Friday, 15 September 2017

पारंपरिक इतिहास लेखनात उत्तर आधुनिकतावादामुळे वस्तुनिष्ठता वृद्धी: प्रा. अविनाश सप्रे यांचे प्रतिपादन




कोल्हापूर, दि. १५ सप्टेंबर: उत्तर आधुनिकतावाद ही अत्यंत लवचिक संकल्पना असून पारंपरिक इतिहास लेखनास जोरदार धक्के देऊन वस्तुनिष्ठ इतिहास लेखनास प्रेरित करण्याचे महत्त्वाचे कार्य या संकल्पनेने केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. अविनाश सप्रे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या निमंत्रितांच्या व्याख्यानमालेअंतर्गत इतिहासातील आधुनिकतावाद आणि उत्तर आधुनिकतावाद या विषयावर ते बोलत होते.
प्रा. सप्रे म्हणाले, ज्ञानव्यवस्थेचा संबंध सत्तेशी असतो कारण समाजाला कोणत्या प्रकारचे ज्ञान द्यावयाचे, याचा निर्णय सत्ता करीत असते. म्हणून ज्ञान आणि सत्ता यांचे संबंध तपासणे गरजेचे असते, असे मांडणारा मिशेल फुको हा महान उत्तर आधुनिकतावादी विचारवंत होता. आधुनिकतावादाने दिलेल्या विवेकवाद, बुद्धी प्रामाण्यवाद, विज्ञाननिष्ठा, व्यक्तीवाद यासारख्या त्त्वांच्या मर्यादा तर फुकोने दाखवून दिल्याच; पण त्याही पलीकडे जाऊन पारंपरिक चौकटीतील इतिहासलेखनास जबरदस्त धक्के दिले.
उत्तर आधुनिकतावाद ही एकसं विचारधारा नाही किंवा कोणी एकच एक व्यक्ती तिचा प्रवर्तक नाही. तर ती एक अतिशय लवचिक आणि वादग्रस्त संकल्पना असल्याचे सांगून प्रा. सप्रे यांनी उत्तर आधुनिकतावादाने नाकारलेल्या श्रेणी व्यवस्था, महाकथने, केंद्रीकरण इ. अनेक गोष्टींचे सविस्तर विवेचन केले. तसेच उत्तर आधुनिकतावादाच प्रणेता ल्योतार्द याने आधुनिकतावादाची देणगी असलेल्या वैज्ञानिक सिद्धांतांच्या तटस्थतेवर प्रश्नचिन्ह उभे केल्याचेही स्पष्ट केले.
     यावेळी इतिहास विभागप्रमुख डॉ.नंदा पारेकर यांनी प्रास्ताविक केले. नीलांबरी जगताप यांनी परिचय करून दिला तर तर डॉ. अवनिश पाटील यांनी आभार मानले. दोन दिवस चाललेल्या या व्याख्यानमालेसाठी प्रा.अविनाश भाले, उमेश भोसले, प्रा.सोनटक्के, प्रा.बोलईकर, प्रा.धीरज शिंदे तसेच इतिहास विभागातील विदयार्थी संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलीयन’ उपक्रम विद्यापीठात उत्साहात


शिवाजी विद्यापीठात ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलीयन’ उपक्रमांतर्गत आयोजित फुटबॉल स्पर्धेचे फुटबॉलला कीक मारून उद्घाटन करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. शेजारी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर व इतर.


फुटबॉल स्पर्धेत सहभागी संघांसमवेत प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड व अन्य शारीरिक शिक्षण संचालक.

फुटबॉल स्पर्धेत सहभागी खेळाडूंसमवेत प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड व अन्य शारीरिक शिक्षण संचालक.

कोल्हापूर, दि. १५ सप्टेंबर: महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलीयन या उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात आज आयोजित करण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेला उत्साहपूर्ण प्रतिसाद लाभला. स्पर्धेत सहभागी झालेल्या चौदा संघांमध्ये विद्यार्थिनींच्याही चार संघांचा समावेश राहिला, हे महत्त्वाचे!
आज सकाळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिवसभरात विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर या फुटबॉल स्पर्धा पार पडल्या. प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी फुटबॉलला कीक मारून स्पर्धेचे उद्घाटन केले. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनीही स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन (फिफा) यांच्यातर्फे १७ वर्षांखालील खेळाडूंसाठी फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा दि. ६ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत भारतात होत आहे. स्पर्धेतील एकूण सामन्यांपैकी सहा सामने महाराष्ट्रात नवी मुंबई येथे होणार आहेत. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर राज्यात फुटबॉलची आवड निर्माण व्हावी व अधिकाधिक युवकांनी मैदानी खेळांसाठी प्रवृत्त व्हावे, यासाठी महाराष्ट्र फुटबॉल मिशन १ मिलीयन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला विद्यापीठातील अधिविभाग व महाविद्यालयांचा उत्फूर्त प्रतिसाद लाभला. आजच्या स्पर्धेत विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, प्राणीशास्त्र, नॅनो सायन्स व तंत्रज्ञान, तंत्रज्ञान अधिविभाग यांसह शिवराज महाविद्यालय, गडहिंग्लज, स.ब. खाडे महाविद्यालय, कोपार्डे, गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय, कोल्हापूर, केआयटी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, कोल्हापूर या महाविद्यालयांचे एकूण चौदा संघ सहभागी झाले. त्यामध्ये चार मुलींचे संघही सहभागी झाले.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जे.एच. इंगळे, डॉ. अभिजीत वणिरे, एन.आर. कांबळे, धनंजय पाटील, राहुल मगदूम, विक्रम नांगरे, गॅब्रिएल रॉड्रिग्ज, शशी दाभाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.