Thursday 10 March 2016

दिवस सामंजस्य करारांचा!



दक्षिण कोरियातील चोन्नम राष्ट्रीय विद्यापीठ आणि धातू तंत्र प्रबोधिनी यांच्यासमवेत
शिवाजी विद्यापीठाचे दोन महत्त्वपूर्ण करार


कोल्हापूर, दि. १० मार्च: शिवाजी विद्यापीठाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांचा ठरला. विद्यापीठाने आज दक्षिण कोरिया येथील चोन्नम राष्ट्रीय विद्यापीठ आणि धातू तंत्र प्रबोधिनी, कोल्हापूर या दोन महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांशी सामंजस्य करार केले.
शिवाजी विद्यापीठाचा विद्यापीठ-उद्योग समन्वय कक्ष (युनिव्हर्सिटी-इंडस्ट्री इंटरॅक्शन सेल) आणि दक्षिण कोरियातील ग्वांगजू येथील नामांकित चोन्नम राष्ट्रीय विद्यापीठातील 'लिंक' (लीडर्स इन इंडस्ट्रीय-युनिव्हर्सिटी को-ऑपरेशन) या उपक्रमासाठी सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनो सायन्स ॲन्ड टेक्ननॉलॉजीच्या सभागृहात हा करार झाला. 'लिंक' हा दक्षिण कोरिया सरकारचा महत्त्वाचा उपक्रम असून त्याअंतर्गत चोन्नम विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर देशांतील उद्योग-व्यवसायांशी बिझनेस टाय-अप्स, तंत्रज्ञान आदान प्रदान, बिझनेस जॉइंट व्हेंच्युअर तसेच संशोधन व विकास आदी स्तरांवर सहकार्य संबंध प्रस्थापित करणे अपेक्षित आहे. चोन्नम विद्यापीठाचा शिवाजी विद्यापीठाशी झालेला आजचा सामंजस्य करार हा प्रामुख्याने कोरियन उद्योग व भारतीय उद्योगांमधील सहकार्य वृद्धीशी निगडित आहे. भारतीय विद्यापीठाशी अशा प्रकारे होणारा हा देशातील पहिलाच सामंजस्य करार आहे, हे याचे वैशिष्ट्य आहे.
या प्रसंगी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या शिष्टमंडळाने गेल्या महिन्यात दक्षिण कोरियास भेट दिली होती. त्यावेळी चोन्नम विद्यापीठातील 'लिंक' या अभिनव उपक्रमाची माहिती घेता आली. त्यामुळे असा प्रकल्प भारतात राबविता येईल का, याविषयी प्रकल्प प्रमुख प्रा. कीम यांच्याशी बोलणे झाले होते. त्यामुळे हा करार त्या भेटीचे फलित आहे, असे म्हणता येईल. या कराराअंतर्गत ही दोन्ही विद्यापीठे आपापल्या देशांतील उद्योगांमध्ये विश्वासार्हता निर्माण करून एकत्र आणण्याची महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. यामुळे विद्यापीठ परिक्षेत्रातील उद्योगांना दक्षिण कोरियातील ६५०हून अधिक प्रमुख उद्योगांशी संवाद व सहकार्य संबंध प्रस्थापित करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कोल्हापूरच्या उद्योजकांना दक्षिण कोरियातील अद्यावत संशोधन व विकास सुविधांचा लाभ घेण्याची संधी मिळेल, ही महत्त्वाची बाब आहे.
सीआयआयचे दक्षिण महाराष्ट्र चेअरमन उद्योजक मोहन घाटगे यांनी शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांच्यातील सुसंवाद वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने हा सामंजस्य करार अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला. कोल्हापूर आणि परिसरातील उद्योजकांचा या कराराला पूर्ण पाठिंबा राहील, अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली.
यावेळी चोन्नम विद्यापीठातील लिंक प्रकल्पाचे प्रा. योंग ह्यूएन जेऊंग आणि पदार्थवैज्ञानिक प्रा. सँग-वॅन रियू उपस्थित होते. सामंजस्य करारावर प्रा. जेऊंग आणि प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी स्वाक्षरी केल्या. विद्यापीठ-उद्योग समन्वय कक्षाचे समन्वयक डॉ. एस.एस. कोळेकर यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. ए.व्ही. घुले यांनी आभार मानले. या प्रसंगी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, उद्योजक सचिन मेनन, रणजित शाह, सचिन शिरगावकर, सोहम शिरगावकर, योगेश कुलकर्णी, वैभव नाईक, यतीन जनवाडकर, प्रसाद गुळवणी, सुनील काळे, किरण पाटील, मनोज लक्ष्मेश्वर, गिरीश वझे यांच्यासह डॉ. सी.डी. लोखंडे, डॉ. पी.एस. पाटील, डॉ. ए.के. साहू, डॉ. ए.एम. गुरव, डॉ. एस.बी. सादळे, डॉ.एम.एम. लेखक आणि डॉ. एन.जी. देशपांडे उपस्थित होते.

'धातू तंत्र प्रबोधिनीशी करार महत्त्वाचा'

आज दुपारी येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिवाजी विद्यापीठ आणि धातू तंत्र प्रबोधिनी यांच्यात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.
या सामंजस्य करारामुळे कोल्हापूरमधील फौंड्री उद्योगाशी निगडित संशोधन आणि विकास कार्याबाबतच्या अनेक समस्या मार्गी लागतील, तसेच नवसंशोधनास चालना मिळण्याच्या दृष्टीने हा करार महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केला. या कराराअंतर्गत दोन्ही संस्थांदरम्यान संयुक्त संशोधन प्रकल्प, प्रयोगशाळा सुविधांचे आदानप्रदान, रोजगार संधी उपलब्ध होणेसाठी सहकार्य वृद्धिंगत करण्यास चालना देण्यात येणार आहे.
करारावर संचालक मंडळाचे चेअरमन किरण पाटील आणि प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी डॉ.ए.एम. गुरव यांनी स्वागत केले. समीर पारीख यांनी प्रास्ताविक केले, तर एस.एम. मांडरे यांनी आभार मानले. यावेळी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रशांत पट्टलवार यांच्यासह धातू तंत्र प्रबोधिनीचे संचालक मंडळ, शिक्षक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment