Thursday 19 May 2016

'आयजीटीआर'च्या सहकार्याने औद्योगिक व्यवस्थेस पूरक मनुष्यबळ पुरविणार : कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे




शिवाजी विद्यापीठ आणि आयजीटीआर, औरंगाबाद यांच्यात सामंजस्य करार

कोल्हापूर दि. 17 मे: इंडो जर्मन टूल रुम, औरंगाबाद यांच्या सहकार्याने विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील तिन्ही जिल्ह्यांमधील औद्योगिक व्यवस्थेस पूरक मनुष्यबळ पुरविण्याचे प्रयत्न सामंजस्य कराराच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ.देवानंद शिंदे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन सभागृहामध्ये विद्यापीठ आणि औरंगाबाद येथील आयजीटीआर या संस्थेमध्ये झालेल्या सामंजस्य करार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बीसीयुडी संचालक डॉ.डी.आर.मोरे, प्र.कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, डॉ.अजित थेटे, डॉ.अजित थेटे, डॉ.जी.एस.कुलकर्णी, गोपाळ बेलूरकर आदी उपस्थित होते.
कुलगुरु डॉ. शिंदे म्हणाले, भविष्यामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स विद्यापीठामध्ये उभारले जाणार आहे. आयजीटीआर, औरंगाबाद यांच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठीचे आवश्यक ते शिक्षण विद्यापीठामध्ये दिले जाईल. त्याचे प्रशिक्षण आयजीटीआर, औरंगाबाद येथे विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही दिले जाणार आहे. उद्योग व्यवस्थेनेही कोणत्या क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे हे विशद करणे आवश्यक आहे. यासाठी उद्योजकांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या भागातील विद्यार्थ्यांना तशा प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध होईल.
          इंडो जर्मन टूल रुम औरंगाबादचे व्यवस्थापकीय संचालक हेमंत कापसे यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य उद्योजक यांना आयजीटीआर, औरंगाबाद या संस्थेचे कार्य प्रेझेंटेशनद्वारे सादर केले. हेमंत कापसे पुढे म्हणाले, उद्योग क्षेत्रास कुशल मनुष्यबळ पुरविणे हा या कराराचा एक भाग असून उद्योगक्षेत्रामध्ये नवतंत्रज्ञानामुळे सातत्याने होणारे बदल हे तळागाळातील लोकांपर्यंत आवश्यकतेप्रमाणे पोहचविण्याचे कार्य केले जाईल. आयजीटीआरचे केंद्र तसेच विद्यापीठातील संशोधकांसाठी औरंगाबाद येथे प्रगत संशोधनाची सोय उपलब्ध होणार आहे. शिवाजी विद्यापीठ आणि आयजीटीआर, औरंगाबाद यांच्या एकत्रित प्रयत्नातून येथील विद्यार्थ्यांना विविध तंत्रकौशल्य आत्मसात करण्याच्या संधी उपलब्ध होणार आहे. तसेच, या प्रयत्नातून उद्योगांच्या आवश्यकतेप्रमाणे कमी कालावधीचे सर्टिफिकेट कोर्सेस प्रशिक्षणार्थींना उपलब्ध होणार आहे.
           या वेळी अनेक उद्योजकांनी कुशल प्रशिक्षणार्थीची अत्यंत निकड असल्याचे सांगून संबंधि विषयांवर चर्चा केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योग तंत्रसंस्था आंतर क्रिया कक्षाचे समन्वयक हर्षवर्धन पंडित यांनी केले. तर आभार मेकॅनिकल इंजिनिअरींगचे समन्वयक अजित कोळेकर यांनी मानले. या प्रसंगी विविध अभियांत्रिकी विभागाचे समन्वयक, शिक्षक उद्योजक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment