Friday, 8 May 2020

विद्यापीठाच्या कौशल्य विकास कार्यशाळेत

२७० जणांचा ऑनलाइन सहभाग



शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता ऑनलाईन कार्यशाळेत सहभागी झालेले शिक्षक.


कोल्हापूर, दि. ८ मे: शिवाजी विद्यापीठ कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय कौशल्य व उद्योजकता ऑनलाईन कार्यशाळेला विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांसह महाराष्ट्राच्या विविध भागातूनही उत्तम प्रतिसाद लाभला. सुमारे २७० प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी-विद्यार्थिनी कार्यशाळेत सहभागी झाले.
पहिल्या सत्रामध्ये डॉ. ए. एम. गुरव यांनी कौशल्य व उद्योजकता विकास या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी कोविड-१९ मुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणी सांगून या काळात उद्योगाच्या नवीन संधी कशा निर्माण होतील, याबाबत मार्गदर्शन केले. या संधी ओळखून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे असून आजच्या या संकटाला संकट न मानता याचे संधीमध्ये रूपांतर करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. डॉ. गुरव यांनी वेगवेगळे उद्योग कशा प्रकारे सुरु करता येतील, त्यासाठी कोणती कौशल्ये आत्मसात करावी लागतील, याबाबतही मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रा डॉ. विद्यानंद खंडागळे यांनी चिकित्सक विचार व कौशल्य विकास या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, कौशल्य विकास करत असताना चिकित्सक विचाराच्या विविध टप्प्याचा विचार करणे आवश्यक आहे. चिकित्सक विचार करण्याचे कौशल्य प्रत्येक व्यक्तीकडे आवश्यक आहे. या कौशल्याचा वापर चांगला करून उत्तम यश संपादन करता येऊ शकेल. महेश चव्हाण यांनी शिवाजी विद्यापीठ कौशल्य व उद्योजकता विकासासाठी राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.
तिसऱ्या सत्रा डॉ. कृष्णा पाटील यांनी उद्योजकता विकास व कौशल्य अंतर विश्लेषण या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, वेगवेगळी कौशल्ये आत्मसात करून रोजगारक्षम विद्यार्थी घडविणे, ही काळाची गरज आहे. या रोजगारक्षम विद्यार्थ्यामधून यशस्वी उद्योजक घडवता येतील. हे करत असताना गरज, क्षमता, अभिरुची, अभिवृत्ती यांचा विचार करून कौशल्य अंतर विश्लेषण करणे गरजेचे आहे.
यानंतर सहभागी व्यक्तींचे शंका-समाधान करण्यात आले. डॉ ए. एम. गुरव व महेश चव्हाण यांनी या ऑनलाईन कार्यशाळेचे समन्वयन केले. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

‘जागतिक स्थलांतरित पक्षी दिन’ विशेष

रुडी शेलडक पक्ष्याची शिवाजी विद्यापीठ परिसरात नोंद


 
शिवाजी विद्यापीठाच्या भाषा भवन तलावात आढळलेला रुडी शेलडक

शिवाजी विद्यापीठाच्या भाषा भवन तलाव परिसरात आढळलेला रुडी शेलडक


 कोल्हापूर, दि. ८ मे: रुडी शेलडक’ (टॅडोर्ना फेरुजीनिया) नावाच्या स्थलांतरित पक्षी शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात प्राणीशास्त्र अधिविभागातील संशोधकांना आढळला आहे. अलिकडच्या काळात प्रथमच हा पक्षी विद्यापीठ परिसरात निदर्शनास आल्याचे या संशोधकांनी म्हटले आहे. उद्या (दि. ९ मे) साजऱ्या होणाऱ्या जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाच्या पार्श्वभूमीवर प्राणीशास्त्र अधिविभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
Dr. S.M. Gaikwad
प्राणीशास्त्र अधिविभागातील प्राध्यापक डॉ. सुनिल एम. गायकवाड विद्यापीठ परिसरातील पृष्ठवंशीय प्राण्यांवर काम करीत आहेत. रुडी शेलडक हा स्थलांतरित पक्षी त्यांना सर्वप्रथम ७ मार्च २०२० रोजी वि.स. खांडेकर भाषा भवनच्या पिछाडीस असलेल्या तलावामध्ये आढळला. ह्या पक्षाची नोंद करून त्यांनी त्याची छायाचित्रे घेतली आहेत. यावरून शिवाजी विद्यापीठ परिसर व या परिसरातील पाणवठे जैवविविधतेसाठी अत्यंत पोषक असून शिवाजी विद्यापीठ जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या कामी योगदान देत असल्याचे अधोरेखित होते.

डॉ. सुनिल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात सुमारे ३५० हून अधिक स्थलांतरित पक्षांच्या प्रजातींची नोंद होत असल्याची माहिती मिळते. परंतु, पाणथळ जागांच्या प्रदूषणासह विविध कारणांमुळे या पक्ष्यांच्या प्रजाती कमी होत चालल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी पाणथळ जागांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. भारतातील अनेक स्थलांतरित पक्षांपैकी ‘रुडी शेलडक’ (टॅडोर्ना फेरुजीनिया) असून त्याला भारतात ‘ब्राह्मणी बदक म्हणूनही ओळखतात. या विशिष्ट पक्ष्याची लांबी २३ ते २८ इंच इतकी व वजन सव्वा किलो इतके असते. याचे डोके फिकट गुलाबी असून पिसे नारंगी-तपकिरी रंगाची तर शेपटीकडील पिसे काळी असतात. हा असा प्रवासी पक्षी आहे, जो भारतीय उपखंडात हिवाळ्यात आगमन करतो आणि एप्रिलमध्ये परत जातो. हा सुमारे २६०० कि.मी. इतका प्रवास करू शकतो आणि जवळपास ६००० मीटर इतक्या उंचीवर पोहचू शकतो. जम्मू-काश्मीरमधील अति उंचीवरील तलावात आणि दलदलीमध्ये ते प्रजनन करतात. जगामध्ये याचा आढळ उत्तर-पश्चिम आफ्रिका, इथिओपिया, दक्षिण-पूर्व युरोप ते मध्य-आशिया ओलांडून दक्षिण-पूर्व चीनपर्यंत व  दक्षिण आशियामध्ये आहे. बौद्ध लोक या पक्षास पवित्र मानतात. त्यामुळे मध्य व पूर्व आशियामध्ये या पक्ष्यांना काही प्रमाणात संरक्षण मिळते, जिथे यांची संख्या स्थिर किंवा वाढत असल्याचे मानले जाते. हा बदक मुख्यत: तलाव, जलाशय आणि नद्यांसारख्या पाणथळ जागी राहतो.

स्थलांतरित पक्षी दिनाच्या संदर्भात माहिती देताना डॉ. गायकवाड म्हणाले, दरवर्षी ९ मे हा दिवस जागतिक स्थलांतरित पक्षी दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. सन २०२० च्या जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाचा विषय ‘बर्ड्स कनेक्ट अवर वर्ल्ड  असा आहे. यामध्ये जगभरातील स्थलांतरित पक्ष्यांचे मार्ग शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅकिंग तंत्रज्ञानाचा संबंधित पक्ष्यांच्या संवर्धनासाठी अधिक प्रभावीपणे कसा उपयोग करता येईल, यावर जगभरातील पक्षीतज्ज्ञांनी लक्ष केंद्रित केले आहे.



Tuesday, 5 May 2020

विद्यापीठातर्फे औद्योगिक सुरक्षेविषयी १२ मे पासून ऑनलाइन राष्ट्रीय कार्यशाळा



कोल्हापूर, दि. ५ मे: शिवाजी विद्यापीठात येत्या १२ मे पासून औद्योगिक सुरक्षा या विषयावर दोन दिवसीय ऑनलाइन राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा विद्यापीठाचा पर्यावरणशास्त्र अधिविभाग व युनिव्हर्सिटी इंडस्ट्री इंटरॅक्शन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती पर्यावरणशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. पी.डी. राऊत यांनी दिली.
डॉ. राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) स्ट्राईड’ (UGC Scheme for Trans-disciplinary Research for India’s Developing Economy) या योजनेअंतर्गत मंगळवार (दि. १२ मे) व बुधवार (दि. १३ मे) असे दोन दिवस औद्योगिक सुरक्षाविषयक ऑनलाईन राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेत डॉ. राऊत यांच्यासह पर्यावरणतज्ज्ञ पंकज कदम, सुरक्षा व्यावसायिक वाय.एस. मुळे, पिडीलाइट इंडस्ट्रीजचे अमेय काळे आणि ग्रीन सोल्युशन्सचे संचालक सागर अहिवाळे हे औद्योगिक सुरक्षाविषयक विविध मुद्यांवर ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत. दोन्ही दिवशी सकाळी ११.३० वाजता कार्यशाळेस प्रारंभ होणार आहे. कार्यशाळेत देशभरातून अधिकतर १५० जणांना सहभागी होता येणार असून इच्छुकांनी नोंदणीसाठी https://forms.gle/jAeUoExkb1bYGZih9 या लिंकला १० मे पर्यंत भेट द्यावी, असे आवाहनही डॉ. राऊत यांनी केले आहे.

डॉ. आप्पासाहेब पवार यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन

शिवाजी विद्यापीठात डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह डॉ. संभाजी शिंदे व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.


कोल्हापूर, दि. ५ मे: शिवाजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात आज त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, प्राचार्य मानसिंग जगताप, डॉ. संभाजी शिंदे, डॉ. मानसिंगराज निंबाळकर आदी उपस्थित होते. सुरक्षित शारीरिक अंतर पाळून हा कार्यक्रम करण्यात आला.

Thursday, 23 April 2020

‘कोविड-१९’विरोधातील लढाईत थेट रस्त्यावर न उतरता सुद्धा योगदान शक्य: कुलगुरू डॉ. नितीन करमळकर

शिवाजी विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना कक्ष व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युट्यूब ऑनलाइन प्रशिक्षणात बीजभाषण करताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर. (हिरव्या चौकटीत)


'कोविड-१९'विषयक ऑनलाइन मार्गदर्शन सत्रातील एक स्लाईड

'कोविड-१९'विषयक ऑनलाइन मार्गदर्शन सत्रातील एक स्लाईड

शिवाजी विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना कक्ष व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युट्यूब ऑनलाइन प्रशिक्षणाच्या समारोप सत्रात बोलताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. (पहिल्या स्तंभात सर्वात वर हिरव्या चौकटीत)

कोल्हापूर, दि. २३ एप्रिल: कोविड-१९साथीच्या काळात थेट रस्त्यावर न उतरता सुद्धा राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांसह सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर सामाजिक योगदान देता येऊ शकते, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी आज केले.
शिवाजी विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आज दुपारी ३ ते ५ या कालावधीत कोरोनासंदर्भात घ्यावयाच्या दक्षतेबाबत युट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बीजभाषण करताना कुलगुरू डॉ. करमळकर बोलत होते.
कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले, कोविड-१९च्या साथीने जगभरातच अक्राळविक्राळ स्वरुप धारण केले आहे. त्यामुळे सर्वच पाथळ्यांवर त्याबाबत चिंतेचे वातावरण आहे. या साथीचे स्वरुप आणि त्या कामी राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान या संदर्भात आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मंथन व कार्यही सुरू आहे. विशेषतः राज्यपाल महोदयांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या आपत्ती व्यवस्थापन युनिटच्या माध्यमातून या प्रसंगी सहभाग द्यावा, असे आवाहन कुलगुरूंच्या बैठकीमध्ये केले. त्यानुसार, एव्हाना सर्वच विद्यापीठांमधील एनएसएस कक्ष गतिमानतेने या परिस्थितीत योगदान देत आहे. तथापि, एनएसएसच्या स्वयंसेवकांना तसेच अन्य विद्यार्थ्यांना सुद्धा प्रत्यक्ष रस्त्यावर न उतरता देखील या साथीविरोधातील लढाईत आपले योगदान देता येणे शक्य आहे. पुणे विद्यापीठाच्या एनएसएसचे कोणीही स्वयंसेवक रस्त्यावर नाहीत, मात्र अप्रत्यक्ष योगदान देण्यात ते आघाडीवर आहेत. यामध्ये हे विद्यार्थी चार प्रकारे आपले योगदान देत आहेत. त्यामध्ये गुगल अॅप तयार करून त्या माध्यमातून रक्तदाते व रक्तगट यांची यादी तयार करण्याचे मोठे काम करण्यात आले आहे. त्याखेरीज विद्यार्थी आपापल्या घराच्या परिसरातील साधारण दहा कुटुंबांची काळजी घेऊ शकतील. या कुटुंबांना भाजीपाला, किराणा आणून देणे, बँकेतून पैसे काढून आणून देणे इत्यादी स्वरुपाची कामे आरोग्यविषयक दक्षता घेऊन करता येऊ शकतात. सॅनिटायझर ही आजच्या काळातली फार मोठी गरज बनली आहे. त्यामुळे संलग्नित महाविद्यालयांतील विज्ञान अधिविभागांतून सॅनिटायझर निर्मिती करण्यास सुरवात झाली आहे. पोलीस कर्मचारी, आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर, सेवक, परिचारक आदी कोविड वॉरियर्सना या सॅनिटायझरचा पुरवठा करण्यात येणार आहे. मास्क निर्मिती ही सुद्धा आजच्या काळाची गरज आहे. विद्यार्थी घरबसल्या मास्क तयार करून परिसरातल्या नागरिकांसह कोविड वॉरियर्सना त्याचा पुरवठा करू शकतात. अशा अनेक पद्धतींनी एनएसएस स्वयंसेवकांना या साथीच्या काळात आपले योगदान देता येणे शक्य आहे, असे त्यांनी सांगितले.
या प्रशिक्षण सत्राचा समारोप शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाने झाला. डॉ. शिंदे म्हणाले, मानवनिर्मित अगर नैसर्गिक संकटाच्या काळात शिवाजी विद्यापीठ पूर्ण क्षमतेने पुढाकार घेऊन त्या संकटावर मात करण्यासाठी  सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून काम करीत असते. गतवर्षी येऊन गेलेला महापूर असो की सध्याची कोरोनाची साथ. या सर्व परिस्थितीत विद्यापीठाच्या एनएसएसने प्रचंड स्वरुपाचे योगदान दिलेले आहे. सध्याच्या संकट काळात शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांचे स्वयंसेवक व स्वयंसेविकांवर कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी होण्याची मोठी जबाबदारी निभावत आहेत. कोरोनाविरुद्धच्या युद्धात विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक पूर्ण तयारीनिशी उतरले असून प्रत्यक्ष तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य प्रभावीपणे करत आहेत. एन.एस.एस.चे सुमारे २८,००० स्वयंसेवक फेसबुक, व्हॉट्सअप यांसह इतर सोशल मीडियाचा वापर करत ५० लाखांहून अधिक लोकांपर्यँत प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष पोहोचत आहेत. अगदी नागरिकांच्या कौटुंबिक अडीअडचणींची माहिती घेऊन अनेक वेळा स्वतः तर काही वेळा प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना तत्परतेने मदत करत आहेत. गरजू, फिरस्ते, गावोगावचे असहाय ज्येष्ठ नागरिक, अनाथ, दिव्यांग इत्यादी लोकांच्या मदतीला जात आहेत. लोकांना सॅनिटायझर्स, मास्क यांचे वितरण, किराणा, भाजीपाला, औषधे व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आदी महत्वाची कामे एनएसएसचे स्वयंसेवक करत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिवाजी विद्यापीठाच्या वसतिगृहांत १००० बेडचे आयसोलेशन केंद्र तात्पुरत्या स्वरूपात सुरू केले गेले आहे. त्याचप्रमाणे मानसिकदृष्ट्याही याचे नागरिकांवर विपरित परिणाम सामोरे येत आहेत. त्या दृष्टीने समुपदेशन सेवाही विद्यापीठाद्वारे पुरविली जात आहे. दिवसाला पाच ते दहा फोन या कक्षाकडे प्राप्त होत असून संवादातून त्यांना योग्य प्रकारे समुपदेशन देण्याचे कामही विद्यापीठ करीत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
या प्रशिक्षण सत्रात एनएसएसच्या महाराष्ट्र व गोवा विभागाचे प्रादेशिक संचालक श्री. डी. कार्थिजेन, राज्य समन्वयक डॉ. अतुल साळुंखे, युनिसेफच्या अधिकारी डॉ.अपर्णा देशपांडे, डॉ. ज्योती पोटारे, डॉ. जी.के. पांडगे, डॉ. राजलक्ष्मी नायर आणि डॉ. स्वाती मोहपात्रा यांनी कोरोनाशी निगडित विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. प्रभाकर देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या ऑनलाइन प्रशिक्षणात एनएसएसचे राज्यभरातील समन्वयक, स्वयंसेवक, संलग्नित महाविद्यालयांतील आजी-माजी स्वयंसेवक- स्वयंसेविका  आजी- माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले.

(हे सत्र युट्यूबच्या https://www.youtube.com/watch?v=zFrQ73nHHYI&feature=youtu.be या लिंकवर उपलब्ध आहे. इच्छुक त्याचा लाभ घेऊ शकतात.)

महर्षी वि.रा. शिंदे यांना जयंतीनिमित्त

शिवाजी विद्यापीठात अभिवादन

महर्षी वि.रा. शिंदे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. नंदकुमार मोरे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर व डॉ. रणधीर शिंदे.


कोल्हापूर, दि. २३ एप्रिल: भारतीय अस्पृश्यतेच्या प्रश्नाचे गाढे अभ्यासक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात अभिवादन करण्यात आले.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते महर्षी शिंदे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, मराठी अधिविभागाचे डॉ. नंदकुमार मोरे, उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून हा कार्यक्रम करण्यात आला.

Friday, 17 April 2020

शिवाजी विद्यापीठातर्फे कर्मचारी, रहिवाशांना

सॅनिटायझर, मास्कच्या १००० कीटचे वाटप

कुलगुरू निवासस्थानी कार्यरत सुरक्षा रक्षकांना सॅनिटायझर व मास्क कीट देऊन राष्ट्रीय सेवा योजनेच्या मोहिमेचा प्रारंभ करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत डॉ. अभय जायभाये. 



कोल्हापूर, दि. १७ एप्रिल: शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षातर्फे आज विद्यापीठात अत्यावश्यक सेवेवर कार्यरत असणाऱ्या सेवकांबरोबरच विद्यापीठ कॅम्पसवरील रहिवाशांना सॅनिटायझर आणि मास्कच्या सुमारे १००० कीटचे वाटप करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठामध्ये सुरक्षा, उद्यान, आरोग्य तसेच पाणीपुरवठा आदी अत्यावश्यक सेवांवर कर्मचारी कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे अत्यावश्यक कार्यालयीन कामकाजाच्या निकडीनुसार आस्थापनासह अन्य काही विभागांतील कर्मचारीही कामकाजावर उपस्थित राहात असतात. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या विविध निवासस्थानांमध्ये अनेक शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि त्यांचे कुटुंबिय राहतात. कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर या सर्व घटकांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) कक्षाच्या वतीने या सर्व घटकांना सॅनिटायझर व मास्क यांच्या कीटचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाची सुरवात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या निवासस्थानापासून करण्यात आली. येथे कार्यरत सुरक्षा रक्षकांना कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते कीट देऊन मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्याही निवासस्थानी कार्यरत असलेल्या रक्षकांना त्यांच्या हस्ते कीट वाटप करण्यात आले. त्यानंतर विद्यापीठाच्या शिव सहाय्यता आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड आणि राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. अभय जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसएसच्या स्वयंसेवकांनी कॅम्पसवर कार्यरत सर्व सुरक्षा रक्षक, कर्मचारी आणि निवासी यांना कीटचे वाटप करण्यात आले. कीट वाटप करीत असताना कोरोनाच्या बाबतीत आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचनाही सर्व संबंधितांना करण्यात आल्या.

एनएसएसचा कौतुकास्पद उपक्रम: कुलगुरू डॉ. शिंदे

शिवाजी विद्यापीठाच्या एनएसएस कक्षातर्फे हाती घेण्यात आलेला सॅनिटायझर कीट वाटपाचा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा व कौतुकास्पद आहे, असे मत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केले. यामुळे सद्यस्थितीत आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या या वस्तूंसाठी कॅम्पसवरील कोणालाही बाहेर जावे लागणार नाही आणि सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल. दिलेल्या मास्कमुळेही सार्वजनिक आरोग्य निकषांचे पालन केले जाईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कॅम्पसवरील कर्मचाऱ्यांनी घरी राहावे, सुरक्षित राहावे, या दृष्टीने एनएसएसचा उपक्रम महत्त्वाचा आहे. सर्वच कर्मचाऱ्यांनी आरोग्य सुरक्षाविषयक निकषांचे पालन करून कोरोनाला पराभूत करावे, असे आवाहन प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी व्यक्त केले.