Wednesday 29 June 2016

राष्ट्र इतिहासाची निर्मिती अभिलेखांच्या माध्यमातूनच: डॉ. भास्कर धाटावकर




Dr. Bhaskar Dhatavkar

'तत्त्वबोध' मालिकेअंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात
कोल्हापूर, दि. २९ जून: राष्ट्राच्या इतिहासाची निर्मिती ही अभिलेखांच्या माध्यमातूनच होत असते. त्यामुळे अभिलेखांचे जतन ही इतिहासाच्या दृष्टीने अतिमहत्त्वाची बाब आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेखागाराचे संचालक डॉ. भास्कर धाटावकर यांनी आज येथे केले. कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनाचे केंद्र बनते आहे, याविषयीही त्यांनी समाधान व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालय संचलित व नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रीप्ट संलग्नित मॅन्युस्क्रीप्ट रिसोर्स सेंटर यांच्या वतीने 'तत्त्वबोध' मालिकेअंतर्गत आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत 'राष्ट्रीय इतिहासामध्ये अभिलेखाचे महत्त्व' या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. राजर्षी शाहू (सिनेट) सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
डॉ. धाटावकर म्हणाले, इतिहास हा सोयीचा, आपल्याला आवडेल असा किंवा आपल्याला हवा तसा लिहीणे चुकीचे आहे. तो वस्तुनिष्ठच असला पाहिजे. इतिहास ही राष्ट्राची स्मृती आहे. इतिहास घडविण्यासाठी इतिहासाची जाणीव असणे आवश्यक आहे. त्यासाठी अभिलेख पाहण्याची संशोधकांची मानसिकता असली पाहिजे. ऐतिहासिक दस्तावेजांशी, अभिलेखांशी संशोधकाने अक्षरशः बोलले पाहिजे, इतकी जवळीक निर्माण झाली, तरच त्यातून वस्तुनिष्ठ इतिहासाच्या मांडणीला पूरक पुरावे संशोधक निर्माण करू शकतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. ज्या राष्ट्रात अभिलेख असत नाहीत, त्या राष्ट्राला इतिहास असूच शकत नाही, असेही ते म्हणाले.
भविष्यात ज्या नोंदी पुरावा ठरू शकतात, त्यांना अभिलेख मानले जाते, असे सांगून अभिलेखाचे महत्त्व स्पष्ट करताना डॉ. धाटावकर यांनी सम्राट अशोक, राजर्षी शाहू यांचा जन्मदिनांक, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिनांक यांच्या निश्चितीची उदाहरणे दिली. ते म्हणाले, सम्राट अशोकाविषयी सन १८३२ पर्यंत आपल्याला माहिती नव्हती. एका ब्रिटीश अभ्यासकामुळे तत्कालीन सिलोनमध्ये सम्राट अशोकाविषयी माहिती मिळू शकली. एका बौद्ध भिक्खूच्या मदतीने त्याने पाली भाषेतील व ब्राह्मी लिपीतील 'महावंश' या ग्रंथाचा अभ्यास केला, त्यातून आपल्याला महान अशोकाविषयी प्राथमिक माहिती होऊ शकली. हे अभिलेखाचे महत्त्व आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी शाहू यांच्या वाढदिवसानिमित्त 'मूकनायक'चा विशेषांक प्रसिद्ध करण्याविषयी राजर्षींना लिहीलेल्या पोस्टकार्डाने २६ जून ही राजर्षींची जन्मतारीख निश्चित करण्यात निर्णायक भूमिका बजावल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची १९ फेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख निश्चित करण्यामध्ये बिकानेर पुराभिलेखागारामधील अभिलेखांनी कळीची भूमिका बजावल्याचेही त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे  यांनी अध्यक्षीय भाषणात मॅन्युस्क्रीप्ट रिसोर्स सेंटरच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, दहा हजारांहून अधिक मोडी हस्तलिखितांचा ठेवा जतन करणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. तत्त्वाचा शोध आणि बोध घेण्यासाठी मॅन्युस्क्रीप्ट रिसोर्स सेंटर हे महत्त्वाचे साधन आहे. राज्यात अशा प्रकारची केवळ पाच सेंटर आहेत. इतिहास संशोधकांनी या व्यवस्थेचा लाभ घ्यायला हवा. त्यातून नवसंशोधनासाठीचे अनेक नवे संदर्भही सामोरे येण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते ज्ञानेश्वर प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन झाले. ग्रंथपाल डॉ. नमिता खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपग्रंथपाल डॉ. डी.बी. सुतार यांनी परिचय करून दिला. कॉन्झर्वेशनिस्ट शफीक देसाई यांनी आभार मानले. यावेळी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, डॉ. आर.के. कामत, डॉ. अरुण भोसले, सहाय्यक ग्रंथपाल डॉ. पी.बी. बिलावर यांच्यासह विविध शासकीय ग्रंथालये व महाविद्यालयांचे ग्रंथपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--००--

No comments:

Post a Comment