Tuesday 17 July 2018

समृद्धी टीबीआय फौंडेशनसमवेत

शिवाजी विद्यापीठाचा सामंजस्य करार

समृद्धी टीबीआय फौंडेशनसमवेत सामंजस्य करार प्रसंगी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, समृद्धी फौंडेशनचे मनिष पाटील यांच्यासह (डावीकडून) रेणुका पाटील, ज्योती यादव, डॉ. जयदीप बागी, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. डी.आर. मोरे, डॉ. एस.डी. डेळेकर आणि डॉ. एस.बी. काळे.
 

विद्यार्थ्यांच्या कल्पनांचे उद्योजकीय परिवर्तन करण्यासाठी प्रोत्साहन देणार
कोल्हापूर, दि. १७ जुलै: विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तींचे उद्योगा परिवर्तन करण्यासाठी त्यांना पाठबळ, प्रोत्साहन देणे मार्गदर्शन करणे, यासाठी शिवाजी विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग आणि सांगली येथील समृध्दी टीबीआय फौंडेशन यांच्या दरम्यान आज सकाळी सामंजस्य करार करण्यात आला.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे, प्र- कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ.जयदीप बागी, डॉ. एस.बी. काळे, डॉ. एस.डी. डेळेकर, समृध्दी फौंडेशनच्या संस्थापक सह-संचालक रेणुका पाटील आणि ज्योती यादव यांच्या उपस्थितीत कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि समृद्धी फौंडेशनचे संस्थापक संचालक मनिष पाटील यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या.
या सुविधेमुळे कौशल्य विकास अध्यापनशास्त्राद्वारे रोजगार निर्मिती आणि कुशल उद्योजक निर्माण होणे शक्य होईल. अभियांत्रिकीसह नवसंकल्पनांचे आविष्करण करण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही यामुळे संधीचे एक महत्त्वाचे द्वार खुले होत आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
या कराराअंतर्गत सिंगापूर येथील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, चीनमधील फुदान विद्यापीठ कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संस्था यांच्या समन्वयातून हा नवसंकल्पनांच्या उद्योजकीय परिवर्तनाचा प्रयोग राबविण्यात येणार आहे. नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी निर्माण करणारे कुशल तंत्रज्ञ तयार झाले पाहिजेत, या अनुषंगाने जुगाडफंडा डॉट कॉम या वेबसाईटमार्फत हा उपक्रम समाजापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना प्रोत्साहन देवून नवउद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे मनिष पाटील यांनी यावेळी सांगितले.
विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग यासाठी अधिकृत केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहे. जुगाडफंडा डॉट कॉम या आयटी पोर्टल प्लॅटफॉर्ममार्फत विद्यार्थ्यांना अधिकृत केंद्राशी संपर्क साधता येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment