Wednesday 11 May 2016

अमोघ थोरात यांचे यश स्पर्धा परीक्षार्थींना प्रेरक : कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे




शिवाजी विद्यापीठाच्या सेवापूर्व मार्गदर्शन केंद्राचे अमोघ थोरात विद्यार्थी

कोल्हापूर, दि. ११ मे: शिवाजी विद्यापीठाच्या सेवापूर्व मार्गदर्शन केंद्राचे विद्यार्थी अमोघ थोरात यांनी युपीएससी परीक्षेत ९६६व्या क्रमांकासह यश संपादन केल्याबद्दल कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज सकाळी त्यांचा अभिनंदनपर सत्कार केला. सर्वसाधारण परिस्थितीतून मोठे यश संपादन करणाऱ्या अमोघ यांचे यश विद्यापीठात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार डॉ. शिंदे यांनी काढले.
विद्यापीठाच्या सेवापूर्व मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ. जगन कराडे यांच्यासह अमोघ थोरात यांनी आज सकाळी कुलगुरू डॉ. शिंदे यांची त्यांच्या दालनात सदिच्छा भेट घेतली. कुलगुरू डॉ. शिंदे यांनी अमोघ यांच्याविषयी आपुलकीने चौकशी केली. त्यावेळी 'माझ्या यशामध्ये विद्यापीठाच्या सेवापूर्व मार्गदर्शन केंद्राच्या मार्गदर्शनाचा महत्त्वाचा वाटा असून त्याव्यतिरिक्त आपण अन्यत्र कोठेही मार्गदर्शनासाठी धावपळ न करता सारा अभ्यास घरीच केला. सन २०१०पासून आतापर्यंत अगदी एक ते सहा गुणांच्या फरकाने माझे युपीएससीमधील गुणांकन हुकले. पण, संयम राखून सातत्यपूर्ण प्रयत्नांनी हे यश साध्य करता आल्याचा आनंद मोठा आहे.' अशी भावना अमोघ यांनी व्यक्त केली.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी विद्यापीठातर्फे शाल, स्मृतिचिन्ह व राजर्षी शाहू महाराज यांचा चरित्रग्रंथ भेट देऊन अमोघ यांचा सत्कार केला. राजर्षींप्रमाणे सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय कामकाज करण्याची प्रेरणा मिळत राहावी, यासाठी हा चरित्रग्रंथ सदैव सोबत बाळगावा, अशी सूचनाही कुलगुरूंनी यावेळी त्यांना केली.
यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ. जगन कराडे, उपकुलसचिव संजय कुबल, उपकुलसचिव जी.एस. राठोड आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment