Monday, 13 April 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय विकासनीतीचे धोरणकर्ते

शिवाजी विद्यापीठातील परिसंवादात सूर

 

शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहांतर्गत आयोजित विशेष परिसंवादात बोलताना डॉ. गिरीष मोरे. मंचावर (डावीकडून) अविनाश भाले, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख आणि डॉ. प्रकाश कांबळे.

शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहांतर्गत आयोजित विशेष परिसंवादात बोलताना डॉ. गिरीष मोरे.

शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहांतर्गत आयोजित विशेष परिसंवादात बोलताना डॉ. गिरीष मोरे.

(परिसंवादाची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. १३ एप्रिल: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने भारतीय विकासनितीचे धोरणकर्ते होते, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहानिमित्त आयोजित परिसंवादात उमटला. सप्ताहांतर्गत आज डॉ. प्रकाश कांबळे यांच्या “वर्तमान उपयुक्त अर्थशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर” या पुस्तकावर विशेष परिसंवाद रंगला.

यामध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉ. गिरीष मोरे आणि सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राचे सहायक संचालक अविनाश भाले यांनी सहभाग घेतला. परिसंवादात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय विकासनीतीचे खरे शिल्पकार म्हणून अधोरेखित केले. अध्यक्षस्थानी मानव्यशास्त्र विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख होते, तर लेखक डॉ. कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

परिसंवादात बोलताना डॉ. गिरीष मोरे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान केवळ सामाजिक किंवा राज्यघटनात्मक क्षेत्रापुरते मर्यादित नसून त्यांनी भारताच्या आर्थिक विकासासाठी ठोस आणि दूरदर्शी धोरणांचा आराखडा तयार केला. या पार्श्वभूमीवर कांबळे यांच्या पुस्तकाने आंबेडकरांच्या आर्थिक विचारांना समकालीन संदर्भ दिला आहे. आंबेडकरांच्या विकासनीतीत शेती आणि उद्योग यांच्यातील समतोलाला विशेष महत्त्व देण्यात आले होते. शेतीतील अतिरिक्त मनुष्यबळ औद्योगिक क्षेत्रात वळवून उत्पादनक्षमतेत वाढ साधण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता. यामुळे ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्थेतील दरी कमी होऊन व्यापक आर्थिक प्रगती साधता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.

आत्मनिर्भरतेवर आधारित अर्थनीती ही आंबेडकरांच्या विचारांची प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचे सांगताना, देशाच्या संसाधनांचा योग्य वापर करून स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था उभी करणे हे त्यांचे ध्येय होते, असे डॉ. मोरे यांनी नमूद केले. आर्थिक लोकशाहीच्या संकल्पनेवर विशेष भर देताना डॉ. मोरे यांनी सांगितले की, प्रत्येक नागरिकाला समान आर्थिक संधी मिळणे, उत्पन्नातील विषमता कमी करणे आणि संसाधनांवर सर्वांचा समान हक्क सुनिश्चित करणे हीच खरी लोकशाही आहे. यासाठी आंबेडकरांनी सातत्याने प्रयत्न केले. राज्य समाजवादाच्या माध्यमातून महत्त्वाच्या उद्योगांचे राष्ट्रीयीकरण आणि सार्वजनिक नियंत्रण यावर त्यांनी भर दिला. मोठ्या उद्योगांमधून निर्माण होणारा नफा समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचावा, यासाठी सरकारची भूमिका निर्णायक असावी. याचबरोबर संपत्ती व संसाधनांचे संतुलित वितरण, सामाजिक न्याय आणि आर्थिक समता यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. खाजगी व सार्वजनिक क्षेत्राचा समतोल साधणारी मिश्र अर्थव्यवस्था हीच आंबेडकरांची विकासाची दिशा असल्याचेही त्यांनी सांगितले. आज बेरोजगारी, वाढती विषमता, ग्रामीण-शहरी दरी इत्यादी आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांची विकासनीती अधिकच महत्त्वाची ठरते. सर्वसमावेशक विकासाचा मार्ग दाखवणारे त्यांचे विचार आजही मार्गदर्शक असल्याचे डॉ. मोरे यांनी नमूद केले.

सहायक संचालक अविनाश भाले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक विचारांचे इतक्या सोप्या आणि सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत केलेले सादरीकरण हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे. अर्थशास्त्रासारखा गुंतागुंतीचा विषयही सामान्य वाचकाला सहज समजेल, अशा पद्धतीने मांडताना लेखकाने बाबासाहेबांच्या विचारांची मूळ गाभा जपला आहे. विशेषतः शेती व औद्योगिक विकासाचा परस्परसंबंध, संशोधनातील बाबासाहेबांची प्रागतिक दृष्टी, ‘लोकल टू ग्लोबल’ असा व्यापक दृष्टिकोन आणि आजच्या धोरणांशी साधलेली सांगड हे या पुस्तकाचे महत्त्वपूर्ण पैलू असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, समावेशकता (Inclusivity) आणि शाश्वतता (Sustainability) हे बाबासाहेबांच्या विकासनीतीचे केंद्रस्थान असून, त्यांची अंमलबजावणी आजच्या परिस्थितीतही शक्य आहे, असा स्पष्ट दृष्टिकोन या पुस्तकातून सामोरा येतो.

लेखक डॉ. प्रकाश कांबळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वातील अर्थशास्त्रज्ञ हा महत्त्वाचा पैलू समाज आणि अभ्यासकांकडून मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित राहिला असून, तो सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हे पुस्तक लिहिले. बाबासाहेबांचे अर्थशास्त्रीय संशोधन, भारताच्या नियोजन प्रक्रियेतले योगदान, वित्तीय समतोल, चलनव्यवस्था, रिझर्व्ह बँकेची संकल्पना, तसेच शेती व औद्योगिक विकासाचा समन्वय या सर्व बाबी आजच्या समस्यांवरही प्रभावी उपाय सुचवतात, असे त्यांनी स्पष्ट केले. आर्थिक विषमता, बेरोजगारी, गरिबी यांसारख्या प्रश्नांची उत्तरे बाबासाहेबांच्या आर्थिक विचारांत दडलेली आहेत, या विश्वासातूनच उपलब्ध विस्तृत साहित्याचा अभ्यास करून ते सोप्या आणि सुबोध पद्धतीने समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे आपण केल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. महादेव देशमुख म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रीय विचारांची सुस्पष्ट, संक्षिप्त आणि संदर्भाधारित मांडणी हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहेअवघ्या १५२ पृष्ठांच्या या पुस्तकात २५ प्रकरणांद्वारे आंबेडकरांचे व्यापक आर्थिक तत्त्वज्ञान प्रभावीपणे उलगडले असून, संशोधनासाठी केवळ समस्या मांडण्यापेक्षा तिचे उपाय सुचवण्याची बाबासाहेबांची दृष्टी विशेष अधोरेखित होते. चलननीती, वित्तीय स्थैर्य, स्वायत्त संस्थांची गरज, तसेच, “रुपयाची समस्याआणि “लहान जमिनींचा प्रश्न आणि त्यावरील उपाययांसारख्या ग्रंथांमधून त्यांनी मांडलेले विचार आजही तितकेच मार्गदर्शक आहेत. समावेशक व मानवी चेहऱ्याचा विकास, शिक्षण-आरोग्य-उपजीविका यांवर आधारित मानवी विकास निर्देशांकाचे महत्त्व आणि बदलत्या अर्थव्यवस्थेत शेतीपासून सेवा क्षेत्राकडे झालेला प्रवास या सर्व बाबींचा संदर्भ देत, आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आजच्या काळातही अत्यंत उपयुक्त ठरते, असा निष्कर्ष त्यांनी मांडला.

यावेळी डॉ. तेजपाल मोहरेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सिद्धांत माने यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. किशोर खिलारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. हरिष भालेराव, डॉ. एल.एन. घाटगे, ए.बी. कांबळे, आनंद खामकर यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment