Wednesday, 10 December 2025

आंतरविद्याशाखीय संशोधनावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक: डॉ. राकेश कुमार शर्मा

शिवाजी विद्यापीठात तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेला प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलताना डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा.

शिवाजी विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलताना डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा. मंचावर (डावीकडून) डॉ. राजीव व्हटकर, डॉ. आण्णासाहेब मोहोळकर, डॉ. दीपक डुबल, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. राजेंद्र सोनकवडे, डॉ. नीलेश तरवाळ आणि डॉ. व्ही.एस. कुंभार.


शिवाजी विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव.

(आंतरराष्ट्रीय परिषदेची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. १० डिसेंबर: आधुनिक कालखंडात आंतरविद्याशाखीय संशोधनाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या दिशेने नवसंशोधकांनी आपल्या संशोधनाची दिशा केंद्रित करावी, असे आवाहन येथील डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी केले.

शिवाजी विद्यापीठात आजपासून फिजिक्स ऑफ मटेरियल्स अँड मटेरियल्स बेस्ड डिव्हाइस फॅब्रिकेशन या विषयावरील पाचव्या तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेला प्रारंभ झाला. परिषदेच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. दीपक डुबल हे या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव अध्यक्षस्थानी होत्या.

कुलगुरू डॉ. शर्मा म्हणाले, मूलभूत पदार्थविज्ञानाने जवळपास सर्वच क्षेत्रे व्यापली आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील बहुतांश उपकरणे ही भौतिकशास्त्रज्ञांनीच संशोधित आणि निर्मित केली आहेत. नॅनो-मटेरियल, फायबर ऑप्टीक्स इत्यादी सूक्ष्मातिसूक्ष्म तंत्रज्ञानाने आज संपूर्ण संशोधन क्षेत्राला वेगळी दिशा प्रदान केली आहे. आंतरविद्याशाखीय संशोधनाच्या शक्यताही मोठ्या प्रमाणात वाढविल्या आहेत. त्यामुळे विविध विद्याशाखांमध्ये ज्ञानाची, संशोधनाची देवाणघेवाण होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे त्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व संशोधन संस्थांसमवेत सहकार्यवृद्धी करणेही अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने आज सर्वच स्तरांवर प्रयत्नांची आवश्यकता आहे.

विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचा अभिमान

यावेळी डॉ. दीपक डुबल यांनी शिवाजी विद्यापीठातील आपल्या विद्यार्थीदशेतील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, जगभरामध्ये मला ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाचा संशोधक, प्राध्यापक म्हणून ओळखतात. तथापि, मी शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी आहे, हीच ओळख मला अधिक भावते. कारण माझ्या व्यक्तीमत्त्वाला प्राथमिक पैलू येथे पडले; मला संशोधक म्हणून घडविणारे शिक्षक येथे भेटले. त्यामुळे जगाच्या पाठीवर कितीही मानसन्मान, पुरस्कार मिळाले, तरी शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी हीच ओळख मिरविण्यात मला अभिमान वाटतो. इथल्या विद्यार्थ्यांनी स्वतःतील क्षमता ओळखून जगभरातील शैक्षणिक, संशोधकीय संधींचा शोध घेतला पाहिजे आणि विद्यापीठाचा लौकिक सर्वदूर पसरविण्यासाठी सिद्ध व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव म्हणाल्या, आजचा काळ आंतरविद्याशाखीय संशोधनाचा असल्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानदृष्टीच्या कक्षा विस्तारल्या पाहिजेत. जीवशास्त्रामधील जवळपास सर्वच जैविक घडामोडींना पदार्थविज्ञानातील सिद्धांतांचा आधार असल्याचे दिसते. उष्मगतिकीशास्त्र (थर्मोडायनॅमिक्स), विद्युतचुंबकीय शास्त्र (इलेक्ट्रोमॅग्नेटिझम्), प्रकाशशास्त्र (ऑप्टीक्स) ही सर्वच भौतिकीय शास्त्रे अनुक्रमे मानवी शरीरामधील तापमान नियंत्रण प्रणाली, हृदय गती, डोळ्यांचे कार्य इत्यादींशी निगडित आहेत. अशी अनेक उदाहरणे देता येऊ शकतील. त्यामुळे या विविध शास्त्रशाखांना एकमेकांपासून वेगळे न मानता आता त्या सर्वांच्या एकत्रीकरणातून उदयास येत असलेल्या नवनव्या ज्ञानशाखांमध्ये संशोधन करण्यास विद्यार्थ्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच डॉ. शर्मा यांच्या हस्ते परिषदेच्या ई-स्मरणिकेचे अनावरण करण्यात आले. डॉ. राजीव व्हटकर यांनी स्वागत केले. डॉ. आण्णासाहेब मोहोळकर यांनी परिचय करून दिला. भौतिकशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नीलेश तरवाळ यांनी परिषदेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. डॉ. व्ही.एस. कुंभार यांनी आभार मानले. परिषदेला ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ डॉ. एस.एच. पवार, डॉ. सी.डी. लोखंडे, डॉ. मानसिंग टाकळे, डॉ. केशव राजपुरे यांच्यासह देशाच्या विविध विद्यापीठांतील शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटन सोहळ्यानंतरच्या पहिल्या तांत्रिक सत्रात ऑस्ट्रेलियातील डॉ. दीपक डुबल यांनी ऊर्जा साठवणुकीच्या नवीन तंत्रज्ञानावर प्रकाश टाकला. म्हैसूर विद्यापीठाच्या डॉ. कृष्णावेणी एस. यांनी आधुनिक उपकरण निर्मिती क्षेत्रातील नवीन प्रवाहांची माहिती दिली. दुपारच्या सत्रात आंध्र प्रदेशातील आदिकवी नन्नया विद्यापीठाचे डॉ. बी. जगन मोहन रेड्डी यांनी संशोधकांशी संवाद साधला. सायंकाळच्या सत्रात 'पोस्टर प्रेझेंटेशन' आयोजित करण्यात आले. यात देशभरातून आलेल्या २०० हून अधिक तरुण संशोधकांनी संरक्षण सज्जता, ग्रीन एनर्जी, सुपरकॅपेसिटर आणि बायो-सेन्सर्स या विषयांवर आपले संशोधन सादर केले. या सादरीकरणाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

उद्या देशविदेशांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन

उद्या (दि. ११) परिषदेत मुंबई विद्यापीठाचे डॉ. पी. बी. सरवदे आणि राजा रामण्णा सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (इंदूर) चे शास्त्रज्ञ पुष्पेन मंडल यांची व्याख्याने होतील. त्याचप्रमाणे आयर्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ लिमरिकचे डॉ. नानासाहेब थोरात, दक्षिण कोरियाच्या चोन्नम नॅशनल युनिव्हर्सिटीचे डॉ. मयूर गायकवाड, जर्मनीच्या कील युनिव्हर्सिटीचे डॉ. अमर पाटील आणि ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्सचे डॉ. एम. पी. सूर्यवंशी हे मटेरियल्स सायन्स आणि त्याचे उपयोजन याविषयी सविस्तर मार्गदर्शन करतील. सायंकाळी सात वाजता विशेष सांस्कृतिक कार्यक्रम होईल.


No comments:

Post a Comment