Monday, 29 January 2024

शिवाजी विद्यापीठाचा ‘आय.सी.ए.आय.’समवेत सामंजस्य करार

 

नवी दिल्ली येथील इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउन्टंट्स ऑफ इंडिया या  संस्थेसमवेत सामंजस्य करार प्रसंगी (डावीकडून)  डॉ. ज्योती बत्रा, सी.ए. रणजीत कुमार अग्रवाल, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, सीए दयानिवास शर्मा.


कोल्हापूर, दि. २९ जानेवारी: येथील शिवाजी विद्यापीठाचा नवी दिल्ली येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउन्टंट्स ऑफ इंडिया या आघाडीच्या संस्थेसमवेत नुकताच सामंजस्य करार झाला आहे. या कराराचा विद्यापीठाचे विद्यार्थी तसेच शिक्षकांनाही मोठा लाभ होईल, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केली.

नवी दिल्ली येथे नुकतीच नॅशनल एज्युकेशन समिट ऑफ कॉमर्स अँड अकाउन्टंसी २०२४ (नेस्का-2024) या दोनदिवसीय उपक्रमाच्या पहिल्या दिवशी सामंजस्य करार समारंभ पार पडला. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यावेळी उपस्थित होते. या सामंजस्य करारावर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउन्टंट्स ऑफ इंडियाचे सेक्रेटरी डॉ. जयकुमार बत्रा यांनी स्वाक्षरी केल्या. हा करार होण्यासाठी इन्स्टिट्यूटचे उपसंचालक डॉ. एन.एन. सेनगुप्ता आणि अधिष्ठाता डॉ. महाजन यांनी समन्वयाचे कार्य केले आहे.

दोन्हीही संस्थांनी शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण यामध्ये केलेल्या कार्यातून ज्ञान आणि कौशल्य यासंदर्भात उत्कृष्टता निर्माण करण्याच्या प्रक्रियेसाठी या सामंजस्य कराराच्या माध्यमातून एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला आहे. वाणिज्य विषयातील पदवी, पदव्युत्तर व पदविका अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले. त्या माध्यमातून या संस्थांच्या बौद्धिक जीवन व सांस्कृतिक विकास याबाबत सहकार्य केले जाईल. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने इन्स्टिट्यूट विशेष सत्रांचे आयोजन करून विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याच्या कामी सहकार्य करणार आहे. संशोधन प्रकल्प, शिक्षक विकास कार्यक्रम तसेच क्षमता विकास कार्यक्रम आणि कार्यशाळा, परिषद व चर्चासत्र असे शैक्षणिक कार्यक्रमही संयुक्तपणे आयोजित करण्यात येतील. शैक्षणिक व व्यवसायिक ज्ञान व कौशल्याची देवाण-घेवाण यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना या सामंजस्य कराराचा लाभ होणार आहे.

Friday, 26 January 2024

शिवाजी विद्यापीठात प्रजासत्ताक दिन उत्साहात

 

                          शिवाजी विद्यापीठात प्रजासत्ताक दिनानिमित्त कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

                 शिवाजी विद्यापीठात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनानंतर उपस्थितांना शुभेच्छा देताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्यासह मान्यवर.

कोल्हापूर, दि.२६ जानेवारी - भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन आज शिवाजी विद्यापीठात मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. 

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते सकाळी ठीक आठ वाजता ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी सामूहिक राष्ट्रगीत गायन विद्यापीठ गीताचे सादरीकरण करण्यात आले. कुलगुरूंसह मान्यवरांनी विद्यापीठ प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्प वाहून अभिवादन केले. 

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विज्ञान तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, बॅ. बाळासाहेब खडरेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, आजीवन अध्ययन केंद्र संचालक डॉ. रामचंद्र पोवार, व्यवस्थापन परिषद राज्यपाल नियुक्त सदस्य सिध्दार्थ शिंदे, प्रभारी सुरक्षा अधिकारी वसंत एकले यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते. 

-----

Friday, 19 January 2024

महाराष्ट्र राज्य आंतर-विद्यापीठ क्रीडा महोत्सवातील यशस्वी खेळाडूंचा गौरव

 

महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी बजावणाऱ्या क्रीडापटूंसमवेत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे आदी.


 

कोल्हापूर, दि. १९ जानेवारी: नागपूर येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव २०२३-२४ मधील उज्ज्वल कामगिरीबद्दल शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडापटूंचा आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दि. १२ ते १६ जानेवारीदरम्यान नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठात २५ वी आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धा पार पडली. स्पर्धेच्या पहिल्या टप्यात शिवाजी विद्यापीठाच्या अॅथलेटिक्स (पुरुष व महिला) संघाने सर्वसाधारण विजेतेपद, बॅडमिंटन (पुरुष व महिला) संघाने तृतीय क्रमांक, टेबल टेनिस (पुरुष) संघाने तृतीय क्रमांक, व्हॉलीबॉल (पुरुष) संघाने द्वितिय क्रमांक असे देदीप्यमान यश प्राप्त केले. या यशाबद्दल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी यशस्वी क्रीडापटूंचे अभिनंदन केले, त्याचप्रमाणे क्रीडापटूंना आवश्यक अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली.

क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी क्रीडा महोत्सव स्पर्धेचे पथकप्रमुख डॉ. सुनील चव्हाण यांनी स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीविषयक अहवालाचे वाचन केले. कार्यक्रमा कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. प्रकाश गायकवाड, डॉ. एन. डी. पाटील, डॉ राजेंद्र रायकर, डॉ. बाळासाहेब भोसले, डॉ. राहुळ इंगळे, डॉ. सविता भोसले, डॉ. इब्राहीम मुल्ला, अजय मराठे, सचिन पाटील यांच्यासह क्रीडापटू विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते. प्रा. किरण पाटील, प्रा. सुचय खोपडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी क्रीडा अधिविभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

सदर क्रीडा महोत्सव स्पर्धेतील दुसऱ्या टप्याचे आयोजन दि. ते फ्रेबुवारी या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नीकल विद्यापीठ, लोणेरे येथे करण्यात आले आहे.

Thursday, 18 January 2024

सहकार क्षेत्रात बहुस्तरीय संधींची उपलब्धता: विभागीय सहनिबंधक अरुण काकडे

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना विभागीय सहनिबंधक अरूण काकडे.

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना विभागीय सहनिबंधक अरूण काकडे. मंचावर (डावीकडून) डॉ. राजन पडवळ, डॉ. श्रीकृष्ण महाजन, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व संजय परमणे.


कोल्हापूर, दि. १८ जानेवारी: सहकार क्षेत्राचे जाळे व्यापक असून या क्षेत्राला कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी आवश्यकता आहे. या क्षेत्रामध्ये बहुस्तरीय संधींची उपलब्धता असून त्यांचा लाभ घेण्यासाठी युवा पिढीने सज्ज व्हावे, असे आवाहन सहकारी संस्था कोल्हापूर विभागाचे विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचा मध्यवर्ती रोजगार कक्ष, बँक ऑफ इंडिया चेअर आणि गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार क्षेत्रातील रोजगाराच्या संधी या विषयावर आयोजित कार्यशाळेत विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील होते.

अरुण काकडे म्हणाले, सहकार क्षेत्र म्हटले की प्रामुख्याने प्राथमिक शेतीपतपुरवठा संस्था नजरेसमोर येतात, पण त्यापलिकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, सहकारी बँका, सहकारी पतसंस्था, सामुदायिक शेती संस्था, सहकारी साखर कारखाने, दुग्ध व पशुसंवर्धन संस्था, मच्छीमार संस्था, पणन, शेतीमाल, ग्राहक संस्था, यंत्रमाग व सूतगिरण्या, सहकारी औद्योगिक वसाहती, गृहनिर्माण संस्था यांसह इतरही अनेक प्रकारचे सहकारी उद्योग आहेत. केवळ महाराष्ट्राचा विचार केल्यास दोन शिखर संस्थांसह राज्यात एकूण २ लाख २२ हजार ७३८ सहकारी संस्था आहेत. त्यापैकी कोल्हापूर, सांगली, सातारा या कोल्हापूर विभागामध्येच उपरोक्त सर्वच प्रकारच्या १४,६७८ सहकारी संस्था आहेत. या सर्व संस्थांमध्ये चांगल्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे. अनेक संस्थांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक आदी पदांसाठी पात्र उमेदवार मिळत नसल्याने वयाने ज्येष्ठ व्यक्तींची केवळ अनुभव लक्षात घेऊन नियुक्ती केल्याचीही उदाहरणे आहेत. यावरुन या क्षेत्रातील अमर्याद संधींची शक्यता लक्षात यावी. केवळ नोकरीच नव्हे, तर अभिनव स्टार्टअप, उद्योग व स्वयंरोजगार तसेच सोसायटी स्थापनेच्या शक्यताही या संधींमध्ये आहेत. मात्र, त्या संधी प्राप्त करण्यासाठी आत्मविश्वासाबरोबरच कामावरील श्रद्धा आणि कठोर परिश्रम यांची मात्र तयारी असायला हवी, असेही त्यांनी सांगितले. सहकार क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी शासन स्तरावरूनही अनेक उपयुक्त योजना व सवलती देण्यात येतात. त्यांचा लाभ घेऊन यशस्वी होणे शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, सहकाराच्या क्षेत्रात अमाप संधी असल्या तरी विद्यार्थ्यांनी आपल्याला कोणत्या स्तरावर काम करायचे आहे, याचा निर्णय व्यक्तीगत पातळीवर घेणे गरजेचे आहे. आपापली क्षमता आणि बुद्धिमत्ता यांचा मेळ घातल्यानंतरच आपल्याला कोणती संधी मिळणार याचे निर्धारण शक्य आहे. वरिष्ठ स्तरावरील पदे हवी असतील, तर त्यासाठी आवश्यक बुद्धिमत्ता आणि परमोच्च कष्ट करण्याची तयारीही असायला हवी. लक्ष्य निर्धारित करून आतापासूनच विद्यार्थ्यांनी वाटचाल सुरू करणे हितावह असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मध्यवर्ती रोजगार कक्षाचे समन्वयक डॉ. राजन पडवळ यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. यावेळी मंचावर अधिसभा सदस्य संजय परमणे उपस्थित होते. कार्यक्रमास विविध अधिविभागांचे रोजगार कक्ष समन्वयक, शिक्षक तसेच वाणिज्य व व्यवस्थापन, एमबीए आणि अर्थशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी लक्षणीय उपस्थिती दर्शविली.

Wednesday, 17 January 2024

मराठा इतिहासाच्या संशोधनात मोडी लिपीचे महत्त्व अनन्यसाधारण: डॉ. अवनीश पाटील

शिवाजी विद्यापीठात मोडी लिपी कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात बोलताना डॉ. अवनीश पाटील. मंचावर डॉ. दत्तात्रय मचाले यांच्यासह मोडी लिपी मार्गदर्शक.


कोल्हापूर, दि. १७ जानेवारी: मराठा इतिहासाच्या संशोधनामध्ये मोडी लिपीच्या अभ्यासाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी आज येथे व्यक्त केले.

शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त इतिहास अधिविभाग, छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र, छत्रपती संभाजी महाराज संशोधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आज “मोडी लिपी प्रचार व प्रसार” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागात झाली. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. दत्तात्रय मचाले यांनी केले. त्यांनी मोडी लिपीचा इतिहास आणि मराठा काळात मोडी लिपीचा झालेला प्रसार याचा आढावा घेतला.

या कार्यशाळेच्या उद्घाटनपर मार्गदर्शनात बोलताना डॉ. अवनीश पाटील म्हणाले की, मध्ययुगीन काळातील मराठा इतिहासाच्या संशोधनासाठी मोडी लिपीचे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे. मराठा इतिहासाच्या मोडी लिपीतील साधने संपूर्ण भारतातील अभिलेखागार त्याबरोबर लंडन, पॅरिस, स्पेन, हॉलंड येथील संग्रहालयातील मोठी प्रमाणात मोडी कागदपत्रांचा संग्रह आहे. इतिहास अभ्यासकांनी या संग्रहालयातील मोडी कागदपत्रांचा अभ्यास करून अधिकाधिक संशोधन करावे, असे आवाहन केले.

या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात अमोल महल्ले यांनी मोडी लिपीच्या अक्षर वळण बाराखडीचे प्रशिक्षण आणि अक्षर ओळख करून दिली. श्री. गणेश खोडके यांनी विविध कालगणना, रेघी हिशोबाची पद्धत, जमीन मोजण्याची पद्धत, अभिलेखागारातील मोडी कागदपत्रांचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. नीलांबरी जगताप यांनी मोडीचे ज्ञान प्राप्त करून नव संशोधकांनी मराठा इतिहासात जास्तीत जास्त संशोधन करावे, असे आवाहन केले.

कार्यशाळेस कोल्हापूर शहरातील इतिहास प्रेमी, महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday, 16 January 2024

विद्यापीठ परिक्षेत्रात स्कूल कनेक्ट अभियान यशस्वी करावे: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

 

शिवाजी विद्यापीठात स्कूल कनेक्ट अभियानाच्या अनुषंगाने आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) डॉ. महादेव देशमुख, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. सरिता ठकार.

शिवाजी विद्यापीठात स्कूल कनेक्ट अभियानाच्या अनुषंगाने आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के.


कोल्हापूर, दि. १६ जानेवारी: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या अंमलबजावणीमुळे होणाऱ्या विद्यार्थी उपयोगी शैक्षणिक बदलांबाबत विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने स्कूल कनेक्ट (एन.ई.पी. कनेक्ट) संपर्क अभियान शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रात यशस्वी करावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले.

महाराष्ट्र शासनाने राज्यातील महाविद्यालयांमधील स्थूल नोंदणी प्रमाण (ग्रॉस एन्रॉलमेंट रेशो-GER) वाढविण्यासाठी व राज्यात राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० यामुळे होणाऱ्या शैक्षणिक बदलांबाबत व त्यांच्या सकारात्मक परिणामांची माहिती देण्यासाठी स्कूल कनेक्ट (एनईपी कनेक्ट) संपर्क अभियान सर्व अकृषी विद्यापीठ स्तरावर १५ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत राबविण्याबाबत कळविले आहे. त्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने संलग्नित महाविद्यालयांच्या समन्वयकांसाठी आज स्कूल कनेक्ट अभियानविषयक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्या कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरुन कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, पुढील शैक्षणिक वर्षापासून अकृषि विद्यापीठांशी संलग्नित सर्व महाविद्यालयांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी होणार आहे. उच्च शिक्षण व्यवस्थेचे संपूर्ण नूतनीकरण आणि आमूलाग्र व्यापक बदल होत असतांना, त्याविषयीची जनजागृती आणि सातत्यपूर्ण समुपदेशनाची नितांत गरज आहे. या बदलांचा सर्वाधिक परिणाम शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये कनिष्ठ महाविद्यालयांतून इयत्ता १२ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर होणार आहे. त्या अनुषंगाने, विद्यार्थीकेंद्री शिक्षण धोरणाची मूलभूत तत्त्वे परिणामकारकरित्या प्रत्यक्षात आणावयाची असतील तर, ती या वर्षीच्या बारावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत योग्य रितीने पोहचणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने स्कूल कनेक्ट अभियान हाती घेतले आहे. ते यशस्वी करणे ही शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे विविध महाविद्यालयांतील प्रथम वर्षाच्या प्रवेश क्षमतेपेक्षा कमी प्रमाणात प्रवेश नोंदणी होऊन जागा रिक्त राहत आहेत. बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थी विविध अडचणींमुळे उच्च शिक्षणापासून दूर जात आहेत. अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देताना विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या ऑनलाईन अभ्यासक्रमांबाबतची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवून स्थूल नोंदणी प्रमाण (GER) वाढविणेही आवश्यक आहे. त्या दृष्टीनेही हे अभियान व्यापक आणि सकारात्मकतेने राबविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, नूतन शैक्षणिक धोरणामध्ये पारंपरिक शिक्षण पद्धतीच्या तुलनेत आमूलाग्र बदल करण्यात आलेले आहेत. ते विद्यार्थ्यांपर्यंत, त्यांच्या पालकांपर्यंत वेळेत पोहोचविणे गरजेचे आहे. विद्यापीठ प्रशासन महाविद्यालयीन समन्वयकांना पॉवरपॉईंट सादरीकरण तयार करून देत आहे. तथापि, त्यातील विषयांच्या अनुषंगाने स्वतंत्र विचार करून, स्वयंअध्ययन करून त्याचे आकलन विद्यार्थ्यांसमोर मांडावे. त्यातून उद्भवणाऱ्या साऱ्या शंका व प्रश्न एकत्रित करून त्यातील सर्वसाधारण प्रश्न एकत्र करून त्यांची समाधानकारक उत्तरे देऊन त्यांची एक एफएक्यूबँक तयार करून सर्वांना देऊ या. अशा रितीने संपर्क अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावा.

यावेळी मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांनी उपस्थितांना स्कूल कनेक्ट (एनईपी कनेक्ट) अभियानाच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण दिले. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार आणि वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी या अभियानाची उत्तम पद्धतीने अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सूचना केल्या. उपकुलसचिव डॉ. उत्तम सकट यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले. मान्यवरांनी उपस्थितांच्या शंकांचे समाधानही केले. कार्यशाळेस विविध महाविद्यालयांचे आयक्यूएसी, एबीसी आणि एनईपी समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते.