शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (महाराष्ट्र, भारत) येथील दैनंदिन ठळक घडामोडींचा वृत्तांत देण्यासाठी जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी निर्मिलेला ब्लॉग.
शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिनानिमित्त कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा देताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह अन्य अधिकारी.
शिवाजी विद्यापीठ स्वातंत्र्यदिन समारंभ (व्हिडिओ)
कोल्हापूर, दि. १५ ऑगस्ट:
शिवाजी विद्यापीठात आज स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते सकाळी ठीक आठ वाजता
ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व
मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, वाणिज्य
व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, विद्यार्थी विकास मंडळाचे
संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक
डॉ. नमिता खोत, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. एम.एस. देशमुख, कौशल्य व
उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव, विकास राष्ट्रीय सेवा योजनेचे
समन्वयक अभय जायभाये, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड यांच्यासह
शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी संगीत व
नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर केले. कोविड-१९ विषयक
नियमांचे पालन करून कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप चहापानाने झाला.
शिवाजी विद्यापीठाच्या 'शिव-वार्ता' वाहिनीसाठी ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांची मुलाखत घेताना डॉ. आलोक जत्राटकर
ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे
(श्री. अण्णासाहेब डांगे यांची सविस्तर मुलाखत पाहण्यासाठी या व्हिडिओ लिंकवर क्लिक करा.)
कोल्हापूर, दि. १३
ऑगस्ट:अठराव्या शतकाच्या नभोमंडळात अनेक मराठेवीर चमकत
होते, त्याच पटलावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शुक्रताऱ्यासारख्या उजळल्या होत्या,
असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी आज येथे केले.
शिवाजी
विद्यापीठाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त
श्री. डांगे यांची ‘पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर आणि समकाळ’
या विषयावरविद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ या वाहिनीवर विशेष ऑनलाईन मुलाखत
घेण्यात आली. त्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.
अण्णासाहेब डांगे म्हणाले, अहिल्यादेवी सत्ताधारी होत्या, राजकारणी धुरंधर
होत्या, मात्र सत्तेच्या चढाओढीत नव्हत्या. पेशव्यांशी एकनिष्ठ होत्या, मात्र
लाचारीने नतमस्तक होणाऱ्यांतल्या नव्हत्या. त्यांच्या जहागिरीत धान्याची कोठारे
भरलेली असायची. मात्र सर्व प्रजा जेवल्याची खात्री झाल्याखेरीज त्या स्वतः
अन्नग्रहण करीत नसत. त्यांचा खजिना सोन्याचांदीने भरलेला असला तरी त्यांच्या
स्वतःच्या अंगावर मात्र स्फटिकाच्या माळेशिवाय अन्य दागिना नसे. अहिल्यादेवी
धार्मिक वृत्तीच्या होत्या, मात्र धर्मभोळ्या नव्हत्या. जीवनात लढाया टाळण्यास
त्यांनी प्राधान्य दिले, मात्र चालून आलेल्या शत्रूला नामोहरम केल्याशिवाय त्या
सोडत नसत. पुरूषांच्या बरोबरीने लढाया लढत असताना स्त्रित्वाच्या मर्यादा मात्र
त्यांनी सोडल्या नाहीत. त्या जेव्हा लढाईस जात, तेव्हा लुटणे अगर सत्ता प्रस्थापित
करणे एवढाच त्यांचा उद्देश नसे, तर त्या भागाचा विकास करण्याची संधी मिळाल्याचे
समाधान त्यांना असे. अशा साऱ्या प्रदेशात त्यांच्या समस्त योजना साकारत होत्या.
त्यांच्या जीवनदायी प्रेरणेतून अन्नछत्रे, धर्मशाळा आकार घेत होत्या. दैवी
गुणांच्या अलंकारांनी त्यांचे जीवन नटलेले होते. माणूसपणाच्या मर्यादांमध्येही हे
सर्वगुणसंपन्नत्व उठून दिसणारे होते.
श्री. डांगे पुढे म्हणाले, अहिल्यादेवींच्या ठायी धर्मभावना, देशप्रेम,
कर्तृत्व आणि दूरदृष्टी यांचा अनोखा संगम आढळतो. त्या केवळ कोणा एका समाजाच्या
होत्या, असे मानणे अन्यायकारक ठरेल. संपूर्ण देशकल्याणाचा विचार आणि कृती
त्यांच्या कारकीर्दीतून आपल्याला जागोजागी आढळते. मोरोपंत, वामन पंडित या तत्कालीन
पंडितांनी पुण्यश्लोक पदवी देऊन त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे सच्चे मूल्यमापन व
गौरव केला. अहिल्यादेवींनी वीस देशी वाणाच्या झाडांची निवड केली होती, ज्यांचा
औषधी, अन्नासाठी तसेच उपयुक्त लाकूड मिळण्यासाठी वापर करता येऊ शकेल. अशा
झाडांच्या लागवडीस त्यांनी प्रोत्साहन दिले. नागरिकांच्या सोयीसाठी दर वीस मैलांवर
विहीरी बांधल्या. चार धाम रस्त्याने जोडण्याचे काम केले. देवळे ही संस्कृतीचे
प्रतीक त्या मानत. संस्कृती रक्षण करण्यासाठी त्यांनी देवळांना संरक्षण पुरविले.
काशीहून दररोज पाण्याची कावड रामेश्वरपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करीत असताना
त्या जोडीनेच त्यांनी टपाल पाठविण्याची व्यवस्थाही विकसित केली. बहुतांश
ज्योतिर्लिंगे ही आपल्या देशाच्या सीमा दर्शवितात. या सीमांचे रक्षण करण्यासाठी
म्हणून ज्योतिर्लिंगांचा जिर्णोद्धार व संरक्षण करण्याचे कार्य त्यांनी केले.
कृतीशीलतेचा आणि आदर्श राज्यकारकारभाराचा वस्तुपाठ म्हणून आपण त्यांच्या
जीवनकार्याकडे पाहायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.
कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
यावेळी अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, अहिल्यादेवी
होळकर यांनी त्यांच्या कारकीर्दीत समाजहिताचे अनेक धाडसी निर्णय घेतले. हुंडाबंदी,
सतिप्रथा यांच्याविरोधात त्यांनी आवाज उठविला. जलसंधारण, वृक्षलागवड, शिक्षण या
क्षेत्रांसाठी त्यांनी घेतलेले व राबविलेले निर्णय अत्यंत मूलगामी स्वरुपाचे व
पथदर्शक स्वरुपाचे आहे. आपल्या राज्याच्या सीमांपलिकडे जाऊन समाजहिताचे कार्य त्यांनी
केले. आजही अशी अनेक ठिकाणे त्यांच्या स्मृती जागवित देशभरात उभी आहेत. एक द्रष्टा
प्रशासक कसा असावा, याचे त्या ज्वलंत उदाहरण होत्या. तत्कालीन इतिहासकार, कवी
यांनी त्यांची तुलना इंग्लंडच्या एलिझाबेथ राणीसह तत्कालीन जागतिक स्तरावर
कर्तृत्व गाजविणाऱ्या महिलांशी केलेली आहे.अहिल्यादेवी
होळकर यांचे कार्यकर्तृत्व नव्या पिढीने समजून घेऊन त्यांचे अनुकरण करण्याची गरज
आहे, असेही ते म्हणाले.
शिवाजी विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ या युट्यूब वाहिनीवरुन ही मुलाखत
प्रसारित करण्यात आली. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी ही मुलाखत घेतली.
डॉ. एम.टी. गोफणे यांनी स्वागत व प्रास्ताविक तसेच कार्यक्रमाचे समन्वयन केले.
शिवाजी विद्यापीठाच्या वतीने करंजफेण परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना मदत साहित्य वाटप करण्यात आले.
कोल्हापूर, दि. ४ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून शाहूवाडी
तालुक्यातील करंजफेण, पाल आणि सावर्डी आदी गावातील
पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचे काम केले. या परिसरातील ७०० कुटुंबांना
धान्य व इतर जीवनावश्यक वस्तू तसेच स्वच्छता कीट वाटप करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठाकडे पुणे येथील नॉर ब्रॅमसे, ग्लोबल केअर यांच्या सीएसआर फंडातून तसेच वर्क फॉर इक्वॅलिटी या सामाजिक
संस्थेच्या माध्यमातून या जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
शिवाजी विद्यापीठाचा शिव आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलमेंटच्या
समाजकार्य अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी ही मदत वाटण्यासाठी पुढाकार घेतला.
आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे समन्वयक डॉ. एस. एम. गायकवाड आणि
समाजकार्य अधिविभागातील सहायक संचालक अमोल मिणचेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वीस विद्यार्थ्यांच्या सहाय्याने ही मदत गरजूंपर्यंत पोहोचविण्यात आली.
करंजफेण परिसराला पूराचा मोठा तडाखा बसला आहे. मात्र हा परिसर दुर्गम असल्याने
सुरूवातीला त्याची तीव्रता लक्षात आली नव्हती. करंजफेण, पाल
आणि सावर्डी या गावातील सत्तर टक्क्यांहून अधिक घरे पाण्यात होती. 12 घरे अतिवृष्टीने जमीनदोस्त झाली आहेत. शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे.
हा दुर्गम भाग असल्याने प्रशासनाची मदत पोहोचणे जिकीरीचे ठरत आहे. त्यामुळे शिवाजी
विद्यापीठाने पुढाकार घेऊन अत्यंत गरजू असलेल्या या दुर्गम भागातील पूरग्रस्त
नागरिकांपर्यंत ही मदत पोहोचवली. यासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ.
डी. टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन
केले.
विद्यार्थ्यांचे ऋणानुबंध आणि गहिवरलेले ग्रामस्थ
शिवाजी विद्यापीठाच्या समाजकार्य अधिविभागातील विद्यार्थी आणि
शिक्षक करंजफेण परिसरात दोन वर्षापूर्वी ग्रामीण विकासाचा आढावा घेण्यासाठी
आठवडाभर मुक्कामी होते. या काळात या विद्यार्थ्यांचे संबंधित गावकर्यांशी
ऋणानुबंध जुळले होते. ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना हेच विद्यार्थी
मदत साहित्य घेऊन गावात आल्याने ग्रामस्थांचे डोळे भरून आल्याचे चित्र होते.
शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना आमदार लहू कानडे.
शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना आमदार लहू कानडे.
शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित कार्यक्रमाची संपूर्ण लिंक (व्हिडिओ)
कोल्हापूर, दि. १ ऑगस्ट: लोकशाहीर अण्णाभाऊ
साठे यांनी कष्टकऱ्याला मराठी साहित्याच्या प्रांतात कथानायक म्हणून त्याचे
अस्तित्व प्रदान करण्याचे महत्कार्य केले, अशा शब्दांत ज्येष्ठ लेखक-कवी आणि
महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य लहू कानडे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
शिवाजी विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
अध्यासनाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष ऑनलाईन
व्याख्यानामध्ये ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ या युट्यूब
वाहिनीवरून प्रसारित झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी.
शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर
प्रमुख उपस्थित होते.
श्री. लहू कानडे म्हणाले, अण्णाभाऊ साठे हे मराठीतले
अव्वल दर्जाचे साहित्यिक होते. व्यक्तीप्रधानतेऐवजी घटनाप्रधान लेखनाला त्यांनी
सदैव प्राधान्य दिले. खरे तर अण्णाभाऊ हे शेक्सपिअरच्या तोडीचे साहित्यिक, पण
इथल्या जातव्यवस्थेमुळे त्यांच्यावर अन्याय झाला. तरीही अण्णाभाऊंनी न डगमगता आपली
लेखणी चालविली. त्यांनी वंचित, शोषित, कष्टकरी लोकांना कथा-कादंबऱ्यांचे नायक
केले. हे लोक कधी जिंकतात, कधी हरतात, मात्र संघर्षकडे पाठ फिरवित नाहीत.
कष्टकऱ्यांची, श्रमिकांची ही संघर्षशीलता अण्णाभाऊंनी अत्यंत प्रत्ययकारकतेने
आपल्या साहित्यात चित्रित केली. अण्णाभाऊंची त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी सकारात्मक,
संघर्षाचे मूल्य शिकविते. कलात्मकतेच्या निकषांवर त्यांची साहित्यनिर्मिती अत्यंत
दर्जेदार स्वरुपाची आहे. या माध्यमातून अण्णाभाऊ हे दलित-शोषित समाजाचे महापुरूष
म्हणून झळाळून सामोरे उभे राहतात. त्यांच्यामध्ये सातत्ने संघर्षाचे बळ आणि विजयी
होण्याची प्रेरणा पेरताहेत, असेही ते म्हणाले.
अण्णाभाऊ हे आजही आपल्यासाठी एक क्रांतीकारक
तत्त्व म्हणून उभे असल्याचे सांगून श्री. कानडे पुढे म्हणाले,अण्णाभाऊंचे गिरणी
कामगार होणे ही अत्यंत परिवर्तनकारी घटना होती. या कामगार चळवळीने त्यांच्यातल्या
शाहीराला व्यासपीठ व ओळख प्राप्त करून दिली. अन्यथा ते या व्यवस्थेने त्यांच्यावर
लादलेल्या गुलामीच्या चौकटीमध्येच बंदिस्त झाले असते. आपल्या चौफेर प्रतिभेच्या
बळावर त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये प्राण फुंकून ती जिवंत
राखण्याचे काम केले, हे त्यांचे फार मोलाचे योगदान आहे.
कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
म्हणाले, वास्तवाशी जवळीक साधणारे लेखन करणाऱ्या अण्णाभाऊंचा अनुभव हाच गुरू होता.
अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनात अद्भुतता, अतिशयोक्ती, अतार्किकता
आहे, पण तेवढेच नव्हे; तर
जीवनातील विदारक वास्तवही प्रगट झाले आहे. लोककथेतील अद्भुतता, अतिशयोक्ती
मानवी मनाला भुरळ घालते. पण त्यातून प्रगट झालेले जीवनातील तत्त्वज्ञान व
वास्तवाचे दर्शन त्या मनाला अंतर्मुख करून विचार करायला लावते. रंजन करता करता
व्यापक जीवनदर्शन घडविण्याचे सामर्थ्य लोककथेत असते. लोकपरंपरेतील मौखिक
साहित्याचे वैशिष्ट्य अण्णाभाऊंच्या कथा-कादंबऱ्यांमधून कलात्मक रूप घेऊन आविष्कृत
झाले आहे. अण्णाभाऊंच्या अनेक कथांमध्ये अद्भुत आणि वास्तव एकाचवेळी अवतरते.
यावेळी अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे समन्वयक डॉ.
रणधीर शिंदे यांनी स्वागत केले व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्र-कुलगुरू
डॉ. पी.एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर
यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.
शाहीर देवानंद माळी
यांचे बहारदार सादरीकरण
शाहीर देवानंद माळी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती
कार्यक्रमात आज सांगली येथील शाहीर देवानंद माळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ऑनलाईन
सहभागी होत अण्णाभाऊंच्या काही कवनांचे बहारदार सादरीकरण केले आणि उत्तम वातावरण
निर्मिती केली. कार्यक्रमाची सुरवात शाहीर माळी यांनी ‘माझी मैना गावावर
राह्यली..’ ही छक्कड सादर केली, तर कार्यक्रमाचा समारोप ‘जग बदल घालुनी घाव’ या सुप्रसिद्ध
कवनाने केली.
अण्णाभाऊ साठे यांना
अभिवादन
दरम्यान, आज सकाळी १०.३० वाजता शिवाजी
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस
कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते पुष्पहार
अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व
लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी.आर.
पळसे, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे आदी उपस्थित होते.
कोल्हापूर, दि. ३१
जुलै: शिवाजी विद्यापीठामार्फत
काल शुक्रवारी (दि. ३० जुलै) एका दिवसात शहराला ११.५१ लाख लीटर इतका उच्चांकी
पाणीपुरवठा करण्यात आला.
महापुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये विद्यापीठाने गेल्या रविवारपासून
दररोज शहर व परिसराला महानगर पालिका प्रशासनाच्या सहकार्यातून पिण्याच्या पाण्याचा
पुरवठा करण्यास सुरवात केली आहे. याअंतर्गत दररोज सरासरी सव्वातीन लाख पाणीपुरवठा
करण्यात येत आहे. मात्र, शहरवासियांची पाण्याची गरज भागविण्यासाठी विद्यापीठाने
काल क्रीडा अधिविभागाशेजारील रुसा विहीर क्र.२ ला आणखी एक पंप वाढविला. त्या
विहीरीतून दोन पाच हॉर्सपॉवरच्या पंपांच्या सहाय्याने दोन पॉईंटवरुन पाणीपुरवठा
सुरू करण्यात आला. यामुळे एकूण ७४ वाहनांच्या माध्यमातून तेथून एकूण ८ लाख ८८ हजार
लीटर पाणी पुरविण्यात आले. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळील
भरणा केंद्रातून तीस वाहनांतून २ लाख ६३ हजार लीटर पाणी पुरविण्यात आले. त्यामुळे
काल एका दिवसांत विद्यापीठ शहराला ११ लाख ५१ हजार लीटर इतके उच्चांकी पाणी पुरवू
शकले.
सदर पाणी पुरवठ्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, आयुक्त
कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर
यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या जलपुरवठा विभागाचे मिलींद जाधव आणि
कर्मचारी तसेच विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी व कर्मचारीही सक्रिय
योगदान देत आहेत.
तसेच, विद्यापीठ मुक्या जनावरांसाठी आपल्या परिसरातील गवत चारा म्हणूनही
उपलब्ध करीत आहे. काल सुमारे शंभर पशुपालक शेतकऱ्यांनी ५५ मोटारसायकल, तीन
ट्रॅक्टर्स, दोन रिक्षा, तीन एपे रिक्षा, दोन जीप ट्रॉली आणि चार बैलगाड्यांतून चारा
नेला आहे.
कोल्हापूरदि, ३१ जुलै:धर्मनिरपेक्षता या
घटनात्मक मूल्याची जोपासना कसोशीने केल्यास लोकशाही व्यवस्था अधिक बळकट होण्यास
मदत होईल, असा सूर ‘लोकशाही आणि अल्पसंख्याक विचार’ या विषयावरील एकदिवसीय वेबिनारमध्ये विविध
तज्ज्ञांनी व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण अध्यासन आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ
रूरल डेव्हलमेंट (वायसीएसआरडी) अधिविभागाच्यावतीने काल (दि. ३०) या वेबिनारचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी शिवाजी
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के होते.
यावेळी सोलापूर येथील वालचंद कॉलेजच्या संस्कृत आणि प्राकृत विभागाचे प्रमुख डॉ.
महावीर शास्त्री यांनी ‘लोकशाही: जैन समाज विषयक विचार’, मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दीन तांबोळी
यांनी ‘लोकशाही: मुस्लिम समाज विषयक विचार’, बेळगावच्या जी.एम.एस. कॉलेजचे प्राचार्य आनंद मेणसे यांनी ‘लोकशाही: लिंगायत समाज
विषयक विचार’ तर शिवाजी
विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी ‘महर्षि शिंदे यांचे धर्मविषयक विचार’ या विषयावर मार्गदर्शन केले.
डॉ. महावीर शास्त्री म्हणाले, भगवान महावीर
यांच्या काळातच लोकशाहीची बीजे रोवली गेली होती. अनेक धर्मांना सामावून
घेणारा महावीरांचा अनेकान्तवाद याचे उत्तम उदाहरण आहे. डॉ. शमशुद्दीन
तांबोळी म्हणाले, अल्पसंख्याक ही
संकल्पना जगभरात आहे. संयुक्त राष्ट्रानेही अल्पसंख्याकांचे प्रश्न गंभीर असल्याचे
म्हटले आहे. भारतात अल्पसंख्य असलेल्या मुस्लिम समाजाने इतरांचे अनुकरण
करण्यापेक्षा नीटपणे इस्लाम समजून घेणे आवश्यक आहे.
कृष्णा मेणसे म्हणाले, बाराव्या शतकात
महात्मा बसवेश्वर यांनी जातविरहित समाजाची संकल्पना मांडली होती. बसवेश्वर
वैज्ञानिक दृष्टीकोनाचे होते. जातव्यवस्था संपल्याशिवाय लोकशाही मूल्ये रूजणार
नाहीत, अशी त्यांची धारणा होती.
डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, परिघाबाहेरील
समाजाला मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. विशेषतः अल्पसंख्याकांचे प्रश्न समजून
घ्यावे लागतील. यासाठी बहुसंख्यांनी स्वतःत बदल करावा. महर्षि विठ्ठल रामजी शिंदे
यांनी अशाच पद्धतीचे सर्वसमावेशक विचार केला होता.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. डी.
टी. शिर्के म्हणाले,लोकशाही मूल्ये रूजण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. लोकशाहीला अनेकवेळा हादरे बसले असले तरी प्रत्येक वेळी लोकशाही त्यातून अधिक
बळकट होत गेली. लोकशाहीत परस्पर सामंजस्य खूप महत्त्वाचे आहे. विशेषतः सर्व
समाजघटकांचे सौहार्द आणि अल्पसंख्याक समूहाकडे पाहण्याचा बहुसंख्याकांचा
दृष्टीकोनही तितकाच सकारात्मक असला पाहिजे. यातून निकोप लोकशाही वाढीस लागण्यास
मदत होईल.
डॉ. नितीन माळी यांनी स्वागत केले. डॉ. वैशाली भोसले आणि डॉ. संतोष सुतार
यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यशवंतराव चव्हाण स्कूलचे प्रभारी संचालक प्रा. प्रकाश पवार यांनी वेबिनारचा हेतू
विशद केला. डॉ. कविता वड्राळे यांनी आभार मानले.
विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागाकडील विहीरीकडील पाणीपुरवठा व्यवस्थेची पाहणी करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के (व्हिडिओ)
शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागाकडील विहीरीतून करण्यात आलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेची पाहणी करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी व कर्मचारी.
पाच दिवसांत १६ लाख लीटर पाणी पुरविले;
जनावरांच्या चाऱ्यासाठी २५
ट्रॉली गवत
कोल्हापूर, दि. २९
जुलै:महापूरग्रस्त कोल्हापूरकरांची तहान भागविण्यासाठी शिवाजी
विद्यापीठाकडून अविरत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या पाच दिवसांत दररोज सरासरी सव्वा तीन लाख लीटर या प्रमाणे १६
लाख लीटरचा पाणीपुरवठा आपल्या जलशुद्धीकरण केंद्रामधून केला आहे. त्याचप्रमाणे
दररोज पाच ट्रॉली इतके गवतही जनावरांच्या चाऱ्यासाठी उपलब्ध करून दिले आहे.
कोल्हापूरला पाणीपुरवठा करणारी सर्व जलशुद्धीकरण केंद्रे पुराच्या पाण्याखाली
गेल्याने शहर व परिसराला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली. सन २०१९चा अनुभव
लक्षात घेता शिवाजी विद्यापीठाने आपल्या जलशुद्धीकरण केंद्रातून यंदा पाणीपुरवठा
करण्याची तयारी ठेवली होती. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त कादंबरी
बलकवडे यांच्याशी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांची चर्चा होऊन रविवार, दि. २४
जुलैपासून महानगरपालिकेच्या टँकर्समधून शहर परिसराला पिण्याचे पाणी पुरविले जाऊ
लागले. रविवारी (दि. २४) २ लाख ७० हजार लीटर, सोमवारी (दि. २५) ३ लाख १८ हजार
लीटर, मंगळवारी (दि. २६) ३ लाख २७ हजार ५०० लीटर, बुधवारी (दि. २७) २ लाख ७६ हजार
लीटर आणि गुरूवारी (दि. २८) ४ लाख २५ हजार लीटर असे एकूण १६ लाख १६ हजार ५०० लीटर
पाणी महानगरपालिकेच्या यंत्रणेद्वारे विद्यापीठाच्या जल शुद्धीकरण केंद्रांमधून
टँकरने शहराला पुरविण्यात आले आहे. विद्यापीठाच्या एका जल शुद्धीकरण केंद्रावर
येणारा ताण लक्षात घेऊन विद्यापीठाच्या क्रीडा विभागाकडील विहीरीच्या विद्यापीठाच्या
पर्यावरण शास्त्र अधिविभागातील संशोधकांमार्फत पाण्याची नमुना तपासणी करण्यात आली.
हे पाणी पिण्यास योग्य असल्याचा निर्वाळा प्राप्त झाल्यानंतर त्या विहीरीचे पाणीही
उचलण्यास सुरवात करण्यात आली. यामुळे दोन केंद्रांमधून आणखी गतीने पाणी पुरविणे
शक्य होऊ लागले आहे. अभियांत्रिकी विभागाचे प्रभारी उपकुलसचिव आर.पी. यादव आणि त्यांचे सर्व सहकारी याचे नियोजन करीत आहेत.
पाण्याप्रमाणेच जनावरांच्या चाऱ्यासाठी विद्यापीठाच्या परिसरातील काही राखीव कुरणांवरील
गवत काढण्यास चारा छावण्या व गरजू नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार
दररोज पाच ट्रॉली भरेल, इतके गवत जनावरांसाठी विद्यापीठाकडून दिले जात आहे.
दरम्यान, काल सायंकाळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस.
पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी क्रीडा
अधिविभागाकडील विहीरीमधून करण्यात येत असलेल्या पाणीपुरवठ्याची पाहणी केली.
सलगपणाने उपसा होऊनही विहीरीतील पाण्याची पातळी उत्तम असल्याचे पाहून त्यांनी
समाधान व्यक्त केले. महापालिका प्रशासनाकडून नियुक्त कर्मचारी आणि विद्यापीठाचा
अभियांत्रिकी विभाग हे अतिशय चांगला समन्वय राखून शहराला पाणी पुरवठा करण्यामध्ये
महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
त्याचप्रमाणे जोवर गरज लागेल, तोवर ही यंत्रणा सुरळीत राहील, याबाबत दक्षता
घेण्याची सूचनाही केली.
नागरिकांकडून समाधान व्यक्त
शिवाजी विद्यापीठाने आपल्या परिसरात गेल्या काही वर्षांत सातत्याने
जलसंवर्धनाचे, जल साठवणुकीचे विविध प्रयोग केले आहेत. परिणामी विद्यापीठाच्या
परिसरात सुमारे ३२ कोटी लीटर पाणी साठविले जाते. त्याचेच फलित म्हणून
महापुरामध्येही भासणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाई काळात विद्यापीठ मदतीसाठी
तत्परतेने कार्य करीत आहे. केवळ माणसांची तहानच नव्हे, तर जनावरांची भूक भागविण्याकडेही
लक्ष देत आहे. एके काळी पाण्यासाठी सार्वजनिक व्यवस्थेवर अवलंबून असणारे विद्यापीठ
आता पाणी देणारे बनले आहे, याबद्दल नागरिकांतूनही मोठे समाधान व्यक्त करण्यात येत
आहे.