Tuesday, 23 October 2018

तिसरी राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ कव्वाली स्पर्धा:

शिवाजी विद्यापीठास सलग दुसऱ्यांदा विजेतेपद

मुंबई विद्यापीठ सहविजेते

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते तिसऱ्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठ कव्वाली स्पर्धेतील विजेतेपदाचे पारितोषिक स्वीकारताना यजमान शिवाजी विद्यापीठाचा संघ.


तिसऱ्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठ कव्वाली स्पर्धेतील सहविजेता मुंबई विद्यापीठाचा संघ.

शिवाजी विद्यापीठात आयोजित कव्वाली स्पर्धेला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कोल्हापूर, दि. २३ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठात गेल्या दोन दिवसांपासून उत्तरोत्तर रंगत गेलेल्या जश्न-ए-कव्वाली अर्थात तिसऱ्या राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ कव्वाली स्पर्धेत यजमान शिवाजी विद्यापीठाच्या संघाने सलग दुसऱ्यांदा स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. मुंबई विद्यापीठाच्या संघाला सह-विजेतेपद जाहीर करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात आज सायंकाळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, रियाझ खान व विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ जल्लोषी वातावरणात पार पडला. रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिकांचे स्वरुप आहे. 

स्पर्धेत द्वितिय क्रमांक तीन विद्यापीठांच्या संघांना विभागून देण्यात आला. यामध्ये महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक (हरियाणा), लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, फगवाडा (पंजाब) आणि बनस्थळी विद्यापीठ, राजस्थान यांचा समावेश आहे.
तृतीय क्रमांकही तीन विद्यापीठ संघांना विभागून देण्यात आला. यामध्ये डॉ. हरिसिंह गौर विद्यापीठ, सागर (मध्य प्रदेश), संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांचा समावेश आहे.
पारितोषिक वितरण समारंभापूर्वी बनस्थळी विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ या तीन संघांनी उपस्थितांसाठी कव्वालीचे विशेष सादरीकरण केले. यावेळी भाषा भवन सभागृह रसिकांनी अक्षरशः तुडुंब भरून गेले होते. प्रत्येक सादरीकरणाला विद्यार्थी-विद्यार्थिनींचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत होता. शिवाजी विद्यापीठ संघाच्या सादरीकरणावेळी तर हा प्रतिसाद शिगेला पोहोचला. यजमान संघाच्या सादरीकरणाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले.
तत्पूर्वी, आज सकाळी नऊ वाजल्यापासून स्पर्धेतील उर्वरित संघांचे सादरीकरण झाले. यामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती, महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक (हरियाणा) आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड या संघांनी सादरीकरण केले. या समारंभास शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य, अधिष्ठाता व अन्य अधिकारी आवर्जून उपस्थित होते.

कोल्हापुरात कव्वालीचाही प्रेक्षक
पोवाडा-लावणीचा परिसर असलेल्या कोल्हापुरात कव्वालीचाही चाहता रसिकवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे, याची प्रचिती या स्पर्धेच्या निमित्ताने आली. शहर व परिसरातील अनेक रसिक प्रेक्षकांनी सलग दोन दिवस या स्पर्धेला उपस्थिती दर्शविली. काही प्रेक्षक तर सहकुटुंब उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे कव्वालीसारखा वेगळा गायन कलाप्रकार तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींना जवळून अनुभवता आला. या विद्यार्थ्यांनीही कव्वालीची अनुभूती वेगळी आणि हृदयस्पर्शी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यातून शिवाजी विद्यापीठाचा ही स्पर्धा आयोजित करण्याचा हेतू सफल झाल्याची पोचपावती मिळाली.

द्वितिय क्रमांक (विभागून)- बनस्थळी विद्यापीठ, राजसथान 

द्वितिय क्रमांक (विभागून)-  लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, फगवाडा, पंजाब

द्वितिय क्रमांक (विभागून)- महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक, हरियाणा

तृतीय क्रमांक (विभागून)- डॉ. हरिसिंह गौर विद्यापीठ, सागर (मध्य प्रदेश)

तृतीय क्रमांक (विभागून)- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती

तृतीय क्रमांक (विभागून)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड


Monday, 22 October 2018

विद्यापीठात माहौल ‘जश्न-ए-कव्वाली’चा!

देशाला एका सूत्रात गुंफण्याची क्षमता संगीतात: डॉ. डेव्हीड सॅम्पसन

शिवाजी विद्यापीठात आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठ कव्वाली स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी एआययूचे सहसचिव डॉ. डेव्हीड सॅम्पसन. व्यासपीठावर (डावीकडून) कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, विद्यार्थी विकास संचालक डॉ. आर.व्ही. गुरव.



मध्य प्रदेशातील सागर येथील डॉ. हरिसिंह गौर विद्यापीठाचा संघ

राजस्थान येथील बनस्थळी विद्यापीठाचा संघ

कोल्हापूर, दि. २२ ऑक्टोबर: ‘मेहफिल हमारी एक है, मेहफिल के टुकडे मत करो... मंझिल हमारी एक है, मंझिल के टुकडे मत करो... भारत हमारा एक है, भारत के टुकडे मत करो... अशी प्रत्येक देशबांधवाला आर्त साद घालणारी कव्वाली मध्य प्रदेशातल्या सागर येथील डॉ. हरिसिंह गौर विद्यापीठाच्या कव्वालीच्या संघाने कव्वाली सादर केली आणि खऱ्या अर्थाने शिवाजी विद्यापीठात जश्न-ए-कव्वालीचा माहौल तयार झाला.
कव्वालीला कोल्हापुरात प्रेक्षक नाही, अशी भावना एकीकडे असताना दुसरीकडे विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर सभागृहात या कव्वाली स्पर्धेला रसिकांचा इतका प्रतिसाद लाभला की, दुपारपर्यंत सभागृहात उभे राहण्यासही जागा नव्हती.
विद्यापीठात आजपासून तिसऱ्या राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ कव्वाली स्पर्धेस प्रारंभ झाला. त्याच्या प्रारंभाची कव्वाली गौर विद्यापीठाच्या संघाने सादर केली. शिवाजी विद्यापीठ आणि भारतीय विद्यापीठ महासंघ (एआययू) यांच्या संयुक्त विद्यमाने ही दोन दिवसीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
तत्पूर्वी, नवी दिल्ली येथील भारतीय विद्यापीठ महासंघाचे (एआययू) सहसचिव डॉ. डेव्हीड सॅम्पसन यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते, तर प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि एआययूचे निरीक्षक डॉ. विश्वरामन निर्मल प्रमुख उपस्थित होते.
डॉ. डेव्हीड सॅम्पसन
यावेळी आपल्या उद्घाटनपर भाषणात डॉ. सॅम्पसन म्हणाले, संगीत हे क्षेत्र असे आहे, की त्यामध्ये साऱ्या देशाला एका सूत्रात गुंफण्याची क्षमता आहे. संगीत माणसाला चिरतरुण ठेवते. कव्वाली ही तर पवित्र हृदयाने ईश्वराला घातलेली साद आहे. कव्वालीसारखा एक अतिशय महत्त्वाचा सांगितिक कलाप्रकार अस्तंगत होऊ लागला आहे, त्याला संजीवनी देण्यासाठी या कव्वाली स्पर्धेचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि परंपरा यांचा संगम या माध्यमातून व्हावा, म्हणून एक कव्वाली राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सौहार्दाचे आवाहन करणारी असावी, अशी अट या स्पर्धेसाठी घालण्यात आली आहे. जेणे करून एकतेची, समतेची भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजेल. यावेळी डॉ. सॅम्पसन यांनी कव्वाली, सुफी, फकीर या परंपरांचे यथार्थ विश्लेषण केले. शिवाजी विद्यापीठाने या स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात दाखविलेल्या सकारात्मकतेचेही त्यांनी मनापासून कौतुक केले.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, रांगड्या पोवाडा आणि लावणीची परंपरा असलेल्या कोल्हापुरात कव्वाली स्पर्धेचे आयोजन ही एका सांस्कृतिक बदलाच्या आणि समावेशनाच्या दिशेने आपली वाटचाल होत असल्याचे सुलक्षण आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवूनच ही स्पर्धा आयोजिली आहे. गतवर्षी शिवाजी विद्यापीठाच्या कव्वाली संघाने राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. त्या विद्यार्थ्यांच्या यशामुळेच मला शिवाजी विद्यापीठात ही स्पर्धा आयोजित करण्याची प्रेरणा मिळाली. ऐ माटी के पुतले तुझे कितना गुमान है, ही माणसाला स्वतःचा शोध घेऊन माणुसकीला प्रेरित करणारी कव्वाली ही व्यक्तीशः आपली आवडती असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी स्पर्धेचे परीक्षक सईद खान (नवी दिल्ली), रियाझ खान (मुंबई) व भारती वैशंपायन (कोल्हापूर) यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. स्वरुपा पाटील यांनी स्वागत केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी प्रास्ताविक केले, तर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांनी आभार मानले.
त्यानंतर मध्य प्रदेशातील गौर विद्यापीठाच्या संघाचे सादरीकरण झाले. त्याच्यानंतर राजस्थान येथील बनस्थळी विद्यापीठाच्या संघाने चाह ये है के मेरी हर साँस देश के नाम पर मिट जाए ही कव्वाली सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
दरम्यान, सुरवातीला प्रमुख अतिथींना मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये कोल्हापुरी फेटे बांधून आणि त्यानंतर तेथून कार्यक्रम स्थळापर्यंत हलगी-ताशाच्या कडकडाटात त्यांचे मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले.


Saturday, 20 October 2018

माजी विद्यार्थ्यांमुळे विद्यापीठाचा लौकिक सर्वदूर: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे

शिवाजी विद्यापीठात आयोजित माजी विद्यार्थी 


कोल्हापूर, दि. २० ऑक्टोबर: माजी विद्यार्थ्यांमुळे शिवाजी विद्यापीठाचा लौकिक जगभरात सर्वदूर पसरला आहे, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे काढले. शिवाजी विद्यापीठ माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आज सकाळी विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात माजी विद्यार्थ्यांचा मध्यवर्ती मेळावा आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा भार स्वीकारल्यानंतर विविध देशांत जाण्याचा योग आला. त्या ठिकाणी मला शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी भेटले. संबंधित ठिकाणचे कॉर्पोरेट जगतातील अधिकारी तसेच प्राध्यापक हे आपल्या विद्यार्थ्यांची कष्टाळू आणि समर्पित भावनेने काम करण्याची वृत्ती यांनी भारावून गेल्याचे दिसले. त्या त्या देशांचे संशोधन क्षेत्र असो अथवा अर्थकारण, या प्रत्येक क्षेत्रात आपले विद्यार्थी जागतिक स्तरावर मोलाचे योगदान देत आहेत. त्याचा आम्हाला अभिमान आहे. या पुढील काळात या विद्यार्थ्यांना विद्यापीठस्तरीय संघटनेच्या माध्यमातून विद्यापीठाच्या सर्वंकष विकासामध्ये सामावून घेण्याचा संकल्पही कुलगुरूंनी बोलून दाखविला.
या वेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी विद्यापीठाच्या वाटचालीविषयी सादरीकरणाद्वारे माजी विद्यार्थ्यांना अवगत केले. ते म्हणाले, वर्तमान स्थितीत विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांकडून विद्यमान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, तसेच सक्रिय योगदान अभिप्रेत आहे. त्या दृष्टीने त्यांनी आपल्या अनुभवाचा लाभ विद्यापीठाला वेळोवेळी मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
मेळाव्यास सुमारे २५० हून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते. त्यांच्यातील काहींनी प्रातिनिधिक मनोगते व्यक्त केली. यावेळी माजी विद्यार्थी संघटनेच्या स्वतंत्र संकेतस्थळाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या सुरवातीला कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी स्वागत केले. संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. डी.आर. मोरे यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक डॉ. जी.एस. राशिनकर यांनी उपक्रमांचा आढावा घेतला. संघटनेचे सचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले. यावेळी वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, इनोव्हेशन व इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. आर.के. कामत, संघटनेचे खजिनदार अजित चौगुले यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यापीठ विकासासाठी माजी विद्यार्थ्यांचे योगदान

नॅक मूल्यांकनात माजी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या विकासात्मक कार्यासाठी दिलेले योगदान हा अनेक घटकांपैकी एक घटक आहे. त्यामध्ये माजी विद्यार्थ्यांनी किती रकमेचे योगदान दिलेले आहे, यावर गुणांकन अवलंबून असणार आहे. याची पूर्ण जाणीव असलेले नॅकचे सल्लागार व शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी डॉ. जगन्नाथ पाटील यांनी पूर्वी जाहीर केल्यानुसार, रु. १,२५,००० चा धनादेश संघटनेकडे पाठविला आहे. तसेच, पलूस येथील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाच्या पदवीधरांनी रु. १० हजार देणगी रुपात दिले. प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी रु. २५ हजार दिले. डॉ. भारती पाटील यांनी रु. ५००० हजार दिले. संघटनेचे अध्यक्ष तथा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनीही ११ हजार रुपयांची देणगी संघटनेला दिली. तसेच, राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याभोवतीच्या उद्यानाच्या सुशोभीकरणाचा संपूर्ण खर्च करण्याची तयारी दर्शविली. 




Friday, 19 October 2018

‘शिवाजी द ग्रेट’ महाग्रंथाचे विद्यापीठात प्रकाशन

स्थित्यंतरांचा साक्षेपी वेध घेणाऱ्या संशोधनाला चालना आवश्यक: डॉ. अनिल काकोडकर


डॉ. बाळकृष्ण लिखित व डॉ. जयसिंगराव पवार संपादित 'शिवाजी द ग्रेट' या महाग्रंथाचे प्रकाशन करताना (डावीकडून) डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अनिल काकोडकर, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.

डॉ. अनिल काकोडकर


कोल्हापूर, दि. १९ ऑक्टोबर: वर्तमान परिस्थितीमधील भारताच्या सामाजिक, राजकीय स्थित्यंतरांचा शास्त्रीयदृष्ट्या आढावा घेऊन भविष्याचा साक्षेपी वेध घेणाऱ्या संशोधनाला विद्यापीठांनी चालना देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी आज येथे केले.
डॉ. अनिल काकोडकर
थोर इतिहासकार डॉ. बाळकृष्ण लिखित आणि डॉ. जयसिंगराव पवार संपादित शिवाजी द ग्रेट या चौ-खंडात्मक शिवचरित्राच्या नूतन आवृत्तीचे प्रकाशन डॉ. काकोडकर यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते, तर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर प्रमुख उपस्थित होते.
डॉ. काकोडकर म्हणाले, डॉ. बाळकृष्ण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा साद्यंत वेध घेतलेला आहे. हा महाग्रंथ शिवरायांच्या समकालीन परकीय वस्तुनिष्ठ संदर्भांच्या आधारे त्यांनी साकारलेला आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सद्यस्थितीतील राजकीय, सामाजिक उत्क्रांतीच्या कारणांचा शोध व वेध घेण्यासाठी अशा ऐतिहासिक दस्तावेजांचे योगदान मोलाचे आहे. डॉ. बाळकृष्णांनी अथक संशोधनांती अत्यंत परिश्रमातून हा महाग्रंथ साकारला आहे. इतके मोठे शिवचरित्र मी प्रथमच पाहतो आहे. इतिहास संशोधकांच्यासह सर्वसामान्य शिवप्रेमींच्या दृष्टीनेही या ग्रंथाचे मोल मोठे आहे.
यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, छत्रपती शिवरायांचे आपण सारे नाव घेतो, मात्र त्यांचा विचार घेत नाही. या देशातील जनतेने या न्यायप्रिय राजाच्या चरित्रापासून दिशादर्शक प्रेरणा घेण्याची गरज आहे.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या संशोधन कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, डॉ. पवार यांनी या वयातही ज्या उत्साहाने आणि जोमाने आपले संशोधनाचे कार्य अखंडितपणे चालविले आहे, त्याचा मला प्रचंड विस्मय वाटतो. सामाजिक विज्ञानामध्ये संशोधनाला मर्यादा आहेत, असे म्हणणारा आणि मानणारा एक मोठा संशोधक वर्ग आपल्याकडे आहे. एका संकुचित परिप्रेक्ष्यातून जर तुम्ही या अतिव्यापक विषयाकडे पाहात राहाल, तर एकही विषय संशोधनासाठी हाती लागणार नाही. संशोधकाने सर्वप्रथम आपला हा संकुचितपणा सोडून देऊन व्यापक दृष्टीने भूतकाळाकडे, वर्तमानाकडे पाह्यला हवे आणि त्यातून त्याने भविष्याचा वेध घ्यायला हवा. सामाजिक संशोधनाच्या या निकषांमध्ये अत्यंत समर्पित भावनेने डॉ. पवार यांनी कार्य चालविल्यानेच त्यांचे संशोधन अनमोल आहे. डॉ. बाळकृष्ण यांनी लिहीलेल्या शिवचरित्राचे पुनरुज्जीवन करून या महाराष्ट्रावर त्यांनी मोठे उपकार केले आहेत, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
शिवाजी महाराज यांचे चरित्र म्हणजे सामान्यत्वापासून असामान्यत्वाकडील प्रवासाचे ज्वलंत उदाहरण आहे. युगानुयुगे त्यांचे चरित्र प्रेरणा देत राहील, अशी भावनाही कुलगुरूंनी व्यक्त केली.
डॉ. जयसिंगराव पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात डॉ. बाळकृष्णांनी मृत्यूशय्येवर असतानाही शिवचरित्राचा ध्यास घेऊन ते कसे पूर्ण केले, याचे मर्मग्राही विवेचन केले. शिवाजी विद्यापीठाची स्थापना हे डॉ. बाळकृष्ण आणि छत्रपती राजाराम महाराज यांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. हा इतिहास तरुण पिढीने लक्षात घेण्याचे आवाहन त्यांनी केले. शिवाजी द ग्रेट या ग्रंथाच्या माध्यमातून शिवरायांना वैश्विक स्तरावर नेण्याची कामगिरी डॉ. बाळकृष्ण यांनी केली, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवाजी द ग्रेट या महाग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.



Wednesday, 17 October 2018

संशोधनाच्या क्षेत्रात शिवाजी विद्यापीठ देशात द्वितिय स्थानी

जागतिक ‘क्यू.एस.’ रँकिंगमधील मानांकन जाहीर

शिवाजी विद्यापीठास प्राप्त झालेले क्यू.एस. रँकिंगचे प्रमाणपत्र.


 
नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार आणि क्यू.एस. रँकिंगचे उपाध्यक्ष जेसन न्यूमन यांच्या हस्ते क्यू.एस. रँकिंगचे प्रमाणपत्र स्वीकारताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार आणि क्यू.एस. रँकिंगचे उपाध्यक्ष जेसन न्यूमन यांच्या हस्ते क्यू.एस. रँकिंगचे प्रमाणपत्र स्वीकारताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

कोल्हापूर, दि. १७ ऑक्टोबर: संशोधनाच्या क्षेत्रात येथील शिवाजी विद्यापीठाने राष्ट्रीय पातळीवर द्वितिय स्थान पटकावून या क्षेत्रातील आपले प्रभुत्व सिद्ध केले आहे. शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनात जागतिक स्तरावर दबदबा असलेल्या ब्रिटीश क्यू.एस. वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगचे भारतीय संस्थांच्या संदर्भातील मानांकन १५ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाची संशोधन क्षेत्रातील आघाडी अधोरेखित झाली आहे.
क्यू.एस. वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगच्या वतीने ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) देशांसाठी स्वतंत्र रँकिंग (क्यू.एस. ब्रिक्स इंडिया रँकिंग) घेण्याचे ठरविण्यात आले आहे. या धोरणानुसार, यंदा प्रथमच भारतातील शैक्षणिक संस्थांसाठी स्वतंत्रपणे क्रमवारी जाहीर केली. यामध्ये भारतातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये शिवाजी विद्यापीठाची क्रमवारी ५६-६० अशी आहे; तर, ब्रिक्स देशांतील शैक्षणिक संस्थांमध्ये ही क्रमवारी २५१-२६० अशी आहे.
ही मानांकने ठरविताना शैक्षणिक लौकिक (३०%), संस्थेचा लौकिक व परंपरा (२०%), शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर (२०%), पीएचडीधारक शिक्षक (१०%), स्कोपस आकडेवारीनुसार प्रतिशिक्षक शोधप्रबंध (१०%), स्कोपसनुसार शोधनिबंधांमधील उद्धृते (साईटेशन्स) (५%), आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे प्रमाण (२.५%) आणि आंतरराष्ट्रीय शिक्षकांचे प्रमाण (२.५%) असे निकष निर्धारित करण्यात आले होते. यातील संशोधनाशी निगडित निकषांवर शिवाजी विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर द्वितिय स्थान मिळवून आपल्या संशोधनाची गुणवत्ता सिद्ध केली आहे. या निकषांवर मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने (आय.सी.टी.) प्रथम स्थान पटकावले आहे.
या रँकिंगच्या प्रमाणपत्र प्रदानाचा कार्यक्रम नवी दिल्ली येथे १५ ऑक्टोबर रोजी झाला. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार आणि क्यू.एस. रँकिंगचे उपाध्यक्ष जेसन न्यूमन यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन केंद्राचे तथा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. आर.के. कामत उपस्थित होते.

विद्यापीठाच्या संशोधन परंपरेचा सन्मान: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
जागतिक संशोधन संस्थांच्या क्रमवारीच्या क्षेत्रात थिंक टँक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ब्रिटनच्या क्यू.एस. वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संशोधनाचा गौरव होणे हा विद्यापीठाच्या संशोधन परंपरेचा सन्मान आहे. या निमित्ताने विद्यापीठाच्या संशोधन कार्याची नोंद प्रथमच एका जागतिक क्रमवारी निर्धारित करणाऱ्या यंत्रणेमार्फत घेण्यात आली, याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठातील शिक्षक तसेच संशोधकांनी आपल्या संशोधनपर कार्याचा ठसा जागतिक स्तरावर उमटविलेला आहे, यावर वेळोवेळी केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणांतून शिक्कामोर्तब झाले आहे. आता या दर्जावर क्यू.एस. रँकिंगची मोहोर उमटल्याने याला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. ही बाब विद्यापीठातील तसेच विद्यापीठ परिक्षेत्रातील संशोधकांसाठी अत्यंत प्रेरणादायी स्वरुपाची असून या पुढील काळातही या क्षेत्रातील विद्यापीठाची आघाडी टिकविण्याच्या दृष्टीने अधिकाधिक दर्जेदार संशोधन होत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या रँकिंगबद्दल विद्यापीठातील संशोधकांसह सर्वच घटकांचे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी अभिनंदन केले.

शिवाजी विद्यापीठात २२ ऑक्टोबरपासून राष्ट्रीय कव्वाली स्पर्धा

- कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची माहिती




कोल्हापूर, दि. १७ ऑक्टोबर: भारतीय विद्यापीठ महासंघ (ए.आय.यु.) आणि येथील शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ कव्वाली स्पर्धेचे आयोजन येत्या सोमवारपासून (दि. २२ ऑक्टोबर) विद्यापीठात करण्यात आले आहे. या दोन दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी सकाळी १०.३० वाजता वि.स. खांडेकर भाषा भवनच्या सभागृहात ए.आय.यु.चे सहसचिव डॉ. सॅम्पसन डेव्हीड यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गतवर्षी मुंबई येथे झालेल्या दुसऱ्या राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या कव्वाली संघाने चमकदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले होते. लावणी-पोवाड्याची परंपरा असलेल्या या परिसरातील विद्यार्थ्यांनी हा एक प्रकारे इतिहास घडविला होता. त्यामुळे ही कव्वालीची परंपरा आणखी जोमाने पुढे जावी आणि स्थानिक विद्यार्थ्यांनाही त्यातून प्रेरणा मिळावी, यासाठी यंदाच्या तिसऱ्या राष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद  भूषविण्याची इच्छा विद्यापीठाने ए.आय.यु.कडे व्यक्त केली होती. त्यानुसार, ही स्पर्धा शिवाजी विद्यापीठात आयोजित केली जात आहे. स्पर्धेत देशभरातील एकूण आठ संघांनी नोंदणी केली आहे. सर्व स्पर्धा वि.स. खांडेकर भाषा भवनच्या सभागृहातच पार पडतील. समारोप समारंभ मंगळवारी (दि. २३) सायंकाळी ४ वाजता होईल. स्पर्धेच्या अनुषंगाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे.
या स्पर्धेचे समन्वयक तथा विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर व्ही. गुरव या संदर्भात अधिक माहिती देताना म्हणाले की, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या आठ संघांपैकी चार संघ महाराष्ट्रातील असून हरियाणा, पंजाब, राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यांमधून प्रत्येकी एक संघ सहभागी होणार आहे. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे २५ हजार रुपये रोख, २० हजार रुपये रोख व १५ हजार रुपये रोख आणि चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठ स्तरावर विविध समित्यांची निर्मिती करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून सर्व कामे मार्गी लावण्यात येत आहेत. येणारे संघ, त्यांचे व्यवस्थापक, परीक्षक यांच्या निवासाची व्यवस्था विद्यार्थी भवन, पाच बंगला आणि विद्यापीठ अतिथीगृह या ठिकाणी करण्यात आली आहे. तर, चहापान व भोजनाची मध्यवर्ती व्यवस्था लोककला केंद्र येथे करण्यात आली आहे.
अशा प्रकारची राष्ट्रीय कव्वाली स्पर्धा ही कोल्हापूरमध्ये प्रथमच होत असून त्याचा रसिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. गुरव यांनी यावेळी केले.
पत्रकार परिषदेस प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, इनोव्हेशन व इन्क्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. आर.के. कामत यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय जाधव, अॅड. धैर्यशील पाटील, डॉ. रसूल कोरबू, डॉ. प्रकाश कुंभार आदी उपस्थित होते.

Tuesday, 16 October 2018

डॉ. बाळकृष्ण लिखित ‘शिवाजी द ग्रेट’चे

शुक्रवारी शिवाजी विद्यापीठात प्रकाशन



डॉ. अनिल काकोडकर प्रमुख पाहुणे
कोल्हापूर, दि. १६ ऑक्टोबर: महान शिवचरित्रकार प्राचार्य डॉ. बाळ कृष्ण यांच्या शिवाजी द ग्रेट या इंग्रजी महाग्रंथाच्या नूतन आवृत्तीचे प्रकाशन महाराष्ट्राच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष व थोर अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (दि. १९) करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राचे संचालक व ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार यांनी दिली आहे.
डॉ. पवार यांनीच राजर्षी शाहू साहित्यमालेच्या अंतर्गत या महाग्रंथाच्या नूतन आवृत्तीचे संपादन केले आहे. या कार्यक्रमाविषयी डॉ. पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर सभागृहात शुक्रवारी दुपारी ३ वाजता प्रकाशन समारंभ होईल. यावेळी श्रीशाहू छत्रपती महाराज (करवीर) यांची प्रमुख उपस्थिती असेल, तर कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे अध्यक्षस्थानी असतील.
शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त शाहू संशोधन केंद्रातर्फे या ग्रंथाचा संकल्प सोडला गेला होता. या संकल्पपूर्तीनिमित्त प्रकाशन दिनी हा चार खंडांचा ग्रंथ अवघ्या ५०० रुपयांत उपलब्ध करण्यात येणार आहे. या संधीचा शिवप्रेमींनी उदंड प्रतिसाद देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. पवार यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी केले आहे.

शिवाजी द ग्रेटचे वैशिष्ट्य
Dr. Balkrishna
सुमारे ७५ वर्षांपूर्वी शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेचे भव्य स्वप्न पाहणाऱ्या डॉ. बाळ कृष्ण यांच्या शिवाजी द ग्रेट या महाग्रंथाचे वैशिष्ट्य असे की, शिवचरित्राने आणि त्यांच्या कार्याने भारावलेल्या डॉ. बाळ कृष्ण यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात या महाग्रंथाचा संकल्प सोडला. १९३२ ते १९४० या कालावधीत त्यांनी या चार खंडांत विभागलेल्या सुमारे १६३५ पृष्ठसंख्येच्या महाग्रंथाचे लेखन पूर्ण केले. कित्येकदा अंगात प्रचंड ताप असतानाही त्यांनी हे लेखन पूर्ण करण्याचा ध्यास सोडला नाही. शिवछत्रपतींविषयी वाटणारा भक्तीभाव व त्यातून निर्माण झालेली त्यांची मिशनरी वृत्ती या गुणांच्या जोरावर त्यांनी दम्यासारख्या रोगाशी झुंज देत आपले जिवितकर्तव्य पूर्ण केले. त्यानंतर काही काळातच त्यांचे निधन झाले.
डॉ. बाळकृष्णांच्या शिवचरित्राचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ते मुख्यतः डच, पोर्तुगीज, इंग्लिश, फ्रेंच आदी युरोपियन भाषांमधील कागदपत्रांवर आधारित आहे. विशेषतः हेग व बटव्हिया येथून त्यांनी खास तज्ज्ञांची नेमणूक करून डच साधने मिळविली. डच साधने मिळवून शिवचरित्रात मोलाची भर घालणारे ते पहिले इतिहासकार आहेत. शिवाजी विद्यापीठाची स्थापना आणि शिवचरित्र ही बाळकृष्णांनी पाहिलेली दोन स्वप्ने होती. त्यातील शिवचरित्राचे स्वप्न त्यांच्या हयातीत, तर विद्यापीठाचे स्वप्न त्यांच्या मृत्योपरांत साकार झाले, अशी माहिती डॉ. जयसिंगराव पवार यांनी यावेळी दिली.