Friday, 22 April 2016

'नेचर' ई-जर्नल वापरामध्ये शिवाजी विद्यापीठ देशात दुसरे




द्वितिय 'एनपीजी ई-जर्नल युसेज ॲवॉर्ड-२०१५' विद्यापीठास घोषित
कोल्हापूर, दि. २२ एप्रिल: जागतिक स्तरावरील नामांकित पालग्रेव्ह मॅकमिलन समूहाच्या 'नेचर पब्लिशिंग ग्रुप'तर्फे 'एनपीजी ई-जर्नल्स युसेज ॲवॉर्ड-२०१५'मधील द्वितिय क्रमांकाचा पुरस्कार शिवाजी विद्यापीठाला घोषित करण्यात आला आहे. ही माहिती विद्यापीठाच्या ग्रंथपाल डॉ. नमिता खोत यांनी दिली. 'युनेस्को'च्या जागतिक पुस्तक व कॉपीराइट दिनाच्या पूर्वसंध्येला हा पुरस्कार घोषित झाल्याने याचा आनंद अधिक आहे, असेही त्या म्हणाल्या.
युजीसी-इन्फ्लिबनेट सुविधेच्या माध्यमातून नेचर समूहाचे जर्नल संदर्भासाठी सर्वाधिक वापरल्याबद्दल नेचर पब्लिशिंग ग्रुपतर्फे हा वैशिष्ट्यपूर्ण पुरस्कार घोषित झाला आहे. नेचर प्रकाशन समूहाचे भारतातील सहाय्यक सरव्यवस्थापक राजेंद्र कुमार यांनी ई-मेलद्वारे ही माहिती दिली आहे. शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी संदर्भासाठी ऑनलाइन ई-जर्नल सुविधांचा अत्यंत चिकित्सकपणे वापर करीत आहेत, हे यातून स्पष्ट झाले आहे.
प्रथम क्रमांकाचा 'एनपीजी ई-जर्नल्स युसेज ॲवॉर्ड-२०१५' कोचीन येथील कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजीला; तर, तृतीय क्रमांकाचा पुरस्कार नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला जाहीर झाला आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) यांच्यातर्फे विद्यापीठांसाठी इन्फ्लिबनेट अर्थात इन्फोनेट डिजीटल लायब्ररी कॉन्सॉर्शियम हा अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम राबविलेला आहे. याअंतर्गत विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे जगभरातील विविध विषयांचे जर्नल (संशोधन पत्रिका) व अधिकृत डाटाबेस उपलब्ध करून देण्यात येतात. जेणे करून संबंधित संशोधक विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयातील जगभरातील अद्ययावत ज्ञान उपलब्ध व्हावे आणि त्यांचे संशोधन अधिक परिपूर्ण व्हावे. आजघडीला शिवाजी विद्यापीठात सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून ५१ आणि इन्फ्लिबनेटच्या माध्यमातून ८५९२ अशी एकूण ८६४३ ई-जर्नल व १० डाटाबेस संशोधक विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. यामधील नेचर संशोधनपत्रिकेच्या व्यक्तीगत वापरामध्ये सन २०१४च्या तुलनेत सन २०१५मध्ये भरीव वाढ नोंद झाली. इन्फ्लिबनेटच्या ई-जर्नल वापराच्या आकडेवारीनुसार, हा आकडा ३४वरुन १८४४ इतका वाढला. त्यामुळेच नेचर पब्लिशिंग ग्रुपच्या द्वितिय पुरस्कारास शिवाजी विद्यापीठ पात्र ठरले, अशी माहिती डॉ. नमिता खोत यांनी दिली.
केवळ नेचर संशोधन पत्रिकाच नव्हे, तर अन्य संशोधन पत्रिकांच्या एकूण वापरातही सन २०१५मध्ये भरीव वाढ दिसून आली आहे. विद्यापीठातील इन्फ्लिबनेट संशोधक वापरकर्त्यांची संख्या सन २०१४मध्ये २ लाख ८९ हजार ९२३ इतकी होती; ती सन २०१५मध्ये ३ लाख ४ हजार ५५२ इतकी झाली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

'एन.आय.आर.एफ.' क्रमवारीनंतर आणखी एक उत्साहवर्धक बहुमान: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
शिवाजी विद्यापीठातील संशोधक मूलभूत संशोधनामध्ये अत्यंत उत्तम कामगिरी बजावत आहेत, हे 'स्कोपस'च्या आकडेवारीवरुन वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. 'नेचर'सारख्या जागतिक दर्जाच्या अत्यंत प्रतिष्ठित संशोधन पत्रिकेचा संदर्भ म्हणून विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी अत्यंत गांभिर्याने वापर करीत आहेत, ही अतिशय समाधानाची बाब आहे. युजीसी-इन्फ्लिबनेटच्या माध्यमातून जगभरातील आठ हजारांहून अधिक जर्नल आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहेत आणि त्यांचा योग्य प्रकारे ते लाभ घेत आहेत, हे महत्त्वाचे आहे. विद्यापीठ कॅम्पसवरील तीन हजार संगणक जोडण्यांच्या माध्यमातून ही सेवा संशोधक विद्यार्थ्यांना २४ तास उपलब्ध करून दिली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे नुकत्याच घोषित झालेल्या 'एन.आय.आर.एफ.' रँकिंगमध्ये देशात २८वे आणि राज्यात पहिले स्थान मिळविल्यानंतर 'नेचर'च्या वापरातही विद्यापीठाने देशात दुसरा क्रमांक प्राप्त केला, हा एक अनपेक्षित तरीही उत्साहवर्धक बहुमान आहे. त्याबद्दल विद्यापीठातील शिक्षक, संशोधक, विद्यार्थी आणि ग्रंथालयातील सर्व सहकाऱ्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

Thursday, 14 April 2016

राज्यघटनेबाबत समाजाला साक्षर करण्याची जबाबदारी विद्यापीठांनी घ्यावी: ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे






 शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

कोल्हापूर, दि. १४ एप्रिल: राज्यघटनेच्या संदर्भात समाजाला साक्षर करण्याची जबाबदारी विद्यापीठांनी घ्यावी, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार उत्तम कांबळे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठातर्फे आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीच्या निमित्ताने विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या १२५ व्याख्यानांचा समावेश असणाऱ्या गौरव ग्रंथाचे प्रकाशन आणि व्याख्यान अशा संयुक्त समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाची उद्देशिका' या विषयावर बोलताना उत्तम कांबळे म्हणाले, गेल्या सात-आठ वर्षांपासून आपण घटनेच्या उद्देशिकेचे वाचन करायला शिकलो. अगदी महोत्सवही साजरे करू लागलो. पण समजून घेण्यात मात्र कमी पडत आहोत. राज्यघटनेच्या बाबतीत आपण अडाणी आहोत, ही खूप मोठी राष्ट्रीय सामाजिक चूक आहे. असे अडाणी लोक विकास घडवू शकत नाहीत. त्यासाठी विद्यापीठांनीच आता पुढे यावे. दैनंदिन कामकाजाची सुरवात उद्देशिकेच्या वाचनाने करावी. उद्देशिका शिकविणे बंधनकारक करावे, असे आवाहन त्यांनी केले.
विभूतीपूजेचा सिद्धांत राज्यघटना अगर बाबासाहेबांना लावू नका, असे सांगून श्री. कांबळे म्हणाले, राज्यघटनेची निर्मिती ही केवळ राजकीय घटना नव्हती, तर त्या काळाचे अपत्य आहे. तत्कालीन परिस्थितीचे संदर्भ त्यासाठी समजून घ्यावे लागतील. दुष्काळ, महापुरामुळे झालेली जीवितहानी, निरक्षरता, हिंदू-मुस्लीम दंगे, जातिव्यवस्थेच्या झळा, फाळणी, महात्मा गांधी यांच्या हत्या असे अनेक संदर्भ त्यासाठी विचारात घ्यावे लागतील. हे पर्यावरण संपवून नवे पर्यावरण निर्माण करण्याची जबाबदारी बाबासाहेबांवर होती. या देशाला इतिहास नव्हता. होता तो केवळ राजांचा आणि जातींचा. भारताची राज्यघटना लिहीणे ही सोपी गोष्ट नव्हती कारण इथे माणसं नव्हे, जाती राहात होत्या. त्यामुळे या देशाचा खरा इतिहास हा राज्यघटनेपासूनच सुरू होतो. कारण बाकी सर्व माहात्म्य नाकारून व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून तिची निर्मिती करण्यात आली. अशी व्यक्तीला अर्पण करण्यात आलेली ही जगातली एकमेव राज्यघटना आहे.
