Friday, 21 April 2023

विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे क्षमतावर्धन आवश्यक: सतीश मराठे

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे. मंचावर डॉ. राजन पडवळ, डॉ. परशुराम पाटील, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. श्रीकृष्ण महाजन, अरुण काकडे.

शिवाजी विद्यापीठात आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे.

कोल्हापूर, दि. २१ एप्रिल: कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे क्षमतावर्धन अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन  भारतीय रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे बँक ऑफ इंडिया अध्यासन व गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटींच्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 'ग्रामीण विकासात प्राथमिक कृषी पतसंस्थांची भूमिका' या विषयावरील एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये श्री. मराठे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के उपस्थित होते.  प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांची विशेष उपस्थिती होती.

श्री. मराठे यांनी आपल्या भाषणात भारतीय विकास संस्थांची अत्यंत सूक्ष्म आकडेवारी मांडली. केंद्र शासन खेड्यांचा विकास करण्यासाठी विकास संस्थांना भरीव मदत करण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. यामध्ये आपण अधिक प्रगतीशील होण्याची आवश्यकताही त्यांनी विविध आकडेवारीसह अधोरेखित केली.

यावेळी विशेष अतिथी नेहरू मेमोरियल फेलो डॉक्टर परशुराम पाटील, महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभाग कोल्हापूरचे विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. डॉ. मुरुडकर, एस. बी. जाधव, बिपिन मोहिते व नारायण परजणे या तज्ज्ञांनीही विविध विषयांवर प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी सहकारी संस्थांच्या सबलीकरणासाठी आणि त्यांना पूरक शैक्षणिक व संशोधकीय मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठ सदैव तत्पर असल्याचे सांगितले.  त्यांनी सहकार प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेमागील भूमिका विषद केली. विविध विद्याशाखांचे शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यापीठ सर्वोतोपरी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

बँक ऑफ इंडिया अध्यासनाचे समन्वयक डॉ. राजन पडवळ यांनी स्वागत केले. अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी प्रास्ताविक केले. डॉ. केदार मारूलकर यांनी आभार मानले. या प्रशिक्षणास शाहूवाडी, पन्हाळा व करवीर तालुक्यातील ९० संस्थांमधील १९० सदस्य उपस्थित होते.

विद्यापीठात शिवस्पंदन मॅरेथॉनला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; शिक्षकांचाही लक्षणीय सहभाग

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित 'शिवस्पंदन' क्रीडा महोत्सवांतर्गत मॅरेथॉनला फ्लॅग-ऑफ करून प्रारंभ करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. शरद बनसोडे, डॉ. प्रकाश गायकवाड आदी.


कोल्हापूर, दि. २१ एप्रिल: शिवाजी विद्यापीठातील आजची सकाळ उगवली तीच मुळी सळसळत्या चैतन्याचे किरण घेऊन! शिवस्पंदन क्रीडा महोत्सवांतर्गत आज सकाळी ७ वाजता कॅम्पस मॅरेथॉन पार पडली. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागाने मॅरेथॉन कमालीची यशस्वी ठरली.

शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाअंतर्गत आज (दि. २१) सकाळी ७ वाजता पाच किलोमीटर अंतराच्या कॅम्पस मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. शिवस्पंदन क्रीडा महोत्सवात सहभागी झालेल्यांमधील सुमारे ३५०हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या मॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, वनस्पतीशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. आर.व्ही. गुरव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मॅरेथॉनला प्रारंभ करण्यात आला.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी फ्लॅग ऑफ करून मॅरेथॉनला प्रारंभ केला. मॅरेथॉनमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या बरोबरच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची संख्याही लक्षणीय होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरून मॅरेथॉनला प्रारंभ होऊन भूगोल अधिविभाग, विद्यार्थिनी वसतिगृह, पाच बंगला, क्रीडा पॅव्हेलियन, गेट क्रमांक आठ, परीक्षा भवन क्र. १, भाषा भवन, रसायनशास्त्र अधिविभाग ते सिंथेटिक ट्रॅक मैदान असा पाच किलोमीटरचा मार्ग सर्वच सहभागींनी पूर्ण केला. डॉ. सागर डेळेकर, डॉ. नीलांबरी जगताप, डॉ. कैलास सोनावणे, डॉ. ए.ए. कोळेकर, डॉ. नीलेश तरवाळ आदी शिक्षकांच्या सहभागाने  विद्यार्थ्यांत उत्साह होता. अंतिम रेषेजवळ कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या सर्वांचेच अभिनंदन केले.

सर्वाधिक प्राधान्य आरोग्यालाच: कुलगुरू डॉ. शिर्के

मॅरेथॉनच्या यशस्वी सांगता प्रसंगी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सर्वच सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे अभिनंदन करताना सांगितले की, आयुष्यात उत्तम शिक्षण आणि करिअर हे प्राधान्याचे विषय असतातच, पण उत्तम आरोग्याखेरीज त्यांची साध्यता मुश्कील होऊन बसते. त्यामुळे सर्वांनीच उत्तम आरोग्यसंपदेला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे. आजच्या मॅरेथॉनमुळे विद्यापीठातला पाच किलोमीटरचा उत्तम ट्रॅक सर्वांना माहिती झाला आहे. त्यामुळे येथून पुढे या सरावात सातत्य ठेवून आरोग्य संवर्धन करीत राहावे, असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले.

Tuesday, 18 April 2023

क्रीडापटूंच्या शानदार संचलनाने व प्रात्यक्षिकांनी

शिवस्पंदन क्रीडा महोत्सवास विद्यापीठात प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात पहिल्या शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाचे रोपट्यास पाणी घालून उद्घाटन करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. 

शिवाजी विद्यापीठाची राष्ट्रीय फुटबॉलपटू प्रतीक्षा मिठारी हिने आणलेल्या क्रीडाज्योतीने स्पर्धेची ज्योत प्रज्वलित करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर.

शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात बॉक्सिंगची प्रात्यक्षिके सादर करताना क्रीडापटू

शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करताना क्रीडापटू विद्यार्थिनी

शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करताना क्रीडापटू विद्यार्थी

शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात जिम्नॅस्टीक्सची प्रात्यक्षिके सादर करताना क्रीडापटू

शिवाजी विद्यापीठात पहिल्या शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आकाशात फुगे सोडताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि मान्यवर. 

  

कोल्हापूर, दि. १८ एप्रिल: क्रीडापटूंचे उत्कृष्ट संचलन, विविध क्रीडाप्रकारांच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण आणि ज्योत प्रज्वलन या उपक्रमांनी आज सकाळी शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या शिवस्पंदन क्रीडा महोत्सव-२०२३चे शानदार उद्घाटन करण्यात आले.

विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी सकाळी ठीक आठ वाजता रोपट्यास पाणी वाहून शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन तसेच ध्वजवंदन केले. त्यानंतर विद्यापीठाच्या विविध ११ अधिविभागांतील क्रीडापटूंनी उत्कृष्ट संचलन केले. यामध्ये ऍग्रोकेमिकल अँड पेस्ट मॅनेजमेंट, जैव-रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, शिक्षणशास्त्र, गणित, इंग्रजी, सूक्ष्मजीवशास्त्र, समाजशास्त्र, तंत्रज्ञान अधिविभाग आणि नॅनो विज्ञान व तंत्रज्ञान या अधिविभागांनी सहभाग दर्शविला.

यावेळी विद्यापीठाची राष्ट्रीय फुटबॉलपटू प्रतीक्षा संजय मिठारी हिच्या हस्ते उद्घाटनस्थळी क्रीडा ज्योतीचे आगमन झाले. आणि त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शिवस्पंदन स्पर्धेची ज्योत प्रज्वलित करण्यात आली. यावेळी क्रीडापटूंनी मुष्टीद्ध, मल्लखांब, जिम्नॅशियम तसेच रस्सीखेच या क्रीडा प्रकारांची प्रात्यक्षिके सादर केली.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या. आकाशात फुगे सोडून औपचारिक उद्घाटन झाल्याचे घोषित केले. प्रतीक्षा मिठारी हिने सहभागी खेळाडूंना शपथ दिली. क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अविराज कुळदीप यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. प्रकाश गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, डॉ. प्रशांत पाटील, डॉ.  कांबळे, डॉ. रोकडे, डॉ. गिरी, संजय तोरस्कर आदी उपस्थित होते.

Saturday, 15 April 2023

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचणे शक्य: डॉ. महादेव देशमुख

  

शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यशाळेत बोलताना अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख. मंचावर (डावीकडून) रमेश लिधडे, सिद्धार्थ शिंदे, विवेककुमार सिन्हा, डॉ. तानाजी चौगुले, शीतल उगले व डॉ. प्रकाश गायकवाड.


कोल्हापूर, दि. १५ एप्रिल - राष्ट्रीय सेवा योजनेच्या समन्वयकांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचणे शक्य आहे. हा विभाग समाजाशी जोडलेला आहे. त्यामुळे विविध योजना, धोरणे यांचा प्रचार आणि प्रसार उत्तमरित्या करणे शक्य आहे. त्या दृष्टीने समन्वयकांनी कार्यरत राहावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राजर्षी शाहू सभागृहामध्ये आयोजित 'सार्वजनिक वित्तिय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळे'च्या उद्घाटन प्रसंगी डॉ. देशमुख अध्यक्षस्थानावरून बोलत होते.  यावेळी व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य सिद्धार्थ शिंदे यांच्यासह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाच्या कक्ष अधिकारी शीतल उगले यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. देशमुख म्हणाले, शिवाजी विद्यापीठ संलग्नित २८६ महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर, समानता आणि गुणवत्ता यावरही भर दिला जात आहे.  एनएसएस, एनसीसी, संरक्षण सेवा क्रेडिट सिस्टीम अंतर्गत घेतले जात आहे.  एनएसएसचे विद्यार्थी नोकरी करणारे न बनता नोकरी निर्माण करणारे बनावेत, अशी अपेक्षा आहे. देशामध्ये तरूणांची संख्या ६५ टक्के आहे.  या तरूणांचे सरासरी आयुर्मान ३२ वर्षे आहे. यांना मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. ती जबाबदारी सर्वांनीच घेणे आवश्यक आहे.

शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य सिध्दार्थ शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विद्यापीठास समाजाशी जोडण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मोठे योगदान आहे.  विद्यार्थी हा प्रगतीशील समाजाचा घटक बनण्यासाठी हा विभाग नेहमी विविध योजना राबवित असतो. त्यांना समाजघटकांनीही योग्य प्रतिसाद देऊन त्या योजना यशस्वीरित्या राबवून शासनाला सहकार्य करावे.

पीएफएमएस योजनेची माहिती देताना स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाचे विभागीय व्यवस्थापक विवेककुमार सिन्हा म्हणाले, पीएफएमएस ही एक सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन सेवा आणि संगणकीय प्रणाली आहे.  तिच्या सहाय्याने शासनाकडून दिले जाणारे विविध योजनांशी संबंधित अनुदान, सवलती आणि त्या संबंधित प्राप्त होत असलेले इतर आर्थिक लाभ हे कोणाच्याही हस्तक्षेपाविना इंटरनेटच्या माध्यमातून थेट युजरच्या बँक खात्यामध्ये जमा होते. युजरला कुठलीही धावपळ न करता त्याची रक्कम ऑनलाईन पद्धतीने थेट बँक खात्यावर प्राप्त करता यावी, तसेच आपले बँक स्टेटस ऑनलाईन चेक करता यावे, हा पीएफएमएसचा मुख्य हेतू आहे. या पद्धतीमुळे युजर्सचा वेळ वाचतो आणि कामात पारदर्शकता येते.

राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ.तानाजी चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कराड येथील संत गाडगेबाबा महाराज महाविद्यालयाचे अभय पाटील यांनी आभार मानले. यावेळी, लेखा विभागाचे उपकुलसचिव रमेश लिधडे, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे दिनेश जाधव यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील समन्वयक आणि कार्यक्रम अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Friday, 14 April 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शिवाजी विद्यापीठात उत्साहात

 




 कोल्हापूर, दि. १४ एप्रिल: शिवाजी विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात झाली.

आज सकाळी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीच्या पोर्चमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी डॉ. रणधीर शिंदे, कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते डॉ. रमेश कांबळे, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, डॉ. प्रकाश कांबळे, तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ. शिवलिंगप्पा सपली, डॉ. अविनाश भाले, डॉ. दीपा श्रावस्ती यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

 

फुले-शाहू-आंबेडकरांकडून भारताला सामूहिक शहाणपणाचा समृद्ध वारसा: डॉ. रमेश कांबळे

 

शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे समाजशास्त्रज्ञ डॉ. रमेश कांबळे. मंचावर (डावीकडून) डॉ. श्रीकृष्ण महाजन, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि कुलसटिव डॉ. विलास शिंदे.


कोल्हापूर, दि. १४ एप्रिल: महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजाला सामूहिक शहाणपणाचा समृद्ध वारसा दिला आहे. हा वारसा वृद्धिंगत करणे हेच त्यांच्या कार्याचे खरे फलित ठरेल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे समाजशास्त्रज्ञ डॉ. रमेश कांबळे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहांतर्गत आज डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानाचे प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सार्वजनिक चिकित्सक अवकाश या विषयावर त्यांचे राजर्षी शाहू सभागृहात व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. रमेश कांबळे म्हणाले, फुले-शाहू-आंबेडकर हे समाजातील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व आर्थिक समस्यांचा साकल्याने विचार करून त्यांच्या मूलभूत पुनर्रचनेसाठी आग्रही असणारे नेते होते. एकूण समाजाची मानसिक जडणघडण ही मानवी मूल्यांवर होणे त्यांना अभिप्रेत होते. या मूल्यांप्रती समाजात समर्पणशीलता असल्याखेरीज आपल्याला खऱ्या अर्थाने या त्रयीच्या विचारांना साजरे करता येणार नाही. आज समाजात परस्परभेद, विषमता आणि अन्य समाजाच्या दुःखाबद्दलची असंवेदनशीलता मोठ्या प्रमाणात आहे. आपण एक समाज म्हणून जर एकत्र येऊ शकत नसू, तर एक राष्ट्र म्हणून कसे उभे राहू शकू, हा आजघडीचा कळीचा मुद्दा आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे शिल्पकार असल्याचे सांगून डॉ. कांबळे पुढे म्हणाले, आधुनिक विचारांच्या पायावर आधुनिक भारताची जडणघडण करण्याची कामगिरी डॉ. आंबेडकर यांनी केली. गेल्या दशकभरात बाबासाहेब परीघावरुन चर्चाविश्वाच्या केंद्रस्थानी आले आहेत, त्याला त्यांची हीच कामगिरी कारणीभूत आहे. बाबासाहेबांकडे दुर्लक्ष करून आपल्याला पुढे जाता येणार नाही. जोपर्यंत इथल्या प्रत्येक व्यक्तीचे अधिकार आणि व्यवस्थेवरील दावा प्रत्यक्षात येत नाही, तसेच संविधानिक नैतिकता आणि संविधानिक मूल्यांची प्रस्थापना होत नाही, तोवर या देशात खऱ्या अर्थाने लोकशाही विकसित होऊ शकणार नाही. असमानता, शोषण, अन्याय आणि गुलामगिरी या मुद्द्यांना भिडल्याखेरीज भारत ही संकल्पना पूर्णत्वास जाऊ शकत नाही. त्यासाठी बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे, या देशातील राजकीय समानता आणि सामाजिक-आर्थिक असमानता यांमधील दरी कमी केल्याखेरीज खरी लोकशाही अस्तित्वात येणे अशक्य आहे.

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, भारताने आता विकसित राष्ट्र होण्यासाठी संघर्ष करण्यास सिद्ध असायला हवे. त्यासाठी शाश्वत विकासाची १७ कलमे साध्य करावयाची असतील आणि गरीबी, विषमता संपुष्टात आणावयाची असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गानेच जावे लागेल. त्यासाठी स्वतःची सामाजिक व सार्वजनिक कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडावीत, असे आवाहन त्यांनी केले.


अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वाचन व ग्रंथप्रेम या किमान दोन गोष्टी आजच्या विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्या, तरी त्यांच्या जीवनाला अर्थ प्राप्त होईल. महापुरूषांच्या चरित्रावरुन जितके शिकता येईल, तितके शिकण्याचा प्रयत्न करावा. मुंबई विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ यांनी डॉ. आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्या अनुषंगाने काही संयुक्त संशोधन प्रकल्प हाती घेता येतील का, याचा विचार जरुर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. आंबेडकर केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले. डॉ. अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

वक्तृत्व स्पर्धेत तेजस्विनी पांचाळ, शुभम राऊत प्रथम

यावेळी डॉ. आंबेडकर केंद्राच्या वतीने फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहांतर्गत पदव्युत्तर व पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धांचे बक्षीस वितरण कुलगुरू तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले.

स्पर्धेचा निकाल अनुक्रमे पुढीलप्रमाणे: पदव्युत्तर गट- तेजस्विनी संजय पांचाळ (डी.आर.के कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर), बन्सी रमेश होवाळे (शिक्षणशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), मोहन मुकुंद कांबळे (विधी अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर).

पदवी स्तर गट- शुभम दशरथ राऊत (डॉ. घाळी महाविद्यालय, गडहिंग्लज), साक्षी सुनील बावडेकर (श्री व्यंकटेश महाविद्यालय, इचलकरंजी), विधिरा राजाराम विभूते (विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर). उत्तेजनार्थ- ज्ञानेश्वरी लक्ष्मण सालगर (संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी, महागाव), अरविंद शंकर कांबळे (न्यू कॉलेज, कोल्हापूर), जयेश बागूल (डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर).

Thursday, 13 April 2023

शिवाजी विद्यापीठाच्या कणबरकर पुरस्काराने दातृत्वाची परंपरा निर्माण केली: खासदार श्रीनिवास पाटील

भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांना पुरस्कार प्रदान

शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांना कासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी (डावीकडून) प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे व प्राचार्य डॉ. बाबासाहेब खोत.



शिवाजी विद्यापीठात प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार प्रदान समारंभाच्या प्रमुख पाहुणे पदावरुन बोलताना खासदार श्रीनिवास पाटील. 


शिवाजी विद्यापीठात प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार प्रदान समारंभात सत्काराला उत्तर देताना भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम.



कोल्हापूर, दि. १३ एप्रिल: शिवाजी विद्यापीठाच्या प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्काराने दातृत्वाची परंपरा निर्माण केली, असे गौरवोद्गार सिक्कीमचे माजी राज्यपाल तथा खासदार श्रीनिवास पाटील यांनी आज येथे काढले.

शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार-२०२३ भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांना खासदार पाटील यांच्या हस्ते आज राजर्षी शाहू सभागृहात प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

खासदार पाटील यांच्या हस्ते डॉ. शिवाजीराव कदम यांना प्राचार्य कणबरकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र, ग्रंथभेट, पुष्पगुच्छ आणि एक लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरुप होते.

यावेळी खासदार पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेपासूनचा मी साक्षीदार आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची परंपरा पुढे वाहून नेणारे अनेक पाईक या भूमीमध्ये निर्माण झाले. त्यांच्या समृद्ध विचारांची परंपरा शिवाजी विद्यापीठ पुढे चालवित हीरकमहोत्सव साजरा करीत आहे, याचा अभिमान वाटतो. कणबरकर पुरस्कारप्राप्त बहुतांश मान्यवरांनी आपल्याला मिळालेली पुरस्काराची रक्कम ही पुन्हा जनहितार्थ पुढे दानच केल्याचा इतिहास आहे. शिवाजीराव कदम यांनीही तोच कित्ता गिरवित भाई माधवराव बागल विद्यापीठास देणगी जाहीर केली, ही मोलाची बाब आहे.

खासदार पाटील पुढे म्हणाले, गरीब आईबापाच्या पोटी जन्मलेल्या पतंगराव आणि शिवाजीराव कदम या बंधूंनी स्वतः अथक परिश्रम करीत शिक्षण घेतले आणि प्रगती साधली. मात्र, त्यांनी ही प्रगती स्वतःपुरती न राखता समाजातील अन्य गोरगरीब घटकांतील विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जाण्याचा चंग बांधला. त्यातून भारती विद्यापीठाचा वटवृक्ष निर्माण झाला आणि देशभरात फोफावला. शिवाजीरावांमध्ये विविध समाजघटकांप्रती खूप कणव आणि जिव्हाळा आहे. आज या प्रसंगी पतंगराव असते तर त्यांनी हा सोहळा डोळेभरून पाहिला असता आणि त्यांचे डोळे पाणावले असते. या दोघाही बंधूंच्या कर्तृत्वाचा यथोचित गौरव आज शिवाजी विद्यापीठाने केला, ही समाधान देणारी बाब आहे.

यावेळी पुरस्काराला उत्तर देताना डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले की, बंधू पतंगराव आणि मी दोघेही शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहोत. त्यामुळे विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्याचा केलेला हा गौरव आहे, अशी माझी भावना आहे.  आजचा दिवस जितका भाग्याचा, तितकाच सामाजिक प्रतिष्ठा वाढविणाराही आहे. अत्यंत मानाचा असा हा पुरस्कार मी अत्यंत विनम्रतापूर्वक स्वीकारतो. भारती विद्यापीठातील माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी हा पुरस्कार अर्पण करतो.

शिवाजी विद्यापीठाने गेल्या साठ वर्षांच्या वाटचालीमध्ये शैक्षणिक, संशोधन आणि प्रसासकीय दृष्टीने अनेक महत्त्वाचे मानदंड निर्माण केले असून ते राज्यातील प्रत्येक विद्यापीठासाठी आदर्शवत् स्वरुपाचे आहेत, अशी भावना डॉ. कदम यांनी व्यक्त केली.

भाई माधवराव बागल विद्यापीठास रु. ५,००,००१/- ची देणगी

यावेळी डॉ. कदम यांनी पुरस्काराच्या १ लाख ५१ हजार रुपयांच्या रकमेमध्ये भर घालून कोल्हापूरच्या भाई माधवराव बागल विद्यापीठास ५ लाख एक रुपयांची देणगी जाहीर केली. बागल विद्यापीठाचे कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी या देणगीचा स्वीकार केला. आपल्या उमद्या स्वभावाला धरूनच आपले हे कृत्य आहे, असे कौतुकोद्गार डॉ. पवार यांनी डॉ. कदम यांच्याविषयी काढले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंच्या नावे असणारा एकमेव आणि सर्वोच्च मानाचा कणबरकर पुरस्कार माजी विद्यार्थ्यास देण्यात येत असल्याचा अभिमान वाटतो. त्यांनी स्वकर्तृत्वाने इथपर्यंत मजल मारली आहे, त्यामुळेच एकमताने त्यांची यासाठी निवड झाली. त्यांच्या कर्तृत्वाचे फलित म्हणून भारती विद्यापीठाचा विद्यार्थी आज या देशाच्या कानाकोपऱ्यात कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावत असल्याचे दिसते. कणबरकर पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी या पुरस्काराच्या रकमेमध्ये स्वतःकडील भर घालून त्याचा समाजोपयोगी कार्यासाठी विनियोग केला. यामध्ये डॉ. एन.डी. पाटील, डॉ. डी.वाय. पाटील आणि आता डॉ. शिवाजीराव कदम यांचा समावेश झालेला आहे. 

यावेळी प्राचार्य डॉ. बाबासाहेब खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. भालबा विभूते यांनी मानपत्राचे वाचन केले. कणबरकर कुटुंबियांतर्फे डॉ. अरुण कणबरकर यांनी शाल व श्रीफळ देऊन डॉ. कदम यांचा सत्कार केला. नंदिनी पाटील व धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

कार्यक्रमास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, माजी प्र-कुलगुरू डॉ. व्ही.एम. चव्हाण, बी.पी. साबळे, प्राचार्य डॉ. बी.एम. हिर्डेकर, प्राचार्य डॉ. डी.आर. मोरे, डॉ. डी.यु. पवार, प्राचार्य रा.तु. भगत, प्राचार्य प्रकाश कुंभार, डॉ. नमिता खोत, डॉ. अंजली साबळे यांच्यासह कणबर कुटुंबिय, अधिष्ठाता, विविध अधिकार मंडळांचे सदस्य, भारती विद्यापीठाचे पदाधिकारी, प्राचार्य व सदस्य, अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.