Monday, 14 January 2019

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना

लातूरचा ‘नारायणी पुरस्कार’ प्रदान



कोल्हापूर, दि. १४ जानेवारी: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना लातूरच्या स्वातंत्र्यसैनिक कै. नारायणराव भगवंतराव कुलकर्णी-गौरकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा नारायणी पुरस्कार-२०१८ आज प्रदान करण्यात आला.
अशोक नारायण कुलकर्णी- लातूरकर यांच्या हस्ते आणि विनायक कुलकर्णी व गुरूनाथ मिरजगावे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार कुलगुरू डॉ. शिंदे यांना त्यांच्या दालनात प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार गतवर्षी कुलगुरू डॉ. शिंदे यांना जाहीर झाला होता. तथापि, पूर्वनियोजित बैठकीमुळे कुलगुरू पुरस्कार वितरण समारंभाला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे श्री. लातूरकर यांनी आज कोल्हापूर भेटी दरम्यान त्यांना पुरस्कार प्रदान केला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि रोख १००१ रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्काराची रक्कम कुलगुरू डॉ. शिंदे यांनी विनम्रपणे परत केली आणि त्याचा विनियोग गरजू विद्यार्थ्यांसाठी करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यापूर्वी, हा पुरस्कार राज्याचे माजी मुख्यमंत्री (कै.) विलासराव देशमुख यांच्यासह भारताचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील, लातूरच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. जी.एम. वाघमारे, साहित्यिक व सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी के.डी. कुलकर्णी आदींना देण्यात आला आहे.


Saturday, 12 January 2019

‘यांचा’ दिवस कधी ढळणार नाही;

विचारांचा मधुघट रिता होणार नाही!

प्रा. एन.डी. पाटील यांच्याप्रती ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कृतज्ञ भावना;

शिवाजी विद्यापीठाचा 'प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार' प्रा. पाटील यांना प्रदान




शिवाजी विद्यापीठाचा 'प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार' ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन.डी. पाटील यांना प्रदान करताना ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार. व्यासपीठावर (डावीकडून) कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, सौ. सरोज (माई) पाटील, प्राचार्य बी.ए. खोत.


शिवाजी विद्यापीठाचा 'प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार' ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन.डी. पाटील यांना प्रदान करताना ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार. व्यासपीठावर (डावीकडून) कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, सौ. सरोज (माई) पाटील, प्राचार्य बी.ए. खोत.

शिवाजी विद्यापीठाच्या 'प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार' प्रदान समारंभात बोलताना ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार. व्यासपीठावर (डावीकडून) कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्रा. एन.डी. पाटील, सौ. सरोज (माई) पाटील, प्राचार्य बी.ए. खोत.

शिवाजी विद्यापीठाच्या कै. शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्या 'कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया' या डॉ. भारती पाटील संपादित ग्रंथाचे प्रकाशन करताना ज्येष्ठ नेते शरद पवार व सौ. सरोज (माई) पाटील. सोबत (डावीकडून) कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. भारती पाटील, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्रा. एन.डी. पाटील. 


कोल्हापूर, दि. १२ जानेवारी: यांचादिवस कधी ढळणार नाही, विचारांचा मधुघट कधी रिता होणार नाही, अशा काव्यमय शब्दांत ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन.डी. पाटील यांच्या संपूर्ण कारकीर्दीचा गौरव केला. शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य आर.के कणबरकर पुरस्कार आज ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन.डी. पाटील यांना श्री. पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या लोककला केंद्रात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. १ लाख ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
श्री. पवार यांनी आपल्या भाषणामध्ये प्रा. पाटील यांच्या समग्र जीवनसंघर्षाचा अत्यंत ओघवत्या भाषेत आढावा घेतला. त्यावेळी कवीवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितेचा संदर्भ देऊन त्यांच्या जीवन उद्दिष्टाचाच स्तुतीपर वेध घेतला. ते म्हणाले, शेतकरी, कष्टकरी, कामगार आदी वंचित शोषित वर्गाच्या हक्कांसाठी हयातभर संघर्षरत राहणारे प्रा. पाटील त्यांना हव्या त्याच पद्धतीनं जीवन जगले, हव्या त्या प्रश्नांसाठी लढले, लढत राहिले. आपलं संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी, सर्वसामान्य माणसाच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी, प्रसंगी संघर्ष करण्यासाठी घालविली. त्यांची ही भूमिका नव्या पिढीसाठी अतीव मार्गदर्शक आहे.
उपेक्षितांच्या न्यायासाठी संघर्ष करावयाचा म्हणूनच सार्वजनिक जीवनात उतरलेल्या प्रा. पाटील यांनी विधीमंडळातल्या आपल्या पदाचा उपयोग सदैव समाजातल्या शेवटच्या माणसाच्या व्यथा मांडण्यासाठी, सोडविण्यासाठी केल्याचे सांगून श्री. पवार पुढे म्हणाले, स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वसामान्यांच्या व्यथा सोडविण्यासाठी काँग्रेसची विचारधारा पुरेशी ठरत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यातून शंकरराव मोरे, केशवराव जेधे आदी प्रभृतींनी त्या विचारांशी फारकत घेऊन शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. त्यातून साकारलेल्या दाभाडे प्रबंधातून सत्तेतील फोलपण लक्षात आणून दिले. या विचारांचे आकर्षण प्रा. पाटील यांच्या मनात निर्माण झाले. तेव्हापासून आजतागायत त्या विचारांशी प्रामाणिक राहून त्यांनी आपले कार्य चालविले आहे. थोरले मेहुणे असलेले प्रा. पाटील विधीमंडळात विरोधी पक्षनेते तर मी सत्तारुढ पक्षाचा मंत्री, अशी अवस्था होती. मात्र, ते जेव्हा विधीमंडळात बोलण्यास उभे राहात, तेव्हा संपूर्ण विधीमंडळ त्यांचा शब्द न् शब्द कानात साठवून ठेवण्यासाठी उत्सुक असे. त्यांच्या मांडणीमध्ये व्यक्तीगत स्वार्थ कधीही डोकावला नाही. समाजाप्रतीची तळमळच त्यांच्या शब्दाशब्दांतून पाझरत असे. सामान्य माणसाच्या हिताचीच भूमिका त्यांनी सातत्याने घेतली.
वसंतदादा पाटील यांच्याशी १९७८ साली मतभेद होऊन सत्तेतून बाहेर पडल्यानंतरच्या काळात आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या मंत्रीमंडळात प्रा. पाटील यांचा सहकार खात्याचा मंत्री म्हणून समावेश होणे, हा त्यांच्या जीवनातील फार मोठा अपघात होता, असे सांगून श्री. पवार म्हणाले, तत्पूर्वी, प्रश्नांची जाण, त्यांची मांडणी इथवर मर्यादित कामकाज असलेल्या प्रा. पाटील यांनी मंत्री म्हणून आणि प्रशासक म्हणून आपली उत्तम छाप पाडली. काम हातात घेतलं की, ते शंभर टक्के यशस्वी झालंच पाहिजे आणि त्यातून सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन झालंच पाहिजे, अशी त्यांची भूमिका असे. कापूस एकाधिकार योजना, स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना हे त्यांच्या कारकीर्दीतील अतिशय महत्त्वाचे आणि यशस्वी निर्णय. मात्र, त्यांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी त्यांनी दौरे काढून अखंड महाराष्ट्र पिंजून काढला आणि या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो की नाही, याची चाचपणी केली. शेतकऱ्यांसाठी त्यांनी सातत्यानं आग्रही आणि आक्रमक भूमिका घेतली. त्यासाठी प्रकृतीचीही कधी तमा बाळगली नाही, आजही बाळगत नाहीत, अशी भावना त्यांनी मांडली.
शिक्षण हा सुद्धा प्रा. एन.डी पाटील यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असल्याचे सांगून श्री. पवार म्हणाले, मधुकरराव चौधरी मुख्यमंत्री असताना चित्रा नाईक समितीने नवे शैक्षणिक धोरण आणले. शिक्षणाचा आकृतीबंध म्हणून ते आणले गेले. ज्याच्यात कुवत असेल, त्यानंच शिकायचं, बाकीच्यांनी थांबायचं, असे त्याचे स्वरुप होते. या आकृतीबंधाविरोधात प्रा. पाटील यांनी राज्यभरात रान उठविले. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे शासनाला हे धोरण बदलावे लागले आणि शिक्षणाचा अधिकार प्रत्येक मुलाला प्रदान करावा लागला. हे त्यांच्या लढ्याचे फलित होते. रयत शिक्षण संस्था हे तर त्यांचे दुसरे घरच आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी त्यांची जी तळमळ आहे, त्याविषयी आम्हा सर्वांच्या मनात नितांत कृतज्ञता आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न हाही त्यांच्या प्रचंड जिव्हाळ्याचा विषय असून त्यासाठी ते अखंडितपणे कार्यरत आहेत. त्यामुळेच सीमाभागातल्या लोकांचे त्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे. आजच्या कार्यक्रमालाही बेळगावच्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते उपस्थित आहेत, हे त्यांच्या या प्रेमाचंच द्योतक आहे, असे गौरवोद्गार श्री. पवार यांनी काढले.
सत्काराला उत्तर देताना प्रा. एन.डी. पाटील यांनी प्राचार्य कणबरकर यांच्याशी असलेल्या आपल्या स्नेहाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. त्याचप्रमाणे या पुरस्काराबद्दल शिवाजी विद्यापीठाप्रती ऋण व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी प्रा. एन.डी. पाटील यांचे जीवन म्हणजे मानवी मूल्यांची समरगाथा असल्याचे सांगितले. प्रा. पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करताना हा त्यांचा नव्हे, तर विद्यापीठाचाच गौरव आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
प्रारंभी श्री. पवार यांच्या हस्ते डॉ. एन.डी. पाटील व सौ. सरोज (माई) यांना पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या कै. शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्या कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया या डॉ. भारती पाटील संपादित ग्रंथाचे प्रकाशनही श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला प्राचार्य कणबरकर यांच्या जीवनावरील चित्रफीतीचे प्रदर्शन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य कणबरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मानव्यविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. भारती पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. प्राचार्य डॉ. बी.ए. खोत यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला. महेंद्र कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांचे सदस्य, पदाधिकारी, रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, शिक्षण, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी व नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते.

पुरस्काराची रक्कम गुरुवर्य खैरमोडे यांच्या स्मृतीमंदिर उभारणीसाठी...
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शब्दाखातर मुंबईतून बीए ऑनर्स झालेले श्री. रामकृष्ण वेताळ खैरमोडे यांनी आष्टा येथील न्यू इंग्लीश स्कूलमध्ये तळमळीने सेवा बजावली; मात्र, त्यांचे असाध्य आजाराने अकाली निधन झाले. या गुरुंची चार महिने सर्व प्रकारची सुश्रुषा करण्याची संधी आपल्याला मिळाली, मात्र त्यातून ते वाचले नाहीत. या खैरमोडे यांचे आष्टा येथे स्मृतीमंदिर उभारण्यात यावे, अशी भावना व्यक्त करून त्यासाठी पुरस्काराच्या रकमेपोटी देण्यात आलेली १ लाख ५१ हजार रुपयांची रक्कम प्रा. पाटील रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर श्री. पवार यांनी आपल्या भाषणादरम्यान संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांना व्यासपीठावर बोलावून संस्थेच्या वतीने या पुरस्काराच्या रकमेत आणखी दहा लाख रुपयांची भर घालून खैरमोडे यांचे स्मारक उभारण्यात येईल, याची ग्वाही या प्रसंगी दिली.


Thursday, 10 January 2019

संशोधनात नवकल्पनांची निर्मिती महत्त्वाची: प्रा. जितेंद्र कुमार

शिवाजी विद्यापीठाच्या भौैतिकशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलताना 'आयआयटी-बीएचयु'चे प्रा. जितेंद्र कुमार. व्यासपीठावर (डावीकडून) प्रा. ए.व्ही. मोहोळकर, प्रा. व्ही.जे. फुलारी, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्रा. डब्ल्यू. सी. चँग, प्रा. पी.एस. पाटील.


'मटेरियल सायन्स'विषयक दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

प्रा. जितेंद्र कुमार
कोल्हापूर, दि. १० जानेवारी: मटेरियल सायन्सच्या संशोधनात विविध नवकल्पनांची निर्मिती आणि त्याच्या प्रतिपूर्तीसाठी पूरक साधनसुविधांची उपलब्धता होणे ही महत्त्वाची गरज बनली आहे. संशोधकांनी त्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन आयआयटी-बीएचयुचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. जितेंद्र कुमार यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या फिजिक्स ऑफ मटेरियल्स अन्ड मटेरियल बेस्ड डिव्हाईस फॅब्रिकेशन या विषयावरील चौथ्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आज प्रा. जितेंद्र कुमार आणि सदर्न तैवान विद्यापीठाचे प्रा. डब्ल्यू. सी. चँग यांच्या हस्ते करण्यात आले. भौतिकशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
प्रा. जितेंद्र कुमार म्हणाले, मटेरियल सायन्सच्या संशोधनात दर्जावृद्धीची मोठी गरज आज निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि अर्थसाह्य यांची उपलब्धता या बाबीही महत्त्वाच्या ठरतात. या क्षेत्रात मूलद्रव्यांच्या गुणधर्मांची अत्यंत चिकित्सकपणे पडताळणी, फेरपडताळणी या बाबींना अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उपलब्धता करणे, हे सुद्धा विद्यापीठीय संशोधनासमोरील एक मोठे आव्हान आहे. असे असले तरीही संशोधन क्षेत्रात निरीक्षणाचे महत्त्व मात्र अबाधित आहे. त्यामुळे संशोधकांनी आपली निरीक्षणशक्ती विकसित करण्यावर भर देण्याची गरज आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, आजच्या युगात सर्वसामान्य नागरिकांना किफायतशीर साधने, उत्पादने उपलब्ध होण्यामध्ये मटेरियल सायन्सच्या संशोधनाचे महत्त्वाचे योगदान आहे. नवसंकल्पना आणि नवनिर्मिती यांना संशोधनाच्या क्षेत्रात प्रचंड महत्त्व आले आहे. त्यामुळे संशोधन आणि विकास या क्षेत्राला अत्यंत सुगीचे दिवस आले आहेत. या नवनिर्मितीच्या केंद्रस्थानी मटेरियल सायन्स आहे. विज्ञानाचा प्रवास आता शोधनिबंध प्रकाशनाकडून उपयोजनाकडे होतो आहे, ही महत्त्वाची बाब आहे. संशोधकांनी वैज्ञानिक क्षेत्राच्या परीघाबाहेरील व्यापक समाजापर्यंत या संशोधनाची माहिती देण्यासाठी तर नवसंशोधकांनी स्टार्ट-अपच्या माध्यमातून आपल्या नवसंकल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरजही कुलगुरूंनी व्यक्त केली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते परिषदेच्या स्मरणिकेचे सीडीच्या स्वरुपात प्रकाशन करण्यात आले. अधिविभाग प्रमुख प्रा. व्ही.जे. फुलारी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. परिषदेचे समन्वयक प्रा. ए.व्ही. मोहोळकर यांनी परिषदेच्या उद्दिष्टांविषयी माहिती दिली. नीलेश तलवार यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. पी.एस. पाटील यांच्यासह माजी अधिविभाग प्रमुख प्रा. सी.डी. लोखंडे, प्रा. सी.एच. भोसले यांच्यासह संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday, 4 January 2019

समाजाने दिव्यांगांकडे सहाय्य करण्याच्या भूमिकेतून पाहणे आवश्यक - डॉ.राजेंद्र हिरेमठ


कोल्हापूर, दि.4 जानेवारी - शैक्षणिक, प्रशासकीय, क्रीडा, सांस्कृतीक या सारख्या अनेक क्षेत्रांमध्ये दिव्यांगांनी अत्यंत उंच भरारी घेतलेली आहे.सहानुभूतिने पाहता सहाय्यकाची भूमिका निभावण्याचे समाजाने ठरविल्यास दिव्यांग देश घडविण्यामध्ये निश्चितपणे हातभार लावतील, असे प्रतिपादन सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ.राजेंद्र हिरेमठ यांनी केले.
          शिवाजी विद्यापीठाच्या बॅ.बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्त्रोत केंद्र-समावेशी शिक्षण संसाधन केंद्र, यु.जी.सी.स्कीम फॉर पर्सन विथ डिसेबल आणि सामाजिक वंचितता समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ब्रेल दिवसानिमित्त 'दिव्यांग हक्क कायदा 2016' या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्धाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.हिरेमठ बोलत होते.छ.राजश्री शाहू सिनेट सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर होते.  यावेळी श्री.धनंजय भोले, समन्वयक, सेंटर फॉर इन्क्लुझीव्ह एज्युकेशन आणि अक्सेसीबिलीटी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.राजेंद्र हिरेमठ पुढे म्हणाले, दिव्यांगांना अधिकार प्रदान करण्याचे मोठे कार्य सरकारने सुरू केलेले आहे.जो पर्यंत आपल्या मनामध्ये दिव्यांगांप्रती जी वेगळेपणाची भावना आहे, तो पर्यंत कितीही कायदे केले तरी दरी मिटणार नाही. यासाठी प्रथमत: सर्व सामान्यांमध्ये याची जाणीव-जागृती होणे आवश्यक आहे.क्षमता आणि पात्रतेचा विचार केला तर दिव्यांग सर्वसामान्यांपेक्षा वेगळे नाहीत.
यावेळी हेल्पर्स ऑफ दी हॅन्डीकॅप, कोल्हापूर या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नसीमा हुरजूक आपल्या मनोगतामध्ये म्हणाल्या, दिव्यागांना कायद्याने प्राप्त झालेले हक्क सर्वच क्षेत्रामध्ये अंमलात आणले जावेत, हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे.कायद्याने दिव्यांगांना समान संधी, हक्क आणि संरक्षण प्राप्त होण्यासाठी मदत झालेली आहे. अडचणींकडे संधी म्हणून पाहून नवी दृष्टी निर्माण करण्यासाठी दिव्यांगांना बळ देणे गरजेचे आहे.
       अध्यक्षीय स्थानावरून बोलताना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर म्हणाले, दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामुहीक प्रयत्न केल्यास जगामध्ये ते आदर्शवत होतील.विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमध्ये दिव्यांगांना सहजपणे वावरता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत.योग्य वयात दिशा मिळाली तर समाजामध्ये त्यांचे जगणे सुसहय होईल.
     तत्पूर्वी, रोपटयाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्धाटन करण्यात आले.  कार्यक्रमाच्या सुरूवातीला दिव्यांगांच्या कार्य कौशल्याचा समावेश असलेल्या 'गगनाला पंख नवे' 'दिव्यांगज' हे लघुचित्रफीत दाखविण्यात आले.
याप्रसंगी, डॉ.अंजली निगवेकर यांची संगीत नाटयशास्त्र अधिविभाग प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
संयोजक डॉ.नमिता खोत यांनी स्वागत प्रास्ताविक केले.डॉ.प्रतिभा देसाई यांनी पाहुण्यांचा परियच करून दिला.डॉ.नंदा पारेकर यांनी आभार मानले.यावेळी विद्यापीठातील सेवक, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

------

Wednesday, 2 January 2019

महर्षी वि.रा. शिंदे यांच्या संशोधनपर लेखनाचा

अनुभवसंपन्न चिंतनशीलता महत्त्वाचा गुणविशेष

- डॉ. गोपाळ गुरू यांचे प्रतिपादन

शिवाजी विद्यापीठात महर्षी वि.रा. शिंदे अध्यासनातर्फे 'भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न; संशोधन आणि कार्य' या विषयावर आयोजित  एकदिवसीय चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून संबोधित करताना डॉ. एन.डी. पाटील. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, डॉ. राजन गवस, डॉ. भारती पाटील, डॉ. गोपाळ गुरू, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले.


शिवाजी विद्यापीठात महर्षी वि.रा. शिंदे अध्यासनातर्फे 'भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न; संशोधन आणि कार्य' या विषयावर आयोजित  एकदिवसीय चर्चासत्राचे बीजभाषण करताना डॉ. गोपाळ गुरू. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, डॉ. राजन गवस, डॉ. भारती पाटील, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले.


कोल्हापूर, दि. २ जानेवारी: अनुभवशील चिंतनातून संशोधनपर लेखनामध्ये झळकणारा अस्सलपणा हे महर्षी वि.रा. शिंदे यांच्या साहित्याचे महत्त्वपूर्ण गुणवैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्यामुळेच भारतीय अस्पृश्यतेच्या प्रश्नाची अत्यंत मूलभूत णि वस्तुनिष्ठ मांडणी त्यांना करता आली, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. गोपाळ गुरू यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन आणि एन.डी. पाटील प्रतिष्ठान, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महर्षी शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न: संशोधन व कार्य या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मानव्यशास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. भारती पाटील होत्या. ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील उद्घाटक म्हणून तर डॉ. नागनाथ कोत्तापल्ले प्रमुख उपस्थित होते.
Dr. Gopal Guru
डॉ. गोपाळ गुरू म्हणाले, मायावी अर्थव्यवस्था, कृत्रिम वर्णव्यवस्था आणि दमट ग्रामव्यवस्था या तीन व्यवस्थांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न जटिल करून ठेवण्याचे काम केले. ही अस्पृश्यता म्हणजे उच्चवर्णियांच्या मनाच्या तळाशी खोल रुतून बसलेली मळमळ आहे आणि ती पूर्णतः ओकून टाकल्याशिवाय संपणार नाही, असे महर्षींचे अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण आहे. त्यामुळे अस्पृश्यता हे हीनतेचे नव्हे, तर दीनतेचे कारण आहे, असे ते म्हणतात. अस्पृश्यता वाहती राखण्यात उच्चवर्णीय समाजाचा स्वार्थ आहे. कारण ती तुंबली की संपली, याची जाणीव असल्याने ती थांबविली जात नाही. त्यामुळे महर्षी शिंदे या साऱ्या व्यवस्थेला बहिष्कृतांची बंदिशाळा असे संबोधतात. अशी अनेक रुपके (मेटाफोअर) महर्षींच्या लेखनात जागोजागी आढळतात. त्यांचाही स्वतंत्रपणे अभ्यास करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महर्षींच्या उपेक्षेच्या अनुषंगाने बोलताना डॉ. गुरू म्हणाले, महर्षी शिंदे यांची त्यांच्या हयातीत आणि त्याउपरांतही मोठी सामाजिक उपेक्षा झाली. समाजाला खोलवर विचार करणारे लोक नको असतात आणि महर्षी हे त्यांनी अंगिकारलेल्या अस्पृश्यता निवारणाच्या प्रश्नाचा अत्यंत खोलवर, सर्वांगीण आणि कृतीशील विचार करणारे होते. साहजिकच त्यामुळे समाजाने त्यांच्यावर उपेक्षेचे शिक्कमोर्तब केले. आत्मटीका हा सुद्धा महर्षींच्या लेखनाचा गुणधर्म होता. या आत्मटिकेचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पानोपानी आढळते. ती सुद्धा त्यांच्या उपेक्षेला कारण ठरली. मात्र, त्याची तमा न बाळगता महर्षी आपण अंगिकारलेले कार्य व्रतस्थ भावनेने करीत राहिले. हेच त्यांचे सर्वात महत्त्वाचे वेगळेपण आहे.
यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील म्हणाले, महर्षी शिंदे हे एक क्रांतीकारक समाजसुधारक होते. आपली संपूर्ण हयात त्यांनी अस्पृश्यता निवारणासारख्या मूलभूत प्रश्नासाठी वेचली आणि आपल्या कार्याने साऱ्या महाराष्ट्राची मान उंचावली. महाराष्ट्राने मात्र त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा फारसा गांभिर्याने विचार केला नाही. तरीही अस्पृश्योद्धाराचे कार्य सर्व तऱ्हेची उपेक्षा सोसून ते करीत राहिले. एकट्यानेच नव्हे, तर साऱ्या कुटुंबियांना सोबत घेऊन त्यांनी हे काम केले, हे त्यांच्या कार्याचे तत्कालीन समाज परिस्थितीत फार झळाळून उठून दिसणारे वैशिष्ट्य आहे.
अध्यक्षीय भाषणात डॉ. भारती पाटील म्हणाल्या, अस्पृश्यतेच्या प्रश्नाची मूलभूत मांडणी करण्याबरोबरच त्याला सांख्यिकीय मांडणीची जोड देऊन या प्रश्नाचे गांभीर्य साऱ्या देशाला पटवून देण्याचे काम महर्षी वि.रा. शिंदे यांनी देशात सर्वप्रथम केले. त्यांचे हे पुस्तक म्हणजे एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. महाराष्ट्राला त्याची पुरोगामी ओळख प्रदान करून देण्यामध्ये महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबरीने महर्षी शिंदे यांचे योगदान आहे, याचे नित्य स्मरण प्रत्येकाने सदोदित मनी बाळगण्याची गरज आहे.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर यंदाचे महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त करणारे ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार आणि साहित्यिक कृष्णात खोत यांचा डॉ. गुरू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यासनाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले.
यावेळी मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. राजन गवस, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. टी.एस. पाटील, डॉ. भारत पाटणकर, डॉ. गेल ऑम्वेट, डॉ. रत्नाकर पंडित, डॉ. जगन कराडे, डॉ. रत्नाकर पंडित, डॉ. व्यंकाप्पा भोसले, डॉ. अरुण शिंदे, डॉ. अवनीश पाटील, डॉ. मेधा पानसरे, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, डॉ. रफिक सूरज, डॉ. सुरेश शिपूरकर यांच्यासह संशोधक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, 29 December 2018

डॉ. अंजली निगवेकर यांच्या अनुभवाचा

संगीतशास्त्र अधिविभागास लाभ: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे

शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या दिव्यांग अधिविभाग प्रमुख डॉ. अंजली निगवेकर यांचे ग्रंथभेट देऊन अभिनंदन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे यांच्यासह संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातील शिक्षक.


शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या दिव्यांग अधिविभागप्रमुख

कोल्हापूर, दि. २९ डिसेंबर: विविध गायन कलाप्रकारांत निष्णात असलेल्या डॉ. अंजली निगवेकर यांच्या अनुभवाचा लाभ संगीतशास्त्र अधिविभागाला निश्चितपणे होईल. विद्यापीठ प्रशासनाचे त्यांना सर्वोतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी काल येथे दिली.
विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या प्रमुखपदी डॉ. अंजली निगवेकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. डॉ. निगवेकर या दृष्टी दिव्यांग असूनही त्यांनी संगीत विशेषतः गायन अध्यापनात स्वतःचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांनी कुलगुरू डॉ. शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. तेव्हा कुलगुरूंनी त्यांचे ग्रंथभेट देऊन अभिनंदन केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, संगीतशास्त्र अधिविभागातील शिक्षक निखील भगत, डॉ. विनोद ठाकूरदेसाई आणि सुप्रिया टिपुगडे आदी उपस्थित होते.
आपल्या दिव्यांगत्वाची कोणतीही सबब पुढे न करता गेली सुमारे २८ वर्षे डॉ. निगवेकर विद्यापीठात अध्यापन कार्य करीत आहेत, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अधिविभाग प्रमुखपदाची जबाबदारीही त्या तितक्याच समर्थपणे सांभाळतील, असा विश्वास कुलगुरू डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.
डॉ. निगवेकर या १९८६मध्ये संगीतशास्त्र अधिविभागात विद्यार्थिनी म्हणून प्रवेशित झालेल्या होत्या. त्यानंतर डॉ. भारती वैशंपायन यांच्या मार्गदर्शनाखाली संगीतशास्त्र विषयात पीएच.डी. केली असून १९९१पासून शिवाजी विद्यापीठात गेली २८ वर्षे अध्यापनाचे कार्य करीत आहेत. विद्यार्थिनी ते अधिविभागप्रमुख असा त्यांचा येथील प्रवास आहे.