Thursday, 29 November 2018

यशवंतराव चव्हाण यांना कुलगुरूंकडून आदरांजली

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कऱ्हाड येथील प्रितीसंगम परिसरातील समाधीस्थळाला भेट देऊन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आदरांजली वाहिली.


ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कऱ्हाड येथील प्रितीसंगम परिसरातील समाधीस्थळाला भेट देऊन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आदरांजली वाहिली.

कऱ्हाड येथील प्रितीसंगम परिसरातील समाधीस्थळाची पाहणी करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

कोल्हापूर, दि. २९ नोव्हेंबर: प्रितीसंगम हे केवळ कृष्णा-कोयनेच्या संगमाचे ठिकाण नसून या संगमात यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाचाही प्रवाह येऊन मिळाल्याने याला पवित्र त्रिवेणी संगमाचे स्वरुप प्राप्त झाले आहे, अशा शब्दांत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्राचे शिल्पकार व ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी गेल्या रविवारी (ता. २६) कऱ्हाड येथील प्रितीसंगमावरील समाधीस्थळास भेट देऊन आदरांजली वाहिली. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. समाधीस्थळ परिसरात कुलगुरू डॉ. शिंदे यांनी काही काळ व्यतित केला आणि उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, यशवंतरावांनी अत्यंत द्रष्टेपणाने महाराष्ट्राच्या विकासाची दिशा आखली. त्यांनी आखून दिलेल्या रोडमॅपनुसार धोरणकर्त्यांनी वाटचाल केल्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा विकास अधिक गतीने झाल्याचे दिसून येते. राज्याचा शैक्षणिक, औद्योगिक तसेच इतर विविध क्षेत्रांत विकास झाला. येथून पुढेही आपण त्याच दिशेने वाटचाल करीत गेल्यास प्रगतीच्या नव्या दिशा गवसतील, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी प्रा. बाळासाहेब गोफणे यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

यजमान ‘शिवाजी’सह मुंबई, औरंगाबाद व कोटा विद्यापीठाचा राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश निश्चित



नांदेडच्या खेळाडूची मुंबई संघावर आक्रमक चढाई

पुणे विद्यापीठाच्या खेळाडूची पकड करण्याच्या प्रयत्नात कोटा विद्यापीठाचे खेळाडू

शिवाजी विद्यापीठाच्या खेळाडूंनी सोलापूर विद्यापीठाच्या खेळाडूची केलेली पकड

प्रेक्षकांनी भरून गेलेली प्रेक्षकगॅलरी

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धा:

कोल्हापूर, दि. २८ नोव्हेंबर: येथील शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेत आज सायंकाळी झालेल्या सामन्यांमध्ये यजमान शिवाजी विद्यापीठासह मुंबई विद्यापीठ, औरंगाबादचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि कोटा विद्यापीठ या चार संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवित राष्ट्रीय स्पर्धेतील आपला प्रवेश निश्चित केला. उद्यापासून त्यांच्यात क्रमांक निश्चितीसाठीचे सामने सुरू होतील.
यजमान शिवाजी विद्यापीठ आणि गेल्या वर्षी चौथ्या क्रमांकावरील सोलापूर विद्यापीठ यांच्यात अतिशय चुरशीने सामना सुरू झाला. तथापि, सोलापूरच्या संघातील खेळाडूंच्या आक्रमकपणाला अखिलाडू वृत्तीचे गालबोट लागले. त्यामुळे पंचांनी त्यांना दोन वेळा ग्रीन कार्ड दाखविले. त्यांच्या संघ प्रशिक्षकांनी, व्यवस्थापकांनीही खेळाडूंना समजावले. पण, त्यांच्यात फरक न पडल्याने पंचांनी एकाला यलो कार्ड दाखविले. तेव्हा पुन्हा प्रशिक्षकांनी खेळाडूंना समजावण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांचे काही न ऐकता ३५-१९ अशा गुणांवर सोलापूरच्या खेळाडूंनी सामना सोडला. पंचांनी त्यांची पाच मिनिटे वाट पाहून गुणांनी आघाडीवर असलेल्या शिवाजी विद्यापीठ संघाला विजयी घोषित केले.
पुणे विद्यापीठ आणि कोटा विद्यापीठ यांच्यातील सामनाही अत्यंत चुरशीने खेळला गेला. या सामन्यात कोटा विद्यापीठाने पुण्यावर ३९-३७ असा अगदी निसटता विजय मिळविला. नांदेडचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ यांच्यातील सामनाही अतिशय रंगतदार झाला. मात्र, मुंबई विद्यापीठाने आक्रमक चढाईच्या जोरावर सामना ४७-३४ असा जिंकला. औरंगाबादचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि गेल्या स्पर्धेतील विजेता असलेला शिखर येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय शेखावती विद्यापीठ यांच्यातही अत्यंत अटीतटीचा सामना झाला. हा सामना औरंगाबादने ४५-४१ असा जिंकला. या चारही विजेत्या संघांचा राष्ट्रीय स्पर्धेतील प्रवेश निश्चित झाला आहे.

तत्पूर्वी, आज सकाळच्या सत्रात विविध संघांनी अत्यंत चुरशीच्या खेळाचे दर्शन घडविले. विशेषतः महाराष्ट्रातील विद्यापीठांचे प्रदर्शन जबरदस्त राहिले. शिवाजी विद्यापीठाचे दोन सामने सकाळच्या सत्रात झाले. पहिल्या सामन्यात गोवा विद्यापीठाच्या संघाला ६३-२१ असे लीलया पराभूत केले. पुढील सामन्यात शिवाजी विद्यापीठाची भोपाळच्या राजीव गांधी प्रौद्योगिकी विद्यापीठाशी लढत झाली. चुरशीने झालेल्या या सामन्यात शिवाजी विद्यापीठाने भोपाळच्या संघाला  ५४-१३ असे हरविले.
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने राजस्थानच्या भूपाल नोबल्स विद्यापीठाला ४०-११ असे पराभूत करून पुढील फेरीत प्रवेश केला. त्यांची पुढील लढत सूरतच्या वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठाशी झाली. स्पर्धेतील सर्वाधिक अटीतटीचा सामना या दोन संघांत झाला. नांदेडने या सामन्यात ४५-४४ असा अवघ्या एका गुणाने निसटता विजय मिळविला.
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने जबलपूरच्या राणी दुर्गावती विद्यापीठाच्या संघाला ६८-२३ असे पराभूत केले. आणि पुढील फेरीत अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाला ४४-२६ असे पराभूत करून पात्रता फेरीत प्रवेश केला.
नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाला मात्र कोटा विद्यापीठाच्या संघाकडून ५६-३१ असा पराभव पत्करावा लागला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर वि.वि. हेमचंद्राचार्य उत्तर गुजरात विद्यापीठ, पाटण (57-25), वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ, सुरत वि.वि. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव (36-34), शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर वि.वि. गोवा विद्यापीठ, गोवा (63-21), संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती वि.वि. राजस्थान विद्यापीठ, जयपूर (34-32), कोटा विद्यापीठ, कोटा वि.वि.एल.एन.आय.पी.ई.विद्यापीठ, ग्वाल्हेर (45-17), स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड वि.वि. भोपाल नोबेल विद्यापीठ, राजस्थान (40-11), राजीव गांधी प्रद्योगिकी विश्वविद्यालय, भोपाल वि.वि. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली (49-26), डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद वि.वि. राणी दुर्गावती विश्वविद्यालय, जबलपूर (68-23), कोटा विद्यापीठ, कोटा वि.वि.राष्टसंत तुकडोजी महाराज, नागपूर (56-31), स्वामी रामानंद तीर्थ महाराज विद्यापीठ, नांदेड वि.वि. वीर नरमद दक्षीण विद्यापीठ, सुरत (45-44), शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर वि.वि. राजीव गांधी प्रोद्योगिकी विद्यापीठ, भोपाळ (54-13), डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद वि.वि. संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती (44-26).
मंगळवारी (दि. २७ नोव्हेंबर) रात्री विद्युतझोतात रंगलेल्या सामन्यांचे निकाल पुढीलप्रमाणे (कंसात गुण) असे: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर वि.वि. भारती विद्यापीठ, पुणे (43-23), उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव वि.वि. गुजरात टेक्नोलॉजिकल विद्यापीठ अहमदाबाद (44-31), शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर वि.वि. कडी सर्वा विश्वविद्यालय, गांधीनगर (61-13), संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ वि.वि. देवी अहिल्या विद्यापीठ, इंदोर (36-21), कोटा विद्यापीठ, कोटा वि.वि. विक्रम विद्यापीठ, उज्जैन (54-28), भोपाल नोबल विद्यापीठ वि.वि. गुजरात विद्यापीठ (48-41), गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली वि.वि. पारुल विद्यापीठ, गुजरात (41-26), राणी दुर्गावती विश्वविदयालय, जबलपूर वि.वि. बरकतुल्लाह विद्यापीठ, भोपाल (48-43),  एल.एन.आय.पी.ई. विद्यापीठ, ग्वाल्हेर वि.वि. महाराज सूरजमल ब्रिज विश्वविद्यालय, भरतपूर (54-29), स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड वि.वि. मोहनलाल सुखोडिया विद्यापीठ, उदयपूर (47-17), राजीव गांधी प्रौद्योगिकी विश्वविदयालय, भोपाल वि.वि. महाराजा छत्रसाल बुंदेलखंड विद्यापीठ, छत्रपूर (59-13), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद वि.वि. सौराष्ट्र विद्यापीठ, राजकोट (70-20).

Tuesday, 27 November 2018

औरंगाबाद, नांदेड संघांची आगेकूच



वीर नर्मद गुजरात विद्यापीठ आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ या संघादरम्यान झालेल्या सामन्यातील एक क्षण.

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धा:

कोल्हापूर, दि. २७ नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेत आज दुसऱ्या दिवशी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवित पुढील फेरीत प्रवेश केला. विद्यापीठाच्या लोककला केंद्रात मॅटवर हे सामने सुरू आहेत.
आज सकाळच्या सत्रात औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि मणिपाल विद्यापीठ, मणिपाल यांच्यात सामना झाला. एकतर्फी झालेला हा सामना औरंगाबादच्या संघाने ६३-०६ असा सुमारे ५७ गुणांनी जिंकला. नांदेड विद्यापीठाच्या संघाची लढत गुजरात विद्यापीठाशी झाली. नांदेडने हा सामना ४१-१२ असा २९ गुणांनी जिंकला.
आज (दि. २७) रोजी झालेल्या इतर सामन्यांचे निकाल (कंसात गुण) पुढीलप्रमाणे असे: वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ वि.वि. स्वर्णीम गुजरात क्रीडा विद्यापीठ, गांधीनगर (४१-३८), महाराजा छत्रसाल बुंदेलखंड विद्यापीठ, छत्रपूर (म.प्र.) वि.वि. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (पुढे चाल), एल.एन.आय.पी.ई. विद्यापीठ, ग्वाल्हेर वि.वि. संदीप युनिव्हर्सिटी, नाशिक (५६-३१), सौराष्ट्र विद्यापीठ, राजकोट वि.वि. तांटिया विद्यापीठ, गंगानगर (राजस्थान) (पुढे चाल), महाराज सूरजमल ब्रिज विश्वविद्यालय विद्यापीठ, भरतपूर वि.वि. राजस्थान केंद्रीय विद्यापीठ, अजमेर (पुढे चाल), राजीव गांधी विद्यापीठ, भोपाळ वि.वि. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (पुढे चाल), मोहनलाल सुखोडिया विद्यापीठ, उदयपूर वि.वि. राजस्थान कृषी विद्यापीठ, बिकानेर (५८-१९), गोवा विद्यापीठ, पणजी वि.वि. पॅसिफिक अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन एन्ड रिसर्च, उदयपूर (४१-३०), हेमचंद्र उत्तर गुजरात विद्यापीठ, पाटण (गुजरात) वि.वि. सरदार पटेल विद्यापीठ, वल्लभ विद्यानगर, गुजरात (३५-२६), राजस्थान विद्यापीठ, जयपूर वि.वि. महाराज गंगासिंह विद्यापीठ, बिकानेर (४२-४०).
दरम्यान, काल उद्घाटन समारंभानंतर रात्री विद्युतझोतात रंगलेल्या सामन्यांचे निकाल पुढीलप्रमाणे:-
भारती विद्यापीठ, पुणे वि.वि. कच्छ विद्यापीठ, गुजरात (३४-१४), गुजरात टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ, अहमदाबाद वि.वि. डॉ. हरिसिंह गौर विद्यापीठ, सागर (४४-२२), देवी अहिल्या विद्यापीठ, इंदोर वि.वि. एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठ, पुणे (५१-१७), कोटा विद्यापीठ, कोटा वि.वि. महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा (३८-१८), भूपाल नोबल विद्यापीठ, राजस्थान वि.वि. गोविंद गुरू ट्रायबल विद्यापीठ, बन्सवारा (७१-३८), गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली वि.वि. माधव विद्यापीठ, पिंडवारा (पुढे चाल), बरकतुल्ला विद्यापीठ, भोपाळ वि.वि. निरमा विद्यापीठ, अहमदाबाद (पुढे चाल), विक्रम विद्यापीठ, उज्जैन वि.वि. श्री गोविंद गुरू विद्यापीठ, गुजरात (५३-०७), गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद वि.वि. राजर्षी भतृहरी मत्स्य विद्यापीठ, अलवार (४०-२९), पारुल विद्यापीठ, गुजरात वि.वि. सिम्बायोसिस विद्यापीठ, पुणे (पुढे चाल), राणी दुर्गावती विद्यापीठ, जबलपूर वि.वि. जिवाजी विद्यापीठ, ग्वाल्हेर (५३-११)


Monday, 26 November 2018

मेहनत करा; स्टॅमिना, ताकद, लवचिकता मिळवा:

आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू शांताराम जाधव यांचा कानमंत्र

शिवाजी विद्यापीठात पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ध्वजवंदन करताना आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू शांताराम जाधव आणि कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत मान्यवर. 


शिवाजी विद्यापीठात पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेचे आकाशात फुगे सोडून उद्घाटन करताना आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू शांताराम जाधव, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा संचालक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, क्रीडा संचालक डॉ. पी.टी. गायकवाड, व्यवस्थापन परिषद सदस्य संजय जाधव.

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात उपस्थित क्रीडापटूंना संबोधित करताना शांताराम जाधव.

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी झालेल्या शिवाजी विद्यापीठ विरुद्ध कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या सामन्यावेळी प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूची पकड करताना शिवाजी विद्यापीठाचे खेळाडू.


पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन


कोल्हापूर, दि. २६ नोव्हेंबर: जोरदार मेहनत करा; स्टॅमिना, ताकद आणि लवचिकता मिळवा. देशाचे नाव कबड्डीत उज्ज्वल करा, असा कानमंत्र आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू शांताराम जाधव यांनी आज येथे विविध राज्यांच्या विद्यापीठांतून आलेल्या कबड्डीपटूंना दिला.
शिवाजी विद्यापीठात आजपासून भारतीय विद्यापीठ महासंघ (एआययू) आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धांना प्रारंभ झाला. त्याचा उद्घाटन समारंभ आज सायंकाळी श्री. जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे अध्यक्षस्थानी होते; तर, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते. विद्यापीठाच्या खुल्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, क्रीडा संचालक डॉ. पी.टी. गायकवाड, व्यवस्थापन परिषद सदस्य संजय जाधव उपस्थित होते.
Shantaram Jadhav
श्री. जाधव म्हणाले, खेळाडूंच्या आयुष्यात आंतरविद्यापीठीय स्पर्धा या सेकंड इनिंग असतात. कोणत्याही उपकरणाशिवाय खेळता येणारा खेळ म्हणजे कबड्डी. यातील आपली कामगिरी उंचावण्यासाठी खेळाडूंनी दररोज किमान सहा तास व्यायाम करायला हवा. प्रामाणिकपणे खेळले पाहिजे. पैशांच्या अपेक्षेपेक्षा करिअर म्हणून खेळलात, तर पाठोपाठ पैसाही आपोआपच येईल. यावेळी स्पर्धेचे नेटके आयोजन केल्याबद्दल त्यांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले.
Dr. Devanand Shinde
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, खेळाडूने शारिरीक श्रम तर करायलाच हवेत, पण त्याचा मानसिक फिटनेसही अत्यंत महत्त्वाचा आहे. खेळ प्रथमतः डोक्यात खेळला जातो आणि नंतर मैदानात त्याची कृती होते. त्यामुळे आपला खेळ निकोप करून खेळाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रत्येक खेळाडूने प्रयत्न करायला हवेत.
यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि शांताराम जाधव यांच्या हस्ते एआययु आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या ध्वजांना वंदन करण्यात आले. तसेच, आकाशात फुगे सोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. उपस्थित खेळाडूंना शिस्त व खिलाडूपणाची शपथ देण्यात आली.
कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी स्वागत केले, तर पी.टी. गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी राष्ट्रीय पंच रमेश भेंडेगिरी यांच्यासह जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी, विविध महाविद्यालयांचे क्रीडा संचालक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांसमोर यजमान शिवाजी विद्यापीठ आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली या दोन संघांमध्ये सामना खेळविण्यात आला. हा सामना शिवाजी विद्यापीठाने ५६-२५ असा जिंकला.


पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी झालेल्या शिवाजी विद्यापीठ विरुद्ध कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या सामन्यावेळी प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूची पकड करताना शिवाजी विद्यापीठाचे खेळाडू.

शिवाजी विद्यापीठात आजपासून सुरू झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी झालेल्या तेरा सामन्यांचा निकाल पुढीलप्रमाणे:-
१)      गोवा विद्यापीठ, पणजी वि.वि. नवसारी विद्यापीठ, गुजरात (४३-१८)
२)      वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ, सूरत वि.वि. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे (६२-१४)
३)      उदयपूर विद्यापीठ, उदयपूर वि.वि. गुजरात विद्यापीठ, गुजरात (विजयी घोषित)
४)      महाराजा गंगासिंग विद्यापीठ, बिकानेर वि.वि. जोधपूर विद्यापीठ, राजस्थान (५७-१७)
५)      सरदार पटेल विद्यापीठ, भावनगर वि.वि. जे.टी.एम. विद्यापीठ, ग्वाल्हेर (६३-३१)
६)      हेमचंद्र विद्यापीठ, गुजरात वि.वि. डी.वाय. पाटील विद्यापीठ, मुंबई (५४-३७)
७)      स्वर्णीम-गुजरात क्रीडा विद्यापीठ, गांधीनगर वि.वि. भक्त कवी नरसी मेहता विद्यापीठ, गुजरात (३८-२६)
८)      राजस्थान विद्यापीठ, जयपूर वि.वि. एम.डी.एस. विद्यापीठ, अजमेर (४१-३२)
९)      कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव वि.वि. एम.के.बी. विद्यापीठ, भावनगर (विजयी घोषित)
१०)  संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती वि.वि. रक्षा शक्ती विद्यापीठ, गुजरात (५८-२५)
११)  के.एस. विद्यापीठ, गांधीनगर वि.वि. दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, वर्धा (७०-१८)
१२)  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर वि.वि. जे.आर.एन. राजस्थान विद्यापीठ, राजस्थान (५७-१८)

१३)  शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर वि.वि. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (५६-२५)

सांविधानिक नैतिकता प्रस्थापनेची जबाबदारी प्रत्येकावर: प्राचार्य डॉ. हरिष भालेराव

संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्राचार्य डॉ. हरिष भालेराव आणि डॉ. श्रीकृष्ण महाजन.


शिवाजी विद्यापीठात संविधान दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना प्राचार्य डॉ. हरिष भालेराव. व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. श्रीकृष्ण महाजन.


शिवाजी विद्यापीठात संविधान दिन उत्साहात

कोल्हापूर, दि. २६ नोव्हेंबर: देशात उच्च प्रतीची सांविधानिक नैतिकता प्रस्थापित करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. हरिष भालेराव यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानातील मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्त्वे या विषयावर डॉ. भालेराव यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मानव्यशास्त्र अधिविभागात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर प्रमुख उपस्थित होते.
Dr. Harish Bhalerao
डॉ. भालेराव यांनी आपल्या व्याख्यानात लोकशाही मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी झालेल्या जागतिक प्रयत्नांचा वेध घेतला. लोकशाही पद्धती हीच भारतीयांची जीवनशैली असली पाहिजे, असे सांगून ते म्हणाले, नागरिकांना मुक्त वातावरणात जीवन जगता आले पाहिजे. यासाठी मूलभूत हक्कांची गरज असते. भेदाभेदाने व्याप्त, विषमतायुक्त समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता, सहिष्णुता या मूल्यांची प्रस्थापना करण्याचे ध्येय संविधान बाळगून आहे. प्रत्येक भारतीयाचे राहणीमान उंचावून त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे आणि त्यांच्या मनात उच्चनीचतेची, परस्परांबद्दल श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची भावना निर्माण न होऊ देणे या गोष्टी संविधानाला अभिप्रेत आहेत.
सांविधानिक नैतिकतेला आव्हान देता येणार नसल्याचे सांगून डॉ. भालेराव म्हणाले, भारतीय संविधानात समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आणि सांविधानिक उपाय योजण्याचा हक्क या मूलभूत हक्कांचा समावेश आहे. राज्याने कसे वागावे, हे मार्गदर्शक तत्त्वे सांगतात आणि ती राज्याची धोरणाबाबतची नैतिकता आहे. विकास, चौकसबुद्धी, मानवतावाद आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाला चालना देणारी आपली मार्गदर्शक तत्त्वे असून त्यामध्ये पर्यावरण आणि पशू यांच्या संदर्भातही सजगतेचा आग्रह दिसून येतो. धोरणे आखताना मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. धोरणांच्या सकारात्मक अंमलबजावणीसाठी राजकीय नैतिकता कळीची भूमिका बजावत असते, असेही डॉ. भालेराव यांनी सांगितले.
Dr. D.T. Shirke
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, संविधान हे केवळ पुस्तक नसून बाबासाहेबांनी या देशाला दिलेला मानवी मूल्यांचा दस्तावेज आहे. या संदर्भात जागरुकता अत्यंत महत्त्वाची आहे. यातल्या शब्दाशब्दाचा अभ्यास व प्रसार करणे ही आपल्यातल्या प्रत्येकाची वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात अधिविभाग तसेच महाविद्यालयीन स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या संविधान दूतांचा गौरव करण्यात आला. सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस डॉ. शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.
डॉ. आंबेडकर केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर अर्थसास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. पी.एस. कांबळे यांनी आभार मानले. वैभव कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी अधिष्ठाता डॉ. ए.एम. गुरव, डॉ. प्रमोद वासंबेकर, डॉ. के.डी. सोनवणे, डॉ. आर.जी. सोनकवडे, प्रा. शोभा शेटे, डॉ. पी.एस. पांडव, आनंद खामकर, सचिन देठे आदींसह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.