Monday, 3 October 2022

विद्यापीठाच्या ‘शिव-वाणी’चे ५० दिवस पूर्ण;

स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्यास दैनंदिन उजाळा

 

शिव-वाणी वाहिनीचा लोगो

अभिवादन स्वातंत्र्यसैनिकांना मालिकेअंतर्गत ३ ऑक्टोबरपर्यंत ५० स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची माहिती प्रसारित करण्यात आली आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या शिव-वाणी ध्वनीवाहिनीवरुन २ ऑक्टोबरपासून महात्मा गांधी यांच्या 'सत्याचे प्रयोग' या आत्मकथेचे क्रमशः अभिवाचन सादर करण्यास प्रारंभ झाला आहे.


कोल्हापूर, दि. ३ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि जनसंपर्क कक्षामार्फत निर्मित शिव-वाणी या युट्यूब ध्वनीवाहिनीस आज ५० दिवस पूर्ण झाले. कोल्हापूर, सांगली व सातारा या विद्यापीठ कार्यक्षेत्रासह राज्यभरात स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देणाऱ्या अभिवादन स्वातंत्र्यसैनिकांना!’ या ध्वनीमालिकेनेही आज ५० भागांचा टप्पा गाठला.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आजादी का अमृतमहोत्सव आणि शिवाजी विद्यापीठाचा हीरकमहोत्सव या संयुक्त निमित्ताने स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याला उजाळा देणाऱ्या ध्वनीमालिकेच्या निर्मितीची संकल्पना मांडली. त्यानुसार त्यांनी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांच्यासमवेत बैठक घेऊन योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार इतिहास अधिविभागामार्फत संलग्नित तीनही जिल्ह्यांमध्ये प्रकल्प समन्वयक नियुक्त करण्यात येऊन त्यांच्याकडून स्वातंत्र्यसैनिकांची माहिती संकलित करण्यास सुरवात केली. जनसंपर्क कक्षाने शिव-वाणी वाहिनीसह अभिवादन स्वातंत्र्यसैनिकांना या मालिकेच्या निर्मितीची संपादकीय व तांत्रिक जबाबदारी उचलली. दि. १५ ऑगस्ट २०२२ रोजी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते वाहिनीचे तसेच ध्वनीमालिकेचे लोकार्पण करण्यात आले. तेव्हापासून दररोज सकाळी ९ वाजता अभिवादन स्वातंत्र्यसैनिकांना या मालिकेअंतर्गत एका ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकाची माहिती प्रसारित केली जात आहे. शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील स्वातंत्र्यसैनिक दत्ताजीराव जाधव यांच्याविषयीचा पहिला भाग १५ ऑगस्ट रोजी प्रसारित करण्यात आला होता. आज ५०व्या भागात नेसरी येथील स्वातंत्र्यसैनिक बाबाना श्रीशैलप्पा साखरे यांच्या कार्याची माहिती प्रसारित करण्यात आली. निवेदक सुस्मिता खुटाळे यांच्या स्वरात ही मालिका प्रसारित होते आहे. दहा हजारहून अधिक श्रोत्यांनी या मालिकेचा लाभ घेतला आहे.

काल, रविवारी (दि. २ ऑक्टोबर) महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने विद्यापीठाचे गांधी अभ्यास केंद्र आणि जनसंपर्क कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सत्याचे प्रयोग या गांधीजींच्या आत्मकथेचे क्रमशः अभिवाचनही दररोज सकाळी ८.३० वाजता शिव-वाणीवरुन प्रसारित करण्यास सुरवात झाली आहे. निवेदक अक्षय नलवडे-जहागीरदार हे अभिवाचन करीत आहेत.

विद्यापीठाच्या शिव-वार्ता (www.youtube.com/c/Shiv-Varta)  आणि शिव-वाणी (www.youtube.com/c/ShivVani1) या वाहिन्यांवरुन दर्जेदार कार्यक्रमांचे प्रसारण करण्याचे नियोजन असून त्यांचा श्रोत्यांनी लाभ घेत राहण्यासाठी या वाहिन्यांना सबस्क्राईब करावे, असे आवाहन जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी केले आहे.

 

 

Sunday, 2 October 2022

महात्मा गांधी यांच्या मूल्यांच्या पायावर

राजकारणाचे शुद्धीकरण व्हावे: डॉ. अशोक चौसाळकर

 

शिवाजी विद्यापीठात महात्मा गांधी जयंतीनिमित्त प्रा. राम बापट आणि प्रा. भारती पाटील यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. भारती पाटील, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील,डॉ. अशोक चौसाळकर, कुलसचिव डॉ. विलास शिंदे.

शिवाजी विद्यापीठात गांधी जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौैसाळकर. मंचावर डॉ. भारती पाटील, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. विलास शिंदे.

शिवाजी विद्यापीठात गांधी जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौैसाळकर. 

शिवाजी विद्यापीठात महात्मा गांधी आणि लाल बाहदूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. सोबत (डावीकडून)



कोल्हापूर, दि. २ ऑक्टोबर: महात्मा गांधी यांना अभिप्रेत मूल्यांच्या पायावर आजच्या राजकारणाचे शुद्धीकरण करण्यास प्रतिबद्ध व्हावे, हाच आजच्या दिवसाचा संदेश आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या गांधी अभ्यास केंद्रातर्फे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. चौसाळकर म्हणाले, महात्मा गांधी यांची न्यायविषयक भूमिका अत्यंत सुस्पष्ट स्वरुपाची होती. आयुष्यात कितीही मोठे आमिष अगर सत्ताशक्ती हाती आले, तरी सुद्धा कोणत्याही परिस्थितीत न्यायाने वागणे न सोडणारी माणसे त्यांना अभिप्रेत होती. विशेषतः आजच्या राजकारणाच्या संदर्भात हे विधान अधिक लागू पडणारे आहे. राजकारणाच्या बाबतीत लोकमान्य टिळकांची भूमिका शठे प्रति शाठ्यम् आणि गांधीजींची भूमिका शठे प्रति सत्यम् अशी असली तरी सध्याची स्थिती या दोघांनाही मान्य होणारी नाही. म्हणूनच राजकारणाचे मोठ्या प्रमाणात नैतिकीकरण होणे आवश्यक आहे.

डॉ. चौसाळकर पुढे म्हणाले, लोकमान्य टिळकांनी स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चार संकल्पना भारताला दिल्या, तथापि, त्या अनुषंगाने त्यांना मर्यादित काम करता आले. महात्मा गांधी यांनी या चार संकल्पना खऱ्या अर्थाने समृद्ध करण्याचे काम केले. गांधीजींनी अनुक्रमे हिंद स्वराज्य, खादी आणि ग्रामोद्योग, नई तालीम अर्थात नवशिक्षण आणि निःशस्त्र प्रतिकार अर्थात सत्याग्रह असा त्यांचा विस्तार व अवलंब केला. श्रमशक्ती, धंदेशिक्षण आणि कौशल्य विकास असे सर्वांगीण व्यक्तीमत्त्व घडविणारे तिहेरी शिक्षण त्यांना अपेक्षित होते.

यावेळी डॉ. चौसाळकर यांनी कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आलेल्या प्रा. राम बापट यांच्या स्वराज्य आणि राज्यसंस्था आणि प्रा. भारती पाटील संपादित लोकमान्य आणि महात्मा या पुस्तकांविषयीही सविस्तर विवेचन केले.

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी संशोधनाच्या क्षेत्रामध्येही महात्मा गांधी यांना अपेक्षित नैतिकता आणि मूल्ये यांची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, सन १९३७मध्ये वर्धा येथे झालेल्या शैक्षणिक परिषदेला महात्मा गांधी उपस्थित होते आणि त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय शिक्षण पद्धतीच्या अनुषंगाने नई तालीम पद्धती उद्घोषित केली. विद्यार्थ्यांचे मन, बुद्धी आणि शरीर यांचा सुसंगम साधून त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी एक मोठी देणगी या माध्यमातून दिलेली आहे. मूल्यशिक्षणाच्या बरोबरीने नई तालीमही आपण पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे. वाचिक शिक्षण हे तर महत्त्वाचेच, मात्र कृतीशील शिक्षण हे माणसाला परिपूर्ण बनविते. गांधीजींचे विचार आपल्याला त्या परिपूर्णतेकडे घेऊन जाणारे आहेत. त्यांच्या सिद्धांतांचा अंगिकार केल्यास राष्ट्रविकास शक्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनीही मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते प्रा. राम बापट लिखित स्वराज्य आणि राज्यसंस्था आणि प्रा. भारती पाटील संपादित लोकमान्य आणि महात्मा या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. त्याचप्रमाणे कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या सत्याचे प्रयोग या आत्मकथेच्या क्रमशः अभिवाचन ध्वनी-मालिकेचे अनावरण करण्यात आले. विद्यापीठाच्या शिव-वाणी या युट्यूब ध्वनी-वाहिनीवरुन या मालिकेचे दररोज सकाळी ८.३० वाजता प्रसारण होणार आहे.

गांधी जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा यांचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. डॉ. भारती पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

तत्पूर्वी, शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. तसेच आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमित्त सामूहिक शपथही घेण्यात आली.

यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मराठी विभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील, विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, डॉ. पी.एस. कांबळे, डॉ. प्रमोद वासंबेकर, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, 1 October 2022

लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या कामाला गती देणार: मंत्री शंभूराज देसाई

 

शिवाजी विद्यापीठात लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या अनुषंगाने झालेल्या आढावा बैठकीसंदर्भात माहिती देताना राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई. (ध्वनीचित्रफीत)


शिवाजी विद्यापीठात लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या आढावा बैठकीत बोलताना मंत्री शंभूराज देसाई. सोबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आमदार सुजीत मिणचेकर, उच्च व तंत्र शिक्षण उपसंचालक हेमंत कठरे.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करताना मंत्री शंभूराज देसाई, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह उपस्थित मान्यवर.


कोल्हापूर, दि. १ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या कामाला गती देण्यासाठी शासकीय तसेच व्यक्तीगत स्तरावर सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही महाराष्ट्राचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे दिली.

मंत्री शंभूराज देसाई यांनी आज शिवाजी विद्यापीठात लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये अध्यासनाच्या कामकाजाची विशेषतः अडचणींची आणि भविष्यात करता येऊ शकणाऱ्या विविध विधायक कामांची माहिती घेतली.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शिवाजी विद्यापीठाच्या उभारणीमधील योगदान अतुलनीय स्वरुपाचे असल्याचे सांगून मंत्री श्री. देसाई म्हणाले, नव्या पिढीला लोकनेते देसाई यांचे उत्तुंग कार्य माहिती होण्याच्या दृष्टीने या अध्यासनाच्या माध्यमातून विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी मदतीसाठी शासन तत्पर असून अध्यासनासाठी मंजूर करण्यात आलेल्या तीन कोटी रुपयांमधील उर्वरित अडीच कोटी रुपयांचा निधी तातडीने विद्यापीठास वितरित करण्यासाठी आवश्यक त्या पूर्तता करण्यात येतील. शासनाव्यतिरिक्त विविध उद्योग-व्यवसायांच्या सामाजिक दायित्व निधीमधूनही निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या वस्तुसंग्रहालय संकुलामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकणारे स्वतंत्र कलादालन निर्माण करण्यात यावे. त्यासाठीही सर्वोतोपरी सकारात्मक मदत करण्यात येईल. यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत निधीची तरतूद करण्याची सूचनाही मंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना या प्रसंगी केली. अध्यासनाच्या कामाला गती देण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेतही चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी सुरवातीला मंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून अभिवादन करण्यात आले. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते मंत्री श्री. देसाई यांचा शाल, श्रीफळ व ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. अध्यासनाचे प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी अध्यासनाविषयी सादरीकरण केले. यावेळी आमदार सुजीत मिणचेकर, श्री. शिवराज देसाई, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, उच्च व तंत्रशिक्षण कोल्हापूर विभागाचे उपसंचालक हेमंत कठरे, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. एम.एस. देशमुख, डॉ. भारती पाटील, डॉ. अरुण भोसले, व्ही.जी. पानस्कर आदी उपस्थित होते.

Friday, 30 September 2022

भारत आत्मनिर्भर होण्यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आत्मीयता आणि बंधुत्वाची भावना जोपासली पाहिजे - प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील

 


कोल्हापूर, दि.30 सप्टेंबर - आत्मनिर्भर भारत करण्यासाठी देशभक्ती, देशप्रेम, निष्ठा, राष्ट्रीय आत्मीयता आणि बंधुत्वाची भावना विद्यार्थ्यांनी जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेच्या तीनदिवसीय राष्ट्रीय/राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलन निवड चाचणी शिबिराच्या समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून प्र-कुलगुरू डॉ.पाटील बोलत होते.

राष्ट्रीय सेवा योजन क्षेत्रीय कार्यालय, पुणे, युवा कार्य क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, उच्च तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई आणि राष्ट्रीय सेवा योजना, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय शिबिराच्या समारोप समारंभामध्ये प्रभारी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क प्रमुखडॉ.प्रशांतकुमार वनंजे, भारत सरकारच्या युवा कार्य क्रीडा मंत्रालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेयन प्रमुख उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील म्हणाले, उत्कृष्ट नमुना होण्यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला पाहिजे.यामधून आपल्या कलागुणांना वाव मिळतो आणि आपल्यामधील नेतृत्वगुण उजागर होतात. राष्ट्रीय सेवा योजनेचे हे शिबिर विद्यार्थ्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये कलाटणी देणारे आहे. आयुष्यामधील वळणबिंदू म्हणून या शिबिराकडे पाहता येईल.विद्यार्थ्यांनी स्वत:चे करियर घडविण्यासाठी आपल्या आवडीचे क्षेत्र कोणते आहे, हे प्रथम ओळखले पाहिजे.त्यानुसार पुढील वाटचाल करणे संयुक्तीक ठरेल.आपल्या देशामध्ये 'आझादी का अमृत महोत्सव' देशभर साजरा करण्यात येत आहे.संघ बांधणी आणि विद्यार्थ्यांच्या क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी राज्यातील कृषी आणि अकृषी विद्यापीठे एकत्रित येवून या राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन केले हे सर्वांसाठी अधिक प्रोत्साहात्मक आहे.

भारत सरकारच्या युवा कार्य क्रीडा मंत्रालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेयन म्हणाले, शिवाजी विद्यापीठामधील राष्ट्रीय सेवा योजना हा विभाग विविध कार्यक्रमांचे यशस्वीरित्या आयोजन करून खुप चांगले योगदान देत आहे. उत्कृष्ट नियोजनामुळेराष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम आयोजित करण्याबाबत हे ठिकाण सकारात्मक आहे.या शिबीरांमध्ये शिकवली जाणारी शिस्त विद्यार्थ्यांनी त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये आचरणात आणली पाहिजे.छोटया-छोटया प्रयत्नातून विद्यार्थ्यांनी सामाजिक समस्या सोडविण्यासाठी हिरहिरीने भाग घेतला पाहिजे.

राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क प्रमुख डॉ.प्रशांतकुमार वनंजे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध कार्यक्रमांच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास असे शिबिर सहाय्यभूत ठरतात.राज्याच्या विविध भागांमधील विद्यापीठांमध्ये असे शिबीर राबविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. 

प्रभारी कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांचेसह संघ व्यवस्थापक डॉ.निर्मला जाधव, डॉ.पवन शिनगारे, डॉ.गांधी पुष्कर, डॉ.कल्याण सावंत, स्वयंसेवक कु.सृष्टी क्षीरसागर, सार्थक पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.एम.एस.देशमुख, क्षेत्रीय कार्यालयाचे युवा अधिकारी अजय शिंदे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.शरद बनसोडे, महाराष्ट्र शासनाचे मंगेश खैरनार, रमेश देवकर, कॅप्टन प्रशांत पाटील, कॅप्टन राहूल मगदूम उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.अभय जायभाये यांनी केले.डॉ.स्नेहल राजहंस, डॉ.संदीप पाटील यांनी सूत्रसंचलन केले. तर युवा अधिकारी अजय शिंदे आणि जिल्हा समन्वयक डॉ.एस.एन.पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास राज्यभरातील 29 विद्यापीठांचे 280 रासेयो स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी संघ व्यवस्थापक उपस्थित होते.

------