Saturday, 18 February 2017

ऑक्सफर्डच्या ज्ञानपंढरीत जाऊन ज्ञानमय झालो:

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची प्रांजळ भावना


ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. लुईस रिचर्ड्सन यांच्यासमवेत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्रा. मार्क मलोनी यांच्या संशोधक टीमसमवेत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.


मूळचे हंगेरी येथील व ऑक्सफर्डच्या हिंदी विभागाचे प्रमुख प्रा. इम्रे बांगा यांच्यासमवेत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

कोल्हापूर, दि. १८ फेब्रुवारी: ऑक्सफर्ड विद्यापीठ ही ज्ञानाची पंढरी असून ज्ञान देणे आणि ज्ञान घेणे, एवढेच कार्य तिथे शतकानुशतके चालू आहे. इंग्लंडच्या ज्ञानाचे व संस्कृतीचे केंद्र असलेल्या या ज्ञानपंढरीत एक महिना राहून मी ज्ञानमय झालो, अशी प्रांजळ भावना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे व्यक्त केली.
कुलगुरू डॉ. शिंदे हे युरोपियन युनियनच्या नमस्ते प्रकल्पांतर्गत इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठात व्हिजिटिंग स्कॉलर म्हणून एक महिना संशोधन करून नुकतेच परतले. त्यांच्या ऑक्सफर्ड येथील अनुभवाचा लाभ शिवाजी विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनींना मिळावा, यासाठी विद्यापीठाच्या कॉलोक्वियममध्ये कुलगुरूंचे विशेष व्याख्यान राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी कोल्हापूरसह शिवाजी विद्यापीठाचा लौकिक सर्वदूर करण्यात मोलाची कामगिरी बजावल्याबद्दल कुलगुरू डॉ. शिंदे यांचा विद्यापीठ परिवारातर्फे शाल, श्रीफळ व छत्रपती शिवरायांचा पुतळा देऊन बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सुमारे तीन तास उपस्थितांना खिळवून ठेवणारे अभ्यासपूर्ण व विविध निरीक्षणांनी परिपूर्ण असे भाषण कुलगुरूंनी या प्रसंगी केले. ते म्हणाले, एक देश, एक भाषा, एक संस्कृती आणि एक कायदा अशा एकात्म सूत्रात ऑक्सफर्डमधील कारभार चालतो. एकूणच तेथील शिस्त आणि संशोधन-अध्यापन संस्कृती अत्यंत अनुकरणीय आहे. संशोधन आणि अध्यापनाची तिथे इतकी अप्रतिम सांगड घातली गेली आहे की, त्यामुळेच या विद्यापीठातून आजपर्यंत ५०हून अधिक नोबेल विजेते आणि जागतिक स्तरावर गौरविले गेलेले शास्त्रज्ञ, साहित्यिक, कलाकार निर्माण झाले. ऑक्सफर्डमध्ये आणि एकूणच इंग्लंडमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे येथे जनतेच्या प्राधान्यक्रमावर सर्वप्रथम देश असतो, त्यानंतर संस्था, कुटुंब आणि सरतेशेवटी मी असतो. या मीपणापासून मुक्ती मिळविण्याची शिकवण ऑक्सफर्डने दिल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कुलगुरूंनी ऑक्सफर्डच्या स्थापनेपासूनच्या म्हणजे साधारणतः सन १०९६पासूनच्या तेथील विविध शैक्षणिक-सांस्कृतिक प्रथा-परंपरांची साद्यंत माहिती दिली. या ज्ञानपंढरीला दरवर्षी जगभरातील ७० लाख लोक भेट देतात, ते केवळ या शैक्षणिक पंढरीच्या दर्शनासाठी. २२ हजार विद्यार्थी, १३ हजार कर्मचारी, १७,००० रोजगार, ४६०० व्यवसाय आदींच्या माध्यमातून अब्जावधी पौडांची उलाढाल या विद्यापीठात होत असल्याचे त्यांनी सांगितले.
इथल्या समृद्ध ग्रंथालयांनी आपण सर्वाधिक प्रभावित झाल्याचे सांगताना कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, दीड लाख लोकवस्तीच्या ऑक्सफर्ड गावात सुमारे १२५ ग्रंथालये आहेत. जगातले सर्वात मोठे ग्रंथभांडार येथे एकवटले आहे. जमिनीच्या वर जितकी इमारत दिसते, तितकेच ग्रंथागार जमिनीच्या खालीही असून भूमिगतरित्या ही ग्रंथालये एकमेकांशी जोडलेली आहेत. येथील मध्यवर्ती ग्रंथालयात सुमारे एक कोटी वीस लाख ग्रंथ असून सन १६२०पासून प्रसिद्ध झालेले प्रत्येक पुस्तक या ठिकाणी उपलब्ध आहे. इतक्या प्रचंड संग्रहातील कोणतेही पुस्तक अवघ्या तीन मिनिटांत वाचकाला उपलब्ध करण्यात येते. या भेटीदरम्यान आपण केवळ २२ ग्रंथालयांना भेट देऊ शकलो, असेही त्यांनी सांगितले.
कुलगुरू पदावरील व्यक्तीने संशोधनासाठी म्हणून ऑक्सफर्डला येण्याचा भारताच्या तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या इतिहासातील पहिलाच प्रसंग असल्याची माहिती ऑक्सफर्डच्या कुलगुरू प्रा. लुईस रिचर्ड्सन यांनी आपल्याला दिल्याचे कुलगुरूंनी सांगितले. याचे श्रेय या स्कॉलरशीपचे महत्त्व ओळखून दौऱ्यास अनुमती देणारे कुलपती श्री. चे. विद्यासागर राव यांच्यासह युरोपियन युनियन, राज्य शासन तसेच परराष्ट्र मंत्रालयाचेही कुलगुरूंनी आभार मानले.
सुरवातीला कुलगुरू डॉ. शिंदे यांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनद्वारे ऑक्सफर्ड विद्यापीठासह भेटी दिलेली अन्य विद्यापीठे, विविध शहरे, प्रयोगशाळा यांची रंजक माहिती दिली. यावेळी परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, संशोधक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीसीयुडी संचालक डॉ.डी.आर. मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. श्रीमती नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.

Tuesday, 14 February 2017

अंगभूत कला, इच्छाशक्तीच्या बळावर कारकीर्द घडवा

समारोप समारंभात सयाजी शिंदे यांचा देशातल्या तरुणांना संदेश



३२वा अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सव (शिवोत्सव-२०१७)

Dr. Amit Saini

Veteran Actor Sayaji Shinde






Prin. Dr. D.R. More


कोल्हापूर, दि. १४ फेब्रुवारी: अंगभूत कलागुण आणि इच्छाशक्तीच्या बळावर कारकीर्द घडवा, असा बहुमोल सल्ला प्रख्यात अभिनेते सयाजी शिंदे यांनी देशभरातील तरुणाईला आज येथे दिला.
शिवाजी विद्यापीठात गेल्या १० फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या ३२व्या अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सवाचा समारोप व पुरस्कार वितरण समारंभ श्री. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या लोककला केंद्रात संपन्न झाला. यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे अध्यक्षस्थानी होते.
सयाजी शिंदे यांनी भाषण करण्याऐवजी उपस्थित तरुणांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून थेट संवाद साधला. देशभरातल्या तरुणाईला सयाजी शिंदे यांच्या संघर्षमय प्रवासाबद्दल, त्यांच्या कारकीर्दीबद्दल तसेच त्यांच्या सामाजिक उपक्रमांबद्दल जाणून घ्यावयाचे होते. त्यामुळे हा संवाद उत्तरोत्तर रंगतच गेला.
साताऱ्यावरुन मुंबईला संघर्ष करण्यासाठी जाताना खिशात वीस पैसे घेऊन गेलो होतो आणि परत येताना यशासोबत ते वीस पैसे तसेच सोबत घेऊन परतल्याची हृद्य आठवण सांगून सयाजी शिंदे यांनी उपस्थितांच्या काळजाला हात घातला. ते म्हणाले, एफ.वाय. ते टी.वाय. या कालावधीत वॉचमनची नोकरी करीत असतानाच मी अभिनेता व्हायचे ठरवले आणि त्याच दिशेने वाटचाल केली. वयाच्या विसाव्या वर्षी धडपड सुरू केली, तेव्हा कुठे चाळीसाव्या वर्षी यश लाभल्याचे त्यांनी सांगितले. दादरच्या फूटपाथवर अभिनय साधना हे अवघ्या २२ रुपयांचे पुस्तक आपल्या करिअरला मार्ग दाखविणारे ठरल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातच आपले लक्ष्य निर्धारित करावे. ते आपल्या मनात निश्चित ठेवून कोणालाही न सांगता हळूहळू त्या दिशेने वाटचाल करावी. महाविद्यालय ही केवळ एक पहिली पायरी आहे, जीवनात अशा असंख्य पायऱ्या आपल्याला चढायच्या आहेत. आज तुम्ही आपल्या विद्यापीठाचे प्रतिधित्व करीत आहात, उद्या जागतिक स्तरावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करावे, अशा प्रकारे स्वतःला विकसित करा, असे आवाहनही त्यांनी केले.
आयुष्यात लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असे काही नसते. आई आणि वृक्ष या दोनच गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक जन्म देते आणि दुसरे श्वास देते, या दोन्ही गोष्टींची उतराई कोणत्याही पद्धतीने शक्य नसल्याचेही सयाजी शिंदे म्हणाले.
जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, शिवाजी विद्यापीठात झालेल्या या राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सादर झालेल्या कलाप्रकारांचा दर्जा अत्यंत उच्च होता. विद्यार्थ्यांनी आपल्यातले अंगभूत गुण पुढे आयुष्यभर जोपासावेत, त्यांचा विकास करावा. आपले कलागुण कधीही हरपू देऊ नका, असा सल्ला त्यांनी दिला. सयाजी शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त माण व खटाव तालुक्यांत केलेल्या वृक्षसंवर्धन कार्यक्रमाचेही त्यांनी मनापासून कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणात प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या संयोजनात मोलाचे सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे मनापासून आभार मानले. देशभरातून विद्यापीठात दाखल झालेले विद्यार्थी कोल्हापूर आणि विद्यापीठाबद्दल चांगल्या आठवणी येथून सोबत घेऊन जातील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, आयुष्यात हा महोत्सव म्हणजे एक टप्पा आहे. तेवढ्यावरच समाधान न मानता पुढे वाटचाल करा, असा संदेशही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
भारतीय विद्यापीठ महासंघाचे निरीक्षक प्रा. एस.के. शर्मा यांनी विद्यापीठाने राष्ट्रीय महोत्सवाचे नेटके संयोजन केल्याबद्दल अभिनंदन केले. कोल्हापूरच्या ऐतिहासिक भूमीवर सादरीकरण करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली, ही बाब महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी तेजपूर विद्यापीठाच्या संघ व्यवस्थापक भूपाली कश्यप आणि मुंबई विद्यापीठाचे नीलेश सावेकर यांनी महोत्सवाच्या संयोजनाबद्दल अत्यंत सकारात्मक भावना व्यक्त केल्या. विशेषतः कश्यप यांनी कोल्हापुरी लोक, त्यांचे आदरातिथ्य, इथली परंपरा, विद्यापीठातील हिरवाई, राष्ट्रीय पक्ष्याचे पदोपदी होणारे दर्शन, उत्स्फूर्त प्रेक्षकगण आणि बाजरीची भाकरी आपण कधीही विसरू शकणार नाही, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त केली.
विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांनी महोत्सवाचा अहवाल सादर केला. नोंद झालेल्या एकूण ८२ विद्यापीठांपैकी ७९ विद्यापीठांचे संघ स्पर्धेत सहभागी झाले. ८७० विद्यार्थी, ५४२ विद्यार्थिनींसह संघ व्यवस्थापक, परीक्षक आदी असे सुमारे १५०० लोक विद्यापीठात दाखल झाले. कोणत्याही राष्ट्रीय स्पर्धेच्या तुलनेत सहभागी विद्यापीठे आणि स्पर्धक या दोहोंची संख्या यंदा विक्रमी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यापीठास या महोत्सवाच्या संयोजनात आर्थिक साह्य करणाऱ्या महाविद्यालये व शिक्षण संस्थांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये भारती विद्यापीठ, कोल्हापूर, रयत शिक्षण संस्था, सातारा, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोल्हापूर,, राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, साखराळे, डीकेटीई, इचलकरंजी, जे.जे. मगदूम महाविद्यालय, जयसिंगपूर, आट्र्स अन्ड कॉमर्स महाविद्यालय, सातारा, जनता शिक्षण संस्था, आजरा यांचा समावेश होता.
कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी आभार मानले. विद्यानंद खंडागळे, वैशाली भोसले, संजीवनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. व्यासपीठावर डॉ. अभयकुमार साळुंखे, डॉ. हणमंतराव कदम, क्रीडा अधिविभाग डॉ. पी.टी. गायकवाड, ग्रंथपाल डॉ. नमिता खोत, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांच्यासह महोत्सव संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांसाठी युवा महोत्सवात सहभागी झालेल्या निवडक संघांचे चित्ताकर्षक सादरीकरण झाले. यामध्ये लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, पंजाबच्या संघाने पाश्चिमात्य समूहगीत, बनस्थळी विद्यापीठ, राजस्थानच्या संघाने समूह लोकनृत्य, आय.के. गुजराल पंजाब टेक्निकल विद्यापीठ, जालंधरचा विद्यार्थी गुरप्रीत सिंग याने मिमिक्री तर आंध्र प्रदेशच्या कृष्णा विद्यापीठाच्या मुलींच्या संघाने लोकवाद्यवृंद सादर केला.
 

राष्ट्रीय युवा महोत्सवावर महाराष्ट्राची मोहोर

मुंबई विद्यापीठास विजेतेपद; नागपूर विद्यापीठास उपविजेतेपद


Overall Champion Team: University of Mumbai

Runner Up: Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Nagpur

3rd position: Gurunanak Dev University, Amritsar

4th position: Lovely Professional University, Punjab

३२वा अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सव (शिवोत्सव-२०१७)

कोल्हापूर, दि. १४ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात गेल्या १० फेब्रुवारीपासून रंगलेल्या ३२व्या अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सव अर्थात शिवोत्सव-२०१७मध्ये मुंबई विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद, तर नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने उपविजेतेपद पटकावून महोत्सवावर महाराष्ट्राची मोहोर उमटवली. अमृसरच्या गुरूनानक देव विद्यापीठाने तृतीय तर पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाने चतुर्थ क्रमांक पटकावला.
शिवाजी विद्यापीठाने शोभायात्रेत चतुर्थ क्रमांकासह सहभाग नोंदविलेल्या स्पॉट फोटोग्राफी व मूकाभिनय या दोन्ही प्रकारांत अनुक्रमे प्रथम व चतुर्थ क्रमांक पटकावला.
प्रख्यात अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर .मोरे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, भारतीय विद्यापीठ महासंघाचे सहसचिव डॉ. डेव्हीड सॅम्पसन, निरीक्षक डॉ. एस.के. शर्मा उपस्थित होते.
शोभायात्रेमध्ये आंध्र प्रदेशच्या कृष्णा विद्यापीठाचा प्रथम, आसामच्या गुवाहाटी विद्यापीठाचा द्वितिय तर कुरूक्षेत्र विद्यापीठाचा तृतीय क्रमांक आला. कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ आणि कर्नाटकचे मैसूर विद्यापीठ यांना चतुर्थ क्रमांक विभागून देण्यात आला.
महोत्सवातील गटनिहाय अनुक्रमे विजेते व उपविजेते विद्यापीठ अनुक्रमे पुढीलप्रमाणे:
संगीत: गुरुनानक देव विद्यापीठ, अमृतसर; मुंबई विद्यापीठ, मुंबई
नृत्य: मणिपूर विद्यापीठ, मणिपूर; कुरूक्षेत्र विद्यापीठ, ठाणेसर, हरयाणा
साहित्य: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर; गुवाहाटी विद्यापीठ, आसाम
नाट्य: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद; एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई
ललितकला: मुंबई विद्यापीठ, मुंबई; गुलबर्गा विद्यापीठ, कर्नाटक
यावेळी महोत्सवात झालेल्या कलाप्रकारनिहाय निकालही घोषित करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांनी निकाल घोषित केले.