Saturday 4 June 2016

'ग्यान' उपक्रमास सोमवारी विद्यापीठात प्रारंभ




म्युझियम कॉम्प्लेक्सचे भूमीपूजन, तंत्रज्ञान वर्कशॉपचे उद्घाटन होणार;
मंत्री विनोद तावडे, चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती

कोल्हापूर, दि. ४ जून: केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे पुरस्कृत ग्लोबल इनिशिएटीव्ह ऑफ ॲकेडेमिक नेटवर्क्स (ग्यान) या उपक्रमाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठात येत्या सोमवारी (दि. ६ जून) राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठाचे डॉ. व्यंकटेश मेरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. विद्यापीठाच्या म्युझियम कॉम्प्लेक्स इमारतीचे भूमीपूजन आणि तंत्रज्ञान अधिविभागाच्या वर्कशॉपचे उद्घाटनही या प्रसंगी मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सोमवारी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या राजर्षी शाहू (सिनेट) सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, जागतिकीकरणाच्या अनुषंगाने उच्च शिक्षणामध्ये आमुलाग्र बदल घडत आहेत. या पार्श्वभूमीवर आपले विद्यार्थी जगाच्या पातळीवर ताठ मानेने उभे राहावेत, असा आग्रह असणे हे स्वाभाविकच आहे.  भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने (एमएचआरडी) यासाठीच ग्लोबल इनिशिएटीव्ह ऑफ ॲकेडेमि नेटवर्क्सची (GIAN) सुरुवात केली आहे. जगाच्या पाठीवर वैज्ञानिक, शिक्षक आणि उद्योजक यांना भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेत अल्पकालीन प्रशिक्षणासाठी आमंत्रित करणे हा ग्यान योजनेचा उद्देश आहे. २९ जून, २०१४ या दिवशी सर्व आयआयटीज् च्या बैठकीमध्ये माननीय मनुष्यबळ विकासमंत्री श्रीमती स्मृती इराणी यांनी 'ग्यान'ची घोषणा केली. 'ग्यान'च्या पहिल्या टप्प्यामध्ये नामांकित आयआयटी, आयआयएम व नॅक '' मानांकित विद्यापीठे अशा शैक्षणिक व संशोधनाचा आलेख उच्च प्रतीचा असणाऱ्या शैक्षणिक संस्थांना समाविष्ट करण्याचे ठरले. आयआयटी, खरगपूर 'ग्यान'साठी नोड एजन्सी म्हणून काम पाहत आहे. 'ग्यान'च्या अंतर्गत निवडल्या गेलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये वेगवेगळ्या देशातील शिक्षक वैज्ञानिकांनी एक किंवा दोन आठवड्यांचे प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी, शिक्षक संशोधक सहभागी होणार आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक संशोधनातील कार्यामुळेच विद्यापीठाला 'ग्यान'अंतर्गत सात अभ्यासक्रम मंजूर झाले असून ही या विद्यापीठाची जागतिकीकरणाच्या दिशेने सुरु झालेल्या घोडदौडीची नांदी आहे. अत्यंत कमी कालावधीत इतक्या मोठ्या प्रमाणात अभ्यासक्रम मंजूर होणारे शिवाजी विद्यापीठ देशातील एकमेव विद्यापीठ आहे. या उपक्रमांतर्गत येत्या ६ ते ११ जून २०१६ या कालावधीत मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटनपर बीजभाषण अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठाचे डॉ. व्यंकटेश मेरवाडे या प्रसंगी करतील. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 'भौगोलिक माहिती प्रणाली (जी.आय.एस.) व जलस्रोतांचे व्यवस्थापन' असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.
याच बरोबर विद्यापीठाच्या प्रौढ निरंतर शिक्षण विभागासमोरील जागेवर म्युझियम कॉम्प्लेक्स इमारत उभारण्यात येणार आहे. तिचे भूमीपूजन मा. मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे तंत्रज्ञान अधिविभागाच्या आधुनिक वर्कशॉपचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहितीही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी दिली.
या वेळी विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, तंत्रज्ञान अधिविभागाचे प्रभारी संचालक डॉ. जी.एस. कुलकर्णी, नॅनो-सायन्स व तंत्रज्ञान अधिविभागाचे प्रमुख डॉ. पी.एस. पाटील, 'ग्यान'चे समन्वयक डॉ. आर.के. कामत, संयोजक डॉ. पी.डी. राऊत, अभ्यासक्रम समन्वयक डॉ. एस.एस. पन्हाळकर आदी उपस्थित होते.

'ग्यान' व्याख्यानांचे लाइव्ह वेबकास्टींग
'ग्यान' उपक्रमांतर्गत अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील डॉ. व्यंकटेश मेरवाडे यांची दि. ६ जून ते ११ जून २०१६ या कालावधीत व्याख्याने होणार आहेत. या सर्व व्याख्यानांचे लाइव्ह वेबकास्टींग करण्यात येणार आहे. त्यामुळे निवडक सहभागी विद्यार्थ्यांच्या बरोबरीनेच इतर इच्छुकांनाही त्यांच्या व्याख्यानांचा लाभ घेता येणार आहे. http://cloud.india.com/shivaji-university या लिंकच्या माध्यमातून हे वेबकास्टींग होणार आहे, अशी माहिती 'ग्यान' समन्वयक डॉ. आर.के. कामत यांनी दिली.

No comments:

Post a Comment