Thursday 13 April 2017

‘रयत’ ही कर्मवीरांची शैक्षणिक प्रयोगशाळा: डॉ. एन.डी. पाटील


शिवाजी विद्यापीठाचा 'प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार' कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेच्या वतीने स्वीकारताना चेअरमन डॉ. अनिल पाटील व माजी चेअरमन डॉ. एन.डी. पाटील. शेजारी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्राचार्य डॉ. बी.ए. खोत.


रयत शिक्षण संस्थेस शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार प्रदान

कोल्हापूर, दि. १३ एप्रिल: कोणताही शिक्षणग्रंथ न वाचता शिक्षण क्षेत्रात नवीन प्रयोगांची नांदी घडविणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे शिक्षणतज्ज्ञांचे महर्षी होते, तर रयत शिक्षण संस्था ही त्यांच्या यशस्वी प्रयोगांची प्रयोगशाळा ठरली, असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत तथा रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन डॉ. एन.डी. पाटील यांनी आज येथे काढले.
शिवाजी विद्यापीठाचा यंदाचा प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थेस आज सकाळी प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
डॉ. अनिल पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. कुलगुरू डॉ. शिंदे यांनी त्यांना पुरस्कार प्रदान केला. रोख १,५१,००० रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील
डॉ. पाटील म्हणाले, कर्मवीरांनी शिक्षणाच्या क्षेत्रात अभूतपूर्व प्रयोग केले. या प्रयोगांमुळे समाजातल्या तळागाळातल्या, गोरगरीब, दलित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील होणे शक्य झाले. खेड्यापाड्यातल्या मातीतली रत्नं त्यांनी गोळा केली आणि त्यांच्या माध्यमातून समतेची रचना केली. रा.कृ. कणबरकर सरांनाही त्यांनी असेच बेळगावहून साताऱ्याला शिवाजी महाविद्यालयात इंग्रजी विभागप्रमुख म्हणून आणले. त्यांना कराडच्या संत गाडगे महाराज महाविद्यालयाचा प्राचार्यही केले. अण्णांचा कणबरकर सरांना साताऱ्याला आणण्याचा निर्णय सरांच्या कारकीर्दीवर दूरगामी परिणाम करणारा ठरला. महाराष्ट्राचे व्यापक कार्यक्षेत्र कणबरकरांना लाभले आणि आपली लेखणी, वाणी बहुजनांच्या उद्धारासाठी वापरून त्यांनी नवी महाविद्यालये आणि विद्यार्थी घडविले. कणबरकर सर अत्यंत नेकदार, सरळमार्गी व सर्जनशील वृत्तीचे व्यक्ती होते. राजर्षी शाहू महाराजांविषयीचा जिव्हाळा हा आम्हा दोघांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा होता, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील म्हणाले, आजवर रयत शिक्षण संस्थेला अनेक पुरस्कार मिळाले, पण, शिवाजी विद्यापीठाकडून प्रदान करण्यात आलेला पुरस्कार आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. कारण या भूमीने आम्हाला कर्मवीर दिला. सन १९०२-०८ या कालावधीत अण्णा कोल्हापुरात जैन बोर्डिंगमध्ये शिकण्यासाठी राहिले होते. तर अखेरचे वर्ष त्यांना राजर्षी शाहू महाराजांसमवेत राजवाड्यातच व्ततित करण्याची संधी लाभली. महात्मा फुले, महात्मा गांधी आणि शाहू महाराज यांना त्यांनी गुरू मानले. आणि त्यांच्या विचारांना कृतीचे स्वरुप देण्यात अण्णा यशस्वी झाले. राजर्षी शाहू महाराजांचे सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी एकत्र वसतिगृह काढण्याचे स्वप्न कर्मवीरांना पुढे पूर्ण केले. म्हणून या भूमीचा हा पुरस्कार महत्त्वाचा आहे.
डॉ. अनिल पाटील
जागतिकीकरणाच्या रेट्यात शिक्षण बदलल्याचे सांगून डॉ. अनिल पाटील म्हणाले, या बदलत्या परिस्थितीमध्ये रयत शिक्षण संस्था आपल्या ध्येयापासून तसूभरही न ढळता आपले शैक्षणिक कार्य करीत आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, कौशल्य विकास, रोजगाराभिमुखता या गोष्टींना या नव-व्यवस्थेत मोठे महत्त्व आले आहे. त्या दृष्टीने शिक्षणक्रमात कालसुसंगत बदल करून विद्यार्थी घडविण्याला रयतचे प्राधान्य आहे. त्याचवेळी विना-अनुदानितसारखी कितीही संकटे आली तरी, आदिवासी, ग्रामीण पाड्यांपर्यंत शिक्षणाची गंगा नेण्याचे व्रत संस्था कधीही सोडणार नाही, याची ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली. शिक्षणाच्या क्षेत्रात मिळकतीनुसार, कॉन्व्हेंट, इंग्लीश मिडियम, मराठी व सेमी-इंग्लीश माध्यम आणि जिल्हा परिषद शाळा अशी नवी चातुर्वण्य व्यवस्था उदयास येते आहे. शिक्षणाचे पावित्र्य टिकविण्यासाठी ही लढाई लढून जिंकण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, रयत शिक्षण संस्थेस प्रदान करण्यात येत असलेला हा पुरस्कार म्हणजे कर्मवीर अण्णांच्या संस्कारांचा सत्कार आहे. कर्मवीरांनी शिक्षण आणि श्रमसंस्काराचे मूल्य समाजमनात खोलवर रुजविले. श्रमसंस्कारातून गरीब, मागास विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण केलेला आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. कित्येत वंचित, शोषित समाजघटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कर्मवीरांचे कार्य हे भारतरत्नाच्या तोडीचे आहे. त्या दृष्टीने कर्मवीर भारतीय नवसमाजाचे रचनाकार होते, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्राचार्य रा.कृ. कणबरकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्राचार्य कणबरकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य बी.ए. खोत यांनी केले. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. अरुण कणबरकर यांनी कणबरकर कुटुंबियांतर्फे मान्यवरांचा सत्कार केला. रसिया पडळकर यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमास विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. एन.जे. पवार, माजी प्र-कुलगुरू डॉ. व्ही.एम. चव्हाण, डॉ. बी.पी. साबळे, श्रीमती शालिनी कणबरकर, पुरस्कार निवड समितीचे सदस्य डॉ. जे.एफ. पाटील, डॉ. भालबा विभुते यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, महाविद्यालयांचे प्राचार्य, रयत शिक्षण संस्थेशी संबंधित शाळा, महाविद्यालयांचे शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment