Friday, 12 December 2025

'लॅब टू फॅब्रिकेशन' मंत्रासह संशोधनाला उद्योगाची जोड देण्याची गरज: 'ॲल्युमिनियम मॅन' भरत गीते

शिवाजी विद्यापीठात ५ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र परिषदेची यशस्वी सांगता

भरत गीते


कोल्हापूर, दि. १२ डिसेंबर: केवळ प्रयोगशाळेतील चार भिंतींच्या आत संशोधन करून थांबणे आता उपयोगाचे नसून त्या संशोधनाचे रूपांतर प्रत्यक्ष उत्पादनात आणि व्यापारात झाले पाहिजे. देशाला खऱ्या अर्थाने स्वावलंबी आणि विकसित बनवण्यासाठी 'ॲकॅडेमिया आणि इंडस्ट्री' यांच्यात थेट संवाद होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पुण्याच्या तरुल इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक आणि भारताचे 'ॲल्युमिनियम मॅन' म्हणून ओळखले जाणारे भरत गीते यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागामार्फत आयोजित तीन दिवसीय "५ व्या आंतरराष्ट्रीय परिषद: फिजिक्स ऑफ मटेरियल्स अँड मटेरियल्स बेस्ड डिव्हाइस फॅब्रिकेशन" (ICPM-MDF-2025) च्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. शुक्रवारी राजर्षी शाहू सिनेट हॉलमध्ये या आंतरराष्ट्रीय परिषदेची मोठ्या उत्साहात सांगता झाली. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रा. राजेंद्र सोनकवडे होते.

यावेळी भारताला ॲल्युमिनियम कास्टिंग आणि फॅब्रिकेशन क्षेत्रात जागतिक स्तरावर नेऊन ठेवणाऱ्या भरत गीते यांनी विद्यार्थ्यांनी संशोधनाचे रूपांतर उद्योगात कसे करावे, याविषयी मार्गदर्शन केले. आपल्या अनुभवाचा दाखला देत त्यांनी विद्यार्थ्यांना 'लॅब टू फॅब्रिकेशन' हा मंत्र दिला. केवळ पेटंट मिळवून न थांबता त्याचे व्यापारीकरण कसे करावे आणि यशस्वी स्टार्टअप्स कसे उभे करावेत, याचे व्यावहारिक धडे त्यांनी दिले.

दरम्यान, आज परिषदेच्या अखेरच्या दिवशी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रगत संशोधनांची सादरीकरणे झाली. सकाळच्या सत्रात दक्षिण अमेरिकेतील चिली येथील डॉ. संतोष नंदी यांनी नॅनो स्ट्रक्चर्समधील अद्ययावत बदलांची माहिती दिली. अध्यक्षस्थानी डॉ. मानसिंग टाकळे होते.

अध्यक्षीय भाषणात डॉ. सोनकवडे म्हणाले, "भौतिकशास्त्र अधिविभाग नेहमीच अशा जागतिक दर्जाच्या उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देत आला आहे. यातूनच उद्याचे शास्त्रज्ञ घडणार आहेत." यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून आयर्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ लिमरिकचे डॉ. नानासाहेब थोरात उपस्थित होते. समन्वयक डॉ. नीलेश तरवाळ यांनी तीन दिवसांच्या कामकाजाचा आढावा सादर केला. डॉ. सत्यजित पाटील यांनी आभार मानले. परिषदेच्या यशस्वितेसाठी खजिनदार डॉ. राजीव व्हटकर, सचिव डॉ. आण्णासाहेब मोहोळकर, डॉ. केशव राजपुरे, डॉ. मानसिंग टाकळे, डॉ. एस. पी. दास, डॉ. एम. आर. वाईकर, डॉ. ए. आर. पाटील यांच्यासह सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

भाऊ पाध्ये अनुभववादी साहित्यिक: प्रा. अविनाश सप्रे

शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन

शिवाजी विद्यापीठात भाऊ पाध्ये यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात बीजभाषण करताना प्रा. अविनाश सप्रे.



शिवाजी विद्यापीठात भाऊ पाध्ये यांच्या 'राडा' या कादंबरीच्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन करताना (डावीकडून) डॉ. नंदकुमार मोरे, प्रा. अविनाश सप्रे, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अनुवादकार गोरख थोरात, चंद्रकांत पाटील आणि डॉ. रणधीर शिंदे

(भाऊ पाध्ये राष्ट्रीय चर्चासत्राची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. १२ डिसेंबर: भाऊ पाध्ये हे मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे अनुभववादी, मानवतावादी लेखक होते. समस्त प्रस्थापित मांडणी व संकेतांना छेद देणारे आणि प्रस्थापित चौकटी झुगारून देत जगण्याचे अराजक मांडणारे लेखन हे त्यांच्या समग्र साहित्यव्यववहाराचे वैशिष्ट्य होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक व समीक्षक प्रा. अविनाश सप्रे यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागातर्फे पी.एम.-उषा योजनेअंतर्गत साठोत्तरी काळातील अग्रगण्य लेखक भाऊ पाध्ये यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भाऊ पाध्ये यांचे वाङ्मय: आकलन आणि पुनर्विचार या विषयावरील दोनदिवसीय चर्चासत्रास आज प्रारंभ झाला. चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात बीजभाषण करताना प्रा. सप्रे बोलत होते. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ कवी, अनुवादक व समीक्षक प्रा. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन झाले.

प्रा. सप्रे यांनी आपल्या बीजभाषणात पाध्ये यांच्या समग्र साहित्याचे चिकित्सक आकलन मांडले. ते म्हणाले, भाऊ पाध्ये यांचे साहित्य समजून घेण्यास प्रचलित वादसंकल्पना अपुऱ्या ठरतात. अत्यंत चौफेर आणि खुलेपणाने, अनुभवाला थेट भिडणारे लेखन भाऊंनी केल्याने ते अनुभववादी लेखक ठरतात. त्यांनी स्वतःच्या लेखनाला कोणतीही प्रचलित संदर्भचौकट स्वीकारली नाही. रचनेपेक्षा विरचनेवर अधिक भर दिला. टोकाचा व्यक्तीवाद टाळून ते समूहाच्या दृष्टीने भोवतालाकडे पाहतात. कृतीप्राधान्यतेबरोबरच आदिम प्रेरणांचे मुक्त आविष्कार त्यांच्या लेखनात आढळतात. आशय, भाषा, विषय यांची असांकेतिकतेसह अनुत्कट शैली असली तरी त्यात कोरडेपणा नाही, हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. वर्गीय जाणीवा समजून घेतानाच त्यापलिकडे जाऊन एका विशिष्ट तटस्थ बिंदूवरुन ते त्याविषयीचे लेखन करतात. त्या अर्थाने ते अवर्गीय आणि व्यापक अंगाने मानवतावादी लेखक ठरतात. त्यांच्या लेखनात कोणताही पूर्वग्रह आढळत नाही. मानवी समाजात अस्तित्वात असलेल्या सर्व विसंगतींसह निर्माण झालेल्या अनेक आवाजांचे मिश्रण त्यांच्या साहित्यात आढळते म्हणून ते वेगळे आणि श्रेष्ठ ठरते. ते समजून घेण्यासाठी भाऊंच्या समग्र साहित्याचे पुनर्वाचन आवश्यक ठरते, असेही सप्रे म्हणाले.

वाचकांची अभिरुची घडविणारा पत्रकार, लेखक

चंद्रकांत पाटील यांनी भाऊ पाध्ये यांच्या सहवासातील अनेक मैत्रीपूर्ण प्रसंगांना उजाळा देऊन त्यामधून त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक अलक्षित पैलू श्रोत्यांसमोर मांडले. ते म्हणाले, लघुनियतकालिक चळवळीला बळ देणारा प्रणेता भाऊ पाध्ये होते. कामगार चळवळीत त्यांचे संपूर्ण आयुष्य गेले. त्यामुळे येथील अधोसंस्कृतीकडे पाहण्याची त्यांची म्हणून एक वेगळी दृष्टी होती. ती दृष्टी पुढे मनोहर ओक, नामदेव ढसाळ यांच्यात आढळते. सिनेमापासून राजकारणापर्यंत विविध विषय त्यांनी पत्रकार, लेखक म्हणून हाताळले. त्याद्वारे सिनेमाविषयी जाणीवा निर्माण करीत असतानाच वाचकांची उच्च अभिरुची त्यांनी घडविली. नवे लेखक त्यांच्या लेखनापासून, शैलीपासून प्रेरणा घेत आहेत, ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, भाऊ पाध्ये यांनी उघड्या डोळ्यांनी, संवेदनशील मनाने भोवताल टिपला आणि तो जसाच्या तसा लिहीला, म्हणून ते लेखन वाचकांना भिडले. त्यांच्या साहित्यात माणसाचे खरे दर्शन घडते, त्याचा विद्यार्थ्यांनी मुळापासून अभ्यास केला पाहिजे.

मान्यवरांच्या हस्ते भाऊ पाध्ये यांच्या राडा या गोरख थोरात अनुवादित हिंदी कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी थोरात यांच्यासह दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी निवड झाल्याबद्दल प्रा. सप्रे यांचा आणि उत्कृष्ट शोधप्रबंध पुरस्कार प्राप्त करणारे डॉ. राजेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. समारंभास डॉ. माया पंडित, डॉ. उदय नारकर, डॉ. श्रीराम पवार, सचिन परब, डॉ. शरद नावरे, डॉ. प्रकाश पवार, डॉ. अवनीश पाटील, डॉ. प्रभंजन माने, डॉ. नीलांबरी जगताप, डॉ. किरण गुरव, अमित नारकर, अवधूत डोंगरे, प्रसाद कुमठेकर यांच्यासह शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Thursday, 11 December 2025

भौतिकशास्त्र आंतरराष्ट्रीय परिषद: दिवस दुसरा

नवसंशोधकांनी नवा ज्ञानप्रवाह निर्माण करावा: डॉ. नानासाहेब थोरात

जर्मनी, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियाच्या शास्त्रज्ञांनी उलगडली संशोधनाची नवी क्षितिजे

शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मार्गदर्शन करताना प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात.


कोल्हापूर, दि. ११ डिसेंबर: संशोधकांनी बहुआयामी ज्ञान संपादन करून विविध ज्ञानशाखांच्या संगमातून नवा ज्ञानप्रवाह निर्माण करण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजेत, असे प्रतिपादन आयर्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ लिमरिक येथील प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागामध्ये सुरू असलेल्या "५ व्या आंतरराष्ट्रीय परिषद: फिजिक्स ऑफ मटेरियल्स अँड मटेरियल्स बेस्ड डिव्हाइस फॅब्रिकेशन"मध्ये उपस्थित संशोधकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी जागतिक स्तरावरील संशोधकांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले आणि नवसंशोधनाच्या क्षितिजांचा उपस्थितांना परिचय करून दिला. आज विविध तांत्रिक सत्रांमध्ये जर्मनी, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया येथील नामवंत शास्त्रज्ञांनी आरोग्य, ऊर्जा आणि प्रगत तंत्रज्ञान या विषयी अत्यंत महत्त्वपूर्ण स्वरुपाचे मार्गदर्शन केले.

आज पहिल्या सत्रात मुंबई विद्यापीठाचे डॉ. पी. बी. सरवदे आणि इंदूर येथील राजा रामण्णा सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीचे शास्त्रज्ञ डॉ. पुष्पेन मंडल यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे डॉ. केशव राजपुरे होते. यावेळी भारतीय संशोधकांनी प्रगत साधनसामुग्री व उपकरणांचा वापर करून देशांतर्गत तंत्रज्ञान विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. मंडल यांनी सांगितले.

दुपारच्या सत्रात आयर्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ लिमरिकचे डॉ. नानासाहेब थोरात आणि दक्षिण कोरियाच्या चोन्नम नॅशनल युनिव्हर्सिटीचे डॉ. मयूर गायकवाड यांनी 'बायो-मटेरियल्स' आणि त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील उपयोजन याविषयी सविस्तर माहिती दिली. अध्यक्षस्थानी डॉ. अण्णासाहेब मोहोळकर होते.

त्यानंतर जर्मनीतील कील युनिव्हर्सिटीचे डॉ. अमर पाटील, ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्सचे डॉ. एम. पी. सूर्यवंशी आणि दक्षिण कोरियाच्या सुंगक्युकवान युनिव्हर्सिटीचे डॉ. रवींद्र बुलाखे यांनी सौर ऊर्जा आणि बॅटरी तंत्रज्ञानातील नवनवीन प्रवाहांची माहिती दिली. तसेच, जपानमधील हिरोशिमा विद्यापीठाचे डॉ. विनायक पारळे यांनी एरोजेल पदार्थांच्या आधुनिक उपयोजनाविषयी मार्गदर्शन केले. डॉ. हेमराज यादव अध्यक्षस्थानी होते. परदेशातील संशोधन संधी आणि आव्हाने याविषयीही या वक्त्यांनी मार्गदर्शन केले. सायंकाळी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राची लोककला आणि परंपरा दर्शविणारी नृत्ये व गायन सादरीकरण झाले.

उद्या परिषदेच्या अखेरच्या दिवशी चिली (दक्षिण अमेरिका) येथील डॉ. संतोष नंदी, पुण्याच्या 'टॉरल इंडिया प्रा. लि.'चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ भरत गीते हे 'संशोधन आणि उद्योग' यावर मार्गदर्शन करतील. त्यानंतर परिषदेचा समारोप होईल.

Wednesday, 10 December 2025

आयात-निर्यात क्षेत्रातील संधींविषयी

शिवाजी विद्यापीठातर्फे कार्यशाळा

शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित आयात-निर्यात कार्यशाळेत बोलताना डॉ. योगेश शेटे. (मंचावर) सलोनी पंडितविषयतज्ज्ञ अक्षय राणेडॉ. रामचंद्र पवारप्रा. पी. डी. उकेसिद्धार्थ पंडित आणि रोहन कांबळे.


कोल्हापूर, दि. १० डिसेंबर: विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाबरोबरच उद्योजकता वृद्धीसाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबविणारे शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र, लेव्हलअप अकॅडमी, कोल्हापूर आणि डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, तळसंदे (कोल्हापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने “लोकल टू ग्लोबल ऑपॉर्च्युनिटीज: एक्स्पोर्ट–इम्पोर्ट” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा काल (दि. ९) डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजच्या सभागृहात झाली. कार्यशाळेला युवकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक अक्षय राणे (EXIM WALA – एक्स्पोर्ट व इम्पोर्ट तज्ज्ञ) यांनी भारतीय युवकांसाठी आयात-निर्यात क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींबाबत सविस्तर माहिती दिली. जागतिक व्यापारातील वाढत्या शक्यता, उद्योगातील आवश्यक कौशल्ये, व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया, परकीय बाजारपेठेतील मागणी यावर त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.

शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार केंद्र आणि कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. रामचंद्र पवार यांनी कौशल्याधिष्ठित शिक्षणाबरोबरच जागतिक पातळीवरील संधींचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी चौफेर ज्ञान घेऊन सुसज्ज व्हायला हवे, असे सांगितले.

कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. पी. डी. उके, प्लेसमेंट ऑफिसर प्रा. योगेश शेटे, लेव्हलअप अकॅडमीचे संचालक सिद्धार्थ पंडित आणि संचालिका सौ. सलोनी पंडित यांनीही विद्यार्थ्यांना रोजगार व उद्योजकतेच्या संधींबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना एक्स्पोर्ट–इम्पोर्ट क्षेत्रातील नव्या दिशा, कौशल्यविकासाच्या संधी आणि जागतिक व्यापारातील करिअर मार्गांविषयी अद्यावत माहिती प्राप्त होण्यास मदत झाली.

 


आंतरविद्याशाखीय संशोधनावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक: डॉ. राकेश कुमार शर्मा

शिवाजी विद्यापीठात तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेला प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलताना डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा.

शिवाजी विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलताना डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा. मंचावर (डावीकडून) डॉ. राजीव व्हटकर, डॉ. आण्णासाहेब मोहोळकर, डॉ. दीपक डुबल, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. राजेंद्र सोनकवडे, डॉ. नीलेश तरवाळ आणि डॉ. व्ही.एस. कुंभार.


शिवाजी विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव.

(आंतरराष्ट्रीय परिषदेची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. १० डिसेंबर: आधुनिक कालखंडात आंतरविद्याशाखीय संशोधनाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या दिशेने नवसंशोधकांनी आपल्या संशोधनाची दिशा केंद्रित करावी, असे आवाहन येथील डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी केले.

शिवाजी विद्यापीठात आजपासून फिजिक्स ऑफ मटेरियल्स अँड मटेरियल्स बेस्ड डिव्हाइस फॅब्रिकेशन या विषयावरील पाचव्या तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेला प्रारंभ झाला. परिषदेच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. दीपक डुबल हे या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव अध्यक्षस्थानी होत्या.

कुलगुरू डॉ. शर्मा म्हणाले, मूलभूत पदार्थविज्ञानाने जवळपास सर्वच क्षेत्रे व्यापली आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील बहुतांश उपकरणे ही भौतिकशास्त्रज्ञांनीच संशोधित आणि निर्मित केली आहेत. नॅनो-मटेरियल, फायबर ऑप्टीक्स इत्यादी सूक्ष्मातिसूक्ष्म तंत्रज्ञानाने आज संपूर्ण संशोधन क्षेत्राला वेगळी दिशा प्रदान केली आहे. आंतरविद्याशाखीय संशोधनाच्या शक्यताही मोठ्या प्रमाणात वाढविल्या आहेत. त्यामुळे विविध विद्याशाखांमध्ये ज्ञानाची, संशोधनाची देवाणघेवाण होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे त्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व संशोधन संस्थांसमवेत सहकार्यवृद्धी करणेही अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने आज सर्वच स्तरांवर प्रयत्नांची आवश्यकता आहे.

विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचा अभिमान

यावेळी डॉ. दीपक डुबल यांनी शिवाजी विद्यापीठातील आपल्या विद्यार्थीदशेतील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, जगभरामध्ये मला ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाचा संशोधक, प्राध्यापक म्हणून ओळखतात. तथापि, मी शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी आहे, हीच ओळख मला अधिक भावते. कारण माझ्या व्यक्तीमत्त्वाला प्राथमिक पैलू येथे पडले; मला संशोधक म्हणून घडविणारे शिक्षक येथे भेटले. त्यामुळे जगाच्या पाठीवर कितीही मानसन्मान, पुरस्कार मिळाले, तरी शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी हीच ओळख मिरविण्यात मला अभिमान वाटतो. इथल्या विद्यार्थ्यांनी स्वतःतील क्षमता ओळखून जगभरातील शैक्षणिक, संशोधकीय संधींचा शोध घेतला पाहिजे आणि विद्यापीठाचा लौकिक सर्वदूर पसरविण्यासाठी सिद्ध व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव म्हणाल्या, आजचा काळ आंतरविद्याशाखीय संशोधनाचा असल्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानदृष्टीच्या कक्षा विस्तारल्या पाहिजेत. जीवशास्त्रामधील जवळपास सर्वच जैविक घडामोडींना पदार्थविज्ञानातील सिद्धांतांचा आधार असल्याचे दिसते. उष्मगतिकीशास्त्र (थर्मोडायनॅमिक्स), विद्युतचुंबकीय शास्त्र (इलेक्ट्रोमॅग्नेटिझम्), प्रकाशशास्त्र (ऑप्टीक्स) ही सर्वच भौतिकीय शास्त्रे अनुक्रमे मानवी शरीरामधील तापमान नियंत्रण प्रणाली, हृदय गती, डोळ्यांचे कार्य इत्यादींशी निगडित आहेत. अशी अनेक उदाहरणे देता येऊ शकतील. त्यामुळे या विविध शास्त्रशाखांना एकमेकांपासून वेगळे न मानता आता त्या सर्वांच्या एकत्रीकरणातून उदयास येत असलेल्या नवनव्या ज्ञानशाखांमध्ये संशोधन करण्यास विद्यार्थ्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच डॉ. शर्मा यांच्या हस्ते परिषदेच्या ई-स्मरणिकेचे अनावरण करण्यात आले. डॉ. राजीव व्हटकर यांनी स्वागत केले. डॉ. आण्णासाहेब मोहोळकर यांनी परिचय करून दिला. भौतिकशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नीलेश तरवाळ यांनी परिषदेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. डॉ. व्ही.एस. कुंभार यांनी आभार मानले. परिषदेला ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ डॉ. एस.एच. पवार, डॉ. सी.डी. लोखंडे, डॉ. मानसिंग टाकळे, डॉ. केशव राजपुरे यांच्यासह देशाच्या विविध विद्यापीठांतील शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटन सोहळ्यानंतरच्या पहिल्या तांत्रिक सत्रात ऑस्ट्रेलियातील डॉ. दीपक डुबल यांनी ऊर्जा साठवणुकीच्या नवीन तंत्रज्ञानावर प्रकाश टाकला. म्हैसूर विद्यापीठाच्या डॉ. कृष्णावेणी एस. यांनी आधुनिक उपकरण निर्मिती क्षेत्रातील नवीन प्रवाहांची माहिती दिली. दुपारच्या सत्रात आंध्र प्रदेशातील आदिकवी नन्नया विद्यापीठाचे डॉ. बी. जगन मोहन रेड्डी यांनी संशोधकांशी संवाद साधला. सायंकाळच्या सत्रात 'पोस्टर प्रेझेंटेशन' आयोजित करण्यात आले. यात देशभरातून आलेल्या २०० हून अधिक तरुण संशोधकांनी संरक्षण सज्जता, ग्रीन एनर्जी, सुपरकॅपेसिटर आणि बायो-सेन्सर्स या विषयांवर आपले संशोधन सादर केले. या सादरीकरणाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

उद्या देशविदेशांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन

उद्या (दि. ११) परिषदेत मुंबई विद्यापीठाचे डॉ. पी. बी. सरवदे आणि राजा रामण्णा सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (इंदूर) चे शास्त्रज्ञ पुष्पेन मंडल यांची व्याख्याने होतील. त्याचप्रमाणे आयर्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ लिमरिकचे डॉ. नानासाहेब थोरात, दक्षिण कोरियाच्या चोन्नम नॅशनल युनिव्हर्सिटीचे डॉ. मयूर गायकवाड, जर्मनीच्या कील युनिव्हर्सिटीचे डॉ. अमर पाटील आणि ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्सचे डॉ. एम. पी. सूर्यवंशी हे मटेरियल्स सायन्स आणि त्याचे उपयोजन याविषयी सविस्तर मार्गदर्शन करतील. सायंकाळी सात वाजता विशेष सांस्कृतिक कार्यक्रम होईल.


Tuesday, 9 December 2025

व्यक्ती, समाज आणि राष्ट्राच्या समृद्धीचा मार्ग संविधानातच: जिल्हाधिकारी अमोल येडगे

शिवाजी विद्यापीठात आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे. मंचावर (डावीकडून) डॉ. प्रकाश पवार, सचिन साळे, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि डॉ. कृष्णा पाटील.

(चर्चासत्राची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. ९ डिसेंबर: व्यक्ती, समाज आणि देशाच्या सर्वांगीण समृद्धीचा मार्ग भारतीय संविधानातूनच जातो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज केले.

शिवाजी विद्यापीठाचे दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र, गांधी अभ्यास केंद्र आणि समाज कल्याण विभाग, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम-उषा योजनेअंतर्गत आयोजित भारतीय राज्यघटना: मूलभूत संरचना सिद्धांताचा विकासया विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव अध्यक्षस्थानी होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी तथा ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात जात, धर्म, वंश, पंथ यांतील भिन्नता असूनही एकात्मता जपण्याचे कार्य भारतीय संविधान करते. असे सक्षम, सर्वसमावेशक आणि मूल्यआधारित संविधान जगात दुर्मिळ आहे. सरनाम्यातील प्रत्येक शब्द हा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी जोडलेला आहे. म्हणून संविधानाचा अभ्यास आणि पालन सर्वांनी केले पाहिजे. संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही मूल्ये प्रत्येक व्यक्तीला सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी आधार देतात. लोकशाही बळकट होण्यासाठी जागृत नागरिक होणे गरजेचे आहे. हर घर संविधानया उपक्रमाला सर्वांनी हातभार लावावा. शाळा स्तरावर संविधानातील कलमे व सरनाम्याचा अर्थ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव म्हणाल्या, नागरिक म्हणून आपण हक्कांची मागणी करत असताना कर्तव्यांची जाणीवही अंगी बाणवली पाहिजे. भारतीय राज्यघटना हा एक जिवंत दस्तऐवज आहे. तिच्या मूलभूत तत्त्वांमध्येच राष्ट्रजीवनाला स्थैर्य, दिशा आणि मूल्याधिष्ठान मिळते.

यानंतरच्या सत्रात लक्ष्मीकांत देशमुख यांनी संविधानाच्या मूलभूत संरचनेच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन केले. भारतीय राज्यघटना ही भारतातील नागरिकांची कवच कुंडले आहेत. नागरिकांनी आदर्श बननेसाठी  संविधान अंगिकारून संविधानातील मूलभूत हक्क, अधिकार व कर्तव्ये याचे पालन केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. 

गांधी  अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. प्रकाश पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. नगिना माळी आणि प्रियांका सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले. दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. कृष्णा पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास  शिंदेडॉ. एस. एच. पाटील, डॉ. श्रीराम पवार, उपकुलसचिव डॉ. निलेश बनसोडे, विलास सोयम, डॉ उत्तम सकट, विनय शिंदे यांच्यासह विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वराज्याला सार्वभौमत्व प्रदान करण्यासाठी ताराबाईंचा लढा: डॉ. जयसिंगराव पवार

शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय चर्चासत्राला प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या ३५० व्या जन्मशताब्दीनिमित्ताने आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात सूत्रभाष्य करताना डॉ. जयसिंगराव पवार. मंचावर (डावीकडून) डॉ. अवनीश पाटील, डॉ. महादेव देशमुख आणि डॉ. नीलांबरी जगताप.


शिवाजी विद्यापीठात छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या ३५० व्या जन्मशताब्दीनिमित्ताने आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांची डॉ. नंदकुमार मोरे यांनी मुलाखत घेतली.


(महाराणी ताराबाई यांच्याविषयी राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभाची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. ९ डिसेंबर: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र स्वराज्याला सार्वभौमत्व प्रदान करण्यासाठी महाराणी ताराबाई यांनी मोठा तात्त्विक लढा उभारला. इतिहासकार आणि अभ्यासकांनी त्यांच्या विविध पैलूंचा साक्षेपी अभ्यास करावा, असे आवाहन ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले.

महाराणी ताराबाई यांच्या ३५० व्या जयंतीचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठात आजपासून "महाराणी ताराबाई आणि अठरावे शतक: एक ऐतिहासिक दृष्टिक्षेप" या विषयावरील दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राला प्रारंभ झाला. त्यावेळी उद्घाटन सत्रात चर्चासत्राचे सूत्रभाष्य करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख होते. विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग, शाहू संशोधन केंद्र, छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र आणि छत्रपती संभाजी महाराज संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्र होत आहे.

आपल्या विवेचनात ताराबाई यांच्याविषयी इतिहासकारांनी लेखनउपेक्षा बाळगली, याची खंत व्यक्त करताना डॉ. पवार म्हणाले, महाराणी ताराबाई या कर्तबगार आणि पराक्रमी होत्या. तरीही गेल्या सव्वाशे वर्षांत मराठा इतिहासाविषयी जो अभ्यास झाला, त्यामध्ये त्यांची खूपच उपेक्षा झाली. या कालखंडात अनेकांनी शिवचरित्रे लिहिली, पेशव्यांचे चरित्र लिहिले, तथापि, ताराबाईंविषयी लिहावेसे कोणालाही वाटले नाही. किंबहुना, छत्रपती शिवाजी महाराजांपासून पेशवाईच्या उदयापर्यंतचा कालखंड याबाबतीत उपेक्षित राहिला. इतिहासकारांनी संभाजी महाराजांना बदफैली आणि राजाराम महाराजांना दुबळा ठरविले आणि थेट बाळाजी विश्वनाथाच्या चरित्राला हात घातला. गुरूवर्य वा.सी. बेंद्रे यांनी मात्र छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी सुमारे ४० वर्षे संशोधन करून त्यांची उज्ज्वल प्रतिमा जगासमोर आणली. छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती ताराबाई यांच्याविषयीचे संशोधन माझ्या हातून व्हावे, हा नियतीसंकेत असावा, असे ते म्हणाले.

डॉ. पवार पुढे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू तथा ज्येष्ठ इतिहासकार डॉ. आप्पासाहेब पवार यांनी ताराबाईंविषयीची कागदपत्रे वेगवेगळ्या देशीविदेशी दप्तरांमधून अथक परिश्रमाने आयुष्यभर जमा केली. या कागदपत्रांचे विश्लेषण, अभ्यास आणि संशोधन करण्याची संधी त्यांनी दिली. त्यामधून ताराबाईंचा वस्तुनिष्ठ इतिहास जगासमोर आणता आला आणि उपेक्षेच्या छायेतून त्यांना बाहेर काढता आले. नव्या संशोधकांनी अद्यापही अज्ञात असणारे त्यांचे पैलू सामोरे आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय मनोगतात अधिष्ठाता डॉ. देशमुख म्हणाले, या दोनदिवसीय चर्चासत्रात भारतातील मराठेशाहीच्या जडणघडणीविषयी साद्यंत चर्चा व्हावी. विशेषतः महाराणी ताराबाई यांनी एकाच वेळी मोगलांसारखा शत्रू, स्वकीय आणि पेशवे असा त्रिस्तरीय संघर्ष केला. त्याविषयी अधिक चिकित्सक अंगाने मांडणी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते महाराणी ताराबाई यांच्या प्रतिमेस डॉ. पवार यांच्या हस्ते पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. इतिहास अधिविभागाचे प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. नीलांबरी जगताप यांनी आभार मानले.

