Friday, 20 October 2023

शिवाजी विद्यापीठात अमृत कलश संकलन समारोह

 






 

कोल्हापूर, दि. २० ऑक्टोबर: मेरी माटी, मेरा देश या उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील ३३ तालुक्यांतून संकलित मातीचे ५० अमृत कलश आज विद्यापीठामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी स्विकारले.

मिट्टी को नमन आणि विरों को वंदना या भारत सरकारच्या उपक्रमाचा भाग म्हणून देशभरात हा उपक्रम साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्यांपासून राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 'सेल्फी विथ मिट्टी तसेच प्रत्येक गावातून माती संकलन करून त्यांचे कलश जमा करण्यात येत आहेत. जमा झालेल्या मातीमधून थोडी माती संबंधित महाविद्यालयाच्या रोपवाटिकेमध्ये मिसळून थोडी माती अमृत कलशाद्वारे संबंधित विद्यापीठात संकलित करावयाची होती. सदर संकलित मातीचे अमृत कलश दिल्ली येथे पाठवून तेथे तयार होणाऱ्या अमृत वाटीकेमध्ये ही देशभरातून आलेली माती मिसळली जाणार आहे.

आज कुलगुरू डॉ. शिर्के यांनी तीन जिल्ह्यांमधून आलेले कलश स्विकारले आणि या उपक्रमाद्वारे युवा पिढीमध्ये देशप्रेमाचा संदेश प्रसारित होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. संकलित कलशांची सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कलश यात्रा काढण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. तानाजी चौगुले यांच्यासह विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयांचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक तसेच विद्यापीठातील प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

 

Thursday, 19 October 2023

जातीव्यवस्था नष्ट करण्यात आलेले अपयश चिंताजनक: डॉ. यशवंतराव थोरात

 विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांच्याविषयी रिटा गुप्ता यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

शिवाजी विद्यापीठात 'सावित्रीबाई फुले: हर लाईफ, हर रिलेशनशीप, हर लिगसी' या पुस्तकाचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) लेखिका रिटा राममूर्ती गुप्ता, डॉ. यशवंतराव थोरात आणि डॉ. भारती पाटील.

शिवाजी विद्यापीठात आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभात बोलताना डॉ. यशवंतराव थोरात.

शिवाजी विद्यापीठात आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभात बोलताना डॉ. यशवंतराव थोरात. मंचावर (डावीकडून) डॉ. भारती पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि लेखिका रिटा राममूर्ती गुप्ता.


कोल्हापूर, दि. १९ ऑक्टोबर: महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दांपत्याने शूद्रातिशूद्रांना शिकवून जातीव्यवस्थेवर प्रखर आघात केला; मात्र आज दोनशे वर्षे उलटल्यानंतरही जातीव्यवस्थद्ध्वस्त करण्यात आपण यशस्वी झालेलो नाही, हे चिंताजनक आहे, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत व अर्थतज्ज्ञ डॉ. यशवंतराव थोरात यांनी आज येथे व्यक्त केली.

सावित्रीबाई फुले: हर लाईफ, हर रिलेशनशीप, हर लिगसी या पुस्तकाचे प्रकाशन आज शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात झाले. रिटा राममूर्ती गुप्ता यांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी लिहिलेल्या या पहिल्या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन कै. श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

डॉ. थोरात म्हणाले, जोतिराव फुले व सावित्रीबाई यांनी पावणेदोनशे वर्षांपूर्वी शूद्रातिशूद्र व स्त्रिया यांच्यासाठी शिक्षणाची दारे खुली करून जातीच्या उतरंडीला आव्हान दिले. पण अजूनही आपली जातमानसिकता बदलेली नाही. कनिष्ठ जातींना जे दुःख भोगावे लागले, त्याची पुसटशीही कल्पना जातव्यवस्थेच्या उतरंडीत स्वतःला उच्च स्थानी मानणाऱ्या जातींना येणार नाही. त्यामुळे त्यांच्या मानसिक स्वच्छतेची गरज आहे. त्यासाठी पुन्हा आपल्याला फुले-शाहू-आंबेडकर यांचाच मार्ग अनुसरावा लागेल. समता, सामाजिक न्याय यांच्या आधारावरच समाजसुधारणेचा मार्ग व्यापक व विकसित होत जातो. त्या दिशेने प्रवासाला सुरू करण्याची गरज आहे.

विद्यापीठांनी आता सावित्रीबाई- फातिमा शेख यांच्याविषयी संशोधनात्मक अभ्यास होण्याची आवश्यकताही डॉ. थोरात यांनी व्यक्त केली.

डॉ. यशवंतराव थोरात यांनी काही प्रश्न विचारून लेखिका रिटा राममूर्ती गुप्ता यांना बोलते केले. सावित्रीबाईंविषयीच पुस्तक लिहावे, असे का वाटले? या त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गुप्ता म्हणाल्या, जेव्हा एका स्त्रीबाबत लिहीण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सावित्रीबाईंशिवाय माझ्यापुढे कोणतेही नाव नव्हते. कोणताही सामाजिक बदल कोणा एका व्यक्तीच्या प्रयत्नातून होत नाही. त्यास सामूहिक प्रयत्नांची गरज असते. सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, सगुणाबाई क्षीरसागर या तिघी म्हणजे माझ्या दृष्टीने भारताची संकल्पना होय. सावित्रीबाईंनी तर लहान असतानाच नायगावमध्ये अगदी एकलव्याप्रमाणे शिकण्याचा प्रयत्न चालविलेला होता. म्हणजे तेव्हापासूनच शिकण्याची ऊर्मी त्यांच्यात होती. जोतिराव फुले यांच्यासारखा सखा लाभल्याने त्या ऊर्मी प्रत्यक्षात साकार झाल्या आणि पुढचा इतिहास घडला.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, सावित्रीबाईंविषयीच्या पुस्तकाचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठात होते आहे, याचा मनस्वी आनंद होतो आहे. सावित्रीबाईंनी त्यांच्या पहिल्या फळीच्या विद्यार्थिनींवर जो शिक्षणाचा संस्कार केला, प्रभाव टाकला, त्या अनुषंगाने संशोधन होणे हे आवश्यकच आहे. मात्र, आजच्या पिढीतल्या सावित्रीच्या लेकींनाही आपल्या या संचिताचा अभिमान वाटला पाहिजे. त्या अनुषंगाने त्यांनी अभ्यास व संशोधन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सुरवातीला अध्यासनाच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी प्रास्ताविक केले. सावित्रीबाई, फातिमा शेख आणि सगुणाबाई या तिघींनी धर्म परंपरांना आव्हान देत शिक्षण प्रसाराचे केलेले कार्य अतुलनीय स्वरुपाचे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला बाळ पाटणकर, इंद्रजीत घोरपडे, डॉ. उषा थोरात, डॉ. भगवान हिर्डेकर, डॉ. अरूण शिंदे, डॉ. केशव हरेल यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, 18 October 2023

विद्यार्थ्यांनी सहकार क्षेत्रात येण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती आवश्यक: कुलगुरू डॉ. शिर्के

 कोल्हापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशनसमवेत विद्यापीठाचा सामंजस्य करार

 

शिवाजी विद्यापीठ आणि कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन यांच्या दरम्यान झालेल्या सामंजस्य करार प्रसंगी कराराचे हस्तांतरण करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि असोसिएशनचे अध्यक्ष निपुण कोरे. सोबत कुलसचिव डॉ. विलास शिंदे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, अधिसभा सदस्य संजय परमणे, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. राजन पडवळ, सूर्यकांत पाटील-बुद्धीहाळकर, अनिल नागराळे, शंकरराव मांगलेकर, अरुण आलासे आदी.

कोल्हापूर, दि. १८ ऑक्टोबर: सहकारी संस्था आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यादरम्यान सहकार्य वृद्धी करीत असताना केंद्रस्थानी विद्यार्थीच राहिला पाहिजे, ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता लक्षात आणून देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांनी सहकारी क्षेत्रात काम करण्यासाठी यावे, यासाठी पोषक वातावरण निर्माण करावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठ आणि कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन यांच्या दरम्यान आज सकाळी सहकार्यवृद्धीच्या अनुषंगाने सामंजस्य करार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते. यावेळी कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनचे अध्यक्ष निपुण कोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यापीठाचा आणि परिसरातील सहकारी क्षेत्राचा स्थापनेपासून सौहार्द आहे. विद्यापीठ प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा सहकारी क्षेत्राच्या सहकार्यातून उभा करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या अनेक उपक्रमांना परिसरातील सहकारी संस्थांचे सहकार्य वेळोवेळी लाभत असते. सामंजस्य करारामुळे शैक्षणिक तसेच बँकिंग क्षेत्रातील सहकार्याचा मार्ग अधिक विस्तारतो आहे, ही बाब महत्त्वाची आहे. यापुढील काळात सहकारी क्षेत्राकडे अधिक लक्ष केंद्रित करून त्यांच्या अपेक्षा जाणून घेऊन त्या दृष्टीने अभ्यासक्रमात समावेश करता येऊ शकेल. सहकारी क्षेत्रातील संधींबाबत विद्यार्थी अनभिज्ञ असतात. त्यांना त्याबाबत अवगत करून या क्षेत्रात येण्यास प्रोत्साहित करता येईल. शिकत असतानाच इंटर्नशीपची संधी देऊन प्रात्यक्षिकीय अनुभव घेण्याची संधी देता येईल. विशेषतः विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राच्या माध्यमातून अनेक महिला वाणिज्य व व्यवस्थापनाचे शिक्षण घेत आहेत. त्यांनाही या इंटर्नशीपमध्ये कसे सामावून घेता येईल, या दृष्टीनेही विचार करण्याची गरज आहे. संयुक्त प्रकल्प व योजनांवर काम करीत क्षमता संवर्धनावर भर देणेही आवश्यक आहे. नजीकच्या काळात सांगली व सातारा या विद्यापीठ परिक्षेत्रातील जिल्ह्यांतील नागरी बँकिंग संघटनांपर्यंत सुद्धा या सहकार्याचा विस्तार करून त्या विभागातील विद्यार्थ्यांनाही या क्षेत्रात कामाच्या, अनुभवाच्या संधी देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावेत, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

यावेळी निपुण कोरे म्हणाले, युवकांचा सहकार चळवळीत सहभाग वाढणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाने घेतलेला पुढाकार खूप महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बँकिंगची माहिती, अनुभव देण्याच्या दृष्टीने या करारांतर्गत निश्चितपणे प्रयत्न करण्यात येतील. त्यातून या क्षेत्राला चांगले मनुष्यबळ उपलब्ध होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अधिसभा सदस्य संजय परमणे म्हणाले, सहकार क्षेत्रातही करिअरच्या उत्तम संधी आहेत, हा संदेश तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी या क्षेत्रात कार्यरत सर्वच घटकांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सहकार क्षेत्रातील चांगली कामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करून त्यांची निर्गत करण्यासाठी एक चांगली परिसंस्था, वातावरण निर्माण करू या, असे आवाहन केले.

यावेळी असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष श्री. कोरे यांनी तर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. यावेळी असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नागराळे, वीरशैव सहकारी बँकेचे संचालक सूर्यकांत पाटील-बुद्धीहाळकर, बँकिंग तज्ज्ञ शंकरराव मांगलेकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. विद्यापीठाच्या बँक ऑफ इंडिया अध्यासन व गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्राध्यापक डॉ. राजन पडवळ यांनी स्वागत केले. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, कुरुंदवाडच्या स्वातंत्र्यसेनानी श्रीपाल आलासे बँकेचे संचालक अरुण आलासे आदी यावेळी उपस्थित होते.

Tuesday, 17 October 2023

अंत्योदयाकडून सर्वोदयाकडे वाटचालीतूनच सामाजिक समावेशन शक्य: किशोर बेडकिहाळ

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ. मंचावर डॉ. श्रीकृष्ण महाजन व अविनाश भाले.


कोल्हापूर, दि. १७ ऑक्टोबर: खऱ्या सामाजिक समावेशनासाठी महात्मा गांधी यांनी सांगितलेला अंत्योदयाकडून सर्वोदयाकडे वाटचाल करण्याचा विचार महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्या वतीने मानव्यशास्त्र सभागृहामध्ये आयोजित ‘महात्मा गांधींचा सामाजिक समावेशनाचा दृष्टीकोन’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन होते. यावेळी दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री. बेडकिहाळ यांचा सत्कार करण्यात आला.

श्री. बेडकिहाळ पुढे म्हणाले, भारतामध्ये भेदाभेदाची परंपरा जात, वर्ण व लिंगावर आधारलेली होती. त्याविरोधात महात्मा गांधींनी संघर्षात्मक पवित्रा घेतला. विकासाची प्रत्येक प्रक्रिया नैतिक असतेच असे नाही. विकासाच्या प्रक्रियेत विस्थापित होणारा प्रमुख घटक हा दलित, आदिवासी आणि स्त्रियाच असतात आणि ही विस्थापनाची प्रक्रियासुद्धा सामाजिक वंचिततेस कारणभूत ठरणारी आहे. परंपरा, सत्तासंबंध, विकासाची प्रक्रिया आणि शासनाची धोरणे या सर्वांचा परिणाम म्हणून सर्वंकष स्वरूपाची सामाजिक वंचितता अथवा बहिष्कृतता निर्माण होते. राजकीय चौकटीमध्ये सध्या आपण तत्त्वत: सर्वांना समान संधी दिलेली असली तरी व्यवहारामध्ये मात्र ही भेदाभेद कायम आहे. सध्या प्रतिकात्मक समावेशनाचा विचार मांडला जातो आहे. तसेच, प्रतिकात्मक योजनांद्वारेच लाभार्थी निर्माण केले जात आहेत. अशा प्रकारच्या सामाजिक समावेशानातून वंचित समुदायांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होणार नाही.

ते पुढे म्हणाले, महात्मा गांधींनी सामाजिक वंचितता संपुष्टात आणण्यासाठी संघर्ष केला. त्यांनी आपल्या आश्रमामध्ये हरिजन जोडप्यांना प्रवेश दिला. त्यास विरोध करणाऱ्या स्वत:च्या बहिणीस आश्रमाबाहेर काढले. अस्पृश्यांना मंदिर प्रवेशासाठी गांधीजींनी सत्याग्रह केला.  चरखा संघाच्या कामामध्ये अस्पृश्यांना मोठ्या प्रमाणात सामील करून घेतले आणि त्यांना रोजगार मिळवून दिला. सवर्ण व अस्पृश्य आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला. महात्मा गांधींचे हे कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सामाजिक बहिष्कृतता नष्ट करण्यासाठी अहिंसा, आसक्तीमुक्त व सर्वसमान स्पर्श भावना या समभावावर आधारित समाज त्यांना अभिप्रेत होता.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. महाजन म्हणाले, सामाजिक समावेशनासाठी राजकीय प्रक्रियेत सहमती व लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. गावच्या विकासासाठी नैसर्गिक संसाधने वापर लोकांच्या हातामध्ये असली पाहिजेत. महात्मा गांधी कृतीशील विचारवंत होते. ते आपल्या वैचारिक आयुष्यामध्ये कसे कसे बदलत गेले, याचा अभ्यास होणे आवश्यक आहे.

सुरवातीला डॉ. अविनाश भाले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. किशोर खिलारे यांनी आभार मानले. व्याख्यानास दशरथ पारेकर, व्यंकप्पा भोसले, केशव हरेल, डॉ. अरुण शिंदे, अनमोल कोठडिया, डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. विद्यानंद खंडागळे,  डॉ. शोभा शेट्ये, डॉ. सुखदेव उंदरे आदी उपस्थित होते. व्याख्यानाच्या यशस्वी आयोजनासाठी शरद पाटील, पल्लवी गिरी-गोसावी यांनी परिश्रम घेतले.

Monday, 16 October 2023

जगण्याचे प्रयोजन वाचनातून सापडते: डॉ. भगवान हिर्डेकर

 शिवाजी विद्यापीठात वाचन प्रेरणा दिन उत्साहात

शिवाजी विद्यापीठात आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात बोलताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) डॉ. प्रकाश बिलावर, डॉ. धनंजय सुतार, डॉ. भगवान हिर्डेकर आणि डॉ. सचिनकुमार पाटील.

शिवाजी विद्यापीठात आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात बोलताना डॉ. भगवान हिर्डेकर


कोल्हापूर, दि. १६ ऑक्टोबर: माणसाला त्याच्या जगण्याचे प्रयोजन वाचनातून सापडते, असे मत ज्येष्ठ विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ डॉ. भगवान हिर्डेकर यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचा बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र आणि ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने का वाचावे? आणि काय वाचावे?’ या विषयावर डॉ. हिर्डेकर यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

डॉ. हिर्डेकर म्हणाले, माणसाप्रमाणे उन्नत होण्याची क्षमता अन्य प्राणीमात्रांत नाही. माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेमुळे त्याने ही उन्नती साध्य केली आहे. मेंदूच्या सातत्यपूर्ण मशागतीमधून ही विचारक्षमता साधली आहे आणि त्यामध्ये वाचन कळीची भूमिका बजावते. मेंदू कार्यक्षम ठेवण्याचे कार्य वाचन करते. मेंदू ताजातवाना आणि जिवंत ठेवण्याचा वाचन हा एक महत्त्वाचा आणि अत्यंत साधासोपा मार्ग आहे. वाचनाने माणूस वेडा होत नाही, तर वाचनवेडा होतो आणि त्यातून जग बदलण्याच्या प्रेरणा त्याच्यात निर्माण होतात.

डॉ. हिर्डेकर पुढे म्हणाले, पुस्तके माणसाला शांत करतात, अशांतही करतात; ती माणसाला समंजस बनवितात आणि बंडखोरही बनवितात. पुस्तके ही आपले 'ब्रेन'वेअर आणि 'हार्ट'वेअरही बदलतात. ती आपल्याला सहृदय बनवितात. भूमिका घ्यायला शिकवितात. त्यामुळे माणसाने आपल्या विषयाबरोबरच विषयबाह्यही वाचन करायला हवे. पर्याप्त विषय आणि अन्य विषयांचं किमान ज्ञान देणारे वाचन असले की त्यातून नव्या गोष्टी समजण्याबरोबरच कृतीशीलतेच्या प्रेरणाही मिळतात. आजच्या काळात विविध ज्ञानशाखांमधील भिंती पाडण्याची गरज आहे. वाचन हा माणसाला समृद्ध करणारा प्रवास आहे. या प्रवासात मिळणारा आनंद हा शब्दातीत प्रेरक आहे.

वाचन माणसाला प्रगल्भ बनविते, असे सांगून कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, वाचन प्रेरणा दिन केवळ एक दिवस नव्हे, तर वर्षभर दैनंदिन स्वरुपात साजरा व्हायला हवा. विद्यापीठाच्या ग्रंथालयात अनेक दुर्मिळ पुस्तकांचा खजिना वाचकांच्या प्रतीक्षेत आहे. त्याचप्रमाणे दर वर्षी लाखो रुपयांची पुस्तके खरेदी केली जातात, त्यांचा लाभही विद्यार्थ्यांनी घेण्याची गरज आहे.

यावेळी गौरी चिंचणे, आकाश कांबळे, शिवाजी चव्हाण या विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांतील उताऱ्यांचे अभिवाचन केले. सुरवातीला कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. धनंजय सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. प्रकाश बिलावर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुधाराणी हजारे आणि प्रियांका मुजुमदार-भिडे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. वाय.जी. जाधव यांनी आभार मानले. यावेळी मंचावर ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. सचिनकुमार पाटील उपस्थित होते.

स्वच्छ ऊर्जा निर्मितीच्या दिशेने संशोधनाची गरज: प्रा. पी.व्ही. कामत

शिवाजी विद्यापीठात पाच दिवसीय ग्यान कार्यशाळेस प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात आयोजित पाचदिवसीय 'ग्यान' कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात बोलताना अमेरिकेतील नॉत्रे दॅम विद्यापीठाचे डॉ. पी.व्ही. कामत. मंचावर (डावीकडून) डॉ. सागर डेळेकर, डॉ. कैलास सोनावणे, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. माणिकराव साळुंखे व डॉ. केशव राजपुरे.

शिवाजी विद्यापीठात आयोजित पाचदिवसीय 'ग्यान' कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात बोलताना अमेरिकेतील नॉत्रे दॅम विद्यापीठाचे डॉ. पी.व्ही. कामत.


कोल्हापूर, दि. १६ ऑक्टोबर: संपूर्ण जगभरात ऊर्जेचे संकट भेडसावत आहे. जगाला स्वच्छ ऊर्जा निर्मितीचे पर्याय शोधण्याची निकड भासत आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी संशोधन करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ व अमेरिकेतील नॉत्रे दॅम विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. पी.व्ही. कामत यांनी आज येथे व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागाने ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ अॅकॅडेमिक नेटवर्क अर्थात ग्यान उपक्रमांतर्गत आयोजिलेल्या पाचदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या उपक्रमात डॉ. कामत अॅडव्हान्स्ड फंक्शनल मटेरियल्स अन्ड ग्रीन एनर्जी स्ट्रॅटेजीस् या विषयाच्या अनुषंगाने व्याख्याने देणार आहेत. उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, तर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के उपस्थित होते.

डॉ. कामत म्हणाले, नजीकच्या काळात वाढत्या उर्जेची गरज भागविण्यासाठी पर्यावरणीयदृष्ट्या आपल्याला स्वच्छ उर्जेचे पर्याय शोधावे लागणार आहेत. त्यासाठी पायाभूत सुविधांपासून ते हरित उर्जा निर्मितीपर्यंत सर्वच क्षेत्रांमध्ये नवसंशोधनाची गरज निर्माण झाली आहे. जगभरातील संशोधन या दिशेने केंद्रित झालेले आहे. आपल्या विद्यार्थ्यांनाही येथे संशोधनाची पुरेपूर संधी आहे. ती त्यांनी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत आणि त्यांची उत्तरे प्राप्त करण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. माणिकराव साळुंखे

डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले, जागतिक स्तरावर शाश्वत विकासाच्या प्राधान्यक्रमावर स्वच्छ उर्जा हा विषया सातव्या स्थानी आहे. जी-२० परिषदेने मानवजातीसमोरील समस्यांचे नव्याने अधोरेखन केले आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी धोरणात्मक बदलांची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने संशोधकांमधील संशोधन विषयांच्या दरी संपुष्टात आणून बहुविद्याशाखीय, आंतरविद्याशाखीय संशोधनास प्रोत्साहन दिले पाहिजे. त्याद्वारे हरित ऊर्जाविषयक संशोधन व्हावे, जेणे करून या समस्येचे निराकरण शक्य होईल.


डॉ. दिगंबर शिर्के

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, आजच्या संशोधकांच्या पिढीने शाश्वत विकासासाठी आग्रही राहिले पाहिजे. त्या दृष्टीने नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत शिवाजी विद्यापीठात अभ्यासक, संशोधकांचे अकादमिक वर्तुळ कार्यरत करण्यात आले आहे. त्याचा विस्तार करीत नेऊन विद्यार्थ्यांचेही त्यामध्ये समावेशन करण्याचा मानस आहे. विद्यार्थ्यांमध्ये शाश्वत विकास, स्वच्छ ऊर्जा व पर्यावरण यांची आस निर्माण करण्याच्या दृष्टीने कार्य करण्यात येत आहे.


कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी वाहून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यशाळेचे समन्वयक डॉ. सागर डेळेकर यांनी स्वागत व पाहुण्यांचा परिचय करून दिला. रसायनशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. कैलास सोनावणे यांनी प्रास्ताविक केले, तर विद्यापीठाचे ग्यान समन्वयक डॉ. केशव राजपुरे यांनी आभार मानले.

Saturday, 14 October 2023

शिवाजी महाराजांनी प्रत्येक मराठ्याच्या हृदयात स्वराज्य निर्मिले

डॉ. जयसिंगराव पवार यांचे शिवजागर परिसंवादात प्रतिपादन

शिवाजी विद्यापीठात आयोजित 'शिवजागर' परिसंवादात बोलताना ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार. सोबत (डावीकडून) डॉ. अशोक चौसाळकर, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. सदानंद मोरे.



शिवाजी विद्यापीठात आयोजित 'शिवजागर' परिसंवादात बोलताना ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार. सोबत (डावीकडून) डॉ. अशोक चौसाळकर, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. सदानंद मोरे, डॉ. गणेश राऊत आणि अनिल पवार.



शिवाजी विद्यापीठात आयोजित 'शिवजागर' परिसंवादात बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे. मंचावर (डावीकडून) डॉ. अवनिश पाटील, डॉ. अशोक चौसाळकर,  डॉ. जयसिंगराव पवार, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. गणेश राऊत आणि अनिल पवार. 


कोल्हापूर, दि. १४ ऑक्टोबर: छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ भूमीवर नव्हे, तर प्रत्येक मराठ्याच्या हृदयात स्वराज्य निर्माण केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाचे छत्रपती संभाजी महाराज संशोधन केंद्र, कृष्णा पब्लिकेशन्स आणि सह्याद्री प्रतिष्ठान, मुळशी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५०व्या वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिवजागर या विशेष परिसंवादामध्ये प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, शिवराज्याभिषेकाचे हिंदुस्थानच्या इतिहासात अतिशय मोलाचे स्थान होते. राज्याभिषेकाची संकल्पना शिवाजी महाराज आणि त्यांच्या मातोश्री जिजाऊसाहेब यांना सुचणे हीच मुळी क्रांतीकारक बाब होती. स्वतंत्र राज्य निर्मितीबरोबरच त्यामध्ये सार्वभौमत्वाच्या संकल्पनेला मोठे स्थान महाराजांनी त्यात दिले होते. कारण देवगिरीचे राज्य संपुष्टात येऊनही सुमारे ३५० वर्षे त्यावेळी उलटली होती. मराठे विविध शाह्यांबरोबरच मानसिक गुलामगिरीत अडकून पडले होते. त्यांना महाराजांनी स्वराज्य दिले, ही मूलगामी बदल होता. राज्याभिषेक झाले असतील, पण राज्याभिषेकाची जाहीर घोषणा होणे हा भारताच्या इतिहासातील अपवादात्मक क्षण होता.

डॉ. पवार पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांच्या मनात स्वातंत्र्य व सार्वभौमत्वाच्या बरोबरीनेच दिल्ली काबीज करण्याची महत्त्वाकांक्षा होती, याचे पुरावे आहेत. पण, अकाली निधनामुळे ते शक्य झाले नाही. त्यांच्या माघारी स्वराज्याची व्यापक संकल्पना त्यांच्या वंशजांना पेलली नाही, किंबहुना समजलीच नाही, याची मोठी खंत वाटते. स्वराज्याचा विस्तार निश्चितपणे झाला, मात्र त्यांना सार्वभोमत्वाचा विसर पडला होता. सार्वभोमत्व सोडले नसते, तर या भारतात वेगळे चित्र दिसले असते. नंतरच्या राज्यकर्त्यांना खरे शिवाजी आणि त्यांचे तत्त्वज्ञान समजलेच नाही. ते समजून घेण्याची आज मोठी गरज निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.

यावेळी इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे म्हणाले, शिवराज्याभिषेक ही इतिहासाचा प्रवाह बदलणारी घटना होती आणि छत्रपती शिवाजी महाराज हे त्याचे इतिहास नायक होते. त्यांच्या नायकत्वावर शिक्कामोर्तब करणारा हा दिवस आहे. औरंगजेबासारख्या बादशहाने निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाहीसारख्या मोठ्या शाह्या संपविल्या, पण त्याच्या दृष्टीने टीचभर असणारे मराठ्यांचे स्वराज्य मात्र त्याला अखेरच्या क्षणापर्यंत संपविता आले नाही. छत्रपती संभाजी महाराज यांच्यापासून ते महाराणी ताराराणी यांच्यापर्यंत मराठ्यांनी त्याला चांगलेच झुंजवित ठेवले. त्याला स्वराज्य जिंकता आले नाही, याला शिवाजी महाराजांचे कर्तृत्व कारणीभूत आहे. मराठ्यांमुळेच पुढे दिल्ली वाचली, हे मराठ्यांचे भारतावर थोर उपकार आहेत. अन्यथा या भारतावर अफगाणांचे वर्चस्व प्रस्थापित झाले असते आणि पुढला इतिहास काही निराळाच निपजला असता. या सर्व घडामोडींमागे शिवराज्याभिषेकाचे फार मोलाचे योगदान आहे, हे अभ्यासांती लक्षात येते.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, शिवाजी महाराजांच्या राजसत्तेला अधिमान्यता मिळवून देणे, हा शिवराज्याभिषेकामागील प्रमुख हेतू होता. हा राज्याभिषेक करवून घेत असताना महाराजांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. त्यामध्ये मातब्बर सरदार-दरकदारांपासून ते धार्मिक सनातनी प्रवृत्तींचा समावेश होता. त्यातूनही धर्मशास्त्रातील अडथळे दूर करीत महाराजांनी हा राज्याभिषेक घडवून आणला. मोठे ध्येय साध्य करावयाचे असल्यास छोट्या छोट्या बाबींकडे दुर्लक्ष करावयास पाहिजे, या न्यायाने त्यांनी अनेक बाबींकडे काणाडोळा केला. कायदेनिष्ठ अथवा वलयांकित अधिमान्यतांच्या खेरीज काही प्रसंगी पारंपरिक अधिमान्यतेला महत्त्व देणे अगत्याचे ठरते, याचे भान महाराजांच्या ठायी होते. त्यातूनच त्यांनी राज्याभिषेकाला महत्त्व दिले. महाराजांच्या या राज्याभिषेकाच्या निर्णयामुळेच पुढे भारताचा राजकीय नकाशा बदलला. मराठ्यांचा झेंडा अटकेपार फडकला, यामागे महाराजांचीच प्रेरणा होती, हे नाकारता येणार नाही.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवराज्याभिषेक ही देशाच्या इतिहासातील असामान्य घटना आहे. शिवजागर या उपक्रमाच्या माध्यमातून शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यात निश्चितपणे यश येईल. शिवाजी विद्यापीठानेही या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. सर्वच स्तरांतील विद्यार्थ्यांचा त्यामध्ये सहभाग अपेक्षित आहे. शिवाजी महाराजांचे कार्य, कर्तृत्व आणि त्यांच्या प्रेरणा समजून घेऊन त्यांचे समकाळाच्या माध्यमातून उपयोजन करणे याची मोठी गरज आज आहे.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. इतिहास अधिविभागप्रमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अनिल पवार यांनी शिवराज्याभिषेक या ग्रंथाच्या निर्मितीमागील प्रेरणा व भूमिका विषद केली. चेतन कोळी यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. गणेश राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रमास मान्यवर इतिहास संशोधक, अभ्यासक यांच्यासह विद्यापीठ परिक्षेत्रातील वीसहून अधिक महाविद्यालयांचे इतिहासाचे शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.