Tuesday, 18 March 2025

समाजाला माहिती नसलेल्या इतिहासपुरूषांविषयी संशोधन करावे: डॉ. नितीन देशपांडे

इतिहास अधिविभागाच्या सर धनजीशा बोमनजी कूपर पारितोषिकांचा प्रथम वितरण समारंभ


शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विषयासाठीच्या सर धनजीशा बोमनजी कूपर पारितोषिकाचे प्रथम मानकरी किरण विजय मुसळे आणि सूरज राजेंद्र गवळी यांना पारितोषिक वितरण प्रसंगी  डॉ. नितीन देशपांडे, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि डॉ. अवनीश पाटील.

शिवाजी विद्यापीठाच्या सर धनजीशा बोमनजी कूपर पारितोषिक वितरण समारंभात बोलताना डॉ. नितीन देशपांडे. मंचावर कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील.


(धनजीशा कूपर पारितोषिक वितरण समारंभाचा व्हिडिओ)



कोल्हापूर, दि. १८ मार्च: अनेक महामानव असे आहेत की ज्यांचा इतिहास सर्वार्थाने समाजासमोर आलेला नाही. इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी अशा समाजाला माहिती नसलेल्या इतिहासपुरूषांविषयी संशोधन करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन साताऱ्याच्या कूपर उद्योग समूहाचे मुख्य मानव संसाधन अधिकारी डॉ. नितीन देशपांडे यांनी केले.

कूपर उद्योग समूहाच्या देणगीनिधीमधून शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागासाठी स्थापित सर धनजीशा बोमनजी कूपर पारितोषिक (२०२३-२४) या पारितोषिकांचा प्रथम वितरण सोहळा आज विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन सभागृहात झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. देशपांडे यांनी सर धनजीशा कूपर यांच्यासह कूपर उद्योग समूहाचा वारसा आणि कार्य याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. ते म्हणाले, साताऱ्यामध्ये १०३ वर्षांपूर्वी कूपर यांच्यासारख्या एका पारशी व्यक्तीने येऊन उद्योग उभारणे ही नवलाईची बाब होती. मात्र, तेथून त्यांचा प्रवास हा स्वतःला मराठमोळा म्हणविण्यापर्यंत झाला, हे वैशिष्ट्य ठरले. एकीकडे उद्योजक म्हणून कारकीर्द घडवित असताना दुसरीकडे ब्राह्मणेतर, बहुजनांची संघटना उभारणी करणे आणि दशकभराहून अधिक काळ साताऱ्याचे नगराध्यक्षपद भूषवित राजकारणावरही स्वतःची छाप सोडणे अशा बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचे ते धनी होते. साधारण १२ वर्षे लोकल स्कूल बोर्डाचे अध्यक्षपद भूषविताना त्यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. त्यांच्या व्यक्तीमत्त्वात अशा प्रकारे उद्योजक, समाजसुधारक आणि राजकारणी या पैलूंचा अनोखा संगम झालेला होता. त्याचा वापर त्यांनी समाजाच्या हितासाठी केला. त्यांचे सुपुत्र नरिमन कूपर यांचे चिरंजीव फारोख कूपर हे त्यांचा वारसा पुढे चालवित असून मोठ्या संघर्षातून त्यांनी समूहाला आज जगभरात ओळख प्राप्त करून दिली आहे. त्यांच्या प्रेरणेतून हा पुरस्कार दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, सर धनजीशा कूपर हे राजकारणविरहित व्यापार आणि व्यापारविरहित राजकारण करणारे व्यक्तीमत्त्व होते. राजर्षी शाहू महाराज यांच्यापासून ते कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी त्यांचे दृढ संबंध होते. हा मोठा वारसा आहे. त्यांच्या नावे हा पुरस्कार शिवाजी विद्यापीठात सुरू होत आहे, याचा आनंद आहेच, पण त्यापुढे जाऊन इतिहास विषयाच्या विद्यार्थ्यांना उद्योगाकडून पारितोषिक मिळणे ही इतिहासाचे महत्त्व अधोरेखित करणारी बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी इतिहास अधिविभागात सन २०२३-२४मध्ये विद्यार्थ्यांत सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या सूरज राजेंद्र गवळी आणि विद्यार्थिनींत सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या किरण विजय मुसळे यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. रु. १९,०३१ रोख आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते.

सुरवातीला इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. वर्षा पांढरे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. दत्ता मचाले यांनी आभार मानले. यावेळी इतिहास अधिविभागातील शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर धनजीशा बोमनजी कूपर पारितोषिकाविषयी...

सातारा येथील कूपर कॉर्पोरेशन प्रा.लि. कंपनीकडून सर धनजीशा बोमनजी कूपर यांच्या जीवन व कार्याविषयी संशोधन प्रकल्पासाठी शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागास १२ लाख २७ हजार रुपयांचा निधी सामाजिक दायित्व निधीमधून (CSR) देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सर धनजीशा कूपर यांच्या स्मरणार्थ इतिहास विषयात सर्वाधिक गुणांसह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी दोन पारितोषिके स्थापित करण्यासाठी ७ लाख रुपयांचा निधीही विद्यापीठास दिला आहे. या निधीच्या व्याजामधून ही पारितोषिके प्रदान करण्यात येत आहेत.

Monday, 17 March 2025

स्थानिक गरजा लक्षात घेऊन संशोधन व्हावे: सिद्धार्थ शिंदे

शिवाजी विद्यापीठात आयोजित संशोधन कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सिद्धार्थ शिंदे. मंचावर (डावीकडून) डॉ. विद्यानंद खंडागळेडॉ. चेतना सोनकांबळेडॉ. श्रीकृष्ण महाजन आणि डॉ. रूपाली संकपाळ. 


कोल्हापूर, दि. १७ मार्च: संशोधकांनी स्थानिक गरजा लक्षात घेऊन त्यांची पूर्ती करण्याच्या दिशेने आपले संशोधन केंद्रित करावे. त्याचप्रमाणे शाश्वत विकास डोळ्यांसमोर ठेवून आपली सृजनशीलता वापरावी, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य सिद्धार्थ शिंदे यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागात प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (पीएम-उषा) संशोधक  व पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी "सृजनात्मक विचारांची शिक्षण पद्धती" या विषयावर आजपासून दोनदिवसीय कार्यशाळेस प्रारंभ झाला. उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. शिंदे बोलत होते. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन अध्यक्षस्थानी होते.

श्री. शिंदे म्हणाले, समाजाचा पैसा समाजोपयोगी संशोधनासाठी खर्च व्हावा. विद्यापीठासारख्या ठिकाणी स्थानिक समस्यांवर आधारित संशोधन व्हावे. स्थानिक गरजांनुरुप अभ्यासक्रमांमध्ये देखील त्याचा अंतर्भाव व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

डॉ. महाजन अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, शिक्षकांमध्ये सृजनशील विचारसरणी असेल तर तो विद्यार्थ्यांसाठी, उद्यमशील समाजासाठी प्रेरणादायी ठरतो. आज शिक्षणक्षेत्रावर ही सृजनशीलता घडविण्याची मोठी जबाबदारी आहे.

यावेळी शिक्षणशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे यांनी स्वागत केले. प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाचे समन्वयक डॉ विद्यानंद खंडागळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुप्रिया पाटील व अंजली आंबेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. रूपाली संकपाळ यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी सारिका पाटील, श्रीराम सोनवणे, आनंदा कुंभार, अर्चना कुराडे, अंजली गायकवाड, संगीता चंदनवाले, संजना भालकर, संगीता माने, ममता घोटल, संजय चव्हाण, अतुल जाधव उपस्थित होते. विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील एकूण ८१ संशोधक व पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांनी कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदविला.


महिलांची गृहकामाची 'सेकंड शिफ्ट' संपुष्टात येईल तोच खरा महिलादिन: के. मंजुलक्ष्मी


शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत बोलताना प्रशासक के. मंजुलक्ष्मी. मंचावर (डावीकडून) अजित पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. तृप्ती करेकट्टी व अभिषेक मिठारी.

(कार्यशाळेची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. १७ मार्च: कष्टकरी व नोकरदार महिलांची गृहकामाची सेकंड शिफ्ट संपुष्टात येईल, त्यावेळी खऱ्या अर्थाने महिलादिन साजरा होईल, असे प्रतिपादन कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचे शरण साहित्य अध्यासन, हिंदी अधिविभाग आणि विवेक वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित एकदिवसीय कार्यशाळेच्या समारोप समारंभाच्या प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्त्रीस्वातंत्र्याचे विचारपुष्प बंधमुक्त करून स्त्रियांची विविध सामाजिक, कौटुंबिक जोखडांतून मुक्तता करण्याचा प्रतीकात्मक संदेश देण्यात आला.

श्रीमती मंजुलक्ष्मी म्हणाल्या, महिला दिनानिमित्त स्त्रीच्या बहुआयामी कार्याचा गौरव करून उत्सव साजरा केला जातो. प्रत्यक्षात मात्र नित्याच्या जीवनात कुटुंब आणि गृहसंगोपनाची जबाबदारी एकट्या महिलेला आपली नोकरी अथवा काम सांभाळत पार पाडावी लागते. कष्टकरी अथवा नोकरदार महिलांची गृहकामाची सेकंड शिफ्ट संपुष्टात येऊन घरातील स्त्री-पुरुष मिळून सामाजिक आणि गृहसंगोपनाची जबाबदारी एकत्रित पार पाडतील तेव्हा खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल.

अध्यक्षीय मनोगतामध्ये कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, स्त्री-पुरुष भेदभाव निर्मूलनाची सुरवात आपल्या घरापासूनच व्हायला हवी. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनी शिक्षणासह सर्व क्षेत्रांत आघाडीवर आहेत. विषम सामाजिक पार्श्वभूमीवर देखील शैक्षणिक क्षेत्रातील स्त्रियांचे संख्यात्मक आणि गुणवत्तात्मक वाढते प्रमाण हे आश्वासक चित्र असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यशाळेचा मुख्य विषय 'भारतीय महिला: जात-वर्ग-लिंगभाव जाणिवा' असा होता. प्रथम सत्रात स्त्रीवादी साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक प्रा.डॉ. माया पंडित यांनी राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिलांच्या वर्तमान स्थितीचे आंतरराष्ट्रीय निर्देशांकाद्वारे विस्तृत वर्णन केले. त्यानंतर कन्नड साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका प्रा. डॉ. शिवगंगा रुम्मा यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. बाराव्या शतकात निर्माण झालेली शरण चळवळ ही केवळ भक्तीपंथ नसून ती जात-वर्ग-लिंगभेदरहित समताधिष्ठित समाज निर्मितीची समग्र चळवळ असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या सत्रात चित्रपट समीक्षक डॉ. अनमोल कोठाडिया यांनी महिलांविषयक निवडक आंतरराष्ट्रीय लघुपटांचे प्रदर्शन करून त्यावर चर्चा घडवून आणली. यामध्ये उमेश मालन दिग्दर्शित 'गोल्डन टॉयलेट' हा मराठी लघुपट, फजिल रझाक दिग्दर्शित 'पिरा' हा मल्याळम लघुपट तसेच समता जाधव दिग्दर्शित 'सोच सही, मर्द वही' हा हिंदी लघुपट दाखविण्यात आला.

या एकदिवसीय कार्यशाळेसाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील वीसहून अधिक महाविद्यालयांतील ३५० विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी सहभाग नोंदविला. डॉ. चैत्रा राजाज्ञा यांनी स्वागत व पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी प्रास्ताविक केले. वैष्णवी पोतदार व मानसी बोलूरे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. अंकिता त्रिभुवने यांनी आभार मानले.

कार्यशाळेस व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रघुनाथ ढमकले, अधिसभा सदस्य ॲड. अभिषेक मिठारी व ॲड. अजित पाटील, डॉ. आण्णासाहेब गुरव, डॉ. राजेंद्र सोनकवडे, डॉ. नितीन माळी, डॉ. चंद्रकांत लंगरे, डॉ. राजश्री बारवेकर, डॉ. दिलीप माळी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपुरकर, सरला पाटील, राजशेखर तंबाके, बसवराज आजरी, प्रा. सुभाष महाजन, प्रा. अशोक विभुते, प्रा. कल्याणराव पुजारी, विलास आंबोळे, चंद्रशेखर बटकडली, सरपंच शुभांगी पाटील, राजश्री काकडे, उमेश सूर्यवंशी, रेश्मा खाडे सुरेश जांबुरे, विजय पाटील, विभावरी नकाते, कैवल्य शिंदे यांच्यासह विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 




Friday, 14 March 2025

विद्यापीठ कॅम्पसमधून आंतरराष्ट्रीय क्रीडापटू घडावेत: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

 शिवस्पंदन क्रीडा महोत्सवात तंत्रज्ञान अधिविभागास सर्वसाधारण विजेतेपद

शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाच्या सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते स्वीकारताना तंत्रज्ञान अधिविभागाचा संघ


शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाच्या द्वितिय सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते स्वीकारताना क्रीडा अधिविभागाचा संघ

शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाच्या तृतीय सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते स्वीकारताना गणित अधिविभागाचा संघ




कोल्हापूर, दि. १४ मार्च: शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पसमधूनही उत्तमोत्तम, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे क्रीडापटू घडावेत, या भूमिकेतून शिवस्पंदन क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास सुरवात केली. विद्यार्थ्यांनी विद्यापीठात उपलब्ध सुविधांचा वर्षभर लाभ घेऊन आपली कामगिरी उंचावत राहावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी काल (दि. १३) केले.

शिवाजी विद्यापीठात गेल्या आठवड्यात पार पडलेल्या शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाच्या सर्वसाधारण विजेत्यांची घोषणा आणि पुरस्कार प्रदान सोहळा काल सायंकाळी क्रीडा अधिविभागाच्या सभागृहात झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. तंत्रज्ञान अधिविभागाने स्पर्धेमध्ये सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने गतवर्षीपासून कॅम्पसवरील विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा गुणांना संधी प्रदान करण्याचे ठरवून शिवस्पंदन वार्षिक महोत्सवाला प्रारंभ केला. याला विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद लाभत आहे. क्रीडा स्पर्धांत गतवर्षी ७०० विद्यार्थी सहभागी झाले. यंदा हाच आकडा २५०० च्या घरात गेला. पुढील वर्षी तो आणखी वाढावा. त्याचप्रमाणे केवळ स्पर्धेपुरते मर्यादित न राहता क्रीडापटूंनी आपल्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच क्रीडाकौशल्यांच्या विकासाकडेही लक्ष द्यावे. क्रीडा विभागाने विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यांचा विद्यार्थ्यांनी वर्षभर लाभ घ्यावा आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांपर्यंत झेप घेऊन विद्यापीठाचे नाव उंचावावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. एन.डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. किरण पाटील यांनी आभार मानले. यावेळी मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार उपस्थित होते. क्रीडा स्पर्धा नेटकेपणाने पार पाडण्यासाठी डॉ. राजेंद्र रायकर, प्रा. किरण पाटील, डॉ. राम पवार, डॉ. धनंजय पाटील, डॉ. निलेश पाटील, प्रा. एन. आर. कांबळे, डॉ. विक्रम नांगरे- पाटील, सुभाष पवार, सुचय खोपडे, डॉ. प्रशांत पाटील, प्रा. मनीषा शिंदे, प्रदीप हंकारे यांनी परिश्रम घेतले.

तंत्रज्ञान अधिविभाग सर्वसाधारण विजेता

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये तंत्रज्ञान अधिविभागाच्या संघाने स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. त्यांना विजेतेपदाचा चषक प्रदान करण्यात आला. क्रीडा अधिविभागाच्या संघाने सर्वसाधारण द्वितिय तर गणित अधिविभागाने तृतीय क्रमांकाचे विजेतेपद पटकावले.

महिला उद्योजकांनी उपलब्ध संधींचा लाभ तत्परतेने घ्यावा: वैष्णवी अंदूरकर

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत बोलताना उद्योजक वैष्णवी अंदूरकर. मंचावर (डावीकडून) डॉ. दीपा इंगवले, डॉ. आण्णासाहेब गुरव, काव्यश्री नलवडे व डॉ. प्रकाश राऊत


कोल्हापूर, दि. १४ मार्च: महिला या मुळातच उत्तम व्यवस्थापक असतात. महिला उद्योजकांना आज अनेकविध प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. त्यांचा लाभ त्यांनी तत्परतेने घ्यावा, असे आवाहन ग्लॅडियन्स ऑटोमेशन कंपनीच्या संचालक वैष्णवी अंदूरकर यांनी केले.

शिवाजी विद्यापीठातील इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि लिंकेंजेस केंद्र, एसयूके रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि एमबीए युनिट, वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या वतीने "विकसित भारतातील महिला उद्योजकांची भूमिका" या विषयावर पीएम-उषा अंतर्गत नुकतीच एकदिवसीय कार्यशाळा झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख डॉ. आण्णासाहेब गुरव होते.

सौ. अंदूरकर यांनी आपल्या भाषणात महिला उद्योजकांसमोरील संधी, सध्याच्या बाजारपेठेतील स्पर्धा आणि महिला उद्योजकांनी घेतले पाहिजेत, असे धोरणात्मक निर्णय याविषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी पूजा इंड्स्ट्रीज समूहाच्या सौ. काव्यश्री नलवडे यांनीही स्वतःचा उद्योग निर्मितीचा प्रवास आणि महिला उद्योजकांच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांची माहिती दिली.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. गुरव यांनी व्यावसायिक तसेच औद्योगिक निर्णयप्रक्रियेतील महिलांचा सहभाग तसेच महिलांच्या अंगभूत कौशल्यांचा वापर करून उदयोग-व्यवसाय यशस्वी करून विकसित भारतामध्ये महिला देऊ शकणाऱ्या योगदानाविषयी मार्गदर्शन केले. महिला उद्योजकांसाठी शासनाने अनेक योजना जाहीर केल्या आहेत. त्यांचा लाभ घेण्यासाठी महिलांनी पुढे येण्याची आवश्यकता त्यांनी मांडली.

या कार्यशाळेच्या विविध सत्रांत सौ. वैजयंती एस. काळे (व्यवस्थापकीय संचालक, निना अॅहग्रोटेक प्रा. लि.), सौ. मोनिका शेवाळे (संस्थापक व इव्हेंट प्लॅनर, अवनी इव्हेंट्स, कोल्हापूर), सौ. वृषाली खोत (उद्योजक, श्रीराम गारमेंट ग्रुप) यांनी आपली वाटचाल, संघटन कौशल्य, व्यवसाय वृद्धी आणि नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याच्या संधी याबद्दलचे स्वानुभव कथन केले.

सुरवातीला एसयूके-आरडीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रकाश राऊत यांनी स्वागत केले. एमबीए युनिटच्या संचालक डॉ. दीपा इंगवले यांनी आभार मानले. कार्यशाळेत डॉ. केदार मारुलकर, तेजश्री घोडके, अर्चना मानकर, डॉ. तेजपाल मोहरेकर, परशराम देवळी आदींनी सहभाग घेतला.

 

शिवाजी विद्यापीठातील 'संगीत' तलाव

आंतरराष्ट्रीय विज्ञानपत्रिकेच्या मुखपृष्ठावर

झाडाच्या प्रतिबिंबात रासायनिक संयुगाच्या संरचनेचा आभास

डॉ. सुशीलकुमार जाधव यांच्या निरीक्षणाचे फलित


आंतरराष्ट्रीय विज्ञान पत्रिकेच्या मुखपृष्ठावर शिवाजी विद्यापीठाचा 'संगीत' तलाव


डॉ. सुशीलकुमार जाधव




कोल्हापूर, दि. १४ मार्च: ‘जे न देखे रवी, ते देखे कवी अशी एक सुप्रसिद्ध म्हण आहे. म्हणजे जे सूर्यालाही दिसत नाही, ते कवीच्या नजरेला दिसते. ही बाब संशोधकांनाही लागू आहे. सतत आपल्या संशोधनाच्या विचारात गुंतलेल्या संशोधकांनाही जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणीअशी सर्वत्रच आपल्या संशोधनाची प्रतिबिंबे दिसू लागतात. शिवाजी विद्यापीठातील शिक्षक, संशोधक डॉ. सुशीलकुमार जाधव यांच्या बाबतीतही असेच घडले. एरव्ही विद्यार्थ्यांमध्ये सनसेट पॉईंट म्हणून प्रसिद्ध असलेल्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाशेजारील तलावामधील झाडाच्या प्रतिबिंबामध्ये त्यांना एका रासायनिक संयुगाच्या संरचनेचा आभास झाला. ते छायाचित्र त्याच ठिकाणाहून त्यांनी टिपले आणि नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या स्प्रिंजर नेचर प्रकाशनाच्या मॅक्रोमॉलेक्युलर रिसर्च (मार्च २०२५) या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेच्या मुखपृष्ठावर झळकण्याचा मान या छायाचित्राला लाभला.

या संदर्भात शिवाजी विद्यापीठातील नॅनो सायन्स व तंत्रज्ञान अधिविभागातील प्राध्यापक डॉ. सुशीलकुमार जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शंभूराज कापसे आणि प्रणोती पाटील हे विद्यार्थी संशोधन करीत आहेत. त्यांच्याच शोधनिबंधाच्या विषयास अनुसरून हे मुखपृष्ठ तयार केलेले आहे. छायाचित्रातील झाडाच्या फांद्या आणि त्यांचे पाण्यातील प्रतिबिंब हे ब्रँच्ड-पॉलिथिलिनमाईन या बहुलकाप्रमाणे (पॉलिमरसारखे) दिसते. हा पॉलिमर पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येतो. या पॉलिमरद्वारे पाण्यातील सेंद्रिय तसेच असेंद्रिय विषारी घटक वेगळे केले जाऊ शकतात. मॅक्रोमॉलेक्युलर रिसर्च या आंतरराष्ट्रीय मानांकित जर्नलच्या प्रत्येक अंकामध्ये साधारण पंधरा ते वीस शोधनिबंध प्रसिद्ध होतात. या सर्वांमध्ये स्पर्धा घेऊन एका शोधनिबंधाशी संबंधित छायाचित्र मुखपृष्ठासाठी निवडले जाते. त्यामधून शिवाजी विद्यापीठ परिसरातील संगीत तलावाचे डॉ. जाधव यांनी काढलेल्या छायाचित्राची निवड या महिन्याच्या मुखपृष्ठासाठी करण्यात आली. या छायाचित्राचा वापर शोधनिबंधातील वैज्ञानिक माहिती कलात्मक पद्धतीने दर्शवण्यासाठी करण्यात आला आहे.

शिवाजी विद्यापीठाचा परिसर हा हिरवाईने, जैवविविधतेने नटलेला आहे. विद्यापीठातील ही नैसर्गिक स्थळे संशोधकांसाठी सुद्धा आता प्रेरणास्थळे ठरत आहेत, ही महत्त्वाची बाब आहे. विद्यापीठाच्या या नैसर्गिक विविधतेला आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेच्या मुखपृष्ठावर झळकवल्याबद्दल डॉ. जाधव आणि संशोधक विद्यार्थ्यांचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी अभिनंदन केले.

Wednesday, 12 March 2025

यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी विशेष प्रयत्न केले - माजी प्राचार्य गणपतराव कणसे



कोल्हापूर, दि.12 मार्च - यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य नेहमी अग्रेसर रहावे यासाठी विशेष प्रयत्न केले, असे प्रतिपादन कराड येथील टिळक हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य गणपतराव कणसे यांनी आज येथे केले.



           शिवाजी विद्यापीठाच्या कै.यशवंतराव चव्हाण अध्यासन, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट यांच्या वतीने भारताचे दिवंगत उपपंतप्रधान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त 'यशवंतराव चव्हाण : संस्काराचे अमृतकुंभ' या विषयावर माजी प्राचार्य गणपतराव कणसे (कराड) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी माजी प्राचार्य कणसे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.महादेव देशमुख उपस्थित होते.

            पुढे बोलताना माजी प्राचार्य कणसे म्हणाले, व्यक्ती संपत्तीवर मोठा होत नाही तर त्यांनी अंगीकारलेल्या संस्कारावर मोठा होतो. हे यशवंतराव चव्हाणांनी आपल्या यशस्वी कारकिर्दीत दाखवून दिले आहे. ते आपल्या संस्काराच्या भक्कम पायांवर उभे राहिले म्हणून आज आपण सगळे त्यांचे स्मरण करतो.व्यक्ती पेक्षा देश मोठा ही पवित्र भावना यशवंतराव चव्हाणांनी लोकांच्या मनामध्ये रूजविली.देवराष्ट्र सारख्या एका दूर्गम भागात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला.आई, वडील आणि गुरूजनांकडून मिळालेल्या संस्कारूपी शिदोरीच्या जोरावरच राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सहकार, कला-क्रीडा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी भरीव कामगिरी केली.  शिक्षण क्षेत्रामुळे सर्व क्षेत्रांला ऊर्जा प्राप्त होते याचे भान त्यांना होते. कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी ते आग्रही होत आणि म्हणूनच प्रसंगी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करण्यासही ते मागे-पुढे पाहिले नव्हते. सहकार क्षेत्रामध्ये त्यांच्या निर्णयामुळे प्रचंड क्रांती झाली.  महाराष्ट्र ही भारत देशाची प्रयोगशाळा ठरते ही सगळी किमया यशवंतराव चव्हाण यांची आहे. आई, वडील आणि गुरूजनांचा नेहमी सन्मान राखावे असे ते म्हणत.  जीवसृष्टी चिरंतन काळापर्यंत अबाधीत राहण्यासाठी आजच्या तरूणांनी पर्यावरण आणि पाणी प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत माजी प्राचार्य कणसे यांनी व्यक्त केले.

            अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना अधिष्ठाता डॉ.महादेव देशमुख म्हणाले, दुर्गम भागातील व्यक्ती आपल्या संस्काराच्या जोरावर देशाच्या प्रगतीमध्ये आणि जडणघडणीमध्ये मोठे योगदान देण्याचे महत्वपूर्ण कार्य यशवंतराव चव्हाण यांचे कडून घडले. राज्याची, देशाची प्रगती व्हावी, सर्वसामान्य माणसाचा विकास व्हावा, अशा पध्दतीची नितीमत्ता त्यांनी बाळगली आणि त्यासाठी ते प्रयत्नशील राहिले.सहकार क्षेत्रामध्ये केलेले त्यांचे कार्य देशाला दिशादर्शक ठरले.

            यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हसते करण्यात आला.या विविध स्पर्धेतील विजेत्यांची नांवे अनुक्रमे अशी: पोस्टर स्पर्धा - वरूण अमृते, नेहा शिंदे, सुकन्या निकम.निबंध स्पर्धा - नेहा शिंदे, सुकन्या निकम, श्रेया म्हापसेकर.रिल स्पर्धा - आरपीता सावंत, आदित्य देसाई, प्रथमेश पाटील.

            कार्यक्रमाच्या सुरूवातीस यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटचे प्रभारी संचालक डॉ.नितीन माळी यांनी स्वागत प्रास्ताविक केले.डॉ.उर्मिला दशवंत यांनी सूत्रसंचालन केले. यशवंतराव चव्हाण अध्यासनाचे समन्वयक डॉ.उमेश गडेकर यांनी आभार मानले.यावेळी डॉ.कविता वड्राळे, डॉ.संतोष सुतार यांचेसह विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी, विद्यार्थींनी, शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.


यशवंतराव चव्हाण यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन

          यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट येथे यशवंतराव चव्हाण यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्धाटन माजी प्राचार्य डॉ.गणपतराव कणसे (कराड) आणि मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.महादेव देशमुख यांनी केले.या प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.


             तत्पूर्वी, शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अपर्ण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी, कुलसचिव डॉ.विलास शिंदे, आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे संचालक डॉ.रामचंद्र पवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.तुकाराम चौगुले, क्रीडा अधिविभागाचे संचालक डॉ.शरद बनसोडे, माजी प्राचार्य गणपतराव कणसे, डॉ.संतोष सुतार, डॉ.उमेश गडेकर, डॉ.कविता वड्राळे, डॉ.वैशाली भोसले, डॉ.गजानन साळुंखे, डॉ.परशुराम वडार, डॉ.दादा ननावरे, डॉ.प्रताप खोत, डॉ.उर्मिला दशवंत यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक उपस्थित होते.

                                                                             -----