Sunday, 6 June 2021

शिवस्वराज्य दिन विशेष व्याख्यान:

भूमीपुत्रांच्या कल्याणासाठीच शिवरायांकडून स्वराज्याची स्थापना: इंद्रजीत सावंत

 

शिवस्वराज्य दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यानात बोलताना इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत.

शिवस्वराज्य दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यानात बोलताना इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत.

कोल्हापूर, दि. ६ जून: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना अठरापगड जातींत विखुरलेल्या एतद्देशीय भूमीपुत्रांची गुलामगिरीतून सुटका करण्यासाठी केलेली होती. स्वातंत्र्य व सहिष्णुता या मूल्यांवर महाराजांचे स्वराज्य अधिष्ठित होते, असे प्रतिपादन प्रख्यात इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी आज येथे केले.

शिव स्वराज्य दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. विद्यापीठाच्या शिव-वार्तायुट्यूब वाहिनीवरुन प्रसारित झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.

श्री. सावंत म्हणाले, रयतेची काळजी वाहणारा शिवाजी महाराजांसारखा दुसरा राजा जगाच्या पाठीवर झाला नाही. म्हणूनच त्यांना राष्ट्रनिर्माता म्हटले जाते. रयतेच्या शेतातील काडीसही हात लावू नका, अन्यथा तुमच्यापेक्षा मोंगल बरे, अशी भावना निर्माण होईल, असे आपल्या सैन्यास बजावतानाच पिचलेल्या शेतकऱ्यांना हरतऱ्हेने मदत करण्याचे धोरणही महाराजांनी राबविले. अवर्षण स्थितीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी त्यांना कसण्यासाठी जमीन द्या, पेरण्यासाठी बीज द्या, नांगरण्यासाठी बैल द्या, पीक उगवेपर्यंत त्यांना पोटापाण्यासाठी धान्य द्या आणि परतवसुली बिनव्याजी करा, असे महाराजांनी आपल्या सुभेदारांना आदेश दिल्याची पत्रे आहेत. जगाच्या इतिहासात असे दुसरे उदाहरण शोधूनही सापडणार नाही. त्याचप्रमाणे जगाच्या पाठीवर गडकोट, किल्ले, दुर्ग बांधणारे अनेक राजे आहेत, मात्र, परचक्राच्या कालखंडात प्रजेला आसरा देण्यासाठी त्या किल्ल्यांचा वापर करणारा शिवाजी महाराजांसारखा अन्य राजा होणे नाही. म्हणूनच आजही भूमीपुत्रांच्या मनात त्यांच्याविषयीचा आदरभाव कमालीचा ओसंडून वाहतो.

श्री. सावंत म्हणाले, भाषेचे सांस्कृतिक व्यवहारातील महत्त्व आणि परकीय भाषेद्वारे येणारी सांस्कृतिक गुलामगिरी या गोष्टी जाणून जाणून आपल्या कारभारात, पत्रव्यवहारात मराठी भाषेचा वापर, परकीय शब्दांना पर्यायी मराठी शब्दांचे उपयोजन या काही ठळक बाबी महाराजांनी जाणीवपूर्वक केल्या. राजव्यवहार कोषाची निर्मिती त्यासाठी केली. त्यामध्ये एतद्देशीयांच्या बोलीमधील शब्दांचा परकीय शब्दांना पर्याय म्हणून समावेश केला. आपल्या संपूर्ण व्यवहारांत त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली. ही इथल्या भूमीपुत्रांच्या सांस्कृतिक हक्कांचे संरक्षण करणारी फार मोठी गोष्ट महाराजांनी केल्याचे आज लक्षात येते.

शकनिर्मिती ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली एक फार महत्त्वाची बाब असल्याचे सांगून श्री. सावंत म्हणाले, शालिवाहनानंतर शकनिर्मिती करणारे शिवाजी महाराज एकमेव शककर्ते ठरले. राज्याभिषेकाच्या दिवसापासून त्यांनी या श्री राज्याभिषेक शकाची सुरवात केली. पुढे आपल्या पत्रव्यवहारांतून, आज्ञापत्रांतून आणि प्रत्येक कागदपत्रामधून हा शक त्यांनी सर्वदूर प्रसारित केला. पुढे सुमारे दीडशे वर्षे हा शक अंमलात राहिला.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, महाराजांचे चरित्र अनेक सुरस घटनांनी समृद्ध आहे. तत्कालीन राजकीय गरजेतून त्यांना काही धाडसी पावले उचलावी लागली. या घटनांनी महाराजांच्या जीवनचरित्राला एक वेगळेच क्षात्रतेज प्रदान केले. या घटना वीररसाने भारलेल्या असल्याने सर्वसामान्य जनतेला भारावून टाकणाऱ्या ठरल्या. आहेत. मात्र, शिवरायांनी ज्या पद्धतीने रयतेची काळजी वाहिली आणि सर्वसामान्य जनतेच्या हृदयात आदराचे स्थान निर्माण केले, ते अढळस्थानच शिवरायांचे खरे सिंहासन ठरले. महाराजांना `जाणता राजा' म्हटले गेले कारण ते खऱ्या अर्थाने इथल्या सर्वसामान्य रयतेचे राजे होते. शिवरायांनी या देशात सर्वप्रथम स्वराज्याचे स्वप्न पाहिले. इथल्या गोरगरीबांपासून ते सरदार दरकदारांपर्यंत प्रत्येकाला त्याच्या जबाबदारीची जाणीव आणि अस्तित्व प्राप्त करून देण्याची भूमिका त्यामागे होती. समाजातल्या सर्व स्तरांतील नागरिकांना विश्वासात घेऊन सामाजिक न्यायाची प्रस्थापना हा खरे तर शिवरायांच्या स्वराज्याचा मूलभूत पाया आणि संकल्पना होती. धार्मिक सहिष्णुता, रयतेप्रती कळवळा, कर्तव्यकठोर पण सर्वसामान्य व्यक्ती केंद्रस्थानी असणारी प्रशासकीय व्यवस्था, प्रजेसाठी धनधान्य वाटपापासून ते जलव्यवस्थापनापर्यंत सर्व गोष्टींची काळजी वाहणारी महसुली व्यवस्था ही शिवरायांच्या स्वराज्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये होती. म्हणूनच शिवरायांची स्वराज्याची संकल्पना म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून लोकशाही प्रस्थापना अशीच होती.

शिवाजी विद्यापीठ महाराजांचा वारसा कसोशीने जोपासण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, बहुजनांच्या घरोघरी शिक्षणाच्या ज्ञानगंगेचा प्रवाह घेऊन जाण्याचे आणि या कार्याला व्यापक स्वरुप प्राप्त करून देण्याचे कार्य विद्यापीठ करीत आहे. समाजातील वंचित, शोषित घटकांना सामाजिक, शैक्षणिक न्याय प्राप्त करून देण्यासाठी विद्यापीठ अखंडित कार्यरत आहे.

यावेळी जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. या ऑनलाईन व्याख्यानाचा लाभ विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला.



भव्य शिवपुतळ्यास अभिवादन



शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यास आज सकाळी ११ वाजता कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह अधिकारी, शिक्षकांनी पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. एम.एस. देशमुख, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक अभय जायभाये, रोजगार व उद्योजकता विकास केंद्राचे संचालक डॉ. ए.एम. गुरव, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, डॉ. पी.एन. वासंबेकर, डॉ. ए.एम. सरवदे आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत यांचे सामूहिक गायन करण्यात आले.


Saturday, 5 June 2021

शिवस्वराज्य दिनानिमित्त विद्यापीठातर्फे

इंद्रजीत सावंत यांचे ऑनलाईन व्याख्यान

 


इंद्रजीत सावंत


कोल्हापूर, दि. ५ जून: शिवाजी विद्यापीठातर्फे शिवस्वराज्य दिनानिमित्त उद्या (६ जून) सकाळी १० वाजता प्रख्यात इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचे शिवस्वराज्य या विषयावरील विशेष ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या शिव वार्ता युट्यूब वाहिनीवरुन प्रसारित होणाऱ्या या व्याख्यानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी केले आहे.

कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर, शिवस्वराज्य दिन साजरा होत असल्याने विद्यापीठातर्फे इंद्रजीत सावंत यांचे शिवस्वराज्य या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या शिव वार्ता (https://www.youtube.com/c/ShivVarta) या वाहिनीवरून https://youtu.be/mh366COs_nw या लिंकद्वारे ते सकाळी १० वाजता प्रसारित होईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करण्यात येईल. कोविड-१९ साथीमुळे शासन निर्देशांचे पालन करीत सदर कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्यात येणार असल्याचेही कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी कळविले आहे.

Tuesday, 1 June 2021

शिवाजी विद्यापीठाच्या संशोधनाला दिशा देण्यात

प्रा. एस.एच. पवार यांचे मोलाचे योगदान – कुलगुरू प्रा. शिर्के

 

प्रा. एस.एच. पवार (संग्रहित छायाचित्र)


कोल्हापूर, दि. १ जून: शिवाजी विद्यापीठातील संशोधनाला दिशा आणि दर्जा प्राप्त करून देण्यामध्ये प्रा. एस. एच. पवार यांचे मोलाचे योगदान आहे, असे गौरवोद्गार कुलगुरू प्रा. डी.टी. शिर्के यांनी आज येथे काढले. डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी विभागप्रमुख प्रा. एस.एच. पवार यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आयोजित ऑनलाईन कृतज्ञता सोहळा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, प्रा. एस.एच. पवार शतायुषी व्हावेत आणि त्यांचे मार्गदर्शन लाभलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही शंभर व्हावी. प्रा. पवार यांनी संशोधनाचा दर्जा उंचावला आणि त्या आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झाली आहे. प्रा. पवार यांनी शिवाजी विद्यापीठात संशोधन प्रकल्प आणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य देण्यास सुरूवात केली आणि ती संस्कृती रूजवली. आज विद्यापीठातील संशोधनाची जी संस्कृती दिसते त्याची सुरुवात प्रा. पवार यांनी केली. त्यांनी विषयांचा प्राधान्यक्रम बदलता ठेवला. त्यामुळे त्यांचा प्रत्येक विद्यार्थी संशोधनाची एक शाळा बनला आहे. त्यांच्या कार्यकाळातच भौतिकशास्त्र विभागाचे देशविदेशा संबंध प्रस्थापि झाले.

प्र-कुलगुरू प्रा. पी.एस. पाटील यांनी संशोधन कसे करावे, याचा वस्तुपाठ दिल्यानेच आपण यशस्वी संशोधक झाल्याचे सांगितले. प्रा. सी.डी. लोखंडे यांनी, प्रा.एस.एच. पवार सरांचा विद्यार्थी हीच आपली खरी ओळख असल्याचे सांगितले. डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी एखादा नवा विषय कसा अभ्यासावा, याचे प्रशिक्षण त्यांच्याकडून मिळाल्याने विविध स्तरावर काम करणे सोपे जात असल्याचे नमूद केले. ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधक डॉ. नानासाहेब थोरात यांनी त्यांच्याकडून अखंड ऊर्जेचा स्रोत कसा कायम ठेवावा, हे शिकता आल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रा. सी.एच. भोसले, प्रा. पी.एन. भोसले, डॉ. बी.एल. चव्हाण, डॉ. डी.डी. शिवगण, डॉ. अर्पिता पांडे यांनीही प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले.

कुटुंबियातर्फे बोलताना पवार सरांचे पुत्र डॉ. स्वप्निल पवार यांनी सांगितले की, वडिलांनी आयुष्यातील पंचाहत्तर वर्षांपैकी पन्नास वर्षे संशोधनात घालवली. मात्र कुटुंबाकडेही तितकेच लक्ष दिल्याने सर्वज आयुष्यात यशस्वी झाले.

सत्काराला उत्तर देताना प्रा. पवार म्हणाले, माझ्या यशामध्ये माझे पीएच.डीचे मार्गदर्शक डॉ. अनंत नारळीकर यांचा मोठा वाटा आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनीही वेळोवेळी मोठे सहकार्य केले, त्यामुळेच एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता आले. माझे विद्यार्थी देशविदेशात आपआपल्या क्षेत्रात कौतुकास्पद कार्य करत असल्याचे पाहून मोठे समाधान मिळते. यापुढेही कार्य रीत राहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला डॉ. जोशी यांनी बनवलेल प्रा. पवार यांचा जीवनपट मांडणारी चित्रफित दाखवण्यात आली.

कार्यक्रमास डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू राकेशकुमार मुदगल, प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, अधिष्ठाता डॉ. आर.के. शर्मा, शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री. संजय जाधव तसेच देशविदेशातील सरांचे विद्यार्थी आणि कुटुंबिय सहभागी झाले. डॉ. लता एकल यांनी प्रास्ताविक केले. तर डॉ. अश्विनी साळुंखे यांनी सूत्रसंचलन केले. डॉ. एस.बी. कुलकर्णी यांनी आभार मानले. डॉ. एस.बी. माने यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.