Tuesday 16 August 2016

आयुष्यात किमान एकाला व्यसनापासून परावृत्त करा: अभिनेत्री अदिती सारंगधर





कोल्हापूर, दि. १६ ऑगस्ट: विद्यार्थ्यांनी आयुष्यात किमान एका व्यक्तीला व्यसनांपासून परावृत्त करण्यात यश मिळविले, तरी एक कुटुंब वाचविल्याचे आणि त्याबरोबरच देशसेवेचे मोठे काम केल्याचे समाधान लाभेल, असे मत अभिनेत्री अदिती सारंगधर यांनी आज येथे व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाची राष्ट्रीय सेवा योजना व नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कोल्हापूर जिल्हा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'नशाबंदी युवा मेळाव्या'त प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
अदिती सारंगधर म्हणाल्या, फिल्मी दुनियेत जणू काही सारेच व्यसनांच्या आहारी गेलेले कलाकार असतात, असा सर्वसामान्यांच्या मनात समज असतो. पण, प्रसारमाध्यमांद्वारे काही लोकांची व्यसनी वृत्ती समोर येत असली तरी, या क्षेत्रातही केवळ चांगल्या कामाचे व्यसन असणारे कलाकार असल्यामुळे या क्षेत्राची प्रगती होत आहे, ही गोष्ट मात्र नजरेआड होते. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांनीही वाईट नशापान, व्यसनांपासून दूर राहावे आणि वाचनासारख्या चांगल्या गोष्टींचे व्यसन करावे. आपल्या शेजारीपाजारी असणाऱ्या किंवा संपर्कातला कोणीही व्यसन करताना आढळल्या त्यालाही त्याचे दुष्परिणाम समजावून सांगून परावृत्त करण्याचा प्रयत्न करावा. यातून एकाचे जरी व्यसन सोडविण्यात आपण यशस्वी ठरलो, तरी आयुष्यात खूप काही मिळविल्याचे समाधान लाभेल.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, माणसाला चांगल्या बाबींचे व्यसन अले पाहिजे. जगात जितक्या थोरव्यक्ती होऊन गेल्या, त्यांना त्यांच्या कामाची नेहमीच नशा होती, त्यामुळेच त्यांच्या हातून जगावर प्रभाव टाकणारी कामगिरी होऊ शकली. दुःख आणि व्यसन यांच्यात परस्परसंबंध असल्याचे दिसते. तथापि, दुःखाच्या प्रसंगी व्यक्तीने व्यसनांऐवजी जवळच्या व्यक्तींशी दुःख वाटून घेतल्यास व्यसनापासून दूर राहता येऊ शकते. जगात व्यसनाचे शास्त्रीयदृष्ट्या कोणत्याही प्रकारे समर्थन करता येत नाही. सारे काही मानसिक आहे. एकदा ठरवले की जगात अशक्य असे काहीच नाही.
यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनीही मार्गदर्शन केले. एनएसएसचे सह-समन्वयक सुरेश शिखरे यांनी स्वागत केले. एनएसएस समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. नशाबंदी मंडळाचे कोल्हापूर जिल्हा संघटक सुरेश सकटे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment