Saturday 12 March 2016

एकाच दिवशी एकाच व्यक्तीवर 125 व्याख्याने


 
शिवाजी विद्यापीठाचे डॉ. आंबेडकरांना अनोखे अभिवादन - संलग्न महाविद्यालयात उपक्रम
कोल्हापूर - दिवस एकच, वेळही एकच आणि विशेष म्हणजे एकाच व्यक्तीवर 125 व्याख्याने, असा आगळा-वेगळा उपक्रम शिवाजी विद्यापीठातर्फे आज राबविण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर जयंतीनिमित्त विद्यापीठाशी संलग्नित 125 महाविद्यालयांत डॉ. आंबेडकर यांच्याविषयी व्याख्याने झाली आणि राज्यातील विद्यापीठांमध्ये असा उपक्रम राबविणारे शिवाजी विद्यापीठ पहिलेच ठरले. विद्यापीठाच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण दिन ठरला.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या शतकोत्तर जयंतीनिमित्त विद्यापीठात काय करता येईल, याची माहिती घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. कृष्णा किरवले यांच्याशी चर्चा केल्यानंतर 125 व्याख्याने बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड यांच्या जयंतीदिनी घेण्याचे निश्‍चित झाले. कुलगुरू डॉ. शिंदे यांनी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत त्यासाठी बैठक घेऊन आवाहन केले. सुरवातीला इतके व्याख्याते मिळतील का, असा प्रश्‍न होता. केंद्रातर्फे झालेल्या शोध मोहिमेत नव्या पिढीतील अनेक संशोधकांनी व्याख्याने देण्याची ग्वाही दिली. 60 टक्के ज्येष्ठ व 40 टक्के नवोदित संशोधक असा मेळ साधण्यात आला. डॉ. आंबेडकरांची राजकीय भूमिका कशी होती, असा विषयही व्याख्यानात होता. विद्यापीठाशी संलग्नित 125 महाविद्यालयांची निवड करताना काही महाविद्यालयांतून यादीत नाव नसल्याने विचारणाही झाली. मात्र अशा महाविद्यालयांना व्याख्याने घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. संचालक डॉ. किरवले म्हणाले, ‘आजचा दिवस विद्यापीठाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल. घटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्याने घेण्यासाठी कुलगुरू डॉ. शिंदे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी केलेल्या आवाहनाला महाविद्यालयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यामुळेच एकाच दिवशी 125 व्याख्याने घेणे शक्‍य झाले.‘‘

पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता
विशेष म्हणजे विषयांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली. संशोधकांचे विषय पाहण्यात आले. सामाजिक, शिक्षण, तत्त्वज्ञान, भारतीय संविधान, अर्थशास्त्र आदी विषयांतील डॉ. आंबेडकर यांची भूमिका यासंबंधीचे विषय निवडण्यात आले.

(दै. सकाळ (कोल्हापूर)च्या सौजन्याने)

No comments:

Post a Comment