Thursday 26 May 2016

शिवाजी विद्यापीठास रोटरी समाज सेवा पुरस्कार प्रदान



पुरस्काराची उंची वाढली: श्रीनिवास मालू




कोल्हापूर, दि. २६ मे: दक्षिण महाराष्ट्राचे एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र असलेल्या शिवाजी विद्यापीठाला 'रोटरी समाज सेवा पुरस्कार' प्रदान करण्यात आल्याने खरे तर या पुरस्काराचीच उंची वाढली आहे, असे गौरवोद्गार रोटरी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर श्रीनिवास मालू यांनी आज येथे काढले.
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि रोटरी समाजसेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठास 'रोटरी समाज सेवा पुरस्कार २०१५-१६' श्री. मालू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मानपत्र, ५१ हजार रुपयांचा धनादेश, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. राजाराम महाविद्यालयाच्या श्री. यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम झाला.
यावेळी विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, ग्रंथपाल डॉ. नमिता खोत उपस्थित होते.
श्री. मालू यांनी शिवाजी विद्यापीठाने गेल्या ५० वर्षांत या विभागाच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले, रोटरी गेल्या दहा वर्षांपासून समाज सेवा पुरस्कार देत आहे. त्यामध्ये समाजाच्या विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना गौरविण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठानेही आपल्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत ठेवला. राज्यात सर्वाधिक सीजीपीए गुणांकनासह नॅकचे '' मानांकन, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एनआयआरएफ रँकिंगमध्ये देशात २८वे, तर राज्यात अकृषी विद्यापीठांत पहिले स्थान पटकावण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी विद्यापीठाने बजावली. ती या विद्यापीठावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. आपल्या ग्रामीण विभागाच्या प्रगती व उन्नतीमधील विद्यापीठाचे योगदान लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी यंदा विद्यापीठाची निवड करण्यात आली.
शिवाजी विद्यापीठाच्या वतीने पुरस्कार स्वीकारून कुलगुरू डॉ. शिंदे यांनी विद्यापीठाच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणारे शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, संलग्नित महाविद्यालये, संबंधित घटक आणि विद्यापीठावर प्रेम करणारे नागरिक या सर्वांना हा पुरस्कार समर्पित करीत असल्याचे सांगितले. शिवाजी विद्यापीठाला गेल्या ५० वर्षांत प्रदान करण्यात आलेला हा पहिलाच समाजसेवा पुरस्कार असल्याने याचे मोल खूप मोठे असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एनआयआरएफ रँकिंगच्या निर्धारणामध्ये विविध समाजघटकांत विद्यापीठाबद्दल काय भावना आहे, काय मत आहे, यासाठी १०० गुण होते. त्यात शिवाजी विद्यापीठाला ९० गुण मिळाले. रोटरीच्या समाज सेवा पुरस्कारामुळे या गोष्टीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे, याचा विशेष आनंद आहे.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी रोटरीच्या निरपेक्ष भावनेतून सद्भावना निर्मितीच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. 'मी'पणा सोडून 'आम्ही'पणाची भावना रुजविण्याबरोबरच रोटरीची समाजाप्रती समर्पणाची भावना खूप महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. प्रेमाची भाषा जगभर विकसित करणारी रोटरी आता केवळ संस्था राहिली नसून एक चळवळ, प्रवाह बनली आहे, असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले.
यावेळी रोटरी समाजसेवा केंद्राचे अध्यक्ष रामप्रताप झंवर यांनी केंद्राच्या उपक्रमांची माहिती दिली. प्रशांत मेहता यांनी मनोगत व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष मोहनभाई पटेल व जितेंद्र पार्टे यांनी स्वागत केले. अजिंक्य कदम यांनी प्रास्ताविक केले. डॉ. क्रांतीकुमार पाटील यांनी परिचय व मानपत्राचे वाचन केले. हरिषचंद्र शर्मा यांनी आभार मानले. मनिषा झेले यांनी सूत्रसंचालन केले.

No comments:

Post a Comment