Thursday, 26 November 2020

शिवाजी विद्यापीठात संविधान दिन, शहीद दिन

शिवाजी विद्यापीठात शहीदांच्या स्मृतिप्रतिमांना अभिवादन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.


शिवाजी विद्यापीठात शहीद दिनानिमित्त शहीदांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केल्यानंतर कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी.

संविधान दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात संविधानाच्या प्रास्ताविकेस अभिवादन केल्यानंतर कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासह (डावीकडून) डॉ. एस.एस. महाजन, डॉ. आर.के. कामत, परीक्षा संचालक गजानन पळसे, डॉ. नमिता खोत, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, अभय जायभाये आदी.



संविधान दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.



कोल्हापूर, दि. २६ नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठात आज संविधान दिन आणि शहीद दिन या निमित्ताने भारतीय संविधानकर्ते आणि वीर शहीद जवान यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या हस्ते संविधानाची प्रास्ताविका, संविधानाची मूळ प्रत यांना अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

यावेळी २६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांसह अन्य शहीदांच्या स्मृतिप्रतिमांनाही कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक अभय जायभाये, डॉ. पी.एन. वासंबेकर, डॉ. ए.एम. गुरव, डॉ. निखील गायकवाड, डॉ. ए.एम. सरवदे, डॉ. वर्षा जाधव, डॉ. डी.बी. सुतार, डॉ. पी.बी. बिलावर, डॉ. शिवराज थोरात यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Wednesday, 25 November 2020

यशवंतराव चव्हाण यांना

शिवाजी विद्यापीठात अभिवादन



कोल्हापूर, दि. २५ नोव्हेंबर: भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना पुण्यतिथीनिमित्त शिवाजी विद्यापीठात अभिवादन करण्यात आले.

विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी अभ्यास केंद्राच्या प्रमुख डॉ. भारती पाटील, चव्हाण स्कूलचे सुधीर देसाई, उमेश गडेकर, गजानन साळुंखे, डॉ. नितीन माळी, अमोल मिणचेकर, डॉ. वैशाली भोसले आदी उपस्थित होते.

Tuesday, 24 November 2020

मेघनाथ नागेशकर पुरस्काराचे न्यू कॉलेज सलग चौथ्यांदा मानकरी

खेळाडूंनी विद्यापीठाचा लौकिक उंचावावा: कुलगुरू डॉ. शिर्के

शिवाजी विद्यापीठातर्फे सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात सर्वोत्कृष्ट क्रीडा प्रदर्शनासाठी देण्यात येणारा क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर पुरस्कार न्यू कॉलेजचे प्राचार्य व्ही.एम. पाटील यांच्यासह खेळाडूंना प्रदान करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. ए.एम. शेख, डॉ. पी.टी. गायकवाड, अमर सासणे आदी.


कोल्हापूर, दि. २४ नोव्हेंबर: विद्यापीठाच्या क्रीडापटूंनी क्रीडा जगतात विद्यापीठाचा लौकिक उंचावण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठातर्फे सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात सर्वोत्कृष्ट क्रीडा प्रदर्शनासाठी देण्यात येणारा क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. येथील न्यू कॉलेजने यंदा सलग चौथ्यांदा हा पुरस्कार पटकाविला.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, महाविद्यालयाने सलग चार वर्षे हा चषक आपल्याकडे ठेवण्यात यश मिळविले आहे, ही कौतुकाची बाब आहे. त्यामध्ये महाविद्यालयातील सर्व घटकांसह क्रीडापटूंनी घेतलेली मेहनत दिसून येते. खेळण्याचे अनेक फायदे आणि आयाम आहेत. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने खेलो इंडिया उपक्रमाच्या माध्यमातून तरुणाईला तंदुरुस्त राखण्याकडे लक्ष पुरविले आहे. खेळांमुळे व्यक्तीमत्त्वाचा विकास होतो, हे खरेच आहे. त्याचबरोबर देशप्रेमाची प्रचिती आणून देण्याची व देशाला एका धाग्यात गुंफण्याची ताकद खेळांत आहे. संघबांधणीचे बाळकडू व नेतृत्व विकास हे त्याचे अधिकचे फायदे आहेत. त्याचप्रमाणे आव्हाने स्वीकारण्याची व त्यांचे रुपांतर पुरस्कारांत करण्याची मोठी संधी क्रीडापटूंना असते. मिळालेल्या यसावर समाधानी न राहता अधिक मोठ्या यशासाठी सदैव तहानलेले असणे, हे सच्च्या खेळाडूचे लक्षण आहे. त्या दृष्टीने प्रत्येक खेळाडूने मोठे ध्येय बाळगून कामगिरी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही.एम. पाटील यांच्यासह निवडक क्रीडापटूंना या पुरस्काराप्रित्यर्थ देण्यात येणारा फिरता चषक प्रदान करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, न्यू कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. ए.एम. शेख, शारीरिक शिक्षण संचालक अमर सासणे, प्रशिक्षक सुचय खोपडे यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला.

Friday, 20 November 2020

शहीद जोंधळे यांच्या कुटुंबातील पाल्याचा

शैक्षणिक खर्च विद्यापीठाच्या वतीने

 

शहीद ऋषिकेश जोंधळे यांचे वडील रामचंद्र जोंधळे यांचे सांत्वन करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर व डॉ. आर.व्ही. गुरव.

कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्याकडून जोंधळे कुटुंबियांचे सांत्वन

 

कोल्हापूर, दि. २० नोव्हेंबर: शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबातील पाल्याने शिवाजी विद्यापीठाच्या अधिविभागात अगर संलग्नित महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास त्याचा संपूर्ण शैक्षणिक खर्च विद्यापीठाच्या वतीने करण्यात येईल, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी दिली.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी काल सायंकाळी बहिरेवाडी (ता. आजरा) येथील शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्या घरी भेट देऊन त्यांचे वडील रामचंद्र हरी जोंधळे व कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी शिवाजी विद्यापीठ परिवाराच्या वतीने शहीद जोंधळे यांना श्रद्धांजली वाहिली. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठातर्फे शहीद लष्करी, निमलष्करी जवान आणि शहीद पोलीस यांच्या अपत्यांना सर्व शैक्षणिक सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले. त्यानुसार शहीद जोंधळे यांच्या कुटुंबातील पाल्यासही संलग्नित महाविद्यालयीन व विद्यापीठीय शैक्षणिक खर्च देण्यात येईल, असे सांगितले. विद्यापीठाच्या वतीने तसे पत्रही कुलगुरूंनी श्री. जोंधळे यांच्याकडे सुपूर्द केले.

Thursday, 19 November 2020

शिवाजी विद्यापीठात इंदिरा गांधी यांची जयंती


कोल्हापूर, दि. १९ नोव्हेंबर
: भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज शिवाजी विद्यापीठात त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी हिंदी अधिविभागाचे प्रमुख डॉ. अर्जुन चव्हाण यांनी सर्वांना सद्भावना व एकात्मतेची शपथ दिली. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय येवा योजना समन्यवक अभय जायभाये यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Wednesday, 18 November 2020

शिवाजी विद्यापीठाचा ५८वा वर्धापन दिन साधेपणाने; पण उत्साहात

संशोधन क्षेत्रातील विद्यापीठाचा लौकिक उंचावण्यासाठी योगदान द्यावे

- कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांचे आवाहन

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांचा विद्यापीठाच्या ५८व्या वर्धापन दिनानिमित्त ऑनलाईन शुभसंदेश (व्हिडिओ)



शिवाजी विद्यापीठाच्या ५८व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत मान्यवर.

शिवाजी विद्यापीठाच्या ५८व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत मान्यवर.

शिवाजी विद्यापीठाच्या ५८व्या वर्धापन दिनानिमित्ताने सर्व उपस्थितांना अभिवादन करून शुभेच्छा देताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर व अन्य मान्यवर.


कोल्हापूर, दि. १८ नोव्हेंबर: संशोधनाच्या क्षेत्रात शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी आपला झेंडा जागतिक पातळीवर फडकविला आहे. विद्यापीठाचा संशोधन क्षेत्रातील लौकिक अधिक उंचावण्यासाठी संशोधक शिक्षक व विद्यार्थ्यांनी सर्वोतोपरी योगदान द्यावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचा ५८वा वर्धापन दिन आज कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. विद्यापीठ प्रांगणात सकाळी ठीक साडेआठ वाजता कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजास वंदन करण्यात आले. यावेळी संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर केले. कुलगुरू डॉ. शिर्के व मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले व शिवपुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमानंतर युट्यूबद्वारे ऑनलाईन स्वरुपात कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सर्वांशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या. त्यावेळी शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह विद्यापीठावर प्रेम करणाऱ्या सर्वच समाजघटकांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, कोविड-१९चे धोके टाळण्यासाठी विद्यापीठाने साध्या पद्धतीने वर्धापन दिन साजरा करण्याचे ठरविले. विद्यार्थ्यांविना साजरा होणारा हा वर्धापन दिन वेगळा आहे. कोविड-१९ने आपल्यातल्या क्षमता व मर्यादांची जाणीव करून दिलेली आहे. विशेषतः ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत. या ऑनलाईन अध्ययन-अध्यापन प्रणालीपासून सुटका होऊन प्रत्यक्ष अध्यापन प्रक्रियेस लवकरात लवकर सुरवात होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोग आणि महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक सूचनांबरहुकूमच आपल्याला टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया राबवावयाची आहे. या प्रक्रियेदरम्यान विद्यापीठ व महाविद्यालये विविध उपक्रम घेऊन सामोरे येतील, ज्यायोगे शिकणे व शिकवणे अधिक सुलभ होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सदर कार्यक्रमानंतर शिवाजी विद्यापीठाच्या शिव वार्ता (https://www.youtube.com/c/ShivVarta/) या युट्यूब चॅनलचे लोकार्पण कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते त्यांच्या दालनामध्ये करण्यात आले.

वर्धापन दिन कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, मानव्यविद्या विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.आर. शेवाळे, कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव, आयक्यूएसी संचालक डॉ. एम.एस. देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक अभय जायभाये यांच्यासह अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्या परिषद सदस्य, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर सुरक्षित शारीरिक अंतरासह योग्य ती खबरदारी घेऊन कार्यक्रम साजरा करण्यात आला.

विद्युत रोषणाईने झगमगले विद्यापीठ

शिवाजी विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुख्य प्रशासकीय इमारत तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा असणारा उद्यान परिसर याठिकाणी अत्यंत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दीपावली आणि वर्धापन दिन असा योग या निमित्ताने जुळून आला. सध्या कोविड-१९मुळे विद्यापीठ परिसरात अभ्यागतांना प्रवेश करता येत नसला तरी मुख्य इमारतीसमोरून या रोषणाईचे नेत्रसुखद दर्शन नागरिकांनी रात्री घेतले.








 

Thursday, 5 November 2020

‘युव्ही-३६० सॅनिटायझर मॉड्युल’वर आधारित ‘तारा’ रोबोटचे ई-अनावरण

शिवाजी विद्यापीठाकडून निर्जंतुकीकरणासाठी युव्ही-३६० रोबोटची निर्मिती अभिमानास्पद

- ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे कौतुकोद्गार

 

शिवाजी विद्यापीठ निर्मित तारा रोबोटच्या ई-अनावरण प्रसंगी मंत्री नितीन राऊत, मंत्री उदय सामंत, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह मान्यवर.

‘युव्ही-३६० सॅनिटायझर मॉड्युल’वर आधारित ‘तारा’ रोबोट

तारा रोबोटची वैशिष्ट्ये

‘युव्ही-३६० सॅनिटायझर मॉड्युल’वर आधारित ‘तारा’ रोबोटच्या ई-अनावरण समारंभात सहभागी झालेले शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि डॉ. राजेंद्र सोनकवडे.


कोल्हापूर, दि. ५ नोव्हेंबर: महाराष्ट्रातील शिवाजी विद्यापीठाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरणासाठी रोबोटची निर्मिती करणे, ही अभिमानाची बाब आहे, असे कौतुकोद्गार महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज केले.

शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे संशोधक डॉ. राजेंद्र सोनकवडे यांनी युव्ही-३६० सॅनिटायझर मॉड्युलवर आधारित तारा हा रोबोट निर्माण केला आहे. त्या रोबोटचे ई-अनावरण आज राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत झाले. त्यावेळी उद्घाटनानंतर श्री. राऊत बोलत होते. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के उपस्थित होते.

श्री. राऊत म्हणाले, कोरोनाच्या महामारीत दिलासा देणाऱ्या अशा अभिनव संकल्पनांवर आधारित संशोधनाची देशालाच नव्हे, तर जगाला मोठ्या प्रमाणात गरज आहे. अशा संशोधकांच्या पाठीशी शक्य ते सर्व प्रकारचे पाठबळ उभे करू, अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, माझ्या कारकीर्दीत शिवाजी विद्यापीठाकडून रोबोटिक तंत्रज्ञानाधारित संशोधन होणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. जगाच्या बरोबरीने भारत आणि महाराष्ट्र वाटचाल करतो आहे, याचे हे द्योतक आहे. राज्यात रोबोटिक तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार होण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

उद्योग संचालनालयाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले, युव्ही व रोबोटिक तंत्रज्ञानाचा संगम करून त्याचा वापर निर्जंतुकीकरणासाठी करण्याचा प्रकल्प महत्त्वाचा आणि स्वप्नवत आहे. तो प्रत्यक्षात आणल्याबद्दल शिवाजी विद्यापीठाचे व तेथील संशोधक टीम अभिनंदनास पात्र आहे. त्यांनी कोरोनाच्या कालखंडात अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. या प्रकल्पाच्या औद्योगिक उत्पादनासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल.

यावेळी सदर प्रकल्पाविषयी माहिती देताना डॉ. राजेंद्र सोनकवडे म्हणाले, कोरोनाच्या काळात आपल्या घरातील, कार्यालयातील स्पर्श झालेल्या, वावर असलेल्या ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करणे हा एकमेव उपाय आहे. त्यासाठीच युव्ही-३६० सॅनिटायझर मोड्युल रोबोटची निर्मिती केली आहे. या रोबोटची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे यात वापरलेले विविध सेन्सर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI-Artificial Intelligence) तंत्रज्ञान. मानवी हालचाली अचूक ओळखून अतिनील किरणांचे उत्सर्जन तत्काळ थांबवण्यासाठी यामध्ये पी.आय.आर. सेन्सर वापरला आहे. खोलीत फिरताना अडथळ्यांमुळे खराब होऊ नये यासाठी अँटीकॉलिजन सेन्सर वापरला आहे. निर्जंतुकीकरणाच्या ठिकाणाचे मोजमाप घेण्यासाठी एल.आय.डी.ए.आर. (LIDAR) सेन्सर बसवला आहे. त्यामुळे रोबोट ३६० अंश स्कॅनरच्या साहाय्याने द्विमिती किंवा त्रिमितीमध्ये मोजमाप घेऊन त्यानुसार निर्जंतुकीकरणासाठीची वेळ निर्धारित करतो. प्रभावी निर्जंतुकीकरणासाठी उपयुक्त सिम्युलेशन्स अँन्सिस सॉफ्टवेअर प्रा. लि. आणि कॅडफेम या कंपन्यांनी पुरवली आहेत. २० किलोग्रॅम वजन असणाऱ्या या रोबोटची क्षमता १० बाय १० मापाची खोली ५ मिनिटांपेक्षा कमी वेळेत निर्जंतुक करण्याची आहे. यात वापरलेल्या ११ वॅटच्या एकूण १८ UV-C टयूबमुळे कोरोना विषाणूसोबतच इतर विषाणू व जीवाणूंचाही  नायनाट करणे शक्य होणार आहे.

डॉ. सोनकवडे पुढे म्हणाले, रोबोटमध्ये वापरलेल्या लिथियम आयन बॅटरीमुळे चार तास चार्ज केल्यानंतर तो दोन ते अडीच तास कार्यरत राहू शकतो. हा रोबोट अँड्रॉइड ऍपच्या मदतीने कोठूनही चालवणे शक्य आहे. मोबाइल वाय-फायद्वारे काही मीटर अंतरावरून हाताळला जाऊ शकतो. याही पुढे तो इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञानाद्वारे परदेशातूनही चालवता येतो. त्याची कार्यस्थिती समजण्यासाठी त्यावर LED बसवले आहेत. हिरव्या रंगाचे एलईडी दिवे त्याची चालू स्थिती दर्शवतात तर UV-C ट्यूबद्वारे निर्जंतुकीकरणाचे काम करतो, तेव्हा तांबडा एलईडी लागतो. रोबोटच्या डोक्यावरील कॅमेऱ्याच्या साहाय्याने तेथील सर्व दृश्ये पाहणेही शक्य होते. कोविड-१९ वॉर्ड, मोठमोठे मा, रुग्णवाहिका, हॉटेल्स, उपहारगृहे, सार्वजनिक वाहने, खासगी हॉटेल्स, विमानतळ, प्रवासी कक्ष, रेल्वे, रेल्वेमधील स्वयंपाक कक्ष, धान्य कोठी, घर, कार्यालये, व्यायामशाळा, महाविद्यालये, कारखाने, किरणा दुकान, सिनेमागृह, बँक, सार्वजनिक शौचालये इ. ठिकाणी   निर्जंतुकीकरणासाठी हा रोबोट अत्यंत लाभदायक आहे. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो आपल्यासोबत बोलूही शकतो. कोरोना व इतर विषाणू, सूक्ष्मजीव, विकिरणे,  विद्युतचुंबकीय लहरी, अतिनील किरणे अशा अनेक वैज्ञानिक बाबींवर माहिती देऊ शकतो.

यावेळी नागपूर येथून युट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीसचे संचालक रत्नदीप कांबळे, पवन खोब्रागडे, समीर रामटेके यांनी सदर रोबोटची प्रात्यक्षिके सादर केली.

यावेळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी स्वागत केले, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव विजय सौरभ, विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, प्रा. महेंद्र शिरसाठ (संचालक, दीन दयाळ उपाध्याय कौशल केंद्र, डा. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद), अमित किमटकर (शैक्षणिक खाते व्यवस्थापक - वेस्ट अन्सिस साफ्टवेअर प्रा. लि.पुणे), सुबोध भालेराव (प्रादेशिक विक्री व्यवस्थापक, वेस्ट CADFEM इंडिया प्रा. लि.) आणि अनिकेत सोनकवडे आदी उपस्थित होते.