शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय
चर्चासत्राला प्रारंभ
 |
शिवाजी विद्यापीठात छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या ३५० व्या जन्मशताब्दीनिमित्ताने आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात सूत्रभाष्य करताना डॉ. जयसिंगराव पवार. मंचावर (डावीकडून) डॉ. अवनीश पाटील, डॉ. महादेव देशमुख आणि डॉ. नीलांबरी जगताप.
|
.jpeg) |
| शिवाजी विद्यापीठात छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या ३५० व्या जन्मशताब्दीनिमित्ताने आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांची डॉ. नंदकुमार मोरे यांनी मुलाखत घेतली. |
(महाराणी ताराबाई यांच्याविषयी राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभाची लघुचित्रफीत)
कोल्हापूर, दि. ९ डिसेंबर: छत्रपती शिवाजी
महाराजांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र स्वराज्याला सार्वभौमत्व प्रदान करण्यासाठी
महाराणी ताराबाई यांनी मोठा तात्त्विक लढा उभारला. इतिहासकार आणि अभ्यासकांनी
त्यांच्या विविध पैलूंचा साक्षेपी अभ्यास करावा, असे आवाहन ज्येष्ठ इतिहासकार डॉ.
जयसिंगराव पवार यांनी केले.
महाराणी ताराबाई यांच्या ३५० व्या
जयंतीचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठात आजपासून "महाराणी ताराबाई आणि
अठरावे शतक: एक ऐतिहासिक दृष्टिक्षेप" या विषयावरील दोनदिवसीय राष्ट्रीय
चर्चासत्राला प्रारंभ झाला. त्यावेळी उद्घाटन सत्रात चर्चासत्राचे सूत्रभाष्य
करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेचे
अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख होते. विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग, शाहू
संशोधन केंद्र, छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास
अध्ययन केंद्र आणि छत्रपती संभाजी महाराज संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने
चर्चासत्र होत आहे.
आपल्या विवेचनात ताराबाई यांच्याविषयी
इतिहासकारांनी लेखनउपेक्षा बाळगली, याची खंत व्यक्त करताना डॉ. पवार म्हणाले, महाराणी
ताराबाई या कर्तबगार आणि पराक्रमी होत्या. तरीही गेल्या सव्वाशे वर्षांत मराठा
इतिहासाविषयी जो अभ्यास झाला, त्यामध्ये त्यांची खूपच उपेक्षा झाली. या कालखंडात
अनेकांनी शिवचरित्रे लिहिली, पेशव्यांचे चरित्र लिहिले, तथापि, ताराबाईंविषयी लिहावेसे कोणालाही वाटले
नाही. किंबहुना, छत्रपती शिवाजी महाराजांपासून पेशवाईच्या उदयापर्यंतचा कालखंड
याबाबतीत उपेक्षित राहिला. इतिहासकारांनी संभाजी महाराजांना बदफैली आणि राजाराम
महाराजांना दुबळा ठरविले आणि थेट बाळाजी विश्वनाथाच्या चरित्राला हात घातला.
गुरूवर्य वा.सी. बेंद्रे यांनी मात्र छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी सुमारे
४० वर्षे संशोधन करून त्यांची उज्ज्वल प्रतिमा जगासमोर आणली. छत्रपती राजाराम
महाराज आणि छत्रपती ताराबाई यांच्याविषयीचे संशोधन माझ्या हातून व्हावे, हा
नियतीसंकेत असावा, असे ते म्हणाले.
डॉ. पवार पुढे म्हणाले, शिवाजी
विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू तथा ज्येष्ठ इतिहासकार डॉ. आप्पासाहेब पवार यांनी
ताराबाईंविषयीची कागदपत्रे वेगवेगळ्या देशीविदेशी दप्तरांमधून अथक परिश्रमाने
आयुष्यभर जमा केली. या कागदपत्रांचे विश्लेषण, अभ्यास आणि संशोधन करण्याची संधी
त्यांनी दिली. त्यामधून ताराबाईंचा वस्तुनिष्ठ इतिहास जगासमोर आणता आला आणि उपेक्षेच्या
छायेतून त्यांना बाहेर काढता आले. नव्या संशोधकांनी अद्यापही अज्ञात असणारे
त्यांचे पैलू सामोरे आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय मनोगतात अधिष्ठाता डॉ.
देशमुख म्हणाले, या दोनदिवसीय चर्चासत्रात भारतातील मराठेशाहीच्या जडणघडणीविषयी
साद्यंत चर्चा व्हावी. विशेषतः महाराणी ताराबाई यांनी एकाच वेळी मोगलांसारखा
शत्रू, स्वकीय आणि पेशवे असा त्रिस्तरीय संघर्ष केला. त्याविषयी अधिक चिकित्सक
अंगाने मांडणी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते
महाराणी ताराबाई यांच्या प्रतिमेस डॉ. पवार यांच्या हस्ते पुष्प वाहून अभिवादन
करण्यात आले. इतिहास अधिविभागाचे प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी स्वागत व
प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. नीलांबरी
जगताप यांनी आभार मानले.
कार्यक्रमास डॉ. भारती पाटील, डॉ.
रणधीर शिंदे, डॉ. अरुण शिंदे, सुरेश शिपूरकर, बाळ पाटणकर, डॉ. भारतभूषण माळी, डॉ.
विजय चोरमारे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, महाराष्ट्र
केसरी विष्णू जोशीलकर, डॉ. सुरेश शिखरे, डॉ. दत्ता मचाले, डॉ. उमाकांत हत्तीकट
यांच्यासह इतिहासाचे शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच मान्यवर नागरिक मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
‘ताराबाई
हिम्मतबाज, बुद्धिमान आणि शहाण्या रणनीतीज्ञ’
यावेळी मराठी अधिविभागाच्या डॉ. नंदकुमार मोरे
यांनी डॉ. जयसिंगराव पवार यांची महाराणी ताराबाई यांच्याविषयी घेतलेली मुलाखत
तासाभराहून अधिक काळ रंगली. डॉ. पवार यांनी यावेळी ताराबाईंच्या अनेक ज्ञात-अज्ञात
पैलूंची अत्यंत वेधक माहिती दिली. ते म्हणाले, ताराबाई या अत्यंत हिम्मतबाज,
बुद्धिमान आणि शहाण्या रणनीतीज्ञ होत्या. सैन्याचे संयोजन त्या अत्यंत कुशल
पद्धतीने करीत असत, असे गौरवोद्गार परदेशी इतिहासकारांनी केले आहे. फिलीप सार्जंट
याने तर जगातील आघाडीच्या दहा प्रभावी महिलांमध्ये त्यांची गणना केली आहे.
ताराबाईंनी एक प्रकारे मोगलांविरुद्ध स्वातंत्र्ययुद्धच छेडले होते. मराठा
स्वराज्याचा विस्तार मोठ्या कौशल्याने करून त्यांनी त्याचे साम्राज्यात रुपांतर
केले. नवा मुलूख काबीज करणे, किल्ले लढवत ठेवणे आणि संधी मिळताच बादशहाला नामोहरम
करणे अशी यशस्वी नीती त्यांनी अवलंबली होती. मराठे पराक्रमी होते, मात्र
छत्रपतींना विसरले होते. म्हणून अटकेपार झेंडे रोवूनही पानिपतापर्यंत घसरले, असेही
त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले. रामराजा प्रकरणही त्यांनी उपस्थितांना
अत्यंत मुद्देसूद पद्धतीने सांगितले आणि या प्रकरणातही ताराबाई यांची भूमिका
योग्यच होती, हे ऐतिहासिक दाखल्यांचा संदर्भ देऊन सांगितले.