Monday, 15 February 2021

शिवाजी विद्यापीठात संत सेवालाल महाराज जयंती



कोल्हापूर, दि. १५ फेब्रुवारी: संत सेवालाल महाराज यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात साजरी करण्यात आली.

कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, प्राणीशास्त्र अधिविभागाचे डॉ. व्ही.एस. मन्ने, समाजशास्त्र अधिविभागाचे प्रल्हाद माने यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व सेवक उपस्थित होते.

Friday, 12 February 2021

लिंग समानता प्रस्थापनेसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

 

'लिंग अभ्यास'विषयक दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बीजभाषण करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

'लिंग अभ्यास'विषयक दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षीय भाषण करताना पी. कृष्ण कुमार.

(आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाचा व्हिडिओ)



लिंग अभ्यासविषयक दोन दिवसीय ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

कोल्हापूर, दि. १२ फेब्रुवारी: लिंग समानता प्रस्थापनेच्या दृष्टीने बदलत्या काळानुरुप आधुनिक तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावी वापर करणे शक्य आहे. या क्षेत्रातील अभ्यासक, कार्यकर्ते यांनी त्या दिशेने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे बेटी बचाओ अभियान, विद्यार्थी विकास विभाग आणि एस.डी. महाविद्यालय, अलापुझ्झा (केरळ) यांच्या संयुक्त विद्यमाने नव्वदोत्तरी कालखंडातील लिंग अभ्यास: तंत्रज्ञानात्मक बाबी व सक्षमीकरणाचे वास्तव या विषयावर आयोजित दोन दिवसीय ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बीजभाषण करताना कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, महिला आज पुरूषांच्या तुलनेत कोणत्याही क्षेत्रात कमी अगर मागे नाहीत. तरीही लिंगभेद नष्ट करून लिंग समानता प्रस्थापित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर प्रभावी करण्याची मोठी गरज आहे. तंत्रज्ञान म्हणजे केवळ संगणक, स्मार्टफोन, इंटरनेट आदी साधने नव्हेत. तर त्या माध्यमातून ज्ञानवृद्धीच्या शक्यता घेऊन ज्या ज्या बाबी उपलब्ध झाल्या आहेत, त्या सर्वांचा समावेश या तंत्रज्ञानाच्या व्याख्येत करायला हवा. त्याला अगदी समाजमाध्यमे सुद्धा अपवाद असता कामा नयेत. त्याद्वारेही आपण लिंगसमानताविषयक बाबींचा प्रसार, प्रचार प्रभावीपणे करू शकतो. शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांबरोबरच तंत्रज्ञानाची उपलब्धता करून देणारे पालक, तंत्रज्ञानाचा परिचय करून देणारे आणि त्यांचा सदुपयोग करावयास शिकविणारे शिक्षक यांनीही ही जबाबदारी उचलली पाहिजे. त्याचबरोबर ज्या महिला, विद्यार्थिनी या तंत्रज्ञानाचा वापर करताहेत, त्यांनीही तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र असल्याची जाणीव ठेवून त्याचा आपली कारकीर्द घडविण्यासाठी जबाबदारीने आणि सकारात्मक वापर करण्याची गरज आहे.

अध्यक्षीय भाषणात एस.डी. महाविद्यालयाचे व्यवस्थापक पी. कृष्ण कुमार म्हणाले, महिलांचा समानतेबरोबरच सक्षमीकरणासाठीचा लढा हा वेगवेगळ्या माध्यमांतून लढला गेला आहे. आजही त्याला अनेक नवनवे संदर्भ प्राप्त होत आहेत. नव्या काळाच्या बदलत्या संदर्भांच्या अनुषंगाने निर्माण झालेली आव्हाने आणि संधी यांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने ही परिषद महत्त्वाची आहे. तंत्रज्ञानामुळे महिला सबलीकरणाच्या चळवळीला नवे आयाम प्राप्त झाले आहेत. या सर्वांचा उहापोह या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत होऊन महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने काही ठोस बाबी निश्चितपणे सामोऱ्या येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या उद्घाटन समारंभात कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, एस.डी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर. उन्नीकृष्णा पिल्लाई, उपप्राचार्य डॉ. टी.आर. अनिल कुमार यांनीही आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. यावेळी परिषदेच्या समन्वयक श्रीमती कार्थिका आर. यांनी स्वागत केले. एस.डी. महाविद्यालयाच्या इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. लीना पी. पै यांनी प्रास्ताविक केले. परिषदेच्या सचिव व बेटी बचाओ अभियानाच्या डॉ. प्रतिभा देसाई यांनी आभार मानले.

Thursday, 11 February 2021

शिवाजी विद्यापीठाचा ‘रवळनाथ’समवेत सामंजस्य करार

अर्थसाक्षरता प्रसाराला गती अपेक्षित: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

शिवाजी विद्यापीठ आणि आजरा येथील मल्टिस्टेट संस्था श्री रवळनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी यांच्यात झालेल्या सामंजस्य करार प्रसंगी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या उपस्थितीत कराराचे हस्तांतरण करताना कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर व एम. एल. चौगुले. सोबत अन्य मान्यवर.

आजरा येथील मल्टिस्टेट संस्था श्री रवळनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी एक लाख रुपयांच्या मदतनिधीचा धनादेश कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्याकडे सुपूर्द करताना संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष एम.एल. चौगुले. 


कोल्हापूर, दि. ११ फेब्रुवारी: सहकारी क्षेत्रातील बहुराज्य संस्था असलेल्या श्री रवळनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीसमवेत शिवाजी विद्यापीठाने केलेल्या सामंजस्य करारामुळे अर्थसाक्षरता प्रसार, प्रशिक्षण व संशोधन कार्याला गती येईल, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे व्यक्त केली.

आजरा येथील मल्टिस्टेट संस्था श्री रवळनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या दरम्यान आज व्यवस्थापन परिषद सभागृहात सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, रवळनाथचे संस्थापक व अध्यक्ष एम.एल. चौगुले प्रमुख उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रामध्ये अर्थसाक्षरता प्रसाराची मोठी गरज आहे. विद्यार्थी, संशोधकांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांमध्येही या संदर्भातील जाणीवजागृती आवश्यक आहे. त्या दृष्टीने रवळनाथच्या सहकार्याने राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिषदा, कार्यशाळा व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येईल, ज्याचा सर्वच घटकांना लाभ होईल. सहकार, वाणिज्य व व्यवस्थापन तसेच अर्थशास्त्र आदी क्षेत्रांतील संयुक्त संशोधन प्रकल्प, अभ्यास हाती घेण्यात याव्यात, जेणे करून अधिकाधिक समाजाभिमुख काम या सामंजस्य कराराच्या माध्यमातून साकार व्हावे.

दिल्ली येथील राष्ट्रीय सहकार संघामार्फत रवळनाथला सभासद प्रशिक्षणासाठी तीन लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाल्याबद्दल कुलगुरूंनी संस्थेचे अभिनंदनही केले.

यावेळी श्री. एम.एल. चौगुले म्हणाले, अर्थ, सहकार व वाणिज्य आदी क्षेत्रांमध्ये अनेक नवनवीन प्रवाह निर्माण होत आहेत. अनेक संधी आणि आव्हानेही सामोरी येताहेत. या सर्वांचा उहापोह करणे आणि सहकार क्षेत्रात कार्यरत संचालक व सदस्यांना त्याविषयी अवगत करणे या बाबींची नितांत गरज निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याच्या दृष्टीने हा करार उपयुक्त ठरणार आहे.

सामंजस्य करारावर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि एम.एल. चौगुले यांनी स्वाक्षरी केल्या. या प्रसंगी श्री. चौगुले यांनी रवळनाथच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी म्हणून एक लाख रुपयांचा निधी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे सुपूर्द केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एम.एस. देशमुख यांनी केले. कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी आभार मानले. यावेळी डॉ. विजय ककडे, प्रा. विजय आरबोळे, प्रा. मीना टिंगणे, रेखा पोतदार, विद्यापीठाचे माजी वित्त व लेखाधिकारी जी.के. नाईक, विजयकुमार हरगुडे यांच्यासह अर्थशास्त्र अधिविभागातील शिक्षक उपस्थित होते.

Friday, 5 February 2021

‘विद्यापीठाच्या विकासात अधिसभा सदस्यांची भूमिका प्रभावी’

शिवाजी विद्यापीठात अधिसभा सदस्यांसाठी आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. एस.टी. कोंबडे, डॉ. राजेंद्र कांकरिया, डॉ. ए.पी. कुलकर्णी, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील आणि डॉ. बी.एम. हिर्डेकर.


शिवाजी विद्यापीठात आयोजित अधिसभेची कार्यप्रणाली कार्यशाळेत सूर

कोल्हापूर, दि. ५ फेब्रुवारी: विद्यापीठाच्या विकासामध्ये अधिसभा सदस्यांची भूमिका प्रभावी असते. त्यांनी सर्व घटकांच्या विकासासाठी आग्रही राहायला हवे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात अधिसभा सदस्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यशाळेत उमटला.

शिवाजी विद्यापीठाच्या अॅकेडमी ऑफ अॅकेडेमिक अॅडमिनिस्ट्रेशन (ए.ए.ए.) च्या वतीने आज अधिसभा सदस्यांसाठी अधिसभेची कार्यप्रणाली या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यामध्ये कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासह नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. ए.पी. कुलकर्णी, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. राजेंद्र कांकरिया, माजी परीक्षा नियंत्रक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी.एम. हिर्डेकर आणि वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील यांनी पॅनल डिस्कशनमध्ये सहभाग घेऊन मार्गदर्शन केले.

डॉ. ए.पी. कुलकर्णी म्हणाले, अधिसभा सदस्य हे एक प्रकारे विद्यापीठाच्या सर्वोच्च सभागृहाचे विश्वस्त असतात. त्यांनी आपले कार्य केवळ अधिसभेपुरते सीमित न करता वर्षभर विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कार्यरत राहिले पाहिजे. विद्यापीठाशी संबंधित विविध घटकांच्या ते संपर्कात असतात. त्या आधारे विद्यापीठ विकासाच्या विविध सूचना त्यांनी कराव्यात. यामुळे कायद्यातील अपेक्षित भूमिकेपेक्षाही अधिक प्रभावी भूमिका बजावणे त्यांना शक्य होईल.

ते म्हणाले, माजी विद्यार्थी हा विद्यापीठाचा अत्यंत महत्त्वाचा घटक पण आपले त्याकडे मोठे दुर्लक्ष होते. माजी विद्यार्थ्यांकडे आपण केवळ आर्थिक लाभाचे साधन म्हणून नव्हे, तर ज्ञानाचे भांडार म्हणूनही पाहायला हवे. त्यांना वेळोवेळी आमंत्रित करून त्यांच्या ज्ञानाचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी अधिसभा सदस्यांनी जरुर पुढाकार घ्यायला हवा. गरजू विद्यार्थ्यांसाठी काही नवीन शिष्यवृत्ती सुरू करावयाच्या असतील अगर जुन्या शिष्यवृत्तींच्या रकमा वाढवायच्या असतील, तर त्या कामी सुद्धा माजी विद्यार्थी निश्चितपणे सहकार्य करण्यास पुढे येतात. आपण केवळ त्यांच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचायला हवे.

डॉ. राजेंद्र कांकरिया म्हणाले, अधिसभेमध्ये आपण सर्वच संबंधित घटकांचे प्रश्न मांडत असतो. तथापि, आपला सर्वाधिक भर हा विद्यार्थ्यांचे प्रश्न व समस्या सोडविण्याकडे असायला हवा. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने ज्या विविध समित्यांची, मंडळांची स्थापना करणे अपेक्षित आहे, त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला गेला पाहिजे. विद्यार्थी प्रश्नांच्या सोडवणुकीत अधिसभा सदस्य प्रचंड महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

डॉ. बी.एम. हिर्डेकर म्हणाले, अधिसभा सदस्यांनी आपले प्रश्न वा प्रस्ताव नाकारले गेल्यास सभात्याग करण्यापेक्षा सभागृहात चर्चा घडवून आणण्यावर भर द्यावा. संबंधित प्रश्नी योग्य तोडगा अगर पर्याय काढण्याचा प्रयत्न करावा. उपलब्ध वेळेमध्ये सभागृहात जास्तीत जास्त कामकाज होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, अधिसभा सदस्यांनी आपली कार्यमर्यादा केवळ अधिसभेच्या बैठकीपुरती असल्याचे समजू नये. विविध प्रश्न मांडण्यासाठी अधिसभेच्या बैठकीची वाट न पाहता विद्यापीठाचे कुलगुरू अगर संबंधित विभाग प्रमुखाशी आवश्यक पत्रव्यवहार केल्यास संबंधित प्रश्न मार्गी लागू शकतो. संवादातून प्रश्न सोडविण्याची भूमिका सर्वच घटकांनी घेतल्यास अधिसभेमध्ये अधिक धोरणात्मक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी वेळ उपलब्ध होऊ शकेल.

यावेळी अधिसभा सदस्यांच्या विविध शंकांचे समाधानही मान्यवरांनी केले. तत्पूर्वी, डॉ. ए.पी. कुलकर्णी यांनी अधिसभा बैठकीच्या माध्यमातून योगदान कसे द्यावे?’, डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी अधिसभा कार्यप्रणालीचे परिनियम आणि डॉ. बी.एम. हिर्डेकर यांनी अधिसभेतील प्रश्न या विषयांवर तीन तांत्रिक सत्रांत मार्गदर्शन केले. सुरवातीला कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. एस.टी. कोंबडे यांनी आभार मानले. बैठकीस अधिसभा सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday, 2 February 2021

कोल्हापूर हे भारतीय सहकारी चळवळीचे महत्त्वाचे केंद्र: डॉ. के.के. त्रिपाठी

 

शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय एक्स्पोजर  व्हिजिट उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. शेजारी सिक्टॅबचे डॉ. डी. रवी.

शिवाजी विद्यापीठात सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय एक्स्पोजर व्हिजिट उपक्रमात सहभागी झालेले नेपाळ, बांगलादेश व श्रीलंका या देशांतील अभ्यासक व प्रतिनिधी.

(या कार्यक्रमाचा शॉर्ट व्हिडिओ)

आंतरराष्ट्रीय एक्स्पोजर व्हिजिट उपक्रमास विद्यापीठात प्रारंभ

कोल्हापूर, दि. २ फेब्रुवारी: कोल्हापूर हे भारताच्या सहकारी चळवळीचे महत्त्वाचे केंद्र असून येथील सहकारी चळवळीच्या गुणवैशिष्ट्यांचा आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी अभ्यास करावा, असे आवाहन पुणे येथील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था (वाम्निकॉम) व सेंटर फॉर इंटरनॅशनल ट्रेनिंग इन अॅग्रीकल्चर बँकिंग (सिक्टॅब) संस्थेचे संचालक डॉ. के.के. त्रिपाठी (आय.ई.एस.) यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण स्कूल फॉर रुरल डेव्हलपमेंट आणि केंद्रीय कृषी व कृषक कल्याण विभाग, वाम्निकॉम व सिक्टॅब यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारविषयक व्यावसायिक प्रतिमानाचा अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासकांसाठी एक्स्पोजर व्हिजिट प्रोग्राम आयोजित केला आहे. या उपक्रमाचा प्रारंभ आज ऑनलाईन व ऑफलाईन स्वरुपात झाला. त्यावेळी पुणे येथून डॉ. त्रिपाठी बोलत होते. अर्थशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.

डॉ. त्रिपाठी म्हणाले, वाम्निकॉम आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या दरम्यान झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत लगेचच हा एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय उपक्रम होतो आहे. या उपक्रमात नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका या देशांतील अभ्यासक सहभागी झाले आहेत. कोल्हापूर हे भारताच्या सहकारी चळवळीच्या विकासाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू असून शिवाजी विद्यापीठ हे त्याचे अभ्यासकेंद्र आहे. या भेटीचा अभ्यासकांनी पुरेपूर लाभ करून घ्यावा आणि या अनुभवाच्या जोरावर आपापल्या देशांमध्येही या चळवळीचा विकास व विस्तार करावा.

कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, सहकारविषयक जाणिवा वृद्धिंगत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविण्यासाठीचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. कोल्हापूर विभागात जवळपास सर्वच क्षेत्रांत सहकाराने मोठी क्रांती घडवून आणली आहे. पशु व दुग्धविकास, ग्रामीण विकास, वस्त्रोद्योग, ग्राहक संस्था, पतसंस्था, साखर कारखानदारी अशी अनेक क्षेत्रे सांगता येतील. या सशक्त सहकारी चळवळीने विभागामध्ये केवळ आर्थिक क्रांतीच घडविली आहे, असे नव्हे, तर सहकार हे येथील सामाजिक विकासाचे महत्त्वाचे साधन बनले आहे. सहकाराने स्वतःबरोबरच परिसराचा शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय असा सर्वांगांनी विकास करण्यात बहुमोल कामगिरी बजावली आहे. आर्थिक लाभापेक्षाही सहकारी चळवळीमुळे झालेले शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, महिलांचे सबलीकरण आदी सामाजिक लाभ हे दूरगामी महत्त्वाचे आहेत. त्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

यावेळी सिक्टॅबचे सल्लागार डॉ. डी. रवी, वाम्निकॉमचे डॉ. यशवंत पाटील यांनीही यावेळी मनोगते व्यक्त केली. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी वाहून उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. चेतन गळगे यांनी स्वागत केले. डॉ. वैशाली भोसले यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. संतोष सुतार यांनी आभार मानले.

यावेळी कार्यक्रमास डॉ. जे.एफ. पाटील, डॉ. ए.एम. गुरव यांच्यासह नेपाळ, बांगलादेश या देशांतील अभ्यासक प्रत्यक्ष उपस्थित होते, तर ऑनलाईन स्वरुपात नेपाळच्या नील को-ऑपरेटिव्ह फेडरेशनच्या श्रीमती चित्रा थम्सुहांग, श्रीलंकेच्या राष्ट्रीय सहकारी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. असंका थिलंगरत्ने, डॉ. गणेश भाड, डॉ. जयमोहन नायर, डॉ. कल्पिता सरकार, बांगलादेशहून मोहम्मद मुर्शदुल इस्लाम आदी उपस्थित होते.

 

एक्स्पोजर व्हिजिट प्रोग्रामविषयी...

श्रीलंका नेपाळ, भूतान, बांगलादेश, मालदीव आदी भारताच्या शेजारी राष्ट्रांसमवेत सकारात्मक सहकार्य संबंध वृद्धिंगत व्हावेत, यासाठी केंद्रीय कृषी विभाग, वाम्निकॉम, सिक्टॅब आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एक्स्पोजर व्हिजिट प्रोग्राम ऑन को-ऑपरेटिव्ह बिझनेस मॉडेल हा उपक्रम दि. २ ते ५ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत उपरोक्त देशांमधील अभ्यासक, प्रतिनिधी सहभागी झालेले असून कोल्हापूर विभागातील सहकारी चळवळीचा प्रत्यक्ष काही प्रकल्पांना, उद्योग-व्यवसायांना भेट देऊन अभ्यास करणार आहेत. विविध सत्रांतर्गत त्यांना येथील सहकार चळवळीच्या विविध बाजूंचा परिचय करून देण्यात येणार आहे. सदर उपक्रम त्यांनी आपापल्या देशात जाऊन राबवावेत आणि तेथील सर्वसामान्य नागरिकांचा सहकाराच्या बळावर विकास करावा, अशी अपेक्षा आहे.

Monday, 1 February 2021

संशोधन विकास व कौशल्य विकासाला बळ देणारा अर्थसंकल्प: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

 

Dr. D.T. Shirke

कोल्हापूर, दि. १ फेब्रुवारी: केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीताराम यांनी आज संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प भारतीय उच्चशिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने संशोधन विकास व कौशल्य विकासाला बळ देणारा असल्याची प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी व्यक्त केली आहे.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अनुस्यूत अशा विविध बाबींना प्रत्यक्षात आणण्यासाठी दूरगामी प्रयत्नांची एक महत्त्वपूर्ण सुरवात म्हणून या अर्थसंकल्पाकडे पाहायला हवे. पंधरा हजारांहून अधिक शाळांची दर्जात्मक गुणवृद्धी करण्याबरोबरच सुमारे शंभर सैनिकी शाळा सुरू करण्याचा संकल्प महत्त्वाचा आहे. गेल्या अर्थसंकल्पात उच्च शिक्षण आयोगाची घोषणा केल्यानंतर यंदाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी आवश्यक अशा नियामक मंडळाची स्थापना करण्याचे सूतोवाच केले आहे. दर्जा प्रस्थापना, गुणांकन, नियमन आणि निधीपुरवठा अशा चौफेर प्रकारे हे मंडळ कार्य करणार आहे. परदेशी शिक्षण संस्थांच्या सहकार्यातून दुहेरी पदवी, सहपदवी आदी प्रकारचे अभ्यासक्रम राबविण्याचा मनोदयही यात आहे. राष्ट्रीय अप्रेंटिसशीप ट्रेनिंग स्कीमच्या (NATS) अंतर्गत अभियांत्रिकी पदवी व पदविका धारकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्यासाठी सुमारे ३००० कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. याचा विद्यार्थ्यांत रोजगारभिमुखता वाढण्यासाठी मोठा लाभ होईल. संयुक्त अरब अमिरात, जपान आदी देशांसमवेत कौशल्य विकासासाठी सहकार्य वृद्धी करण्याचा मानसही भारतीय युवकांसाठी फायद्याचा ठरणार आहे. राष्ट्रीय संशोधन फौंडेशनच्या माध्यमातून संशोधन विकासासाठी पुढील पाच वर्षांत सुमारे ५० हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद करून अर्थमंत्र्यांनी या क्षेत्राला मोठी गती देण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रीय भाषा अनुवाद अभियानाच्या माध्यमातून देशाच्या प्रशासकीय धोरणांशी निगडित बाबी इंटरनेटवर विविध भारतीय भाषांत उपलब्ध करणे शक्य होणार आहे. अवकाश संशोधन व सागरी संशोधनासाठीही भरीव तरतूद केल्याने या क्षेत्रातील संशोधनासही मोठे बळ मिळेल, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. शिर्के यांनी व्यक्त केली.

Saturday, 30 January 2021

‘मूलद्रव्यांची दुनिया’ विविध भाषांत अनुवादित व्हावे: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

महाराष्ट्र शासनाचा महात्मा फुले साहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवाजी विद्यापीठातर्फे उपकुलसचिव व विज्ञान लेखक डॉ. व्ही.एन. शिंदे यांचा सत्कार करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. सोबत कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे.
 
शिवाजी विद्यापीठात उपकुलसचिव व विज्ञान लेखक डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्या सत्कार प्रसंगी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत अधिकारी वर्ग.


शासनाच्या साहित्य पुरस्काराबद्दल विद्यापीठात डॉ. व्ही.एन. शिंदे यांचा गौरव

कोल्हापूर, दि. ३० जानेवारी: ‘आवर्तसारणी व मूलद्रव्यांची दुनिया या पुस्तकाचा अनुवाद विविध प्रादेशिक भाषांत होऊन सर्वच भाषांतील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी काल सायंकाळी येथे व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या आवर्तसारणी व मूलद्रव्यांची दुनिया या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा सन २०१९साठी उत्कृष्ट विज्ञान ग्रंथ म्हणून महात्मा जोतिराव फुले पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्त डॉ. शिंदे यांचा शिवाजी विद्यापीठातर्फे गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विज्ञान लेखन करीत असताना त्यामधील वस्तुनिष्ठतेला कोणताही धक्का न लावता अत्यंत ओघवत्या गोष्टीरुप पद्धतीने समजावून सांगण्याची शैली डॉ. शिंदे यांना साधली आहे. त्यामुळे वाचकाला ते आपल्याशेजारी बसून सांगताहेत की काय, असा भास निर्माण होतो. त्यामुळे अवघड विषय समजावून घेणे सोपे जातेच, शिवाय ते कायमस्वरुपी लक्षात राहते. आवर्तसारणीसारखा क्लिष्ट विषयही त्यांच्या या शैलीमुळे अत्यंत वाचनीय झाला आहे. शिक्षक, विद्यार्थी, पालकांसह सर्वसामान्य वाचकालाही हा विषय रुक्ष वाटणार नाही, तर विज्ञानाची गोडीच निर्माण होईल, असा त्यांनी मांडला आहे. हे पुस्तक हिंदी, इंग्रजीसह कन्नड, तेलगू, तमीळ आदी विविध भारतीय भाषांतून अनुवादित झाल्यास देशातील प्रादेशिक विद्यार्थ्यांचीही मोठी सोय होईल. त्यांनी असेच लिहीते राहावे आणि स्वतःबरोबरच शिवाजी विद्यापीठाचाही लौकिक वृद्धिंगत करावा, अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या.

प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, डॉ. शिंदे यांच्यात विद्यार्थी दशेपासूनच सातत्याने काही तरी वेगळे करीत राहण्याची ऊर्मी आहे. ती आजतागायत अबाधित आहे, याचा आनंद व अभिमान वाटतो. त्यांची लेखन व निवेदन शैली अत्यंत रंजक असून वाचकांना खिळवून ठेवण्याची ताकद त्यांच्या लेखनात आहे. या पुढील काळातही त्यांनी विज्ञान लेखनातील आपली वाटचाल जोमाने चालू ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सत्काराला उत्तरादाखल बोलताना डॉ. शिंदे म्हणाले, वाचन आणि लेखनाच्या प्रेरणा माझ्यात जागृत करण्याचे काम माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले. तेव्हापासून विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून माझ्या प्रत्येक पुस्तकाचे लेखन केले. एका लेखापासून सुरू झालेला प्रवास केवळ विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेपोटी आवर्तसारणी व मूलद्रव्यांची दुनिया या पुस्तकापर्यंत येऊन ठेपला. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा महात्मा फुले यांच्या नावे देण्यात येणारा पुरस्कार लाभला, ही माझ्यासाठी अत्यंत समाधानाची व जबाबदारीची जाणीव करून देणारी बाब आहे.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, ग्रंथ, विद्यापीठाचे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन डॉ. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी अभिनंदनपर मनोगते व्यक्त केली. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, ज्येष्ठ कवी संजय कृष्णाजी पाटील, मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. भारती पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

डॉ. व्ही.एन. शिंदे यांचा लेखन प्रवास

डॉ. शिंदे यांनी एककांचे मानकरी, असे घडले भारतीय शास्त्रज्ञ, हिरव्या बोटांचे किमयागार आणि आवर्तसारणी व मूलद्रव्यांची दुनिया ही पुस्तके लिहीली आहेत. क्रायोजेनिक्स अँड इट्स एप्लीकेशन्स या पुस्तकाचे सहसंपादन व सक्सेस गाईड फॉर एमएचसीईटी या पुस्तकाचे सहलेखन केले आहे. एककांचे मानकरी हे पुस्तक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या एम.ए. भाग-१ या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. डॉ. शिंदे यांनी विविध वृत्तपत्रांतून स्तंभलेखन केले आहे. अनेक दिवाळी अंकातून लिहीले आहे. ब्लॉगलेखनही ते नियमितपणे करीत असतात. त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कारही लाभले आहेत. त्यामध्ये क्रायोजेनिक्स विषयातील संशोधनासाठी प्रा. एम्.सी. जोशी पुरस्काराचे सहमानकरी, वसुंधरा पर्यावरण संरक्षण व संशोधन संस्था, वारणानगर यांचा राज्यस्तरीय वसुंधरा निसर्ग मित्र पुरस्कार, एककांचे मानकरी या पुस्तकाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा प्रतिष्ठेचा कृ. गो. सुर्यवंशी पुरस्कार तसेच मिरजेच्या चैतन्य शब्दांगण संस्थेचा पुरस्कार यांचा समावेश आहे.