Thursday, 30 January 2025

‘होय होय वारकरी’ पुस्तकात वारकरी परंपरांचा चिकित्सक वेध: प्रा. प्रवीण बांदेकर

 

शिवाजी विद्यापीठात 'होय होय वारकरी' ग्रंथावरील चर्चेत बोलताना प्रा. प्रवीण बांदेकर. मंचावर डॉ. रणधीर शिंदे व प्राचार्य गोविंद काजरेकर

शिवाजी विद्यापीठात 'होय होय वारकरी' ग्रंथावरील चर्चेत बोलताना डॉ. श्रीरंग गायकवाड. मंचावर (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, प्राचार्य गोविंद काजरेकर,  प्रा. प्रवीण बांदेकर, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, ज्ञानेश्वर बंडगर, डॉ. नंदकुमार मोरे


 शिवाजी विद्यापीठात 'होय होय वारकरी' ग्रंथावरील चर्चेत बोलताना प्राचार्य गोविंद काजरेकर 

शिवाजी विद्यापीठात 'ज्ञानबातुकाराम' या विशेष वार्षिकांकाचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, प्राचार्य गोविंद काजरेकर,  प्रा. प्रवीण बांदेकर, डॉ. श्रीरंग गायकवाड, ज्ञानेश्वर बंडगर, डॉ. नंदकुमार मोरे.

('होय होय वारकरी' ग्रंथावरील चर्चेची लघुचित्रफीत)






कोल्हापूर, दि. ३० जानेवारी: वारकरी संप्रदायाच्या परंपरांचा चिकित्सक वृत्तीने वेध घेणारे होय होय वारकरी हे मराठीतील एक महत्त्वाचे पुस्तक आहे, असे मत प्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी आज येथे व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाचे संत तुकाराम अध्यासन आणि मराठी अधिविभाग यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर लिखित होय होय वारकरी या ग्रंथाविषयी आयोजित करण्यात आलेल्या चर्चेत ते बोलत होते. चर्चेत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. श्रीरंग गायकवाड आणि प्राचार्य गोविंद काजरेकर यांनीही सहभाग घेतला. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के उद्घाटक म्हणून उपस्थित होते.

प्रा. बांदेकर म्हणाले, वारकरी संप्रदायाच्या वाटचालीचा आणि परंपरांचा वर्तमानकालीन परिप्रेक्ष्यातून वेध घेण्याचा प्रयत्न बंडगर यांनी या पुस्तकात केला आहे. केवळ कौतुक करणारे न लिहीता अत्यंत परखडपणे सत्य समोर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. संप्रदायातील चांगल्या गोष्टी मांडतानाच वारकरी संप्रदायाच्या आडून समाजमन कलुषित करणाऱ्या प्रवृत्तींचाही शोध ते घेतात. काळाच्या ओघात वेळोवेळी दडविल्या गेलेल्या गोष्टीही पुराव्यानिशी प्रकाशात आणतात. त्याचप्रमाणे अनेक अलक्षित वारकरी, कीर्तनकार यांचेही कार्य सामोरे आणतात. विविध जाती समुदायातील अज्ञात कीर्तनकारांची नावे यात समजतात. जंगली महाराज, गणपती महाराज यांच्यासारख्या अनेक दुर्लक्षित राहिलेल्या प्रबोधकांचे काम या पुस्तकामुळे माहिती झाले आहे. त्यांच्या कार्याविषयी स्वतंत्र पुस्तकांच्या निर्मितीची आवश्यकता त्यातून अधोरेखित होते. अनेक वारकरी कथांचा इतका सुंदर अन्वयार्थ बंडगरांनी लावला आहे की त्यातून महाकादंबरीच्या शक्यताही डोकावतात, असेही ते म्हणाले.

संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. श्रीरंग गायकवाड म्हणाले, जिथला नागरिक वारी करतो, तो महाराष्ट्र; आणि सर्व जातीधर्मांचे लोक एकत्र यावेत, याचे तत्त्वज्ञान सांगणारा तो महाराष्ट्र धर्म, असे वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्राचे अभिन्न नाते आहे. सहभोजनाची परंपरा वारकरी संप्रदायाने रुजविली. संतांनी लोकांना जोडून ठेवण्याचे काम सातत्याने केले. ज्ञानेश्वरी, भागवत आणि तुकारामांची गाथा हे तीन ग्रंथ अवघ्या मानवतेचे सारस्वरुप आहेत. अस्पृश्यतेसह कर्मकांडांची चिकित्सा करीत सर्वांना सामावून घेणारा असा वारकरी संप्रदाय आहे. या संप्रदायाच्या समग्र गुणवैशिष्ट्यांची अतिशय अभ्यासपूर्वक मांडणी बंडगर यांनी सदर पुस्तकात केली आहे, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले.

प्राचार्य गोविंद काजरेकर म्हणाले, सांस्कृतिक धुरिणत्व भौतिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक परिवर्तनासाठी आवश्यक असते. हे धुरिणत्व वारकरी संप्रदायाकडे संत ज्ञानेश्वर यांच्यापासून ते नामदेव, तुकाराम यांच्याकडून आले. ज्ञानेश्वरीमध्ये वारकरी संप्रदायाची बीजमांडणी करण्यात आली आहे. तेथे समताकांक्षी माणसांचा समुदाय अभिप्रेत असल्याचे माऊलींनी सांगितले. ही मूल्यचौकट पुढे संत तुकाराम यांच्यापर्यंत प्रवाहित होत राहिली. वर्तनव्यवहारातून संतांनी समतेचे आदर्श समाजासमोर मांडले. सहभोजन हे त्यामुळेच समानता मूल्याचे प्रतीक ठरले. त्यातून समाजात सहभावाची जाणीव निर्माण झाली. बंडगर यांनी बहुजनवादी परिप्रेक्ष्यातून या साऱ्याची मांडणी पुस्तकात केली आहे. वारकरी संचिताचा उलगडा करीत असताना या तत्त्वज्ञानाच्या चलाख मारेकऱ्यांचाही त्यांनी यात समाचार घेतला आहे. हे या पुस्तकाचे आगळे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, समतेचा विचार प्रवाहीपणे सर्वदूर पसरविणारा वारकरी संप्रदाय म्हणजे तत्कालीन समाजातील एक विद्यापीठच होते. माणसातले माणूसपण कायम जपण्याचे काम वारी करीत असते. भक्तीरसाची प्रचिती घेण्यासाठी आणि आपले पाय जमिनीवर राहण्यासाठी वारीचा अनुभव घेणे आवश्यक आहे. बंडगर यांनी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाच्या माध्यमातून संतसाहित्याला आणखी योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सुरवातीला कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते संत तुकाराम यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून ग्रंथचर्चेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दीपा गायकवाड संपादित ज्ञानबातुकाराम या विशेष वार्षिकांकाचे कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. लेखक ज्ञानेश्वर बंडगर यांनी ग्रंथाच्या निर्मितीमागील प्रेरणांची माहिती दिली. संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. कार्यशाळेला डॉ. प्रभंजन माने, डॉ. अक्षय सरवदे, डॉ. मनोहर वासवानी यांच्यासह विविध महाविद्यालयांतील मराठीचे शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रंथालयांनी नवतंत्रज्ञान अंगिकारण्याची गरज: डॉ. विनायक बंकापूर

 

शिवाजी विद्यापीठात ग्रंथालयांविषयी आयोजित राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. सोबत डॉ. विनायक बंकापूर, किशोर इंगळे, डॉ. सचिनकुमार पाटील आदी.

शिवाजी विद्यापीठात ग्रंथालयांविषयी आयोजित राष्ट्रीय परिषदेत बोलताना डॉ. विनायक बंकापूर


कोल्हापूर, दि. ३० जानेवारी: बदलत्या तंत्रज्ञानाच्या गतीने बदलण्याचे आव्हान आज सर्वच क्षेत्रांसमोर आहे. ग्रंथालयांनीही नवतंत्रज्ञान अंगिकारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठाचे डॉ. विनायक बंकापूर यांनी काल (दि. २९) येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग आणि शिवाजी विद्यापीठ महाविद्यालयीन ग्रंथालय संघटना (सुक्ला), कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘टेक्नोलाइब्ररियनशिप: अ गेटवे टूवर्ड्स फ्युचर लायब्ररीज्’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद झाली. या परिषदेमध्ये ते बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील होते.

डॉ. बंकापुर यांनी आपल्या भाषणात मातीच्या विटेतील अक्षरांपासून डिजिटल अक्षरांपर्यंतचा तंत्रज्ञानाचा प्रवास कसा घडला, अफाट माहिती प्रस्फोट युगात डिजिटल ग्रंथालये, ग्रंथपाल यांचे महत्त्व याविषयी विवेचन केले. क्रिएटिव्ह लर्निंग, लाईफ लाँग लर्निंग, ग्रंथालय गतिशीलता (Dynamism)  मल्टीमीडिया स्टुडीओ इत्यादींबाबतही त्यांनी तपशीलवार चर्चा केली.

अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील जनरेटिव्ह एआय, क्वांटम एआय, चीनचे अतिअद्यावत डीपसिक एआय तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉन- ह्युमन न्युरॉन यातून विकसित न्युरोचीप असा तंत्रज्ञानाचा आवाका गतीने वाढतो आहे. तंत्रज्ञानाची ही झेप ओळखून आपणही त्याच्याशी सुसंगत राहण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार आता याच तंत्रज्ञानाच्या मदतीतून आपल्या क्षेत्रातील स्टार्टअपला चालना दिली पाहिजे. आजघडीला इलेक्ट्रॉन व मानवी न्युरॉन यांच्या संयोगातून ब्रेन चीप निर्माण करून प्रत्येक मानव हाफरोबो होऊ शकतो, असे तंत्रज्ञानात्मक आव्हानही मानवी कार्यकौशल्यासमोर उभे राहू पाहते आहे. त्याला तोंड देण्यासाठीही आपण सज्ज असायला हवे.

टाटा कन्सल्टन्सीचे किशोर इंगळे यांनी लायब्ररीयन कौशल्य, लायब्ररी एज्युकेशनचे डिजिटल युगातील महत्त्व अधोरेखित केले.

परिषदेत आयसीटी एनव्हायर्नमेंट, क्लाऊड कॉम्प्युटिंग व ग्रंथालये, डिजिटल ज्ञान संवर्धन, ग्रंथालय सेवेत आर्टिफिशियल इंटलिजेन्सचा प्रभाव व वापर, बिग डेटा, चॅटबॉट्स, ग्रीन लायब्ररीज्, ब्लॉकचेन तंत्रज्ञान, ई-रिसोर्स लायसन्सिंग, डिजिटल राईट्स व्यवस्थापन, वाङ्मयचौर्य तपास प्रणाली इत्यादी आधुनिक नवतंत्रज्ञानाचा  ग्रंथालयांवरील परिणाम आणि वापर आदी विषयांवर परिषदेत विविध सत्रांत चर्चा झाली. परिषदेत देशभरातील ६८ ग्रंथालय तज्ज्ञांसह ग्रंथालय प्रोफेशनल्स, शिक्षक, संशोधक विद्यार्थी सहभागी झाले. ५४ संशोधकांनी शोधनिबंध सादर केले.

तत्पूर्वी, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्या हस्ते रोपास पाणी वाहून उद्घाटन करण्यात आले. संचालक डॉ. धनंजय सुतार यांनी स्वागत केले. विभाग प्रमुख डॉ. सचिनकुमार पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सुक्लाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र आढाव यांनी आभार मानले.

 

Wednesday, 29 January 2025

भाषेची सातत्याने चिकित्सा आवश्यक

 शिवाजी विद्यापीठातील परिसंवादात सूर

शिवाजी विद्यापीठात आयोजित मराठी भाषाविषयक परिसंवादात बीजमांडणी करताना रवींद्र इंगळे-चावरेकर

शिवाजी विद्यापीठात आयोजित मराठी भाषाविषयक परिसंवादात बोलताना डॉ. दिलीप चव्हाण

शिवाजी विद्यापीठात आयोजित मराठी भाषाविषयक परिसंवादात बोलताना डॉ. गोमटेश्वर पाटील

(मराठी भाषाविषयक परिसंवादाची लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. २९ जानेवारी: भाषेला सौष्ठव आणि श्रेष्ठत्व प्राप्त होण्यासाठी हजारो वर्षे जावी लागलेली असतात. काळानुरुप तिचे स्वरुप बदलत असते. भाषेचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी तिला भाषिक राजकारणापासून जपण्याची आवश्यकता असते. त्यासाठी सातत्याने तिची मीमांसा, चिकित्सा केली पाहिजे, असा सूर शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात आज उमटला.

विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यांतर्गत मराठी भाषेच्या उत्पत्तीविषयक सिद्धांतांची पुनर्मीमांसा या विषयावर एकदिवसीय परिसंवादाचे आज आयोजन करण्यात आले. परिसंवादामध्ये रवींद्र इंगळे-चावरेकर (बुलडाणा) यांनी बीजमांडणी केली, तर डॉ. दिलीप चव्हाण (नांदेड) आणि डॉ. गोमटेश्वर पाटील (कोल्हापूर) यांनी परिसंवादात सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख होते.

रवींद्र इंगळे-चावरेकर यांनी आपल्या बीजमांडणीमध्ये मराठी भाषेच्या इतिहासाची संशोधनात्मक आणि अभ्यासपूर्ण रितीने उकल करण्याचा प्रयत्न केला. मराठी भाषेचे धागेदोरे सिंधुसंस्कृतीपर्यंत मागे नेता येऊ शकतात, याविषयी त्यांनी साधार मांडणी केली. ते म्हणाले, उपलब्ध साहित्यावरुन भाषेचे प्राचीनत्व आणि अभिजनत्व यांची निश्चिती केली जाते. मराठी भाषेमध्ये सन ११२९मध्ये मानसोल्हास, त्यानंतर बाराव्या शतकात विवेकसिंधु, लीळाचरित्रापासून ते पुढे ज्ञानेश्वरीपर्यंत असे नऊ ग्रंथ सापडतात. या ग्रंथांतील मराठीचे भाषावैभव उच्च दर्जाचे आहे. मात्र, भाषा जन्मली आणि लगेच त्या भाषेमध्ये समृद्ध वाङ्मय निर्माण झाले, असे होत नाही. भाषेला तिचे श्रेष्ठत्व प्राप्त होण्यासाठी वर्षानुवर्षांचा कालखंड जावा लागतो. मराठीतील या उपलब्ध साहित्यामध्येही ग्रंथभाषा आणि लोकव्यवहार भाषा असा फरक दिसतो. एक भाषा संस्कृतविरहित आहे, तर दुसरी संस्कृतधार्जिणी आहे, हे अभ्यासांती स्पष्ट झालेले आहे. अशा दोन संस्कृतींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या भाषांचा प्रवास प्राकृत, महाराष्ट्री, मराठी आणि अभिजात असा झाला आहे. यातील मारहरट्टी भाषेचा सांधा आपल्याला मागे नेत सिंधुसंस्कृतीशी जोडता येतो. मराठी भाषेची पुनर्मीमांसा करीत असताना तिच्या प्रवासातील विविध प्रवाहांचा, बदलांचा आणि परंपरांचा नव्याने वेध घेण्याची गरज आहे, असे मत त्यांनी मांडले.

मराठी भाषा: बहुविध इतिहासाची दृष्टी या विषयावर बोलताना डॉ. दिलीप चव्हाण म्हणाले, ब्रिटीश काळात मराठीविषयी भाषाशुद्धीच्या अनुषंगाने अधिक चांगले विचार मांडण्यात आले. ऐतिहासिक भाषाविज्ञान हे मराठीच्या बाबतीत अधिक सजग होते. भांडारकर, चिपळूणकर, तर्खडकर, दामले इत्यादी व्याकरणकारांवर तौलनिक भाषाविज्ञानाचा मोठा प्रभाव दिसतो. जर्मन आणि ब्रिटीश अभ्यासकांनी संस्कृत आणि इतर भाषांचा सहसंबंध जोडून घेतला. भाषांमध्ये हा आंतरिक व्यवहारही समृद्धतेच्या दिशेने घेऊन जातो, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे प्राचीन संदर्भ देत त्यांनी मराठी भाषेची लेखनपद्धती कशी असावी, तिचे स्वरुप कसे असावे, याविषयीही विवेचन केले.

मराठीच्या पूर्वेतिहासाचा शोध या विषयावर बोलताना गोमटेश्वर पाटील म्हणाले, महाराष्ट्रीय अपभ्रंश भाषेतून मराठी भाषेचा पूर्वेतिहास आपल्याला शोधता येतो. महाराष्ट्रीय प्राकृत आणि महाराष्ट्रीय अपभ्रंश यांचा सहसंबंधही जोडता येतो. महाराष्ट्रीय अपभ्रंश आणि मराठी यांची सलगता शब्दसंपत्तीमधून शोधता येते. तसेच महाराष्ट्रीय मध्ययुगीन कवींच्या साहित्यातूनही मराठीच्या पूर्वेतिहासाचा शोध घेता येतो. शिलालेख, ताम्रपट, गद्यलेखन यांमधून मराठीची वेगवेगळी रुपे सापडतात. महाराष्ट्राबाहेरही लिहीत असणाऱ्या कवींचे प्राचीन साहित्य मराठीची विविध रुपे वेळोवेळी सामोरे आणण्याचे काम करीत असते, असेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख म्हणाले, व्यवहारात भाषेची अनेक रुपे प्रचलित असतात, तिची रुपांतरणेही होत असतात. भाषा आणि बोलीभाषा तसेच भाषा आणि लिपी यांच्यातही फरक असतो. या रुपांतरणाचा आणि फरकांचा अभ्यास व्हायला हवा. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठात होत असलेल्या या परिसंवादाचे दस्तावेजीकरण व्हायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमात सुरवातीला मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून दिले. डॉ. रणधीर शिंदे यांनी परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. कार्यशाळेला प्राचार्य जी.पी. माळी, डॉ. अनिल गवळी, डॉ. मेघा पानसरे, डॉ. प्रभंजन माने, डॉ. अक्षय सरवदे, डॉ. मानसिंग टाकळे, डॉ. शरद गायकवाड, डॉ. अरुण शिंदे यांच्यासह विविध महाविद्यालयांतील मराठीचे शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Tuesday, 28 January 2025

शिवाजी विद्यापीठाचा निसर्ग उतरला १२० कलाकारांच्या कॅनव्हासवर!

राज्यस्तरीय प्रत्यक्ष निसर्गचित्रण स्पर्धेला उत्साही प्रतिसाद

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय प्रत्यक्ष निसर्गचित्रण स्पर्धेच्या खुल्या कलाकार विभागातील सर्वोत्कृष्ट पाच विजेते कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्यासह मान्यवरांसमवेत.

शिवाजी विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय प्रत्यक्ष निसर्गचित्रण स्पर्धेच्या विद्यार्थी विभागातील सर्वोत्कृष्ट पाच विजेते कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्यासह मान्यवरांसमवेत.


शिवाजी विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय प्रत्यक्ष निसर्गचित्रण स्पर्धेत सहभागी कलाकार चित्र रंगविताना.

शिवाजी विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय प्रत्यक्ष निसर्गचित्रण स्पर्धेमध्ये सहभागी कलाकारांची चित्रकला पाहण्यासाठी त्यांच्याभोवती जमलेल्या विद्यार्थिनी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय प्रत्यक्ष निसर्गचित्रण स्पर्धेत  सहभागी कलाकार समोरील परिसर कॅनव्हासवर उतरविताना.

शिवाजी विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय प्रत्यक्ष निसर्गचित्रण स्पर्धेचे निसर्गचित्र काढून उद्घाटन करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील.




(निसर्गचित्रण स्पर्धेची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. २८ जानेवारी: विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरावर पसरलेली कोवळी उन्हे, त्या उन्हामध्ये ठिकठिकाणी समोरील कॅनव्हासवर हा निसर्ग उतरविण्यात गुंग झालेले निरनिराळ्या वयोगटातील चित्रकार आणि त्यांची कलाकारी पाहण्यासाठी त्यांच्याभोवती जमलेली विद्यार्थ्यांची कुतूहलपूर्ण गर्दी. शिवाजी विद्यापीठाच्या संपूर्ण परिसरात आज सकाळी नऊ वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत हेच दृष्य पाहावयास मिळत होते. निमित्त होते संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रत्यक्ष निसर्गचित्रण स्पर्धा-२०२५चे!

विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातर्फे प्रथमच विद्यापीठात प्रत्यक्ष निसर्गचित्रण स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेला राज्यभरातील चित्रकारांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. पश्चिम महाराष्ट्रासह बेळगाव, मुंबई, पुणे, रत्नागिरी इत्यादी ठिकाणांहून १२० चित्रकार यात सहभागी झाले. सकाळी नोंदणी आणि उद्घाटन समारंभानंतर सर्व कलाकारांनी विद्यापीठाच्या परिसरात फेरफटका मारला आणि आपल्याला भावलेल्या दृष्याची निवड करून तेथे चित्र काढण्यासाठी बसले. कोवळ्या उन्हाचे दुपारी तळपत्या उन्हात रुपांतर झाले तरी त्याचे भान या चित्रकारांना राहिले नव्हते, इतके ते चित्र काढण्यामध्ये गुंगून गेल्याचे दिसले. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सुद्धा या कलाकारांची चित्रे पाहण्यासाठी त्यांच्याभोवती गर्दी केली. त्याकडेही त्यांचे लक्ष नव्हते. मुख्य प्रशासकीय इमारतीच्या परिसरात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनीही मोटारीतून उतरून हे चित्रकार काढत असलेली चित्रे मोठ्या कुतूहलाने पाहिली आणि त्यांचे कौतुक केले.

सायंकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. ही स्पर्धा विद्यार्थी विभाग आणि खुला कलाकार विभाग अशा दोन विभागांत घेण्यात आली. दोन्ही विभागांमध्ये सर्वोत्कृष्ट पाच चित्रकारांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, रोप आणि रोख ५००० रुपये असे पारितोषिकाचे स्वरुप होते.

विद्यार्थी विभागात विशाल सुतार (मुंबई), पियांशू मीठगरी (देवरूख, रत्नागिरी), नीलेश उडमाळे (मुंबई), सचिन बामणे (मुंबई) आणि सुजल निवटे (सावर्डे, रत्नागिरी) यांची चित्रे सर्वोत्कृष्ट ठरली. तर खुल्या कलाकार विभागात विजय उपाध्ये (कोल्हापूर), गौरव साखरे (सांगली), संदीपकुमार कुंभार (इचलकरंजी), प्रणय फराटे (रत्नागिरी) आणि सुधीर वाघ (सांगली) यांची चित्रे सर्वोत्कृष्ट ठरली. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ चित्रकार सुनील पुजारी (मुंबई), शरद तावडे (मुंबई) आणि महेश होनुले (बेळगाव) यांनी काम पाहिले.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी पहिल्याच वर्षी स्पर्धेला लाभलेला प्रतिसाद उत्साहवर्धक असून दरवर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात यावी, अशी सूचना केली. पारितोषिक वितरण समारंभास विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, माजी संचालक डॉ. प्रकाश गायकवाड उपस्थित होते.

तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी कॅनव्हासवर निसर्गचित्र रंगवून स्पर्धेचे अभिनव पद्धतीने उद्घाटन केले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी केले, तर डॉ. राजश्री खटावकर यांनी आभार मानले. प्रख्यात चित्रकार बबन माने, नृत्यदिग्दर्शक संग्राम भालकर, नागेश हंकारे यांनी स्पर्धेचे यशस्वी संयोजन केले. कॅमल कंपनीचे वितरक दिलीप घेवारे यांनी ३० टक्के सवलतीच्या दरात चित्रकलेचे साहित्य उपलब्ध केले.


संविधानिक मूल्यांशी प्रतिबद्धतेमधूनच वंचितांच्या सामाजिक समावेशनाची निश्चिती: प्रा. रमेश कांबळे

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित सामाजिक समावेशन राष्ट्रीय परिषदेत बीजभाषण करताना प्रा. रमेश कांबळे.

शिवाजी विद्यापीठात आयोजित सामाजिक समावेशन राष्ट्रीय परिषदेत बीजभाषण करताना प्रा. रमेश कांबळे. मंचावर (डावीकडून) कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. श्रीकृष्ण महाजन आणि अविनाश भाले.

(सामाजिक समावेशन राष्ट्रीय परिषदेची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. २८ जानेवारी: संविधानिक मूल्यांशी प्रतिबद्धतेमधूनच वंचितांच्या सामाजिक समावेशनाची निश्चिती होत असते. म्हणून भारतीय समाजाने संविधानिक मूल्यांच्या पालनाविषयी सजग राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. रमेश कांबळे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्या वतीने विकसित भारतासाठी सामाजिक समावेशनया विषयावर आज राष्ट्रीय परिषद झाली. या परिषदेत बीजभाषण करताना प्रा. कांबळे बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहात झालेल्या या परिषदेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

प्रा. कांबळे म्हणाले, भारतीय समाज हा वेगवेगळ्या प्रकारच्या बहुस्तरित असमानतांनी व्यापलेला आहे. ही असमानतेची दरी दूर करण्याची आवश्यकता आहे. अशा असमानतेवर आधारलेल्या सत्तासंबंधांचा अभ्यास करून त्यांचे सांविधानिक मूल्यांच्या आधारे निराकरण करावे लागेल. संविधानातील स्वातंत्र्य आणि समता ही मूल्ये बंधुतेचे मूल्य निश्चित करीत असतात. अशा समताकांक्षी समाजसमूहांमधूनच देशाची निर्मिती होत असते. अशा देश आपल्याला उभा करावयाचा आहे.

प्रा. कांबळे म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिकाला प्रतिष्ठापूर्वक जगण्याचा अधिकार आहे. प्रत्येक नागरिकाला शिक्षण, आरोग्य आदी सुविधा लाभार्थी म्हणून नव्हे, तर त्याचा अधिकार म्हणून प्रदान केल्या पाहिजेत. मनुष्यबळाकडे संसाधन किंवा साधन म्हणून पाहणे योग्य नव्हे. त्यापलिकडे क्षमता आणि सक्षमता असणारा नागरिक म्हणून प्रत्येक माणसाकडे आपण पाहिले पाहिजे. डेटा अर्थात माहितीकडेही त्याच दृष्टीने पाहायला हवे. माहितीचा अभाव अथवा अनुपलब्धता ही संस्थात्मक हिंसाच मानायला हवी. सामाजिक समावेशनाच्या प्रक्रियेमध्ये माहितीची खूप महत्त्वाची भूमिका असते. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सामाजिक आणि भौतिक संसाधने आणि प्रक्रियांची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली, तथापि खूप मोठ्या लोकसंख्येचे जगणेही त्यांनी हिरावले. म्हणून सामाजिक समावेशनाच्या संदर्भात बोलत असताना सामाजिक वंचिततेच्या निराकरणाबाबतही उच्चरवाने बोलण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

अध्य७य मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, सन २०४७ पर्यंत आपण भारत पूर्णतः विकसित करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची आहे. वंचितांच्या सामाजिक समावेशनासाठी अंत्योदयाच्या अभियानामध्ये प्रत्येकाचे योगदान अभिप्रेत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे माहितीचे संकलन करण्यात येते. या माहितीची तपासणी, शहानिशा आणि विश्लेषण करण्याची जबाबदारी नागरिकांवर, विशेषतः संशोधकांवर आहे. या माहितीमधील तसेच ज्यासंदर्भात माहिती आहे, त्या व्यवस्थेमधील त्रुटीनिवारण करणे हेच विकासाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे, याची जाणीव त्यासाठी असायला हवी. त्यामुळे या विकास प्रक्रियेमध्ये व्यक्तीगत पातळीवर प्रत्येकाने आपला वाटा उचलण्यास सिद्ध व्हायला हवे.

उद्घाटन समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक सामाजिक वंचितता केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले, तर अविनाश भाले यांनी आभार मानले.

यानंतर परिषदेच्या विविध सत्रांमध्ये आरोग्य आणि समाज कल्याणया विषयावर डॉ. योगेश साळी आणि डॉ. रवींद्र श्रावस्ती यांनी, आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक नवकल्पनाया विषयावर प्रा. प्रशांत बनसोडे आणि जात, लिंग आणि सामाजिक न्यायया विषयावर डॉ. सुनीता सावरकर यांनी आपली भूमिका सविस्तरपणे विषद केली. परिषदेच्या अखेरीस बलुतंहा चित्रपट दाखविण्यात आला. त्यावर चित्रपट समीक्षक डॉ. अनमोल कोठडिया यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. परिषदेस डॉ. कैलास सोनवणे, डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. किशोर खिलारे यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, 27 January 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ मानवतेसाठीची: डॉ. सुनिता सावरकर

शिवाजी विद्यापीठात आयोजित परिसंवादात बोलताना डॉ. सुनीता सावरकर. मंचावर (डावीकडून) अविनाश भाले, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. दीपा श्रावस्ती, डॉ. रणधीर शिंदे.

शिवाजी विद्यापीठात आयोजित परिसंवादात बोलताना डॉ. सुनीता सावरकर.


 कोल्हापूर, दि. २७ जानेवारी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली चळवळ कोणत्याही विशिष्ट जात किंवा समुदायापुरती मर्यादित नव्हती, तर ती मानवी हक्क प्रस्थापित करणाऱ्या लोकांची मानवतेसाठीची चळवळ होती, असे प्रतिपादन डॉ. सुनिता सावरकर यांनी आज येथे व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेच्या शतकपूर्तीनिमित्त ‘ढोर-चांभार स्त्रियांच्या आंबेडकरी जाणिवांचा परीघ’ पुस्तकावरील परिसंवादामध्ये त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन होते. डॉ. सुनिता सावरकर लिखित या पुस्तकावरील परिसंवादात लेखिका डॉ. सावरकर यांच्यासह डॉ. रणधीर शिंदे, डॉ. दीपा श्रावस्ती सहभागी झाले.

डॉ. सावरकर म्हणाल्या, इतिहास हा फक्त एका समूहाचा नसतो, तर त्या काळामध्ये अस्तित्वात असणाऱ्या अनेक समूहांचा असतो. यातून स्त्रिया मात्र परिघाबाहेर राहतात. या परिघाबाहेरील स्त्रियांचा इतिहास शोधणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये ढोर-चांभार समाजातील अनेक स्त्रियांनी सहभाग घेतला कारण त्यांच्या आंबेडकरी विचारांच्या जाणीवा प्रगल्भ झाल्या होत्या. त्यांनी आंबेडकर चळवळीत एखाद्या कार्यक्रमात स्वागत गीत गाण्यापासून ते संघटना उभी करणे, ती चालविणे व त्या अनुषंगाने लिखाण कारणे अशी महत्त्वाची कामे केली आहेत.

डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, डॉ. सावरकर यांनी अलक्षित व दुर्लक्षित परिघावरील स्त्रियांची नोंद करून त्यांची ओळख प्रकाशमान केली आहे. त्याद्वारे सामाजिक दस्ताऐवजीकरणाचे महत्त्वपूर्ण काम सिद्ध झाले आहे. 

डॉ. दिपा श्रावस्ती म्हणल्या, परीघाबाहेरील स्त्रिया जात-वर्ग लिंग व धर्म यामध्ये अडकलेल्या आहेत. परंतु यामधून बाहेर पडून विविध क्षेत्रांत काम केलेल्या स्त्रियांची इतिहासाने दखल घेतलेली नाही. डॉ. सावरकर यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये डॉ. आंबेडकर यांच्या चळवळीतील स्त्रियांच्या ऐतिहासिक कामाची नोंद करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. श्रीकृष्ण महाजन म्हणाले, डॉ. सावरकर यांचे पुस्तक जातींची धारधार होत चाललेली टोके मोडण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आंबेडकरी चळवळीचे भान आणि जाणीवा जागृत झालेल्या स्त्रियांच्या कार्याची नोंद या पुस्तकाने घेतली आहे.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अविनाश भाले यांनी केले. डॉ. तेजपाल मोहरेकर यांनी आभार मानले. यावेळी सुरेश शिपूरकर, डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. अवनीश पाटील, जयवंत व्हटकर, मधुकर शिर्के, डॉ. चंद्रकांत शिर्के, मदन पवार, किरण गवळी आदी उपस्थित होते.