Monday 29 August 2016

शिक्षणाद्वारे समाज बदलवून टाकण्याचे बाबासाहेबांचे उद्दिष्ट: उत्तम कांबळे





कोल्हापूर, दि. २९ ऑगस्ट: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाचे प्रयोजन हे केवळ पदवी किंवा नोकरी मिळविण्यापुरते मर्यादित नव्हते; तर, समाज बदलवून टाकण्याचे उद्दिष्ट त्यांनी शिक्षण घेताना बाळगले होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत उत्तम कांबळे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण' या विषयावर आयोजित व्याख्यान देताना ते बोलत होते. वि.स. खांडेकर भाषा भवनाच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे होते.
शिक्षणाच्या प्रयोजनाविषयीच आजच्या व्यवस्थेमध्येच संभ्रम असल्याचे आढळून येते, असे सांगून श्री. कांबळे म्हणाले, आयुष्य घडविणे आणि आयुष्य बदलून टाकणे हा कोणत्याही शिक्षणाचा प्रधान हेतू असतो, असला पाहिजे. अशा शिक्षणातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे व्यक्तीमत्त्व घडत असते. क्रमिक अभ्यासक्रमापलिकडे जाऊन संबंधित विषयांचे ज्ञान मिळविण्याची जिज्ञासा व प्रज्ञा बाबासाहेबांनी स्वतःमध्ये विकसित केली. या वाचनातून त्यांना प्रश्न पडत. त्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी ते आणखी वाचत. या प्रक्रियेमधून आपल्याला निरतिशय आनंद व समाधान मिळते, असे बाबासाहेब म्हणत असत. खूप प्रश्न पडणे हे चांगल्या शिक्षणाचे लक्षण आहे. अशा प्रकारे पुस्तकांशी त्यांनी लहानपणापासून जिव्हाळा निर्माण केला, तो अखेरच्या क्षणापर्यंत जपला.
बाबासाहेब जेव्हा विलायतेहून शिक्षण घेऊन परतले, तेव्हा ते या देशातले सर्वाधिक उच्चशिक्षित व्यक्ती होते, असे सांगून श्री. कांबळे म्हणाले, बाबासाहेबांच्या या शिक्षण प्रक्रियेचा मुळापासून अभ्यास केल्यास त्यामध्ये त्यांनी मानलेले तीन महागुरू बुद्ध, कबीर आणि महात्मा फुले यांच्यासह त्यांच्या शिक्षणाला दिशा देणाऱ्या त्यांच्या विलायतेतील शिक्षकांचा आणि समकालीन विचारवंतांचाही मोलाचा वाटा राहिला. बाबासाहेबांना कबीराची परंपरा जन्मजात लाभली. विषमतेवर प्रहार करणारा पहिला संत म्हणून हा प्रभाव महत्त्वाचा राहिला. बुद्ध हा असा महान शिक्षक होता, ज्याने आपल्या शिष्यांची कधीही पिळवणूक अथवा शोषण केले नाही. महात्मा फुले यांनी बाबासाहेबांच्या जन्माअगोदरच दलित व महिलांना शिक्षण मिळावे, यासाठी इंग्रज सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून जणू बाबासाहेबांच्या शिक्षणाची पृष्ठभूमी तयार करून दिली. या त्रिगुरूंखेरीज इतिहासतज्ज्ञ जेम्स हार्वे रॉबिन्सन, तत्त्वचिंतक व शिक्षणतज्ज्ञ जॉन ड्युई, जेम्स शॉटवेल, प्रोफेसर सेलिग्मन, प्रोफेसर सिडनेवेब या त्यांच्या विलायतेतील गुरूंच्या विचारांचा मोठा प्रभाव बाबासाहेबांवर पडला. या विचारांची कास त्यांनी सदोदित सोबत बाळगली. त्यांच्या पुढील आयुष्यभरातील कार्यामध्ये त्यांच्या या सर्व गुरूंच्या विचारांची व कार्याची परंपरा प्रतिबिंबित होताना दिसते. या सर्व विद्वानांच्या खांद्यावर बाबासाहेब उभे राहिल्याने साहजिकच त्यांच्या विद्वत्तेची व द्रष्टेपणाची उंची वाढली. या विद्वत्तेच्या जोरावरच भारतीय स्वातंत्र्याची संकल्पना विकसित करण्याचे महत्त्वाचे कार्य बाबासाहेबांनी केले. स्वातंत्र्य व शहाणपणा यांच्यातील परस्परसंबंध अधोरेखित करण्याचे कार्य त्यांच्याइतके कोणीही केले नाही, म्हणूनच भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये त्यांचे योगदान सर्वार्थाने महत्त्वाचे राहिले. भारतीय समाजाची कोणतीही बाब साक्षरतेविना स्वीकारण्याच्या मानसिकतेवर नेमके बोट ठेवण्याचे कार्यही बाबासाहेबांना शक्य झाले, ते केवळ त्यांनी मिळविलेल्या ज्ञानामुळेच, असेही त्यांनी सांगितले. बाबासाहेब आणि त्यांचे गुरू यांच्यामधील संबंधांचे तपशीलवार स्पष्टीकरण श्री. कांबळे यांनी या वेळी केले. बाबासाहेबांच्या अनेकविध पैलूंचा विविधांगांनी अभ्यास होण्याची गरजही त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे म्हणाले, शरीराला जसा सकस आहार आवश्यक असतो, त्याचप्रमाणे शिक्षण हा मन, मेंदू बळकट करणारा सकस आहार आहे. शोषणाची जाणीव करून देऊन त्याविरुद्ध संघर्षाला प्रेरित करते, ते खरे शिक्षण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांकडून अशा शिक्षणाची प्राप्ती अपेक्षित केली होती. आयुष्यभर बाबासाहेबांनी शिक्षण व चिंतनाची जी परंपरा, पद्धती विकसित केली, त्यातून त्यांचा विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन प्रतीत होतो, असे ते म्हणाले.
यावेळी केंद्राचे संचालक डॉ. भगवान माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले; तर विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment