Saturday, 23 January 2021

‘सेराफ्लक्स’च्या सहकार्यामुळे विद्यापीठातील नॅनो-फॉर्म्युलेशनविषयक संशोधनाला बळ: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

 

सेराफ्लक्स कंपनीकडून नॅनोसायन्स व तंत्रज्ञान अधिविभागाला अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरण भेट

 


शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाला 'सेराफ्लक्स' कंपनीने भेट दिलेल्या हायस्पीड ओव्हरहेड स्टीररचे औपचारिक उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, 'सेराफ्लक्स'चे संजीव तुंगतकर, डॉ. के.के. शर्मा, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आदी.


कोल्हापूर, दि. २३ जानेवारी: अद्ययावत नॅनो-फॉर्म्युलेशन्सच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे हायस्पीड ओव्हरहेड स्टीरर हे उपकरण शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स व तंत्रज्ञान अधिविभागातील संशोधकांसाठी उपलब्ध करून सेराफ्लक्स कंपनीने त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक दायित्वाचे दर्शन घडविले आहे, असे कौतुकोद्गार कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी काल येथे काढले.

सेराफ्लक्स इंडिया प्रा. लि., कोल्हापूर या कंपनीतर्फे शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजीला संशोधन कार्यासाठी इका हायस्पीड ओव्हरहेड स्टीरर युरोस्टार-२०हे उपकरण भेट दिले आहे. त्याचा प्रदान सोहळा काल अधिविभागात कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील आणि कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, सेराफ्लेक्स कंपनीच्या या देणगीमुळे नॅनोसायन्स विभागात नॅनोफॉर्म्युलेशनविषयक संशोधनाला गती मिळणार आहे. याच्याशी संबंधित संशोधनाबरोबरच तंत्रज्ञान हस्तांतरण उपक्रम राबवून त्यामध्ये अन्य अधिविभागांतील संशोधकांनाही सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे या क्षेत्रातील सखोल संशोधन विकसित करण्याच्या दिशेनेही प्रयत्न करावेत. येथील संशोधन हे जागतिक संशोधनाच्या तोडीचे किंबहुना अधिकाधिक सरस कसे होईल, या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकताही त्यांनी प्रतिपादन केली. यावेळी अधिविभागाचे संचालक डॉ. के. के. शर्मा, डॉ. एस. एन. तायडे यांचे अभिनंदन केले तर सेराफ्लक्सचे संजीव तुंगतकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद दिले.

एखाद्या औद्योगिक संस्था अगर कंपनीकडून विद्यापीठातील अधिविभागाला असे महत्त्वाचे उपकरण भेट मिळण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगून प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, अशा प्रकारचे संशोधन-सहकार्य विद्यापीठ आणि औद्योगिक क्षेत्रात उत्तरोत्तर होत राहाणे आवश्यक आहे. नव्या शैक्षणिक धोरणात तसेच विद्यापीठे कायद्यात सुद्धा विद्यापीठे व उद्योग यांच्यामधील परस्पर सहकार्य वाढून अधिकाधिक समाजोपयोगी संशोधन व उत्पादने त्यातून निष्पन्न व्हावीत, ही अपेक्षा आहे. या एपेक्षापूर्तीची सुरवात सेराफ्लक्सने केली, याचा आनंद आहे. विविध औद्योगिक निर्मिती उपक्रमांमध्ये उद्योजकांना येणाऱ्या शास्त्रीय अडचणी सोडविण्यासाठी उद्योगांनीही विद्यापीठासमवेत सहकार्यवृद्धी करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

या उपकरणाच्या रूपाने सेराफ्लक्स आणि इतरही तत्सम उद्योगांना आवश्यक असणाऱ्या नॅनोफॉर्म्युलेशन्सच्या निर्मितीसाठी खूप मोठा आधार निर्माण केला गेला आहे. लवकरच सेराफ्लक्स कंपनीच्या माध्यमातून अत्यंत उपयुक्त स्वरुपाचे नॅनोकोटिंग मटेरियल बाजारात उपलब्ध होईल आणि भारताबरोबरच इतर देशातल्या उद्योजकांनाही त्या नॅनोफॉर्म्युलेशनचा फायदा होईल, असा विश्वास सेराफ्लक्सचे संजीव तुंगतकर यांनी व्यक्त केला.

संशोधन प्रकल्प प्रमुख डॉ. के.के. शर्मा यांनी, नॅनोफॉर्म्युलेशनबरोबरच आपण इतरही औद्योगिक समस्या आणि आव्हानांवर काम करण्यास प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत, सेराफ्लक्सचे एकनाथ घाडगे व अन्य अधिकारी, इकोसायन्स इनोव्हेशन प्रा. लि.चे अजय मेहतर यांच्यासह स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजीचे शिक्षक, संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

 

नॅनोफॉर्म्युलेशन क्षेत्रात अनेक संशोधन संधी

जगभरात नॅनोतंत्रज्ञानावर आधारित सुरू असलेल्या संशोधन प्रकल्पांमध्ये 'नॅनोफॉर्म्युलेशन्स आणि नॅनोकोटिंग्स' याबाबतच्या संशोधनाला महत्त्व आले आहे. कारण नॅनोफॉर्म्युलेशन्स हा नॅनोकोटिंगबरोबरच सर्वच नॅनोतंत्रज्ञानाचा अत्यंत महत्वाचा, अपरिहार्य भाग आहे. असे फॉर्म्युलेशन्स हे कन्ट्रोल्ड व्हिस्कॉसिटी, टॉर्क, सॉल्व्हंट, स्पीड यांसह तापमान आणि वापरलेले नॅनो-मटेरिअल यांच्या संयुक्त आणि नियंत्रित मिश्रणप्रक्रियेअंती तयार करता येते. कोटिंगच्या कामासाठी पूर्वीपासून वापरल्या जाणाऱ्या निर्मितीप्रणालींपेक्षा नॅनोफॉर्मुलेशनद्वारे तयार केलेले कोटिंग मटेरियल अधिक उपयुक्त असल्याचे सिद्ध झालेले आहे. अति-जलरोधक (super-hydrophobic), स्व-स्वच्छक (self-cleaning), गंजरोधक (anti-corrosion) आणि सूक्ष्मजीवरोधक (antimicrobial) अशा अनेक प्रकारचे कोटिंगचे पर्याय हे नॅनोफॉर्म्युलेशन्सचेच फलित आहेत. अशा विविध बहुपर्यायी नॅनोफॉर्म्युलेशन्सची निर्मिती करण्याच्या क्षेत्राकडेही आज संशोधन संधींचे क्षेत्र म्हणून पाहिले जात आहे.

तीसहून अधिक देशांत विस्तारलेली सेराफ्लक्स

कोल्हापूर स्थित सेराफ्लक्स इंडिया प्रा.लि. या कंपनीने नॅनोफॉर्म्युलेशन क्षेत्रातील संधी ओळखून त्या दिशेने आवश्यक संशोधन व उपकरण निर्मिती करण्यात पुढाकार घेतला आहे. कंपनी जगभरात ३०हून अधिक देशांत, मेटल कोटिंग मटेरिअल्ससोबतच शंभरहून अधिक विविध उत्पादनांची निर्मिती करते. स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये डॉ. के. के. शर्मा यांच्या पुढाकारातून असे विविध नॅनोफॉर्म्युलेशन्स तयार करण्याबाबतचे संशोधन सुरू आहे. कंपनीमार्फत निर्माण केल्या जाणाऱ्या मेटल कोटिंग्स मटेरिअल्सची कार्यक्षमता आणि टिकाऊपणा वाढविण्यासाठी स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी अधिविभागातर्फे संशोधन सहकार्य पुरविले जाणार आहे.

 

सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त

शिवाजी विद्यापीठात अभिवादन

 


कोल्हापूर, दि. २३ जानेवारी: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना शिवाजी विद्यापीठात आज अभिवादन करण्यात आले.

कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, पदार्थविज्ञान अधिविभागाचे प्रमुख डॉ. के.वाय. राजपुरे, डॉ. पी.एन. वासंबेकर, डॉ. व्ही.जे. फुलारी, डॉ. राजीव व्हटकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Friday, 22 January 2021

‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’ यशस्वी करण्याचा निर्धार

शिवाजी विद्यापीठात तयारी वेगात

 

 शैक्षणिक क्षेत्रातील विविध घटकांना निवेदनपत्रे सादर करणे सोयीचे होण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने निर्माण केलेले विशेष पोर्टल

 

कोल्हापूर, दि. २२ जानेवारी: विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेर कर्मचारी, विद्यापीठीय कर्मचारी तसेच शैक्षणिक संस्था यांचे विविध स्तरावरील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय आपल्या विभागात हा अभिनव उपक्रम घोषित केला आहे. या उपक्रमाची सुरवात येत्या २५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शिवाजी विद्यापीठामध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूरने होणार आहे. हा उपक्रम पूर्णतः यशस्वी करण्याचा निर्धार विद्यापीठ प्रशासनाने केला असून त्यासाठी आवश्यक तयारी वेगात चालविली आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या संदर्भात असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी संबंधित घटकांना संचालक, सहसंचालक, विद्यापीठ, मंत्रालय व इतर कार्यालयात यावे लागते. विशेषतः त्यांच्या प्रश्नांसंदर्भात वारंवार विविध प्रशासकीय कार्यालयात भेट देऊन काही कारणांमुळे प्रलंबित असल्याने अनेकांचा वेळ, ऊर्जा व निधी खर्च होतो. ही बाब लक्षात घेऊन उच्च व तंत्र विभागातील मंत्रालय व संचालक स्तरावरील अधिकाऱ्यांसमवेत विभागीय ठिकाणीच उपस्थित राहून सर्व संबंधित घटकांची भेट घेऊन प्रश्नांची तत्काळ सोडवणूक करण्याचा मानस मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. त्यानुसार विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेर कर्मचारी, विद्यापीठीय कर्मचारी, शैक्षणिक संस्था यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी राज्यातील प्रत्येक विभागात बैठका घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. याची सुरूवात कोल्हापूर विभागापासून होत आहे. त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर या उपक्रमाची सुरवात सोमवार, दि. २५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात होणार आहे.

निवेदने स्वीकारण्यासाठी स्वतंत्र पोर्टल

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने विविध समित्या गठित करून कामकाजास प्रारंभ केला आहे. विशेषतः विविध घटकांच्या प्रश्नांची निर्गत समाधानकारक पद्धतीने करता यावी, यासाठी विद्यापीठाने निवेदने स्वीकारण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर याच नावाने स्वतंत्र पोर्टल निर्माण केले आहे. याची लिंक विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या वेबसाईटच्या होमपेजवर ठळकपणाने देण्यात आली आहे. त्यावर जाऊन नागरिकांना इंग्रजी अथवा युनिकोड मराठीतून आपले प्रश्न मांडता येणार आहेत. निवेदनाची सॉफ्ट कॉपी जोडण्याची व्यवस्थाही येथे केली आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत सुमारे १०८ व्यक्ती, संघटनांनी ऑनलाईन निवेदने सादर केली आहेत. त्यांच्याशी अनुक्रमे मा. मंत्री महोदय संवाद साधतील. त्यानंतर ऐनवेळी निवेदने घेऊन येणाऱ्या नागरिकांनाही मंत्री श्री. सामंत वेळ देतील.

उच्च व तंत्र शिक्षणाशी संबंधित घटकांनी सहभाग नोंदवावा

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमात विभागाच्या प्रधान सचिवांसह राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक, उच्च शिक्षण संचालक, कला संचालनालयाचे संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक, ग्रंथालय संचालनालयाचे संचालक, सह संचालक तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सर्व उच्चपदस्थ अधिकारी व कर्मचारी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर या अभिनव उपक्रमात अधिकाधिक विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेर कर्मचारी, विद्यापीठीय कर्मचारी, शैक्षणिक संस्थांनी आपला सहभाग नोंदवून आपल्या अडचणी सोडवून घ्याव्यात, असे आवाहन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी केले आहे.

राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात तयारी वेगात

शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर या उपक्रमासाठी कोविड-१९ साथीच्या अनुषंगाने शासन तथा युजीसी यांनी जारी केलेल्या निर्देशांचे पालन करीत मंत्री महोदयांसाठी खुला कक्ष उभा करण्याचे काम गतीने सुरू आहे. सुरक्षित शारिरीक अंतर राखून मंत्री महोदयांना संबंधित व्यक्ती, संस्था आदींचे प्रतिनिधी यांचे गाऱ्हाणे ऐकता येईल, त्यावर तोडगा काढता येईल, या पद्धतीने या सभागृहात मंत्र्यांसह सचिव, आयुक्त तसेच अन्य सर्व अधिकारी, कर्मचारी व अभ्यागत यांची बैठक व्यवस्था करण्यात येत आहे. त्यांच्यासाठी विद्यापीठाच्या वतीने प्रवेशद्वारात सॅनिटायझर, ताप तपासणी आदी सुविधा करण्यात येत आहेत. येणाऱ्या प्रतिनिधींनी त्यास सहकार्य करावे, तसेच मास्क व सुरक्षित शारिरीक अंतर यांचे पालन करावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी केले आहे.

समस्या जागेवर सोडविण्यासाठी अभिनव उपक्रम: मंत्री उदय सामंत

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मुंबई येथून या कार्यक्रमाविषयी माहिती देताना म्हटले आहे की, असा उपक्रम याआधी कधीही झालेला नसून सर्वांच्या अडचणी त्या - त्या ठिकाणी तत्काळ सोडविण्यासाठी या अभिनव उपक्रमाची सुरूवात होत आहे. आपल्या समस्यांसाठी मुंबईला येत असताना प्रवास, निवासाची व्यवस्था आणि यासाठी लागणारा वेळ यामुळे अनेकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सर्वांनी आपल्या प्रश्नांसाठी मंत्रालयात येण्यापेक्षा मंत्रालय आपल्या विभागात आले तर ते तत्काळ आपले प्रश्न सोडवू शकते, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

Thursday, 21 January 2021

‘शिवाजी विद्यापीठाकडून लाभलेले प्रेम अविस्मरणीय’

विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या परदेशी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात भावना

 

शिवाजी विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या परदेशी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत विविध अधिविभागांतील शिक्षक व परदेशी विद्यार्थी.

 

कोल्हापूर, दि. २१ जानेवारी: शिवाजी विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी दाखल होत असताना मनात अनेक संमिश्र भावना होत्या. मात्र, विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात जीव गुंतला. चांगली माणसेही भेटली. काळ लोटला तसतसे इथल्या विविध घटकांकडून मिळालेले प्रेम, निर्माण झालेले आपुलकीचे बंध अविस्मरणीय आहेत, अशा शब्दांत शिवाजी विद्यापीठाच्या अधिविभागांतून पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पडत असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शिवाजी विद्यापीठातील विविध अधिविभागां सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षा विविध देशांतील विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेशित झाले. हे शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत असा संयुक्त कार्यक्रम विद्यापीठ कार्यालयात काल पार पडला. कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के अध्यक्षस्थानी तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.

यावेळी सदर विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांसमवेत दिवाळीसह विविध सण साजरे केल्याच्या आठवणींबरोबरच कोविड-१९च्या कालखंडात स्वतःच्या घरापासून दूर असलेल्या आम्हा विद्यार्थ्यांची अत्यंत आपुलकीच्या भावनेतून काळजी वाहिली, त्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली. विद्यापीठातील विविध अधिविभागांतील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व सेवक यांचे त्यांनी आभार मानले.

कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी त्यांच्या भावी जीवनातील यशस्वितेसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रंथभेट व विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह त्यांना प्रदान करण्यात आले. यावेळी विविध अधिविभागांचे प्रमुख तसेच शिक्षकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये आयक्यूएसी संचालक प्रा. एम.एस. देशमुख, प्रा. एस.एस. महाजन,  प्रा. के. डी. सोनवणे, प्रा. जी. एस. राशीनकर, प्रा. ए. एम. गुरव, डॉ. ए. डी. जाधव, डॉ. मेघा पानसरे, डॉ. के. के. शर्मा, डॉ. व्ही. वाय. धुपदाळे आदींचा समावेश होता.

सुरवातीला इंटरनॅशनल अफेअर्स सेलचे संचालक प्रा. ए. व्ही. घुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. जी. एस. राशीनकर यांनी या विद्यार्थ्यांची माजी विद्यार्थी म्हणून नोंदणीकृत करण्याबाबतची कार्यवाही केली. डॉ. जे. बी. यादव यांनी आभार मानले.

Wednesday, 20 January 2021

मराठी कवितेच्या प्रांतात कोलटकर ध्रुवताऱ्याप्रमाणे

‘स्मरण अरुण कोलटकरांचे’ चर्चासत्रातील सूर

 

'स्मरण अरुण कोलटकरांचे' या कार्यक्रमाची लघुचित्रफीत (शॉर्ट व्हिडिओ)

'स्मरण अरुण कोलटकरांचे' चर्चासत्रात बोलताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. व्यासपीठावर (डावीकडून) गणेश विसपुते, बाळासाहेब आळवेकर, प्रा. अरुण चव्हाण, प्रा. अविनाश सप्रे, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे.

प्रा. अविनाश सप्रे

गणेश विसपुते

बाळासाहेब आळवेकर

प्रा. अरुण चव्हाण

प्रा. श्रीकृष्ण कालगावकर यांचे टिपण वाचताना सुश्मिता खुटाळे


कोल्हापूर, दि. २० जानेवारी: मराठी कवितेच्या प्रांतामध्ये अरुण कोलटकर यांचे स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ आहे. त्यांच्या कवितेवर दुर्बोधतेचे आरोपण करण्याऐवजी ती समजून घेण्याचा, समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्याची आज खरी गरज आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात आयोजित स्मरण अरुण कोलटकरांचे या चर्चासत्रात उमटला.

शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने साजऱ्या होत असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत आज हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले. चर्चासत्रात प्रा. अविनाश सप्रे (सांगली), गणेश विसपुते (पुणे), प्रा. अरुण चव्हाण (सांगली), बाळासाहेब आळवेकर (कोल्हापूर) हे सहभागी झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.

प्रा. अविनाश सप्रे यावेळी म्हणाले, अरुण कोलटकरांच्या कवितेमध्ये परंपरा आणि नवता यांचा परस्परसंबंध आढळतो. आधुनिक मराठी कवितेचे स्वरुप समजावून घेण्याच्या दृष्टीने कोलटकरांच्या कवितेचे महत्त्व कालातीत आहे. कवितेचे कवितापण नेमके कशात दडलेले आहे, हे समजावून घ्यावयाचे, तर कोलटकरांच्या कवितेला पर्याय नाही. कवितेच्या प्रांतात साचलेले निकृष्टपण दूर करण्यासाठी सुद्धा कोलटकरांच्या कवितेचा मापदंड लावणे गरजेचे आहे. दिलीप चित्रे, अरुण कोलटकर हे दोघे आजच्या नवकवींसमोर आदर्श म्हणून उभे आहेत, ही खूप महत्त्वाची बाब आहे.

चित्रकार, कवी, समीक्षक गणेश विसपुते म्हणाले, कोलटकरांच्या साहित्याविषयी मराठी साहित्यिक क्षेत्रातच खरे तर मोठी अनास्था आहे. त्यांची कविता विस्मित करणारी, दीपवून टाकणारी आहे. मानवी जगण्यातली विसंगती आणि भोवतालातली असंगती टिपण्याचे काम त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून केले आहे.

कोल्हापुरात कोलटकर यांचे सहाध्यायी असलेले प्रा. अरुण चव्हाण म्हणाले, कोलटकर लहानपणापासूनच मनस्वी व अंतर्मुख स्वभावाचे होते. जीवन आणि त्याचे महत्त्व समजून घेण्यासाठी हा माणूस महाराष्ट्रभर पायी फिरला. मुंबईच्या रस्त्यावरील कलाकाराचे कौतुक करण्यासाठी पैसे नव्हते, तर अंगावरील शर्ट त्याला भेट देऊन तसाच आनंदाने घरी जाणारा हा अवलिया होता. त्यांना समजून घ्यायला आपण अद्यापही कमी पडतो आहोत, हे खेदजनक आहे.

कोलटकरांचे मित्र बाळासाहेब आळवेकर म्हणाले, कोलटकर हे साहित्य आणि समाज यांचा संगम साधणारे कृतीशील कवी होते. कोल्हापूर महानगरपालिकेकडून त्यांच्या स्मरणार्थ सभागृह उभारण्यात येत आहे. ते कोल्हापुरातील सांस्कृतिक चळवळीचे केंद्र म्हणून पुढे यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अरुण कोलटकरांचे मेहुणे प्रा. श्रीकृष्ण कालगावकर हे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. सुश्मिता खुटाळे यांनी त्यांच्या लेखी टिपणाचे वाचन केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, मराठी अधिविभागाने भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने अरुण कोलटकरांसह अनेक नव्या जुन्या प्रभावी साहित्यिक, कवींचा परिचय नव्या पिढीला घडवून आणला आहे. काही चांगल्या पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. नव्या पिढीला प्रेरणादायी व्यक्तीमत्त्वांशी, साहित्यिकांशी जोडण्याची ही प्रक्रिया निरंतर चालू राहावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी कुलगुरूंनी कोलटकरांच्या वामांगी या सुप्रसिद्ध कवितेचे वाचनही केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी परिचय करून दिला. कार्यक्रमास इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनिश पाटील, डॉ. प्रकाश पवार, डॉ. रघुनाथ कडाकणे, डॉ. नीलांबरी जगताप, उदय कुलकर्णी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Tuesday, 19 January 2021

मराठीचे विद्यार्थी भाषेच्या निरंतर सेवेत राहावेत

- कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांची अपेक्षा

 

'मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी' व 'दृष्टांतपाठ: निवडक दृष्टांत' या क्रमिक पुस्तकांचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. सोबत (डावीकडून) डॉ. गोपाळ गावडे, प्रा. नानासाहेब जामदार, प्राचार्य प्रकाश कुंभार, डॉ. अरुण शिंदे, डॉ. अर्जुन चव्हाण, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ. ए.एम. गुरव, डॉ. कोमल कुंदप.


कोल्हापूर, दि. १९ जानेवारी: मराठी शिकणारे सारे विद्यार्थी या भाषेच्या निरंतर सेवेत राहतील, याची दक्षता सर्वांगाने घेतली जाईल, तेव्हाच मराठी भाषेचे खऱ्या अर्थाने संवर्धन होईल, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने साजऱ्या करण्यात येत असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने आज कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी आणि दृष्टांतपाठ: निवडक दृष्टांत या बी.ए. भाग-३च्या दोन क्रमिक पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यार्थी ज्या विषयाचे शिक्षण घेतो आहे, त्याला ज्या क्षेत्रात काम करावयाचे आहे, त्या क्षेत्रातील संधींची माहिती त्याला दिली जावी, अशी अपेक्षा नव्या शैक्षणिक धोरणात व्यक्त करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने अर्थार्जनाच्या संधींविषयीचे क्रमिक पुस्तकच विद्यार्थ्यांना सादर करून या अपेक्षेची पूर्तता केली आहे, ही महत्त्वाची बाब आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्ताने सोमवारी मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांची पुस्तके प्रकाशित करण्यात आली, तर आज शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी संपादित केलेल्या पुस्तकांचे प्रकाशन होते आहे, ही बाबही नोंद घेण्यासारखी आहे. या पुस्तकासाठी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिक, माहीतगार लोकांना लिहीते केले आहे, हे निश्चितच वेगळेपण आहे. त्याचा विद्यार्थ्यांना निश्चितपणे लाभ होईल.

प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, अभ्यासक्रमाचे रुपांतर एका दर्जेदार क्रमिक पुस्तकात करण्याचे काम मराठी अभ्यास मंडळाने केले आहे. विद्यार्थ्यांपर्यंत सर्वंकष ज्ञान पोहोचविण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. विषयाची गोडी निर्माण होण्याबरोबरच विद्यार्थ्यांत रोजगाराभिमुखता निर्माण करण्यासाठी अभ्यास मंडळाचा पुस्तकरुपी उपक्रम महत्त्वाचा आहे. प्रत्येक अधिविभागाने अशा प्रकारचा  विस्तार उपक्रम हाती घ्यायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी संपादक डॉ. दत्ता पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संपादक डॉ. अरुण शिंदे, अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी पुस्तकांविषयी मनोगत व्यक्त केले. कुलगुरू व प्र-कुलगुरूंच्या हस्ते घटक लेखक डॉ. अर्जुन चव्हाण, डॉ. ए.एम. गुरव, प्रा. नानासाहेब जामदार, डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. कोमल कुंदप, योगीराज बच्चे यांचा ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन अभ्यास मंडळाच्या उपकुलसचिव संध्या अडसुळे आणि विभागातील सहकाऱ्यांनी केले. कार्यक्रमास डॉ. शहाजी पाटील, डॉ. सुभाष जाधव, डॉ. गोपाळ गावडे, डॉ. संदीप कंदले, प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार, डॉ. नितीश सावंत, डॉ. नामदेव मोरे, डॉ. सर्जेराव जाधव, डॉ. एकनाथ पाटील, लेखक संपत मोरे आदी उपस्थित होते. सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले.