Monday, 28 August 2023

‘इट राइट मिलेट मेला’ वॉकेथॉन विद्यापीठात जल्लोषात; दीड हजारांहून अधिक जणांचा सहभाग

शिवाजी विद्यापीठात आयोजित 'इट राइट मिलेट मेला'च्या निमित्ताने अॅरोबिक्स प्रात्यक्षिके करताना सहभागी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित 'इट राइट मिलेट मेला'च्या निमित्ताने अॅरोबिक्स प्रात्यक्षिके करताना सहभागी.

शिवाजी विद्यापीठात 'इट राइट मिलेट मेला'निमित्त आयोजित वॉकेथॉनचे तुळशी रोपास पाणी वाहून उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. विलास शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभाकर मिश्रा, डॉ. के.यू. मेथेकर आदी.

शिवाजी विद्यापीठात 'इट राइट मिलेट मेला'निमित्त आयोजित वॉकेथॉनला फ्लॅग-ऑफ करून प्रारंभ करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के वप्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. सोबत डॉ. विलास शिंदे, श्रीमती के.के. जिथा, प्रभाकर मिश्रा, डॉ. के.यू. मेथेकर आदी.

शिवाजी विद्यापीठात 'इट राइट मिलेट मेला'च्या निमित्ताने आयोजित वॉकेथॉनमध्ये सहभागी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि विद्यार्थी.

शिवाजी विद्यापीठात 'इट राइट मिलेट मेला'च्या निमित्ताने आयोजित वॉकेथॉनमध्ये सहभागी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि विद्यार्थी.



कोल्हापूर, दि. २८ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठ, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (एफ.एस.एस.ए.आय.-पश्चिम विभाग), ज्युबिलंट फूड्स प्रा.लि. (डॉमिनोज्) आणि परफेट्टी व्हॅन मिले यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त आज विद्यापीठात इट राईट मिलेट मेला या एकदिवसीय उपक्रमास मोठ्या जल्लोषात व आरोग्यदायी वॉकेथॉनने प्रारंभ झाला. या वॉकेथॉनमध्ये दीड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांसह कोल्हापूरकर नागरिकांनी सहभाग नोंदविला.

आज सकाळी ठीक साडेसहा वाजता विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात एरोबिक्स प्रशिक्षणाने उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. तत्पूर्वी, सहभागींना एफ.एस.एस.ए.आय.च्या वतीने मोफत टी शर्टचे वाटप करण्यात आले. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, एफ.एस.एस.ए.आय.च्या पश्चिम विभागाच्या सहसंचालक श्रीमती के.के. जिथा, उपसंचालक डॉ. के.यू. मेथेकर, अन्न व औषध प्राधिकरणाचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे, ज्युबिलंट फूड्सचे व्हाईस प्रेसिडेंट (क्वालिटी एश्यूरन्स) देवेंद्र यादव आणि परफेट्टी व्हॅन मिलेचे सहाय्यक संचालक प्रभाकर मिश्रा यांच्या उपस्थितीत वॉकेथॉनचा उद्घाटन समारंभ झाला. कुलगुरू डॉ. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते फ्लॅग-ऑफ करून वॉकेथॉनला प्रारंभ करण्यात आला. विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरातून वॉकेथॉन संपन्न झाली. वॉकेथॉनमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी भरडधान्यांच्या अनुषंगाने जागृतीपर घोषणा देत होत्या. त्याचप्रमाणे भरडधान्याचे महत्त्व दर्शविणारे फलकही त्यांनी हाती धरले होते. तंत्रज्ञान अधिविभागाच्या विद्यार्थ्यांचे झांजपथक ढोल-ताशाच्या गजरात सहभागी झाले. त्याचप्रमाणे हलगीचा कडकडाटही सहभागींना अधिक जोमाने चालण्यासाठी प्रेरणा देत होता.

वॉकेथॉन यशस्वी होण्यासाठी तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. एस.एन. सपली, फूड सायन्स अँन्ड टेक्नॉलॉजीचे विभाग प्रमुख डॉ. पी.डी. पाटील, समन्वयक डॉ. इराण्णा उडचान, एफ.एस.एस.ए.आय.च्या सहाय्यक संचालक ज्योती हर्णे, तांत्रिक संचालक देवांशी चावला यांच्यासह तंत्रज्ञान अधिविभागाच्या शिक्षकांचे सहकार्य लाभले.

आरोग्यासाठी चाला; सकस आहार घ्या!

चांगल्या आरोग्यासाठी दररोज चालणे हा एक महत्त्वाचा व्यायाम आहेच, पण त्याचबरोबर सकस व पोषणमूल्यांनी युक्त आहार घेणेही आवश्यक बाब आहे. भरडधान्ये ही भारतीय अन्नसंस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहेत. त्यांचे महत्त्व नव्याने समजावून घेऊन आपल्या दैनंदिन आहारात त्यांचा समावेश करण्याचा संदेश आजच्या उपक्रमातून प्रत्येक सहभागीने आपापल्या कुटुंबियांपर्यंत आणि पर्यायाने संपूर्ण समाजापर्यंत घेऊन जावयाचा आहे, असे आवाहन वॉकेथॉनच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले.

Wednesday, 23 August 2023

शिवाजी विद्यापीठातून चांद्रयान -3 च्या लॅंडींगचे थेट प्रक्षेपण

 


कोल्हापूर, दि.23 ऑगस्ट - शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृह येथे उपस्थितांना  चंद्राच्या पृष्ठभागावर ''चांद्रयान - 3'' च्या लॅंडींगचे थेट प्रक्षेपण सायंकाळी 5.30 ते 6.30 या कालावधीत एकत्रित पाहण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली. त्याचबरोबर, विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान अधिविभाग सभागृह आणि पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्र येथेही ''चांद्रयान - 3'' च्या लॅंडींगचे थेट प्रक्षेपण पाहण्याची सुविधा करण्यात आली.  ''चांद्रयान - 3'' च्या लॅंडींगनंतर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने भरलेले संपूर्ण सभागृह भारत मातेच्या जयघोषाने दणाणून गेले.

           






या एेतिहासिक प्रसंगी राजर्षी शाहू सभागृह येथे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के, प्रभारी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अजितसिंह जाधव, क्रीडा अधिविभागप्रमुख डॉ.शरद बनसोडे, डॉ.प्रकाश गायकवाड, डॉ.तानाजी चौगुले, डॉ.रामचंद्र पवार, डॉ.डी.के.गायकवाड, उपकुलसचिव डॉ.वैभव ढेरे, डॉ.प्रिया देशमुख, डॉ.अभिजीत रेडेकर यांचेसह विद्यार्थी, विद्यार्थीनी, संशोधक, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, अधिविभागप्रमुख, संचालक, समन्वयक, विज्ञानप्रेमी जिज्ञासू नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

--------

 

 

कोल्हापूरातील फौंड्री उद्योग हे देशाचे वैभव - उद्योगपती प्रफुल्ल वानखेडे

 

 

कोल्हापूर, दि.22 ऑगस्ट फौंड्री उद्योग हे कोल्हापूर शहराबरोबरच देशाचे वैभव आहे.या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे कार्यरत असणाऱ्या मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी मोठी संधी आहे.फौंड्री उद्योगामध्ये जगातील सर्वांत चांगली गुणवत्ता देणारे शहर म्हणजे कोल्हापूर ही खात्रीची जागा होय, असे प्रतिपादन प्रसिध्द उद्योगपती प्रफुल्ल वानखेडे यांनी केले.

            राष्ट्रीय फौंड्री दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठ उद्योग कक्ष इन्स्टिटयूट ऑफ इंडियन फौंड्रीमन कोल्हापूर चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिध्द उद्योगपती प्रफुल्ल वानखेडे यांचे ''नवी औद्योगिक क्रांती आणि संधी'' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेे.राजर्षी शाहू सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के उपस्थित होते तर प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.


            उद्योगपती प्रफुल्ल वानखेडे पुढे म्हणाले,  कुशल मनुष्यबळाशिवाय फौंड्री उद्योगाचा भविष्यकाळ खूप अंधकारमय होवू शकतो. ज्या राज्यांमध्ये कुशल मनुष्यबळाची उपलब्धता आहे त्या ठिकाणच्या फौंड्री उद्योगाची भरभराटी होत आहे. उद्योग क्षेत्रास सर्वात जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे कुशल मनुष्यबळाची आहे.त्याची निर्मिती करणे ही आजची गरज आहे.काळासोबत चालणारा माणूसच पुढे जातो. कोणत्याही उद्योगाचा पाया हा त्याच्या प्रक्रीयेचा असतो.इंडस्ट्री 4.0 मधील आधुनिक सॉफ्टवेअरचा वापर करणे आवश्यक आहे.यामधील आय.ओ.तंत्रज्ञान फार महत्वाचे आहे.फौंड्रीमध्ये सर्वात जास्त गरज ही उत्पादकतेच्या देखभालीची आहे.4.0 चा उपयोग करून उत्पादकता नाकारण्याचे प्रमाण कमी करणे अथवा थांबवणे शक्य आहेे.

सध्या, जगामध्ये सेमीकंडेक्टर निर्मितीची स्पर्धा निर्माण झालेली आहे.त्यानंतर, पुढे ऊर्जा निर्मितीकडे संपूर्ण जग वळणार आहे.जो पर्यंत आपल्याकडे ऊर्जा साक्षरता येत नाही तो पर्यंत आपण दीर्घकाळ टिकून राहू शकत नाही.साखर कारखाने आणि फौंड्री उद्योग एकत्र येवून मोठया प्रमाणात ऊर्जा निर्मिती करणे शक्य आहे.कमी दरामध्ये उपलब्ध होणाऱ्या ऊर्जेमुळे निश्चित प्रगती साध्य होते.  पाचव्या औद्योगिक क्रंातीमध्ये चांगल्या जीवन पध्दतीसाठी सुशिक्षित लोकांचे होणारे स्थलांतर थांबवणे अत्यंत आवश्यक आहे.ज्ञानाचे अभिसरण थांबलेले आहे त्यामुळे संवाद घडविणे आवश्यक आहे. तज्ज्ञांनी ज्ञानाची निर्मिती करून पुढच्या पिढीकडे सोपविले पाहिजे. फक्त संपत्ती उपभोगण्यासाठी उद्योजक होता समाजपयोगी उद्योजक व्हावे. कोल्हापूर ही काम करणाऱ्या कष्टकऱ्यांची भूमी आहे.

फौंड्रीबाबत सखोल ज्ञान प्राप्त होण्यासाठी अद्यावत पुस्तके उपलब्ध होणे फार महत्वाचे आहे.हा फौंड्री उद्योग 100 वर्षे पुढे घेवून जाण्यासाठी काय केले पाहिजे याचा विचार होणे आवश्यक आहे.एकेकाळी हा उद्योग प्रचंड अडचणीत आला होता.राजकोट, कोर्‌इंबतूर, कोलकत्ता, लुधियाना, दिल्ली या ठिकाणी क्लस्टर निर्माण झालेले आहे.कोल्हापूरमधील फौंड्री उद्योगाची आजही ओळख ही प्रामाणिकपणाची आहे.अद्वितीय विक्री विधान (युएसपी) कसा वाढू शकतो यावर नवीन तरूण उद्योजकांनी काम करण्याची गरज आहे.उद्योग क्षेत्रामध्ये मराठी माणूस फार कमी प्रमाणात आहे.

            जग हे आपल्या कृतीतून बदलत असते. कृती ही आपल्या एकीकरणाची असली पाहिजे. संघर्ष करून सातत्याने पुढे मार्गक्रमण करत छत्रपती बनलेल्या शिवाजी महाराजांकडे फार मोठी दूरदृष्टी होती. ज्याकाळात समुद्र पार करण्यास बंदी होती त्याकाळात त्यांनी आरमार बांधले.राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे देशातील लोकशाहीच्या प्रगतीचा पाया घातला गेला.1850 साली कोल्हापूरमध्ये वाचनालय होते.पुढच्या शंभर वर्षांमध्ये ते टिकविणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. कारण, वचान प्रगल्भतेमुळे विचारांची आदान-प्रदान आणि माहितीची देवाण-घेवाण करणे सहज शक्य होते.कोल्हापूरच्या अर्थकारणाला फौंड्री उद्योगाने खऱ्या अर्थाने गती दिलेली आहे.

            प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आपल्या मनोगतामध्ये म्हणाले, फौंड्री उद्योगामध्ये काम करणाऱ्यांसाठी पी.जी.डिप्लामो इन फौंड्री हा सर्टिफिकेट कोर्स विद्यापीठाने सुरू केलेला आहे.यामुळे फौंड्री उद्योगास कुशल मनुष्यबळ मिळण्यासाठी सोयीचे होईल.  संवाद, सामाजिक, सॉफ्टवेअर, व्यवसाय या कौशल्यांचा आंतर्भाव या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे.  यामुळे मोठयाप्रमाणात रोजगार निर्मिती होवू शकते.

            विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्ष स्थानावरून बोलताना म्हणाले, उद्योग निर्मितीला मोठया प्रमाणात चालना देण्यासाठी उद्योग क्षेत्रातील आणि विद्यापीठातील तज्ज्ञ व्यक्ती एकत्र येवून काम करणे आवश्यक आहे.  विद्यापीठामध्ये उद्योग कॉम्प्लेक्स उभे करण्याचा मानस आहे.  उद्योग कॉम्प्लेक्स विकासाचे केंद्र म्हणून पुढे येण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.देशामध्ये फौंड्री उद्योग फार मोठयाप्रमाणात काम करीत आहे.याचा निश्चित फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.

            उद्योजक एम.बी.शेख यांनी फौंड्री तंत्रज्ञान पदवीका अभ्यासक्रमाची माहिती दिली. विद्यापीठ उद्योग कक्षाचे समन्वयक डॉ. सागर डेळेकर यांनी स्वागत केले.आयआयएफ कोल्हापूरचे अध्यक्ष महेश दाते यांनी प्रास्ताविक केले.सचिव मिलिंद बिरादार यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. खजीनदार राहूल पाटील यांनी आभार मानले.

            याप्रसंगी, डॉ.पी.डी.राऊत, डॉ.डी.टी.गायकवाड, डॉ.प्रकाश गायकवाड, डॉ.तानाजी चौगुले, डॉ. सचिन पन्हाळकर, गजानन कडूकर, डॉ.सुभाष माने यांचेसह विद्यार्थी, शिक्षक, प्रमुख उद्योजक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

------