Wednesday, 26 January 2022

शिवाजी विद्यापीठात प्रजासत्ताक दिन उत्साहात

शिवाजी विद्यापीठात ध्वजवंदन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी.

शिवाजी विद्यापीठात ध्वजवंदन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी.

७३व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थितांना अभिवादन करून शुभेच्छा देताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत अधिकारी.


कोल्हापूर, दि. २६ जानेवारी: ७३ वा भारतीय प्रजासत्ताक दिन आज शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते सकाळी ठीक ८ वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात राष्ट्रध्वजास वंदन करण्यात आले. त्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले.

या वेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी.आर. पळसे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. एम.एस. देशमुख, कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, क्रीडा संचालक डॉ. पी.टी. गायकवाड, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. अभय जायभाये यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कोविड-१९विषयक नियमांचे काटेकोर पालन करून कार्यक्रम साजरा करण्यात आला. चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Tuesday, 25 January 2022

‘निसर्ग व माणसांतील अंतर कमी करण्याचा मराठी साहित्यविश्वाकडून प्रयत्न’

विद्यापीठातील ‘मराठी निसर्ग साहित्य’ चर्चेमधील सूर

शिवाजी विद्यापीठात आयोजित ऑनलाईन मराठी साहित्य चर्चेत बोलताना साहित्यिक संदीप नाझरे


कोल्हापूर, दि. २५ जानेवारी: माणसांसह सजीव सृष्टीचेही भावविश्व रेखाटताना मराठी साहित्यविश्वाने निसर्ग व माणूस यांच्यातील अंतर कमी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे, असा सूर आज मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या साहित्य चर्चेमध्ये उमटला.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी निसर्ग साहित्यया विषयावर आज साहित्य चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चे साहित्यिक सलीम मुल्ला, दत्ता मोरसे आणि संदिप नाझरे सहभागी झाले.

इथून पुढच्या लिहिणाऱ्या पिढीने देखील निसर्गाला काहीतरी सांगायचे आहे, याची जाणीव ठेवून पर्यावरणाचा विचार करून लेखन करावे’, असे मत साहित्यिक सलीम मुल्ला यांनी यावेळी मांडले. संदिप नाझरे यांनी मौखिक परंपरेतील लोककथांचा आणि लोकगीतांचा आधार घेत पशुक्ष्यांचे लोकसाहित्याबरोबरचे नाते उलडले. दत्ता मोरसे यांनी साहित्यातून चित्रित झालेल्या जंगल चित्रणाचा वेध घेतला. तसेच जंगलातील भाषा आणि पशुक्ष्यांतील सांकेतिक खुणांचे अर्थनिर्णयन कसे करावे, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

ऑनलाईन स्वरूपात झालेल्या या चर्चासत्राचे प्रास्ताविक प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले. सूत्रसंचालन राजेश पाटील यांनी केले तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले.

शिवाजी विद्यापीठात

राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात


 

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रतिज्ञा घेताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक अभय जायभाये, डॉ. प्रल्हाद माने आदी.

कोल्हापूर, दि. २५ जानेवारी: प्रत्येक प्रौढ विद्यार्थी-विद्यार्थिनीने मतदार यादीत आपले नाव नोंदविले पाहिजे, त्याचप्रमाणे आपल्या समवयस्कांना त्यासाठी प्रोत्साहितही केले पाहिजे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठात आजादी का अमृतमहोत्सव उपक्रमांतर्गत आज १२व्या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपूर्ण निवडणुका हा उपक्रम उत्साहाच्या वातावरणात आयोजित करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित निवडणूक साक्षरता मंडळाच्या सदस्य विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, केवळ मतदार यादी नाव नोंदविण्याने काम भागत नाही, तर निवडणुकांमध्ये मतदान करण्यासही युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे. लोकशाहीचे पवित्र कर्तव्य म्हणून देशाचा विकास, लोकशाहीचे संवर्धन यासाठी प्रत्येक सुजाण नागरिकाने कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करायला हवे. कोणताही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहता कामा नये, ही राज्य निवडणूक आयोगाची देखील भूमिका आहे. त्यासाठी आयोगाने मोठ्या प्रमाणात जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. त्याला प्रतिसाद म्हणून युवकांनी मतदार नोंदणी मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी नोडल अधिकारी डॉ. प्रल्हाद माने यांनी उपस्थितांना मतदार दिवस प्रतिज्ञा दिली. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी.आर. पळसे, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक अभय जायभाये, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांच्यासह निवडणूक साक्षरता मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Monday, 24 January 2022

मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त

शिवाजी विद्यापीठात विविध कार्यक्रम






 

कोल्हापूर, दि. २४ जानेवारी: शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग, इतिहास अधिविभाग, राज्यशास्त्र ज्ञान मंडळ, महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाचे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त उद्या, मंगळवार दि. २५ जानेवारी ते २८ जानेवारी २०२२ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये व्याख्यानमाला, साहित्य चर्चा, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखकांशी संवाद आणि कवी संमेलन यांचा समावेश आहे.

व्याख्यानमाला

मराठी, इतिहास, राज्यशास्त्र ज्ञान मंडळ आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ ते २८ जानेवारी या कालावधीत दररोज सायंकाळी वाजता विविध विषयांवरील व्याख्यानांचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष व प्रमुख संपादक मा. राजा दीक्षित यांच्या हस्ते या ऑनलाईन कार्यक्रमाचे उद्‌घाटन होईल. डॉ. नंदकुमार मोरे यांचे 'तंजावर राज्याचा भाषाविषयक दृष्टिकोन' (दि. २५), डॉ. रणधीर शिंदे यांचे 'महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा भाषाविषयक विचार' (दि. २६), डॉ. राजेंद्र मगर यांचे 'सयाजीराव महाराज यांचे भाषाविषयक कार्य' (दि. २७) आणि डॉ. सूर्यकांत गायकवाड यांचे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भाषाविषयक विचार' (दि. २८) या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान "शांतता! मराठीचे कोर्ट चालू आहे" ही चित्रफत प्रदर्शित केली जाणार आहे.

साहित्य-चर्चा

शिवाजी विद्यापीठाचा मराठी विभाग आणि महाराष्ट्र राज्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त २५ जानेवारी सकाळी ११:३० वाजता 'साहित्य चर्चा' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 'मराठी निसर्ग साहित्य' या विषयावर ही साहित्य चर्चा होणार आहे. या चर्चे सलीम मुल्ला, संदीप नाझरे आणि दत्ता मोरसे यांचा सहभाग असणार आहे.

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकांशी संवाद

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकांशी संवादाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गुरुवार दि. 27 जानेवारीस दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम आयोजित केला असून यामध्ये साहित्यिक किरण गुरव, सोनाली नवांगुळ, संजय वाघ आणि प्रणव सखदेव या लेखकांशी श्रोत्यांना संवाद साधता येणार आहे.

हा कार्यक्रम मराठी विभागाचे फेसबुक पेज https://www.facebook.com/SUKmarathi आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या 'महाकल्याण' युट्यब चॅनेल https://youtu.be/QXuMmK-UEL8 वरून प्रक्षेपित केला जाईल.

कवी संमेलन

शिवाजी विद्यापीठाचे मराठी, इतिहास राज्यशास्त्र ज्ञान मंडळ आणि महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. २८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता कवी संमेलनाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री नीरजा असतील. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष प्रा. श्री. म. (राजा) दीक्षित यांची प्रमुख उपस्थिती असून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते उद्घाटन होईल.

कवी प्रफुल्ल शिलेदार (नागपूर), रमेश इंगळे उत्रादकर (बुलढाणा), सौमित्र (मुंबई), श्रीधर तिळवे (मुंबई), प्रज्ञा दया पवार (मुंबई), मीनाक्षी पाटील (मुंबई), दिनकर मनवर (मुंबई), प्रवीण बांदेकर (सावंतवाडी), गोविंद काजरेकर (बांदा), मनोज बोरगावकर (नांदेड), संदीप जगदाळे (पैठण) आणि जय प्रभू कांबळे (गोवा) आदी नामवंत कवी सहभागी होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागासाठी https://www.facebook.com/SUKmarathi या फेसबुक लिंकचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे, विद्याव्यासंगी सहाय्यक डॉ. जगतानंद भटकर, मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबईचे सचिव, कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे आणि समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन करीत आहेत.

‘दक्षिण आशिया: ‘अज्ञात’ अवकाशांचा शोध’ या विषयावर

२९ जानेवारीपासून आंतरराष्ट्रीय ऑनलाईन परिसंवाद




कोल्हापूर, दि. २४ जानेवारी: शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभाग व मराठी अधिविभाग आणि द इंटरनॅशनल सेंटर फॉर साउथ एशियन स्टडीज, रशियन स्टेट युनिव्हर्सिटी फॉर द ह्युमॅनिटीज, मॉस्को, रशिया (RSUH) यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २९ ते ३१ जानेवारी २०२२ या कालावधीत आंतरराष्ट्रीय बहुविद्याशाखीय ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन केले आहे, अशी माहिती डॉ. मेघा पानसरे आणि डॉ. रणधीर शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

डॉ. पानसरे व शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दक्षिण आशिया: ‘अज्ञात’ अवकाशांचा शोध  (“Open Pages in South Asian Studies - IV”, Kolhapur, India) या शृंखलेतील ‘दक्षिण आशिया: समकालीन गतिमान वास्तव – 2022’ (The Contemporary Dynamics of South Asia – 2022) या मध्यवर्ती  विषयावर हा परिसंवाद होणार आहे.

शनिवारी (दि. २९) सकाळी ११ वाजता परिसंवादाचे उद्घाटन होईल. या प्रसंगी प्रा. वेरा जबोत्किना (प्र-कुलगुरू, इंटरनॅशनल अफेअर्स, RSUH, मॉस्को), मा. निकलाइ कुदाशेव (रशियाचे भारतातील राजदूत), महनीय पवन कपूर (भारताचे रशियातील राजदूत) व डॉ. इलेना रेमीजवा (संचालक, रशियन हाउस इन मुंबई) सदिच्छा संदेश देण्यासाठी उपस्थित असतील. या सत्रात ज्येष्ठ इतिहासकार प्रा. रोमिला थापर उद्घाटनपर व्याख्यान देणार आहेत, तर विख्यात भाषातज्ज्ञ प्रा. गणेश देवी बीजभाषण करतील. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे माजी संचालक डॉ. डी. दयालन विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील तर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डी.टी. शिर्के उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी असतील.

या परिसंवादामध्ये देश-विदेशातील प्रख्यात विचारवंत, अभ्यासक दक्षिण आशियाशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. त्यात प्रामुख्याने प्रा. प्रभात पटनाईक, श्री. सईद नक्वी, प्रा. उर्वशी बुटालिया, प्रा. उमा चक्रवर्ती, प्रा. सईदा हमीद (दिल्ली), तसेच दक्षिण आशियायी देशांतील प्रा. महेंद्र लावोटी (नेपाल व अमेरिका), श्रीमती खुशी कबीर (बांगला देश), अॅड. निमाल्का फेर्नान्दो (श्रीलंका), डॉ. तैमुर रहमान व फर्वा शफ्कत (पाकिस्तान) यांची व्याख्याने होतील. त्याचबरोबर प्रा. एस. इरुदया (केरळ), श्रीमती सबा नक्वी, प्रा. जया वेलणकर, डॉ. जया मेहता, विनीत तिवारी, (दिल्ली), सचिन केतकर (बडोदा), सलमा (तमिळनाडू), श्री. जतीन देसाई, प्रा. अविनाश पांडे, श्री. प्रताप आसबे, अॅड. मिहीर देसाई (मुंबई), श्रीमती मीना शेषू (सांगली), प्रा. परिमल माया सुधाकर, श्री. दत्ता देसाई (पुणे) यांचेही मार्गदर्शन होईल. दि. ३१ जानेवारी रोजी ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभा सदस्य श्री. कुमार केतकर समारोपाचे भाषण करणार आहेत. प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील समारोप सत्राचे अध्यक्ष असतील.

परिसंवादाच्या माध्यमातून दक्षिण आशियाशी संबंधित अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्नांवर देश-विदेशातील अभ्यासक चर्चा करतील. त्यातून अनेक मते- निष्कर्ष समोर येतील. दक्षिण आशियातील देशांचे प्रश्न समजून घेऊन भविष्यात त्यांच्यामध्ये सौहार्द संबंध प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने हा परिसंवाद महत्त्वाची भूमिका बजावेल. परिसंवादामध्ये भारत, रशिया, पाकिस्तान, बांगलादेश, इंग्लंड य देशांतील संशोधक शोधनिबंध वाचणार आहेत. भाषा, साहित्य, कला, इतिहास, सामाजिक विज्ञान आणि मानव्यशास्त्र या विविध शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनुभवी संशोधक आणि तरुण तज्ज्ञांना या परिसंवादात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवर परिसंवादाचे तपशीलवार माहितीपत्रक उपलब्ध आहे, अशी माहिती परिसंवादाचे निमंत्रक डॉ. मेघा पानसरे, प्रा. रणधीर शिंदे (कोल्हापूर) व प्रा. अलेक्सांद्र स्तल्यारव व डॉ. इंदिरा गजीयेवा (रशिया) यांनी दिली आहे.

Wednesday, 19 January 2022

प्रा. सागर डेळेकर यांच्या संशोधनास भारतीय पेटंट


डॉ. सागर डेळेकर


''अँटीमायक्रोबियल रंग करिता नॅनो संमिश्रे'' या संदर्भात केले संशोधन


कोल्हापूर, दि.19 जानेवारी: शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील  प्रा. एस. डी. डेळेकर  व त्यांचे संशोधक विद्यार्थी डॉ. शामकुमार देशमुख यांना ''अँटीमायक्रोबियल रंग करिता नॅनो संमिश्रे'' या संशोधनाकरीता भारतीय पेटंट मिळाले आहे. 

मानवाच्या दैनंदिन जीवनात बॅक्टेरिया, विषाणू, बुरशी इ. सूक्ष्मजीवजंतू सर्वत्र आढळतात. पोषक वातावरणात हे सूक्ष्मजीवजंतू त्वरित पुनरुत्पादित होतात. त्यामुळे वातावरणात दुर्गंधी, अस्वच्छता पसरते. तसेच हे सूक्ष्म जीवजंतू मानवी शरीरामध्ये प्रवेश करुन अनेक संसर्गजन्य आजारांच्या प्रसारास कारणीभूत ठरतात. त्याचसोबत या सूक्ष्म जीवजंतूच्या संसर्गामुळे अनेकदा दवाखान्यामध्ये दाखल व्हावे लागते. काही वेळा जीवही गमवावा लागतो. किंबहुना मधुमेही, रक्तदाबाच्या (बीपी) रुग्णांना अशा सूक्ष्म जीवजंतूचा संसर्ग लवकर होवून त्यांची प्रतिकार क्षमता दिवसेंदिवस खालावत जाते. कोरोना विषाणूमुळे होणारे विविध संसर्गजन्य आजाराची प्रचिती सारे जग अनुभवत आहे. म्हणूनच या सूक्ष्म जीवजंतूचा पृष्ठभागावरील होणारा प्रसार व पुनरुत्पादन रोखण्याठी प्रा. डेळेकर यांनी अविरत परिश्रम करून साकारलेल्या संशोधनातून  अँटीमायक्रोबियल रंग (पेंट) करिता आवश्यक नॅनो संमिश्रे   तयार केली आहेत. अशा रंगाचे आवरण घरातील व दवाखान्यातील विविध वस्तूंना दिल्यास त्या वस्तूंच्या पृष्ठभागावरील सूक्ष्म जीवजंतू नष्ट होवून त्यांचा प्रसारही होत नाही. त्यामुळेच विविध संसर्गजन्य आजारांचा अटकाव होऊ शकतो. सदरचा रंग (पेंट) हा घरातील, कार्यालयातील, दवाखान्यातील विविध उपकरणे, कॉट, दरवाजे, कपाटे, टेबल, खुर्ची इ. साठी वापरु शकतो. तसेच वाहनांच्या विविध पार्ट्सना  सदरच्या रंगाचे आवरण दिल्यास ते पृष्ठभागही जंतूविरहित होऊ शकतात. डॉ. डेळेकर यांनी संशोधित केलेले नॅनो संमिश्रे ही दीर्घकालीन  अँटीमायक्रोबियल गुणधर्म असलेले पदार्थ असून ते पूर्ण सुरक्षित आणि पर्यावरणपूरक आहेत.  

या संशोधनाचे श्रेय त्यांनी शिवाजी विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांना दिले आहे.