श्री. कांबळे म्हणाले, उद्देशिका हे राज्यघटना समजून घेण्याचे महत्त्वाचे साधन आहे. राज्यघटनेचा आत्मा, आरसा आहे. राज्यघटनेचा सारांश अवघ्या साठ शब्दांत सांगण्याचे काम उद्देशिका करते. राज्यघटनेतील 'आम्ही भारताचे लोक' हे संबोधन अनेकार्थाने महत्त्वाचे आहे. कारण तत्पूर्वी, या देशातील रहिवाशांत 'आम्ही' ही एकत्वाची भावनाच नव्हती. इथे भावना होती ती केवळ 'मी'पणाची. या देशात तत्पूर्वीस ब्राह्मण होते, क्षत्रिय होते, वैश्य होते, शूद्र होते, पण भारतीय मात्र कोणीच नव्हते. ही भारतीयत्वाची ओळख ही उद्देशिका ठळक करते. या देशावर आधी देवा-धर्माचे अनैसर्गिक (अँटी-नेचर) राज्य होते; तथापि, राज्यघटनेमुळे प्रथमच नैसर्गिक वाटचाल होण्यास प्रारंभ झाला.
सामाजिक न्यायाच्या बाबतीत बाबासाहेब प्रचंड आग्रही होते. न्यायाची मर्यादा जिथे संपते, तिथपासून पुढे सामाजिक न्यायाची सुरवात होते, असे सांगून श्री. कांबळे यांनी उद्देशिकेमधील समता, स्वातंत्र्य, बंधुता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, सार्वभौमत्व या लोकशाही व मानवी मूल्यांचे कालातीत महत्त्व विविध उदाहरणांसह स्पष्ट केले. ज्याला देश म्हणून जगायचे आहे, त्याची राज्यघटनेशी बांधिलकी अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले.
चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टीम (सीबीसीएस) अभ्यासक्रांतर्गत या वर्षापासून संविधान हा विषय विद्यापीठाने बंधनकारक केला असल्याचे सांगून अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, बाबासाहेबांच्या अनेक पैलूंचा वेध घेण्यात आला आहे. तथापि, त्यांच्या विज्ञानवादी दृष्टीकोनाच्या अनुषंगाने अधिक सविस्तर मांडणी होणे आवश्यक आहे. विज्ञान, शहाणपण आणि व्यक्तीमत्त्व या तिहेरी संगमातून बाबासाहेबांचे महान, प्रज्ञासूर्य व्यक्तीमत्त्व आकाराला आले, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, या आवाहनाचा अर्थ शहाणपणा विकसित करणारे शिक्षण घ्या, स्वार्थासाठी नव्हे, तर समाजाच्या भल्यासाठी एकत्र या आणि केवळ आंदोलनादी बाह्य संघर्ष नव्हे, तर मिळविलेल्या ज्ञानासंदर्भात अंतर्गत संघर्ष, विचारमंथन करून व्यक्तीमत्त्व घडवावे, असा घेतला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. बाबासाहेबांच्या विचारांची मांडणी भावनेच्या नव्हे, तर अभ्यासाच्या आधारावर करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
यावेळी उत्तम कांबळे यांच्या हस्ते 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती गौरव ग्रंथा'चे प्रकाशन करण्यात आले. तसेच, डॉ. आंबेडकर यांच्याविषयी १२५ भाषणे आयोजित करणाऱ्या महाविद्यालयांची प्रशंसा करताना प्रातनिधिक स्वरुपात आजरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. होनगेकर यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवनच्या विद्यार्थ्यांनी तेथील ग्रंथालयासाठी सुमारे १२५ पुस्तके व ई-बुक्सच्या सीडी कुलगुरू डॉ. शिंदे यांच्याकडे सोपविल्या. अधीक्षक डॉ. पी.व्ही. अनभुले व सहा. अधीक्षक डॉ. शिंदे यांच्याकडे त्या सुपूर्द करण्यात आल्या.
सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. कृष्णा किरवले यांनी स्वागत व परिचय करून दिला. बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांनी प्रास्ताविक केले. राजेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक, मान्यवर मोेठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमापूर्वी, शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि श्री. उत्तम कांबळे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

'सारी लेकरं आईसाठी श्रीमंतच'
ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी आजच्या कार्यक्रमापूर्वी सकाळी कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या मातोश्री नागरबाई शिंदे यांची निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. आईचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण आवर्जून आलो असल्याचे त्यांनी सांगितले. आईंची भेट घेतल्यानंतर श्री. कांबळे यांनी त्यांना आपले 'आई समजून घेताना...' हे पुस्तक भेट दिले. आणि ते म्हणाले, आई, बाकी काही नाही; पण हे लेकरू गरीब असल्यामुळं तुझ्यासाठी पुस्तक घेऊन आलंय.' यावर आई म्हणाल्या की, आईसाठी तिची लेकरं गरीब कधीच नसतात. तिच्यासाठी सारीच लेकरं श्रीमंत असतात.' आणि त्यानंतर सुमारे अर्धा तास या मायलेकरांत चांगलाच संवाद रंगला.

Tuesday, 12 April 2016

संशोधकीय सृजनशीलतेतला आनंद घ्या: भारतरत्न प्रा. राव



शिवाजी विद्यापीठाचा 'प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार' प्रदान





कोल्हापूर, दि. १२ एप्रिल: वय सृजनशीलतेच्या कधीही आड येत नाही. त्यामुळे संशोधकांनी संशोधकीय सृजनशीलतेमधील आनंद घ्यावा आणि देशाच्या उन्नतीला हातभार लावावा, असे आवाहन ज्येष्ठ वैज्ञानिक भारतरत्न प्रा. सी.एन.आर. राव यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा पहिला 'प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार' प्रा. राव यांना आज कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते आणि श्रीमती शालिनी कणबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. या समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. शिंदे होते.
शिवाजी विद्यापीठात येण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे याठिकाणी वैज्ञानिक क्षेत्रात अतिशय उत्तम काम सुरू असल्याचे सुरवातीलाच सांगून प्रा. राव म्हणाले, सुमारे ६५ वर्षांपूर्वी म्हणजे वयाच्या १७व्या वर्षी मी संशोधनाला सुरवात केली. तेव्हापासून संशोधनात व्यस्त आहे. आश्चर्याची आणि महत्त्वाची बाब म्हणजे वयाच्या साठाव्या वर्षापासून माझ्या संशोधनाचे सायटेशन्स वाढू लागले, एच इन्डेक्स वाढू लागला. याचा अर्थ असा की, वयाचा आणि संशोधन किंवा सृजनशीलतेचा काहीही संबंध नाही. आजही माझे वर्षाकाठी किमान २५ शोधनिबंध प्रसिद्ध होतात. वयाची कोणतीही मर्यादा न बाळगता मला संशोधन कार्य करता आले, याचे मोठे समाधान आहे. संशोधनाबरोबरच निःस्वार्थ अध्यापनातला आनंदही अतिशय निर्मळ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
देशात काहीच चांगले होत नाही, अशा मानसिकतेतून युवकांनी बाहेर पडावे, असा सल्ला देताना प्रा. राव म्हणाले, माझे शोधनिबंध विविध देशांतल्या संशोधन पत्रिकांतून प्रसिद्ध झाले असले तरी, माझे सर्व संशोधन कार्य मी भारतात राहूनच केले आहे. देशात राहून केलेल्या कामामुळे आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करता आल्याचेही मोठे समाधान लाभले. त्यामुळे युवकांनी देशात राहून काम करण्याचा निर्धार केल्यास त्याचे फळ निश्चितपणे त्यांना मिळेल.
नजीकच्या काळात चार कोटी विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या प्रवाहात सामील करून घेण्याचे आव्हान आपल्यासमोर उभे असल्याचे सांगून डॉ. राव यांनी जल व्यवस्थापन, ऊर्जा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात मोठे काम होण्याची गरज व्यक्त केली. आपल्या देशाला कोणत्या क्षेत्रात आघाडीवर न्यायचे, याची दिशा युवकांनी ठरवायची आहे. त्यासाठी विज्ञानाचा आधार घ्यायचा आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
कुलगुरू डॉ. शिंदे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, प्रा. राव आणि प्राचार्य कणबरकर या दोघांच्या जीवनात कष्टाच्या तत्त्वज्ञानाचे साम्य आढळते. आयुष्यात आपल्याला काय मिळेल, यापेक्षा आपण या देशाला, समाजाला काय देऊ शकतो, याचा ध्यास या दोघांच्या प्रकृतीमधला समान धागा आहे. त्यामुळे पहिल्या प्राचार्य कणबरकर पुरस्कारासाठी निवड समितीने भारतरत्न प्रा. राव यांची एकमताने निवड केली, याचा अतिशय आनंद वाटतो. संशोधन करीत राहिलो तर आपण निश्चितपणे तरुण राहू शकतो, असा सल्लाही त्यांनी नवसंशोधकांना दिला. प्राचार्य कणबरकर यांच्या कुटुंबियांनी २५ लाख रुपयांचा निधी या पुरस्कारासाठी विद्यापीठाकडे सुपूर्द करून सरांच्या दातृत्वाचा वारसा पुढे चालविला असल्याबद्दल त्यांनी सर्व कुटुंबियांचे अभिनंदन केले व आभार मानले.
यावेळी प्रा. राव यांना कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह, मानपत्र व १ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरुप आहे. कणबरकर कुटुंबियांतर्फे डॉ. अरुण कणबरकर यांनी महालक्ष्मीची मूर्ती व शाल, श्रीफळ देऊन प्रा. राव यांचा सत्कार केला. सौ. अनिता शिंदे यांनी श्रीमती इंदुमती राव यांचा सत्कार केला. यावेळी प्रशांत गिरी यांनी तयार केलेल्या प्राचार्य कणबरकर यांच्या जीवन व कार्याचे दर्शन घडविणाऱ्या चित्रफीतीचे प्रदर्शन करण्यात आले.
प्राचार्य डॉ. बी.ए. खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. अरुंधती पोवार यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले.