Thursday 29 December 2016

सृजनशीलता, उपक्रमशीलता व नाविन्याचा ध्यास ही यशस्वी संशोधनाची त्रिसूत्री: महेश काकडे



शिवाजी विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन प्रकल्प स्पर्धा उत्साहात








कोल्हापूर, दि. २९ डिसेंबर: सृजनशीलता, उपक्रमशीलता आणि नाविन्याचा ध्यास ही यशस्वी संशोधनाची त्रिसूत्री आहे. आयुष्याच्या प्रत्येक बाबतीत तिचा अवलंब केल्यास यश निश्चित मिळेल, असा विश्वास शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी नवसंशोधकांच्या मनात आज जागविला.
शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात आज आविष्कार-२०१६-१७ ही विद्यापीठस्तरीय संशोधन प्रकल्प स्पर्धा पार पडली. स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ राजर्षी शाहू सभागृहात झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे होते.
श्री. काकडे म्हणाले, आविष्कार स्पर्धेची सन २००६मध्ये सुरवात झाली, तेव्हा केवळ स्पर्धकांची संख्या ३५-३६ इतकी अल्प असायची. मात्र आज एक हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होत आहेत, नवनव्या कल्पना, संकल्पना सादर करीत आहेत, ही अत्यंत उत्साहवर्धक बाब आहे. असे उपक्रम हे केवळ कोण्या एका संस्थेसाठी नव्हे, तर संपूर्ण देशातील समाजाच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरत असतात. त्यांचा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी उपयोग होणे आवश्यक आहे. विद्यापीठ सुद्धा संशोधक विद्यार्थी, शिक्षक यांच्यासाठी स्वनिधीतून संशोधनवृत्ती देऊन प्रोत्साहन देत आहे. असे उपक्रम आणि स्पर्धा यांच्या माध्यमातून स्पर्धकांच्या एकूणच व्यक्तीमत्त्वामध्ये सकारात्मक बदल घडून येत असेल, तर ते खरे यश आहे, असे म्हणता येईल.
अध्यक्षीय भाषणात बीसीयुडी संचालक डॉ. मोरे म्हणाले, पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीला चालना देणे हा आविष्कार स्पर्धेच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. स्पर्धेला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता हा हेतू साध्य करण्याच्या दिशेने योग्य वाटचाल सुरू असल्याचा विश्वास मिळतो. पण, त्याचवेळी संशोधन प्रकल्पांची संख्या आणि त्यांचा दर्जा यांमधील असंतुलन, दरी कमी करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
यावेळी आविष्कारचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव यांनी प्रास्ताविक केले. गेल्या तीन दिवसांत २६ डिसेंबरापासून अनुक्रमे कोल्हापूर, सांगली व सातारा येथे जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धा झाल्या. त्यामध्ये प्रत्येकी सरासरी तीनशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले. आजच्या विद्यापीठस्तरीय स्पर्धेत २५०हून अधिक स्पर्धक सहभागी झाल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी सहभागी स्पर्धक, टीम लीडर व परीक्षक यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. मोनाली खाचणे यांनी आभार मानले. विशाल ओव्हाळ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी बीसीयुडी संचालक डॉ. मोरे व श्री. काकडे यांच्या हस्ते स्पर्धेचे पुरस्कार वितरण करण्यात आले.
दरम्यान, आज सकाळी लोककला केंद्रात परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांच्या हस्ते फीत कापून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटने स्पर्धेचे संयोजन केले.

No comments:

Post a Comment