कार्यक्रमास डॉ. भारती पाटील, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. अरुण शिंदे, सुरेश शिपूरकर, बाळ पाटणकर, डॉ. भारतभूषण माळी, डॉ. विजय चोरमारे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, डॉ. सुरेश शिखरे, डॉ. दत्ता मचाले, डॉ. उमाकांत हत्तीकट यांच्यासह इतिहासाचे शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

ताराबाई हिम्मतबाज, बुद्धिमान आणि शहाण्या रणनीतीज्ञ

यावेळी मराठी अधिविभागाच्या डॉ. नंदकुमार मोरे यांनी डॉ. जयसिंगराव पवार यांची महाराणी ताराबाई यांच्याविषयी घेतलेली मुलाखत तासाभराहून अधिक काळ रंगली. डॉ. पवार यांनी यावेळी ताराबाईंच्या अनेक ज्ञात-अज्ञात पैलूंची अत्यंत वेधक माहिती दिली. ते म्हणाले, ताराबाई या अत्यंत हिम्मतबाज, बुद्धिमान आणि शहाण्या रणनीतीज्ञ होत्या. सैन्याचे संयोजन त्या अत्यंत कुशल पद्धतीने करीत असत, असे गौरवोद्गार परदेशी इतिहासकारांनी केले आहे. फिलीप सार्जंट याने तर जगातील आघाडीच्या दहा प्रभावी महिलांमध्ये त्यांची गणना केली आहे. ताराबाईंनी एक प्रकारे मोगलांविरुद्ध स्वातंत्र्ययुद्धच छेडले होते. मराठा स्वराज्याचा विस्तार मोठ्या कौशल्याने करून त्यांनी त्याचे साम्राज्यात रुपांतर केले. नवा मुलूख काबीज करणे, किल्ले लढवत ठेवणे आणि संधी मिळताच बादशहाला नामोहरम करणे अशी यशस्वी नीती त्यांनी अवलंबली होती. मराठे पराक्रमी होते, मात्र छत्रपतींना विसरले होते. म्हणून अटकेपार झेंडे रोवूनही पानिपतापर्यंत घसरले, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले. रामराजा प्रकरणही त्यांनी उपस्थितांना अत्यंत मुद्देसूद पद्धतीने सांगितले आणि या प्रकरणातही ताराबाई यांची भूमिका योग्यच होती, हे ऐतिहासिक दाखल्यांचा संदर्भ देऊन सांगितले.

Sunday, 7 December 2025

शिवाजी विद्यापीठात दिव्यांगांसाठी करिअर गाईडन्स, सांस्कृतिक कार्यक्रम

शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. मंचावर (डावीकडून) डॉ. मनोहर वासवानी, डॉ. प्रतिभा देसाई आणि बालाजी शिंदे.
 







कोल्हापूर, दि. ७ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठातील युजीसी स्किम फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलीटीज आणि समावेशी शिक्षण संसाधन केंद्र यांच्यातर्फे विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी  करियर गाईडन्स आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव म्हणाल्या, दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध सोयी पुरविण्यात आणि त्यांचा मुख्य प्रवाहामध्ये समावेश करण्याच्या कामी शिवाजी विद्यापीठ अग्रेसर आहे. येथून पुढेही दिव्यांग कल्याणासाठी विद्यापीठ कार्यरत राहील.

या कार्यक्रमात इंग्रजी अधिविभागाचे डॉ. मनोहर वासवानी यांनी दृष्टीदिव्यांगासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर प्रभावीपणे कसा करावयाचा आणि आधुनिक तंत्रज्ञान आपल्या प्रगतीसाठी कसे वापरावे, याविषयी मार्गदर्शन केले. म्युझिक कौन्सिलिंगमध्येही दृष्टीदिव्यांग विद्यार्थ्यांना मोठी करिअर संधी असल्याचेही त्यांनी सांगितले. बालाजी शिंदे यांनी  बँकिंग, कॉर्पोरेट तथा अशासकीय संस्थांमध्ये दिव्यांगांसाठी असणाऱ्या संधींविषयी माहिती दिली. यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात हेल्पर्स ऑफ दि हॅन्डीकॅप्ड, मिरजकर तिकटी अंधशाळा, कर्णबधीर विद्यालय, कागल येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नृत्य व गायन सादरीकरण केले. केंद्राच्या समन्वयक डॉ. प्रतिभा देसाई यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन केले.