Monday 9 July 2018

शिवाजी विद्यापीठाचे डॉ.पी.एस.पाटील भारतातील ‘टॉप टेन’ शास्त्रज्ञांमध्ये!


करिअर-३६०च्या सर्वोत्कृष्ट संशोधन अध्यापक पुरस्काराने सन्मानित

Dr. P.S. Patil
कोल्हापूर, दि. ९ जुलै:  शिवाजी विद्यापीठातील पदार्थविज्ञान विभागाचे प्राध्यापक, स्कूल ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे समन्वयक तथा विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील मटेरियल सायन्स विषयाच्या संशोधनात भारतातील सर्वोत्कृष्ट दहा (टॉप टेन) शास्त्रज्ञांमध्ये गणले गेले आहेत. करिअर-३६० या शैक्षणिक संस्थेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार त्यांची ही निवड करण्यात आली. तसेच संस्थेकडून त्यांना या वर्षीचा सर्वोत्कृष्ट संशोधक अध्यापक पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले आहे.
डॉ. पाटील यांनी सौर घट, गॅस सेन्सिंग, सुपरकॅपॅसिटर या क्षेत्रातील संशोधनाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर भरीव कामगिरी केली आहे. प्रा. पाटील व त्यांच्या चमूला सौर घटाची कार्यक्षमता वाढविण्यामध्येही यश आले आहे.
प्रा.पाटील गेली २७ वर्षे मटेरियल सायन्सच्या क्षेत्रात संशोधन कार्य करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४५ विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट प्राप्त केली आहे. आजवर आंतराष्ट्रीय स्तरावर त्यांचे ४३५ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या शोधनिबंधांना १२,००० हून अधिक सायटेशन प्राप्त आहेत. अर्थात, त्यांच्या संशोधन कार्याचा संदर्भ १२,००० हून अधिक संशोधकांनी त्यांच्या शोधनिबंधांमध्ये दिला आहे. त्यांच्या नावावर समाजोपयोगी पाच पेटन्ट्स नोंद आहेत. त्यांचा एच इंडेक्स (h-index) ५६ असून आय टेन इंडेक्स (i -10-index) २८९ इतका आहे. त्यांचे संशोधन लेख ७०  हजारहून अधिक शास्त्रज्ञ तसेच संशोधक विद्यार्थ्यांनी अभ्यासले आहेत. त्यांच्या संशोधन क्षेत्रासंदर्भात त्यांची पाच पुस्तके प्रकाशित आहेत. 
डॉ. पाटील यांना आजवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर फेलोशिप व पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये जर्मनीची डॅड फेलोशिप, इंग्लंडची इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स फेलोशिप, दक्षिण कोरियाची ब्रेन पूल फेलोशिप यांचा समावेश असून शिवाजी विद्यापीठाने त्यांना २०१४ साली गुणवंत  शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले आहे.
त्यांच्या शैक्षणिक व संशोधन कार्याची दखल घेऊन आजवर १९ संस्थांनी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविले आहे. तसेच, त्यांच्या शोधनिबंधांमधील सूक्ष्म पदार्थांच्या छायाचित्रांची नोंद जागतिक स्तरावर घेतली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या जागतिकीकरणाच्या यशस्वी वाटचालीत मानाचा तुरा रोवण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध संस्था व विद्यापीठाशी शैक्षणिक व संशोधन करार करून विद्यापीठातील ५० हून विद्यार्थ्यांना पोस्ट डॉक्टरेटसाठी परदेशी पाठविले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना पदार्थविज्ञान विभागामध्ये पदार्थांच्या गुणविश्लेषणासाठी लागणाऱ्या उपकरणांची सुविधा उपलब्ध करून देऊन अद्यावत, आधुनिक व प्रशस्त प्रयोगशाळा उभारली आहे. या सुविधांचा विद्यापीठातील व बाहेरील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे.
प्रा. पाटील यांनी आजवर भारत सरकारच्या LIGO, DRDO, INSA, AICTE, DAE - BRNS, DST अशा विविध  संस्थांकडून विद्यापीठातील संशोधन प्रकल्पासाठी २.५० कोटींहून अधिक निधी मंजूर करून आणला आहे.
जपान व इजिप्त या देशांनी मंजूर केलेले दोन आंतरराष्ट्रीय प्रकल्प त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी या स्वतंत्र अधिविभागाची उभारणी करून शिवाजी विद्यापीठाला जागतिक संशोधनात मानाचे स्थान निर्माण करून देण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. सौर ऊर्जा व पवन ऊर्जा यांच्यावर आधारित ऊर्जा तंत्रज्ञान या विभागाचे देखील त्यांनी नेतृत्व केले आहे.
प्रा.पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे बागणी (ता.वाळवा) या छोट्याशा खेडेगावातून आलेल्या डॉ.सावंता माळी या विद्यार्थ्याच्या शोधप्रबंधाला ''जगातील सर्वोत्कृष्ट प्रबंध'' (बेस्ट थेसिस इन द वर्ल्ड) हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांचे मार्गदर्शन लाभलेले जवळपास वीसहून अधिक विद्यार्थी आज अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, दक्षिण कोरिया, जपान, तैवान इ. अनेक देशांत संशोधन करीत आहेत.

कुलगुरू, प्र-कुलगुरूंकडून अभिनंदन
डॉ. पी.एस. पाटील यांना 'करिअर-360'चा पुरस्कार प्राप्त झाल्याचे समजताच कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी त्यांचे आपल्या दालनात बोलावून अभिनंदन केले. डॉ. पाटील यांचे विद्यापीठाच्या मटेरियल सायन्स विषयाच्या संशोधन व विकासामध्ये अत्यंत मोलाचे योगदान असून त्यांनी संशोधकांची मोठी फळी जगाला येथून प्रदान केली आहे. महत्त्वाचे म्हणजे अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतील विद्यार्थ्यांनाही त्यांनी अगदी असामान्यरित्या घडविले आहे, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. शिंदे यांनी काढले.

No comments:

Post a Comment