Tuesday, 24 January 2023

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धा:

रोहतकचे महर्षी दयानंद विद्यापीठ सर्वसाधारण विजेते

 भटिंडा विद्यापीठ उपविजेते; कुरूक्षेत्र तिसऱ्या स्थानी

शिवाजी विद्यापीठात झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेतील सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते स्वीकारताना रोहतकच्या महर्षी दयानंद विद्यापीठाचा संघ.


शिवाजी विद्यापीठात झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेतील सर्वसाधारण उपविजेतेपदाचा चषक कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते स्वीकारताना भटिंडा येथील गुरू काशी विद्यापीठाचा संघ.

शिवाजी विद्यापीठात झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेतील सर्वसाधारण तृतीय क्रमांकाचा चषक कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते स्वीकारताना कुरूक्षेत्र विद्यापीठाचा संघ.

शिवाजी विद्यापीठाचा कुस्तीपटू अक्षय मंगावडे (निळा जर्सी) याने १२५ किलो वजनी गटात अलवारच्या राजर्षी भर्तृहरी विद्यापीठाच्या गौरव याला हरवून कांस्यपदक पटकावले.

शिवाजी विद्यापीठाचा अक्षय मंगावडे कांस्यपदकासह 



कोल्हापूर, दि. २४ जानेवारी: शिवाजी विद्यापीठात गेले तीन दिवस सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत आज रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. शिवाजी विद्यापीठाच्या अक्षय मंगावडे याने १२५ किलो वजनी गटात कांस्य पदक प्राप्त केले.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, भारतीय विद्यापीठ महासंघाचे निरीक्षक डॉ. सुरेश कुमार मलिक, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात पुरस्कार प्रदान समारंभ पार पडला.

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत भटिंडा येथील गुरू काशी विद्यापीठाने द्वितिय स्थान तर कुरुक्षेत्र येथील कुरूक्षेत्र विद्यापीठाने तृतीय स्थान प्राप्त केले. कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते विजेतेपदाच्या ट्रॉफींचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, कराड येथील प्रकाशबापू पाटील यांच्यासह स्पर्धा संचालक दिलीप पवार, तांत्रिक संचालक बंकट यादव, आंतरराष्ट्रीय रेफ्री नवनाथ ढमाळ आदी उपस्थित होते. डॉ. विजय रोकडे यांनी कार्यक्रमाचे स्वागत केले, तर क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी आभार मानले.

स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचे दहा कुस्तीपटू सहभागी झाले. त्यांनी उत्तम कामगिरीचे प्रदर्शन केले. अक्षय मंगावडे याने १२५ किलो वजनी गटात तृतीय क्रमांक पटकावून विद्यापीठास कांस्य पदक मिळवून दिले. तो कोतोली- माळवाडी येथील श्रीपतराव चौगुले कला व वाणिज्य महाविद्यालयाचा खेळाडू आहे.

स्पर्धेत विविध वजनी गटांमध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक प्राप्त करणाऱ्या कुस्तीपटूंची नावे अनुक्रमे पुढीलप्रमाणे:-

५७ किलो: सतीश (चौधरी बन्सीलाल विद्यापीठ, भिवानी) सुमित (इंदिरा गांधी विद्यापीठ, मिरपूर हरियाणा) अमितकुमार (गुरुग्राम विद्यापीठ, गुरुग्राम) सुनिल (ओ.पी.जे.एस. विद्यापीठ, चिरु, राजस्थान).

६१ किलो: सुधीर ज (बीर टिकेंद्रजी विद्यापीठ, मणीपुर), आशिष (इंदिरा गांधी विद्यापीठ, हरियाणा), लोकपाल गोहर (देवी अहिल्या विद्यापीठ, इंदूर), उदित (महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक).

६५ किलो: जसकरण सिंग (पंजाबी विद्यापीठ, टियाला), रोहित (बीर टिकेंद्रजित विद्यापीठ, मणीपूर), आयुष कुमार (छ. चरणसिंग विद्यापीठ, मेरठ), सचिन दहीया (पंजाब विद्यापीठ, चंदिगड).

७० किलो: परवेंदर (लवली प्रोफेशनल विद्यापीठ, वाडा), विजय मलिक (चंदिग विद्यापीठ, मोहाली), राकेश कुमार (सिंघानिया विद्यापीठ, झुनझुनु, राजस्थान), सौरभ सेहावत (गुरु काशी विद्यापीठ, टिंडा).

७४ किलो: रविराज चव्हा (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर), मोहीत (देश भगत विद्यापीठ, मंडी गोविंदग्राम, पंजाब), दीपक (गुरु जंबेशवर विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ, हिस्सार, हरियाणा), दिपक (कुरुक्षेत्र विद्यापीठ, कुरुक्षेत्र).

७९ किलो: सागर जगलान (कुरुक्षेत्र विद्यापीठ, कुरुक्षेत्र), अनिकेत (महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक), अनुज कुमार (छत्रपती चरणसिंग विद्यापीठ, मेरठ), मुकुल मिश्रा (जननायक चंद्रशेखर विद्यापीठ, बल्लिया).

८६ किलो: संदिप (चितकरा विद्यापीठ, राजपुरा पंजाब), एम.म. सरनोबत (स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड), प्रतक जगताप (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे), संजीव (गुरु काशी विद्यापीठ, टिंडा)

९२ किलो: अजय (महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक), अंकित (इंदिरा गांधी विद्यापीठ, मीरपूर, हरियाणा), पवन (गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर), आशिष (कुरूक्षेत्र विद्यापीठ, कुरूक्षेत्र).

९७ किलो: साहील (गुरु काशी विद्यापीठ, भटिंडा), अभिषेक खोखर (छ. चरणसिं विद्यापीठ, मेरठ), आकाश (चितकरा विद्यापीठ, रायपुर, पंजाब), दिपक कुमार (लिंगा विद्यापीठ, त्तीसगढ)

१२५ किलो: अनिरूद्ध कुमार (महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक), आकाश अंतिल (गुरू काशी विद्यापीठ, भटिंडा), अमन (गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर), अक्षय एस. मंगावडे (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)

 स्पर्धा निकोप व पारदर्शक: डॉ. मलिक

शिवाजी विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या या कुस्ती स्पर्धा अत्यंत निकोप व पारदर्शक पद्धतीने पार पडल्या असून ग्रीको-रोमन स्पर्धांमध्येही हीच पारदर्शकता जोपासली जाईल, अशी ग्वाही भारतीय विद्यापीठ महासंघाचे निरीक्षक डॉ. सुरेश कुमार मलिक यांनी आज फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेच्या समारोप समारंभात बोलताना दिली.

डॉ. मलिक यांनी शिवाजी विद्यापीठाने पाहुण्या खेळाडूंना उत्तम सोयीसुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला आहे. याउपरही काही उणीव भासली असल्यास तसे सांगावे, जेणे करून पुढील स्पर्धेदरम्यान ती दूर करणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले.

खेळाडूंना डोपिंगच्या दुष्परिणामांची जाणीव करून द्या

डोपिंगसदृश प्रकार झाल्यास संघ व्यवस्थापकांनी तातडीने ते निदर्शनास आणावेत. अशा कोणत्याही गैरप्रकारांबाबत एआययू अत्यंत गंभीर आहे. डोपिंगमुळे खेळाडूंच्या भवितव्यावर गंभीर दुष्परिणाम होतात. कारकीर्द धोक्यात येऊ शकते, याची जाणीव त्यांना करून द्यावी. खेळाडूंना योग्य मार्गाने यश मिळविण्यास उद्युक्त करा, असे आवाहनही डॉ. मलिक यांनी या प्रसंगी केले.

Monday, 23 January 2023

आंतरविद्यापीठ स्पर्धांत पारंपरिक कुस्तीचाही समावेश करावा: श्रीमंत छत्रपती शाहू महाराज

 शिवाजी विद्यापीठात अखिल भारतीय कुस्ती स्पर्धांचे उद्घाटन

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन रोपट्यास पाणी घालून करताना श्रीमंत शाहू छत्रपती महाराज. सोबत (डावीकडून) डॉ. शरद बनसोडे, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. प्रकाश गायकवाड.


शिवाजी विद्यापीठात आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात रोपट्यास पाणी घालताना हिंदकेसरी दीनानाथ सिंह. सोबत (डावीकडून) डॉ. शरद बनसोडे, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. विलास शिंदे, डॉ. प्रकाश गायकवाड.

शिवाजी विद्यापीठात आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेतील उद्घाटनाची कुस्ती लावताना श्रीमंत शाहू छत्रपती महाराज. सोबत (डावीकडून) डॉ. रामचंद्र पवार, डॉ. शरद बनसोडे, डॉ. सुरेशकुमार मलिक, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, दिलीप पवार, डॉ. प्रकाश गायकवाड आदी.



शिवाजी विद्यापीठात आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात बोलताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज. सोबत (डावीकडून) डॉ. शरद बनसोडे, एआययूचे निरीक्षक डॉ. सुरेशकुमार मलिक, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसिचव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड.


कोल्हापूर, दि. २३ जानेवारी: अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्तरावरील स्पर्धांत मॅटवरील कुस्तीच्या बरोबरीने पारंपरिक मातीतील कुस्तीचाही समावेश करावा, अशी सूचना श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केली.

शिवाजी विद्यापीठात आज अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फ्रीस्टाईल व ग्रीको-रोमन कुस्ती (पुरूष) स्पर्धांचा उद्घाटन समारंभ आज श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रोत्साहनामुळेच कुस्तीचा देशभरात प्रसार झाला. जागतिक कीर्तीचे नामवंत मल्ल कोल्हापूरच्या या मातीमध्ये घडले. त्याचप्रमाणे देशभरातील मल्लांसाठी ही कुस्तीची प्रेरणाभूमी ठरली. तालमीतील सराव, मातीतील कुस्ती आजही या भूमीत जपली जाते. मात्र, सध्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅटवरील कुस्ती खेळविली जाते आहे. बदलत्या काळानुसार हे ठीक असले तरी पारंपरिक कुस्ती जपण्याची जबाबदारीही आपण उचलली पाहिजे. त्यासाठी भारतीय विद्यापीठ महासंघाने त्यांच्या क्रीडा कार्यक्रमात पारंपरिक कुस्तीचा समावेश करावा, यासाठी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

हिंदकेसरी दीनानाथ सिंह म्हणाले, कुस्तीच्या नभांगणातील सारे तारे जणू काही शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात उतरल्याचा भास होतो आहे. आमचा काळ हा शाळेऐवजी तालमीत जाण्याचा होता. आता मात्र शिक्षण आणि कुस्ती एकत्रितपणे साध्य होते आहे. आता खेळ विद्यार्थ्याला नोकरीपासून सर्व काही मिळवून देण्यास सक्षम आहे. त्यामुळे कुस्तीपटूंनी दर्जेदार खेळ आणि जीवन या दोहोंची तितक्याच उत्तम पद्धतीने सांगड घालून या क्षेत्राची सेवा करावी, असे आवाहन केले.

यावेळी एआययूचे निरीक्षक डॉ. सुरेशकुमार मलिक यांनी शिवाजी विद्यापीठात सन २००७मध्ये झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेची आठवण जागविली. त्यावेळी स्पर्धा पारदर्शकतेने कशी घ्यावी, याचा मानदंड या विद्यापीठाने प्रस्थापित केला. यंदाही त्याच धर्तीवर पारदर्शकपणाने स्पर्धा पार पाडल्या जातील, याची ग्वाही त्यांनी दिली.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के यांनी श्रीमंत शाहू महाराज यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसादादाखल भारतीय विद्यापीठ महासंघाचे निरीक्षक डॉ. सुरेशकुमार मलिक यांना पारंपरिक कुस्तीचा एआययूच्या क्रीडा स्पर्धांत समावेश करण्याबाबत विचार करण्याची विनंती केली. शिवाजी विद्यापीठाच्या दर्जेदार क्रीडा परंपरेचा आढावा घेतानाच विद्यापीठाला लौकिक मिळवून देणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडापटूंचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

यावेळी कुस्तीच्या क्षेत्रातील दिग्गज असणाऱ्या महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक उत्तमराव पाटील, हिंदकेसरी विनोद चौगुले, बाबासाहेब शिरगावकर, रंगराव हर्णे, महाराष्ट्र केसरी नामदेव मोळे, साईचे प्रशिक्षक चंद्रकांत चव्हाण, उप-महाराष्ट्र केसरी अशोक माने, संभाजी वरुटे, राम सारंग, अक्षय डेळेकर, बंकट यादव, नवनाथ ढमाल, रोहिदास कांबळे, संभाजी पाटील आणि दिलीप पवार यांचा श्रीमंत शाहू महाराजांच्या हस्ते शाल व स्मृतिचिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात आला.

उद्घाटन समारंभानंतर विवेकानंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकपरंपरा हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यामध्ये लोकसंगीत आणि लोकगीतांचे बहारदार सादरीकरण केले. त्यानंतर पराईपट्टम या दुर्मिळ होत चाललेल्या लोकनृत्याचे सादरीकरणही केले.

क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी स्वागत केले. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रकाश कांबळे आणि डॉ. अभिजीत वणिरे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

शाहू महाराजांच्या हस्ते उद्घाटनाची कुस्ती

उद्घाटन समारंभामध्ये आज श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचा मल्ल साहील आर. आणि कुरूक्षेत्र विद्यापीठाचा मल्ल आशिष जगपाल यांच्यात ९७ किलो वजनी गटातील कुस्ती लावण्यात आली. हा सामना आशिष याने १२-०२ असा गुणांवर जिंकला.

दुसऱ्या दिवशी चार वजनी गटांत रंगले ४६२ सामने

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फ्रीस्टाईल कुस्ती (पुरूष) स्पर्धेत आज दुसऱ्या दिवशी चार विविध वजनी गटांचे मिळून एकूण ४६२ सामने रंगले. आज दिवसभरात ६१ किलो (१२१ सामने), ७० किलो (१३३ सामने), ७९ किलो (१२० सामने) आणि ९७ किलो (८८ सामने) असे सामने झाले. सकाळी साडेआठ वाजल्यापासून सुरू झालेले हे सामने उद्घाटन समारंभापुरते स्थगित होऊन पुन्हा रात्री उशीरापर्यंत सुरू होते.