Saturday, 30 November 2024

कामावरील असीम निष्ठेतूनच खेडकर यांच्या हातून

शिवाजी महाराजांचे भव्य शिल्प साकार: सीमा खेडकर-शिर्के

 शिवाजी विद्यापीठात शिवछत्रपतींच्या पुतळ्याचा सुवर्णमहोत्सव समारंभ उत्साहात

शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त विद्यापीठामार्फत विशेष माहितीपुस्तिकेचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) परीक्षा संचालक डॉ. अजितसिंह जाधव, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, सीमा खेडकर-शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील व डॉ. अवनिश पाटील.

शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त पुतळ्याचे शिल्पकार बी.आर. खेडकर यांच्या कुटुंबियांचा विद्यापीठामार्फत विशेष सत्कार करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्यासह मान्यवर.

शिवाजी विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण सुवर्महोत्सव समारंभात बोलताना शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के. मंचावर (डावीकडून) डॉ. अजितसिंह जाधव, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. विलास शिंदे, डॉ. सुहासिनी पाटील आणि डॉ. अवनिश पाटील.



छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुवर्णमहोत्सवाच्या पूर्वसंध्येला अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह शिल्पकार बी.आर. खेडकर यांचे कुटुंबिय व अन्य अधिकारी  

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने पुतळ्याच्या माहितीफलकाचे अनावरण प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, सीमा खेडकर-शिर्के यांच्यासह खेडकर कुटुंबिय, विद्यापीठाचे अधिकारी, अधिकार मंडळांचे सदस्य आणि मान्यवर नागरिक

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या सुवर्ममहोत्सवाच्या पूर्वसंध्येला पुतळ्यासमोर पोवाडा सादरीकरण करताना शाहीर डॉ. आझाद नायकवडी. समोर उपस्थित मान्यवर आणि नागरिक.




कोल्हापूर, दि. ३० नोव्हेंबर: आपल्या कामावरील असीम निष्ठेमुळेच शिल्पकार बी.आर. खेडकर यांच्या हातून शिवाजी विद्यापीठासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य, देखणे शिल्प तयार झाले, असे भावनिक उद्गार त्यांच्या कन्या तथा शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के यांनी आज येथे काढले.

शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणाचा सुवर्णमहोत्सव दिन आज विद्यापीठात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

सीमा खेडकर-शिर्के यांनी आपल्या भाषणात श्री. खेडकर यांनी छत्रपतींच्या या पुतळ्याच्या निर्मितीविषयी सांगितलेल्या आठवणी आणि त्यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात आढावा घेतला. त्या म्हणाल्या, खेडकर यांनी मोठी मेहनत व चिकाटीने शिवाजी विद्यापीठातील या शिवशिल्पाचे काम केले. सुरवातीला त्यांच्याकडे काम देण्याविषयी साशंक असणाऱ्या लोकांनीही हे काम पाहून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार आणि खेडकर यांच्या एकमेकांशी सातत्यपूर्ण चर्चेतून हे शिवरायांचे देखणे शिल्प साकार झाले. त्यावेळी हा पुतळा आशिया खंडातला सर्वात मोठा म्हणून गणला गेला. ऊन, वारा, पाऊस झेलत गेली ५० वर्षे हा पुतळा दिमाखदारपणे उभा आहे, हेच खेडकर यांच्या शिल्पकलेचे मोठेपण आहे. आजच्या शिल्पकारांसाठी त्यांचे हे काम आदर्शवत स्वरुपाचे आहे. असे खेडकरांनी ५०० हून अधिक पुतळे साकारले. विशेष म्हणजे ७१ व्या वर्षी त्यांना अर्धांगवायू झाला. त्यानंतर सुद्धा त्यांनी एका हाताने १५० पुतळे साकारले. सन २०२६ हे बी.आर. खेडकर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्या निमित्ताने जानेवारी २०२५मध्ये शिवाजी विद्यापीठात शिल्पकला कार्यशाळा भरविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाची स्थापना आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यामागील प्रेरणा सांगितल्या. ते म्हणाले, डॉ. आप्पासाहेब पवार हे द्रष्टे कुलगुरू आणि महान इतिहासकार होते. त्यांच्या मनात छत्रपती शिवरायांची विशिष्ट छबी होती. ती या पुतळ्याच्या माध्यमातून त्यांनी खेडकर यांच्याकरवी साकार करून घेतली. खेडकरांनीही जीव ओतून काम केल्याने मूर्तीमध्ये जिवंतपणा उतरला. सर्व घटकांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे घडलेला हा पुतळा अखिल महाराष्ट्राचे वैभव आणि प्रेरणास्थान आहे.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ. आप्पासाहेब पवार यांच्यासारख्या जाणकार इतिहासकाराची नजर आणि खेडकरांसारख्या कसलेल्या शिल्पकाराचे कसब यांचा संगम म्हणजे शिवछत्रपतींचा हा पुतळा आहे. या पुतळ्याच्या उभारणीत कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती, दूधगंगा-वेदगंगा, कुंभी-कासारी, वारणा आणि पंचगंगा या पाच सहकारी साखर कारखान्यांच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचाही हातभार लागला आहे, तर परिसरातील नागरिकांनीही निधी दिला आहे. लोकसहभागातून शिवरायांचा हा पुतळा उभा राहिल्याने त्याला आणखी वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. येथून पुढे दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस या पुतळ्याचा अनावरण दिन म्हणून साजरा केला जाईल आणि त्या दिवशी पुतळ्याभोवती रोषणाई सुद्धा केली जावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

माहितीपुस्तिका, रील व माहितीपटाचे लोकार्पण

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी संकलित व संपादित केलेल्या विशेष माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे जनसंपर्क कक्षाद्वारे निर्माण करण्यात आलेली पुतळ्याची माहिती देणारी रील आणि १५ मिनिटांची लघुचित्रफीत यांचेही लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने मा. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. या चित्रफीती नागरिकांना विद्यापीठाच्या शिव-वार्ता (@ShivVarta) या युट्यूब वाहिनीवर पाहता येतील.

पुतळ्याच्या माहितीफलकाचे अनावरण

या कार्यक्रमानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याची माहिती देणाऱ्या फलकाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. विद्यापीठ परिसरात या माहिती फलकाची प्रस्थापना करण्यात येणार आहे.

खेडकर यांच्या नऊ कन्यांचा एकत्र सत्कार

शिल्पकार बी.आर. खेडकर यांना एकूण नऊ मुली आहेत. आज शिवाजी विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अनावरण दिन समारंभाच्या निमित्ताने या सर्व भगिनींना सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात आले आणि त्यांचा कुटुंबियांसह शाल, श्रीफळ व शिवछत्रपतींच्या पुतळ्याची प्रतिकृती देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये सीमा शिर्के-खेडकर, प्रतिभा ओव्हाळे, शोभा राजे, उज्ज्वला राजे, जयश्री भालेराव, अंजली पाषाणकर, प्रविणा पुरेकर आणि तृप्ती पुरेकर यांचा समावेश राहिला.

यावेळी इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. नंदिनी पाटील व धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांचे सन्माननीय सदस्य, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

शाहीर डॉ. आझाद नायकवडी यांच्या पोवाड्यांनी वातावरण शिवमय

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुवर्णमहोत्सवी पुतळ्याभोवतीच्या वर्तुळ उद्यानामध्ये शाहीर डॉ. आझाद नायकवडी आणि त्यांच्या साथीदारांनी छत्रपतींची स्वराज्य स्थापना आणि त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठातील शिवाजी महाराज निर्मितीच्या इतिहासाचा पोवाडा सादर करून वातावरण शिवमय करून सोडले. या पोवाडा सादरीकरण कार्यक्रमास नागरिकांचा, विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तत्पूर्वी, कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले.

पुतळ्यास आकर्षक विद्युतरोषणाई आणि फुलांची आरास

पुतळा अनावरण सुवर्णमहोत्सव दिनाच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यास साजेसा भव्य हार, संपूर्ण पुतळ्याला शोभिवंत फुलांच्या माळांची आरास आणि पुतळा परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी या पुतळ्यासमवेत छायाचित्रे काढण्यासाठी नागरिकांसह विद्यार्थी-विद्यार्थिनींची मोठी गर्दी झाली.

 

Friday, 29 November 2024

लोकांच्या प्रेमादरास पात्र ठरल्यानेच संविधान यशस्वी: डॉ. अशोक चौसाळकर

 

शिवाजी विद्यापीठात भारतीय संविधान अमृतमहोत्सव सप्ताहानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर. मंचावर (डावीकडून) डॉ. तानाजी चौगुले, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. प्रकाश पवार व डॉ. प्रल्हाद माने.

शिवाजी विद्यापीठात भारतीय संविधान अमृतमहोत्सव सप्ताहानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर. 

(डॉ. अशोक चौसाळकर यांच्या व्याख्यानाची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. २९ नोव्हेंबर: संविधान ही भारतीय लोकांनी आपल्या जीवनाची प्रेरणाशक्ती मानली. हे संविधान लोकांच्या प्रेमादरास पात्र ठरल्यानेच गेली ७५ वर्षे यशस्वीपणे टिकले आणि यापुढेही टिकेल, असा विश्वास ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी आज येथे व्यक्त केला.

शिवाजी विद्यापीठात आयोजित भारतीय संविधान अमृतमहोत्सव सप्ताहामध्ये भारतीय संविधानाचे आजच्या भारतासाठीचे महत्त्व या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. प्रकाश पवार होते.

डॉ. चौसाळकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत भारतीय संविधानाची प्रस्तुतता अत्यंत मुद्देसूदरित्या मांडली. ते म्हणाले, संविधानातील विचार हे देशातील जनतेला मान्य असल्यानेच त्यांचा समावेश राज्यघटनेत करण्यात आला, हे लक्षात घेतले पाहिजे. संविधानाचे तत्त्वज्ञान हे सामाजिक, आर्थिक व राजकीय चळवळींतून साकार झाले आहे. लोकमान्य टिळकांपासून महात्मा गांधी यांच्यापर्यंत भारतीय स्वातंत्र्याचे तत्त्वज्ञान अभिव्यक्त झाले. राजा राममोहन रॉय, महात्मा फुले यांच्यापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत सामाजिक चळवळींचे तत्त्वज्ञान आकारास आले. या साऱ्या चळवळींचे तत्त्वज्ञान संविधानामध्ये ग्रथित झाल्याचे दिसते. मार्गदर्शक तत्त्वांमधील अनेक तरतुदी या देशाच्या गेल्या दीडशे वर्षांच्या सुधारणांची परंपरा सांगणाऱ्या आहेत. संविधानातील या प्रेरक तत्त्वांद्वारेच भारतीय जनता प्रगती करते आहे.

समतेचा अधिकार, जगण्याचा अधिकार आणि अभिव्यक्तीचा अधिकार हा राज्यघटनेने भारतीयांना प्रदान केलेला सुवर्ण त्रिकोण असल्याचे सांगून डॉ. चौसाळकर म्हणाले, राज्यघटनेने लोकांना अनेक अधिकार दिलेले आहेत. तथापि, ते अधिकार लक्षात घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्यास व्यवस्थेला भाग पाडणे महत्त्वाचे असते. संघर्ष, चळवळींशिवाय आणि मागण्या मांडल्याखेरीज अधिकार प्राप्त होत नाहीत, हे गेल्या ७५ वर्षांच्या संवैधानिक वाटचालीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जीवनात राज्यघटनेचे महत्त्व आहेच, पण जेव्हा लोक आपले अधिकार शाबीत करून घेतात, तेव्हा ते सिद्ध होते. न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार हा लोकशाहीतला सर्वात मोठा अधिकार संविधानाने आपल्याला दिल्याचेही त्यांनी सांगितले.

सामाजिक क्रांतीच्या वाटचालीत राज्यघटना विकसित होत जाते. मार्गदर्शक तत्त्वांच्या साथीने हे विकसन आपल्याला घडवित जावे लागेल. राज्यघटनेतील तरतुदींचे प्रत्यक्ष लाभ लोकांना व्हायला हवेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेतल्या अखेरच्या भाषणात आपण मागास समाजासाठी प्रागतिक राज्यघटना देत असल्याचे सांगून हा अंतर्विरोध लवकरात लवकर कमी करण्याविषयी सूचित केले होते. तसे करण्यात आपण यशस्वी ठरलो तरच भारतीय राज्यघटना खऱ्या अर्थाने देशाचे आत्मचरित्र ठरेल, असे मतही डॉ. चौसाळकर यांनी व्यक्त केले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. प्रकाश पवार म्हणाले, राज्यघटनेने भारतीय नागरिकांच्या जीवनात क्रांती घडवून आणली आहे. तिने लोकांना सामाजिक गुलामगिरीकडून मुक्त वातावरणात आणले आहे. देशातील समग्र सामाजिक, आर्थिक आणि वैचारिक परिस्थिती पालटण्यासाठी राज्यघटनेने बळ दिलेले आहे. भारतीय संविधानाची मागणी व मुद्दे हे स्वातंत्र्य चळवळीतून पुढे आल्याचे डॉ. चौसाळकर यांचे प्रतिपादन लक्षात घेता संविधान हे वेस्टमिन्स्टर मॉडेल नसून भारतीयत्वातूनच पुढे आल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणाले.

यावेळी स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रल्हाद माने यांनी केले. डॉ. सुखदेव उंदरे यांनी परिचय करून दिला. अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले, तर मतीन शेख यांनी आभार मानले. कार्यक्रमास वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, डॉ. चंद्रकांत लंगरे, डॉ. रविंद्र भणगे, डॉ. प्रकाश कांबळे, विलास सोयम यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सप्ताहाचा उद्या समारोप

शिवाजी विद्यापीठाच्या भारतीय संविधान अमृतमहोत्सव सप्ताहाचा समारोप समारंभ उद्या, शनिवारी (दि. ३०) होणार आहे. समारोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील डॉ. रविनंद होवाळ हे उपस्थित राहणार असून भारतीय संवैधानिक मूल्ये या विषयावर विशेष व्याख्यान देतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के असतील.

प्रश्नमंजुषा स्पर्धा १५ डिसेंबरपर्यंत

विद्यापीठाने शिव-वार्ता (@ShivVarta) या युट्यूब वाहिनीवर श्याम बेनेगल दिग्दर्शित संविधान: दि मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन या मालिकेच्या दहा भागांची प्लेलिस्ट ठेवली आहे. त्या मालिकेवर आधारित खुली ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. मालिका पाहून झाल्यानंतर https://forms.gle/jmUK9zNHZ2goG5iK9 या लिंकवर जाऊन प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होता येईल. प्रश्नमंजुषा सोडविल्यानंतर सहभागींना विद्यापीठाचे ऑनलाईन प्रमाणपत्रही मिळणार आहे. ही स्पर्धा १५ डिसेंबरपर्यंत खुली राहणार असून त्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले आहे.

Thursday, 28 November 2024

सद्गुणी लोकशाहीसाठी सत्यान्वेषी राजकारण नव्याने उभारण्याची गरज: डॉ. सुरेंद्र जोंधळे

 

शिवाजी विद्यापीठात संविधान अमृतमहोत्सव सप्ताह विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. सुरेंद्र जोंधळे.

शिवाजी विद्यापीठात संविधान अमृतमहोत्सव सप्ताह विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. सुरेंद्र जोंधळे. मंचावर (डावीकडून) डॉ. तानाजी चौगुले, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. प्रकाश पवार, डॉ. प्रल्हाद माने.

(डॉ. सुरेंद्र जोंधळे व्याख्यानाची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. २८ नोव्हेंबर: गेल्या ७५ वर्षांत भारतीय लोकशाहीचा अवकाश घटनात्मक ते प्रातिनिधिक आणि पुढे प्रातिनिधिक ते मतदानकेंद्री असा आक्रसत गेला. या लोकशाहीचे पुनश्च सद्गुणी लोकशाहीत रुपांतर करण्यासाठी सत्यान्वेषी राजकारण नव्याने उभे करण्याची गरज निर्माण झालेली आहे, असे प्रतिपादन राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. सुरेंद्र जोंधळे यांनी आज येथे काढले.

शिवाजी विद्यापीठात आयोजित भारतीय संविधान अमृतमहोत्सव सप्ताहामध्ये आज संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समता आणि धर्मनिरपेक्षता या विषयावरील विशेष व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश पवार होते.

डॉ. जोंधळे यांनी आपल्या व्याख्यानात भारतीय संविधानाच्या ७५ वर्षांच्या वाटचालीचा समग्र वेध घेत लक्षवेधी मांडणी केली. ते म्हणाले, गेल्या ७५ वर्षांत सवंग लोकप्रिय राजकारण घडविण्यात आले. त्यातून लोकांच्या सार्वजनिक जीवनाचे अवमूल्यन झाले. नागरिकांच्या हक्कांचा संकोच होत गेला. देशाप्रती कर्तव्याची भावना निरंतर विरळ होत गेली. अशा सामाजिक उणीवा दूर करण्यासाठी कटिबद्ध होण्याची गरज आहे. भारताला पूर्वापार खंडण-मंडणाची चर्चात्मक वादविवादाची परंपरा लाभलेली आहे. तथापि, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रवास आता भीती, भक्ती आणि आभास असा होऊ लागला आहे. तो रोखण्यासाठी आपल्याला पुन्हा या भारतीय परंपरेकडे वळून चर्चेचा आग्रह धरला पाहिजे. लोकशाहीचे पुनर्शोधन, पुनर्संशोधन केले पाहिजे. त्यातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला एक व्यक्ती-एक मत यापुढील एक व्यक्ती-एक मूल्य हा प्रवास भारताला करता येऊ शकेल. भारतीय संविधानात उल्लेखित जनता (वुई दि पीपल) यापासून नागरिक (सिटीझन) ते लाभार्थी (बेनिफिशरी) हे स्थित्यंतरही विदारक आहे. त्यामुळे लोकशाहीच्या मूलतत्त्वांशी फारकत न घेता सांविधानिक नैतिकता वृद्धिंगत करणे आणि समता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता या मूल्यांचे संतुलन सांभाळणे ही आजघडीची मोठी गरज आहे.

डॉ. जोंधळे म्हणाले, लोकशाही स्वातंत्र्याची गळचेपी करणारी आणीबाणी एका टप्प्यावर या देशावर लादली गेली. मात्र, जिथे आणीबाणी आणली गेली, तिथे त्या पंतप्रधानांचा पराभवही होतो, हे नजीकच्या काळात नागरिकांनी दाखवून दिले. हे भारतीय संविधानाचे, लोकशाहीचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून सांगता येईल. संविधानातील मार्गदर्शक तत्त्वे ही प्रमुख आधार असून दीपस्तंभासारखे देशाला दिशा दाखविण्याचे काम करतात. राज्यघटनेची सैद्धांतिकता ही लोकांचे व्यक्ती म्हणून सममूल्य अधोरेखित करते. व्यक्ती आणि समूह यांच्या संघर्षातून सामाजिक वातावरण गढूळते. हा संघर्ष होऊ नये, यासाठी सांविधानिक मूल्येच मार्गदर्शक ठरतात. प्रत्येक शासनसंस्थेने वैधानिक नियंत्रण स्वीकारायला हवे. आपल्या कल्याणकारी राज्याला उदारमतवादी विचारप्रणालीची चौकट आहे, याची जाणीवही शासनकर्त्यांनी सदोदित बाळगली पाहिजे, असेही ते म्हणाले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. प्रकाश पवार म्हणाले, धर्मनिरपेक्षता ही संकल्पना भारतीय संविधानाने पाश्चात्यांकडून नव्हे, तर भारतीयांची गरज म्हणून स्वीकारली. व्यक्तीचे वर्तन धर्माने नियंत्रित केलेले असू नये, तर देशाचा नागरिक म्हणून ते नियंत्रण असले पाहिजे, ही जाणीव त्यामागे आहे. देशाला जडलेला विषमतेचा आजार दूर करण्यासाठी धर्मनिरपेक्षता मूल्य उपयुक्त ठरते. देशातील नागरिकांचे व्यक्तीगत आणि सार्वजनिक जीवन कलुषित करणारे विपर्यस्त संप्रेषण रोखणे हे आपल्यासमोरील मोठे आव्हान आहे.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक नेहरू अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. प्रल्हाद माने यांनी केले. डॉ. सुखदेव उंदरे यांनी परिचय करून दिला. अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले, तर मतीन शेख यांनी आभार मानले. यावेळी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. ओमप्रकाश कलमे, श्रीराम पवार, डॉ. नितीन माळी, डॉ. चंद्रकांत लंगरे, विलास सोयम, डॉ. विद्यानंद खंडागळे, डॉ. दीपा श्रावस्ती, डॉ. तेजपाल मोहरेकर आदींसह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


संविधान अमृतमहोत्सव सप्ताहांतर्गत आयोजित गटचर्चेत बोलताना डॉ. प्रकाश पवार. मंचावर (डावीकडून) अविनाश भाले, डॉ. प्रल्हाद माने व डॉ. दीपा श्रावस्ती

संविधान साक्षरताविषयावर गटचर्चा

संविधानामुळे भारतीय नागरिकांच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन झाले आहे, असा सूर संविधान साक्षरता या विषयावर झालेल्या गटचर्चेत उमटला. संविधान अमृतमहोत्सव सप्ताहांतर्गत या गटचर्चेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने करण्यात आले.

संविधानामुळे महिलांच्या आयुष्यात परिवर्तन झाले आहे. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संविधानाची उपयुक्तता आहे याचे भान महिलांच्यामध्ये निर्माण होणे व त्याविषयी त्या जागृत असणे म्हणजे संविधान साक्षरता आहे, असे डॉ. दीपा श्रावस्ती  म्हणाल्या. तर, संविधान साक्षर असलेला नागरिकच संविधांचे रक्षण करू शकेल. संविधानाने प्रदान केलेल्या हक्क व कर्तव्यांविषयी जागृत असणे म्हणजे संविधान साक्षरता होय, असे डॉ. प्रल्हाद माने म्हणाले. 

अध्यक्षीय समारोप करताना डॉ. प्रकाश पवार म्हणले, भारतीय संविधानामध्ये स्वातंत्र्यपूर्व  सामाजिक व राजकीय चळवळीचा अर्क आहे. भारतीय समाजजीवनामध्ये निर्माण झालेल्या सर्व प्रकारच्या समस्या सोडविण्याची शक्ती भारतीय संविधानात आहे. अविनाश भाले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. किशोर खिलारे यांनी आभार मानले. या गटचर्चेत विविध अधिविभागातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी व सामजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदविला.


डॉ. अशोक चौसाळकर यांचे उद्या व्याख्यान

विद्यापीठाच्या भारतीय संविधान अमृतमहोत्सव सप्ताहामध्ये उद्या, शुक्रवारी (दि. २९) सकाळी ११ वाजता मानव्यशास्त्र सभागृहात ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांचे भारतीय संविधानाचे आजच्या भारतासाठीचे महत्त्व या विषयावर व्याख्यान होईल.

Wednesday, 27 November 2024

भारतीय संविधान हेच देशाचे पथदिग्दर्शक जीपीएस: डॉ. श्रीरंजन आवटे

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. श्रीरंजन आवटे. मंचावर (डावीकडून) डॉ. तानाजी चौगुले, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. नंदकुमार मोरे आणि डॉ. रणधीर शिंदे.

(पोस्टर प्रदर्शन व डॉ. श्रीरंजन आवटे व्याख्यानाची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. २७ नोव्हेंबर: भारतीय संविधान हेच आपल्या देशाचे पथदिग्दर्शक जी.पी.एस. आहे. त्यामुळे या संविधान निर्मितीचा खरा इतिहास समजून घेणे, हाच विकसित भारताकडे जाण्याचा योग्य मार्ग आहे, असे प्रतिपादन पुणे येथील राज्यशास्त्र व भारतीय संविधानाचे अभ्यासक डॉ. श्रीरंजन आवटे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठात भारतीय संविधान अमृतमहोत्सव सप्ताहांतर्गत भारतीय संविधान आणि विकसित भारत या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानामध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे होते.

डॉ. आवटे म्हणाले, डिजीटल मॅप्समध्ये जशी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) ही नेव्हिगेशनसाठी वापरली जाते, त्याचप्रमाणे भारत देशाचा नागरिक म्हणून आपल्या व्यक्तीगत आणि सामूहिक नेव्हिगेशनला दिशा देणारे आणि योग्य दिशेने नेणारे संविधान हे आपल्या देशाचे जीपीएस आहे, या अंगाने संविधानाचा परिचय विद्यार्थ्यांना, नव्या पिढीला करून देणे आवश्यक आहे. त्यांना आपल्या देदीप्यमान इतिहासाची जाणीव करून देणे आजघडीला सार्वत्रिक गरजेची बाब आहे. त्या दृष्टीने संविधानकर्त्यांनी दिलेल्या योगदानाची माहिती त्यांना दिली पाहिजे. संविधानाने प्रत्येकाला मताधिकार देऊन हरेक व्यक्तीचा लोकशाही प्रक्रियेतील सहभाग अधोरेखित केला ही फार मोठी बाब आहे. बहुसंख्य समाज अशिक्षित असला तरी त्या समाजाच्या सामूहिक शहाणपणावर संविधानकर्त्यांचा पूर्ण विश्वास होता. हे सामूहिक समंजसपण जपणे आजघडीला अत्यंत महत्त्वाचे आहे.

संविधान हा सामूहिक स्वप्नसंहितेचा ऐवज असल्याचे सांगून डॉ. आवटे म्हणाले, संविधानकर्त्यांनी विकसित भारताची संकल्पनाच संविधानाच्या प्रत्येक कलमामध्ये मांडून ठेवली आहे. त्या संविधानामधील आशय जपला जाईल आणि त्या माध्यमातून देशातील समग्र घटकांचे हित साधले जाईल, याची दक्षता घेण्याची जबाबदारी व्यवस्थेवर आहे. संविधानाची उद्देशिका हे अवघे एकच दीर्घवाक्य असले तरी त्यामध्ये आम्हा भारतीय लोकांना कशा प्रकारचा भारत हवा आहे, तो निर्माण करण्यासाठी आपण काय करणार, याची वचनबद्धता अभिप्रेत आहे. लोकांना अर्पण केलेले हे जगातील एकमेव संविधान आहे. देशातील प्रत्येक समाजघटकांच्या प्रतिनिधींचा या संविधानसभेत समावेश होता. या सर्वांमध्ये खूप मोठ्या मंथनाअंती संविधानाची संपूर्ण संरचना साकार झाली आहे. भारताची बहुसांस्कृतिकता ही अतिशय लक्षणीय आहे. म्हणूनच भारताची धर्मनिरपेक्षतेची संकल्पना ही वैशिष्ट्यपूर्ण स्वरुपाची ठरते. नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन संसाधनांचे न्याय्य वाटप हे भारतीय समाजवादाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. म्हणजेच या बाबी संविधानात अस्तित्वात होत्याच. ४२ व्या घटनादुरुस्तीने केवळ त्या उद्देशिकेत अधोरेखित करण्यात आल्या इतकेच. तीच बाब स्वातंत्र्य व समता यांच्या सहअस्तित्वाची आणि बंधुता या शब्दातील सहभावाची आहे. फ्रेंच राज्यक्रांतीतून नव्हे, तर बुद्धाच्या भारतीय परंपरेतून ती संविधानात समाविष्ट झालेली आहेत, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. नंदकुमार मोरे म्हणाले, डॉ. आवटे यांनी संविधान निर्मितीच्या इतिहासातील सौंदर्यस्थळांची अत्यंत तपशीलवार चर्चा केली. त्यातून भारताच्या अंतरंगातील अनेकरंगी बहुसांस्कृतिक बांधणीची जटिल प्रक्रिया त्यांनी विषद केली आणि त्याच्या संविधानातील समावेशनाबाबतही अवगत केले. संविधानामध्ये देशातील सर्व घटकांच्या आवाजाची दखल असून त्याची लोकाभिमुखता ही फार मौलिक बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून वक्त्यांचा परिचय करून दिला. सुखदेव एकल यांनी आभार मानले. अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, डॉ. अविनाश सप्रे, डॉ. प्रकाश पवार, डॉ. अवनीश पाटील, डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. चंद्रकांत लंगरे, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. कैलास सोनावणे विलास सोयम, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. विद्यानंद खंडागळे, अविनाश भाले, डॉ. किशोर खिलारे आदींसह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठात आयोजित संविधानाधारित पोस्टर प्रदर्शनाची पाहणी करताना डॉ. चंद्रकांत लंगरे, डॉ. नंदकुमार मोरे आणि डॉ. श्रीकृष्ण महाजन.


संविधानाधारित पोस्टर प्रदर्शनास प्रारंभ

शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र इमारतीमध्ये संविधान अमृतमहोत्सव सप्ताहांतर्गत आज विशेष पोस्टर प्रदर्शनाचेही वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. शिक्षणशास्त्र अधिविभागाने आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचा मध्यवर्ती विषय भारतीय संविधानिक मूल्ये आणि शिक्षण असा असून या संकल्पनेवरील २० हून अधिक पोस्टर विद्यार्थ्यांनी प्रदर्शित केली आहेत. हे प्रदर्शन ३० नोव्हेंबरपर्यंत पाहण्यास खुले राहील.

डॉ. सुरेंद्र जोंधळे यांचे उद्या व्याख्यान

संविधान अमृतमहोत्सव सप्ताहांतर्गत उद्या, गुरूवारी (दि. २८) सकाळी ११ वाजता ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुरेंद्र जोंधळे यांचे भारतीय संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समता आणि धर्मनिरपेक्षता या विषयावर मानव्यशास्त्र सभागृहात व्याख्यान होईल.

Tuesday, 26 November 2024

माध्यमांनी स्वयंनियमन करावे

 शिवाजी विद्यापीठातील गोलमेज परिषदेतील सूर

शिवाजी विद्यापीठात संविधान अमृतमहोत्सव सप्ताहानिमित्त आयोजित गोलमेज परिषदेत (डावीकडून) उदय कुलकर्णीप्रशांत आयरेकर, अविनाश भाले, डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. श्रीकृष्ण महाजन, शीतल धनवडे, श्रीराम पवार, चारुदत्त जोशी, कृष्णात जमदाडेसमीर मुजावरडॉ. चंद्रकांत लंगरे यांच्यासह अन्य मान्यवर.

शिवाजी विद्यापीठात संविधान अमृतमहोत्सव सप्ताहानिमित्त आयोजित गोलमेज परिषदेत बोलताना डॉ. श्रीकृष्ण महाजन. शेजारी डॉ. शिवाजी जाधव व शीतल धनवडे.


शिवाजी विद्यापीठात संविधान अमृतमहोत्सव सप्ताहानिमित्त आयोजित गोलमेज परिषदेत कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने तयार केलेल्या संविधानाच्या उद्देशिकेचे प्रकाशन करताना प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन, श्रीराम पवार, शीतल धनवडे, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. आलोक जत्राटकर, कृष्णात जमदाडे, समीर मुजावर, उदय कुलकर्णी, प्रशांत आयरेकर, डॉ. चंद्रकांत लंगरे, अविनाश भाले यांच्यासह अन्य मान्यवर.


(भारतीय संविधान आणि प्रसारमाध्यमे या विषयावरील गोलमेज परिषदेची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. २६ नोव्हेंबर: लोकशाही मूल्ये टिकण्यासाठी प्रसारमाध्यमांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे. भारतीय राज्यघटनेने माध्यमांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कायदे करुन सक्तीचे नियंत्रण आणणे योग्य नाही. यासाठी माध्यमांनी स्वतःच माध्यमांचे नियमन करावे, असा सूर भारतीय राज्यघटना आणि प्रसारमाध्यमेया विषयावर आयोजित गोलमेज परिषदेत मान्यवर वक्त्यांनी व्यक्त केला.

शिवाजी विद्यापीठाचा मास कम्युनिकेशन अधिविभाग, जनसंपर्क कक्ष आणि कोल्हापूर प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मास कम्युनिकेशन विभागात परिषद आयोजित करण्यात आली. अध्यक्षस्थानी वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन होते. परिषदेत ज्येष्ठ पत्रकार-संपादक श्रीराम पवार, ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी, बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी, ‘एसपीएन न्यूजचे संपादक कृष्णात जमदाडे, इंडिया टीव्हीचे समीर मुजावर, कॅमेरामन प्रशांत आयरेकर, इंग्रजी अधिविभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. चंद्रकांत लंगरे, सामाजिक समावेशन केंद्राचे अविनाश भाले, प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले.

श्रीराम पवार म्हणाले, पत्रकारांचा आवाज कायद्याच्या आधारे दाबणे चुकीचे आहे. कोणत्याही सरकारला आपल्याविरुद्ध जनमत तयार करणारी पत्रकारिता नको असते. तथापि, माध्यमांवर सरकारकडून नियंत्रण न येता माध्यमांनी स्वयंनियमन करीत स्वतःच स्वतःवर काही निर्बंध घालून घ्यावेत. समाजानेही या दृष्टीने सजग राहणे आवश्यक आहे.

चारुदत्त जोशी म्हणाले, माध्यमकर्मी संविधानाने प्रदान केलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल सजग आहेत, मात्र जबाबदारी आणि स्वयंशिस्त या बाबतीत मात्र कमी पडतात. डिजिटल माध्यमांच्या नावाखाली सुरू असलेल्या उथळ पत्रकारितेचाही गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. त्यांच्या अनिर्बंध वर्तनामुळे चांगले पत्रकार आणि माध्यमे यांची मुस्कटदाबी होते. पत्रकारितेतील पूर्वीची अनुभवी पिढी आणि नवी स्मार्ट पिढी यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण होणे आवश्यक आहे.

कृष्णात जमदाडे म्हणाले, भारतीय संविधान लवचिक आहे. संविधानात बदलाची तरतूद करण्यात आली असून ते संविधानाचे सौंदर्य आहे. परंतु हे बदल करत असताना ज्यांच्यासाठी बदल करायचे आहेत, त्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवले पाहिजे. माध्यमांना राज्यघटनेने अभिव्यक्ती दिली आहे. म्हणून माध्यमांची जबाबदारी वाढलेली आहे.

ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी म्हणाले, लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित नाही. लोकशाहीत माध्यमांचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. परंतु अलिकडे भारतातील माध्यम स्वातंत्र्याचा निर्देशांक जगातील इतर देशांच्या तुलनेने खूपच खालच्या पातळीवर म्हणजे अखेरच्या वीस देशांत आहे. ही स्थिती बदलण्यासाठी माध्यमांच्या विश्वासार्हतेवर आणि माध्यम साक्षरतेवर विशेष भर द्यावा लागेल.

माध्यमांनी समाजाचे हित डोळ्यासमोर ठेवून पत्रकारिता करावी, अशी अपेक्षा प्रशांत आयरेकर यांनी व्यक्त केली. कॅमेर्‍याद्वारे टिपलेली माहिती पुरावा म्हणून सादर केली जात असल्याने कॅमेर्‍याचे महत्त्व वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. समीर मुजावर यांनी भारतीय राज्यघटनेतील विविध कलमांचा उल्लेख करून राज्यघटना माध्यमांसाठी आणि पत्रकारांसाठी अत्यंत मौलिक असल्याचे म्हटले.

डॉ. चंद्रकांत लंगरे म्हणाले, भारताचे संविधान डोळसपणे वाचले पाहिजे. संविधानात लोकल टू ग्लोबल आशय आहे. तो समजून घेणे गरजेचे आहे. डॉ. आंबेडकर यांना जगातील अनेक विचारवंतांचा सहवास लाभला होता. शिवाय फ्रेंच राज्यक्रांतीतील स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांनी ते प्रभावित झाले होते. या सर्वांचे प्रतिबिंब भारतीय राज्यघटनेत दिसते. अविनाश भाले यांनी राज्यघटनेत बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील सर्व उपेक्षित, वंचित घटकांचा विचार केला. त्यांनी या घटकांसाठी आपली पत्रकारिता वापरली. मुख्य प्रवाहातील माध्यमांनी समाजातील उपेक्षित घटकांना स्थान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. श्रीकृष्ण महाजन म्हणाले, विकासाचा संबंध आर्थिक वृद्धीशी लावला जातो, परंतु तो शाश्वत मूल्यांवरून मोजला गेला पाहिजे. समाधान आणि आनंद या बाबीही विकासाच्या संकल्पनेत विचारात घ्याव्यात. प्रसारमाध्यमांमध्ये समाजाचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता आहे. सरकारला संवेदनशील बनविण्याचे काम माध्यमे करू शकतात. धोरणांची निर्मिती आणि त्याच्या अंमलबजावणीत माध्यमांची भूमिका विशेष महत्त्वाची ठरते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मितीवेळी अनेक बाबींचा विचार केला होता. विशेषतः देश एकसंध राहावा, अशी त्यांची भूमिका होती. देश एक ठेवण्यात संविधान उपयुक्त आहेच, परंतु प्रसारमाध्यमेही या कामी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने तयार केलेल्या संविधानाच्या उद्देशिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी आभार मानले. यावेळी हिंदी विभागाचे डॉ. प्रशांत मुंज, प्रशांत चुयेकर, डॉ. सुमेधा साळुंखे, जयप्रकाश पाटील, अनुप जत्राटकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.