Wednesday, 21 January 2026

"बोलीभाषांविषयी सार्वत्रिक सन्मान निर्माण होण्याची गरज"

शिवाजी विद्यापीठातील बोलींचा जागर कार्यशाळेतील सूर

शिवाजी विद्यापीठात आयोजित 'बोलींचा जागर' या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मराठी भाषा विभागाचे उपसमन्वयक डॉ. संजय पवार.


शिवाजी विद्यापीठात आयोजित 'बोलींचा जागर' या कार्यक्रमात बोलताना डॉ. नंदकुमार मोरे. मंचावर (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, डॉ. विलास शिंदे, डॉ. संजय पवार, डॉ. गोपाळ गावडे व डॉ. एकनाथ आळवेकर.

शिवाजी विद्यापीठात आयोजित 'बोलींचा जागर' या कार्यक्रमात बोलताना डॉ. नंदकुमार मोरे. 

शिवाजी विद्यापीठात आयोजित 'बोलींचा जागर' या कार्यक्रमात कोल्हापुरी बोलीविषयी बोलताना डॉ. एकनाथ आळवेकर. 

शिवाजी विद्यापीठात आयोजित 'बोलींचा जागर' या कार्यक्रमात चंदगडी बोलीविषयी बोलताना डॉ. गोपाळ गावडे. 

शिवाजी विद्यापीठात चंदगड येथील तुळसाबाई बांदिवडेकर आणि सहकारी लोककलाकारांनी डॉ. गोपाळ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगडी लोकगीतांचे सादरीकरण केले.

('बोलींचा जागर' कार्यक्रमाची लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. २१ जानेवारी: बोलीभाषा टिकविण्यासाठी त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याबरोबरच तिच्याविषयी सार्वत्रिक सद्भाव आणि सन्मानाची भावना निर्माण होण्याची आवश्यकता आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात आयोजित बोलींचा जागर या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये उमटला.

महाराष्ट्र शासनाचे भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग आणि शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत बोलींचा जागर ही विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत कोल्हापुरी आणि चंदगडी बोलींच्या अनुषंगाने विस्तृत चर्चा आणि चंदगडी लोकगीतांचे सादरीकरण झाले.

मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ. उदय सामंत आणि सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या प्रेरणेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. गोपाळ गावडे आणि डॉ. एकनाथ आळवेकर या तज्ज्ञांनी सहभाग दर्शविला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते, तर मराठी भाषा विभागाचे उपसमन्वयक डॉ. संजय पवार प्रमुख उपस्थित होते.

यावेळी चंदगडी बोली: उद्गम आणि विकास या विषयावर बोलताना डॉ. नंदकुमार मोरे म्हणाले, बोलीभाषेचा न्यूनगंड विद्यार्थ्यांच्या मनात शालेय शिक्षणापासूनच निर्माण केला जातो आणि त्यातूनच पुढे भाषिक सपाटीकरणाच्या प्रक्रियेला सुरवात होते. या पेरलेल्या न्यूनगंडातून आजवर अनेक बोलीभाषा अस्तंगत झाल्या, तथापि आता त्यांच्या जतनासाठी शासनाने पुढाकार घेतला, ही स्वागतार्ह बाब आहे. बोलीभाषा ही आपल्या अस्तित्वाचे कारण आहे, याची जाणीव नागरिकांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांच्या मनातील न्यूनगंड दूर होऊन बोलीभाषेविषयी, प्रेम, आदर आणि सद्भाव जागृत करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्या दृष्टीने ज्या त्या भागातील बोलीभाषेविषयी त्या भागांत संबंधित बोलीभाषेचा उत्सव साजरा केला जावा. त्यासाठी शासन आणि विद्यापीठांनी संयुक्तपणे कार्यक्रम राबविण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

चंदगडी बोलीचे स्वरुप या विषयावर बोलताना डॉ. गोपाळ गावडे म्हणाले, चंदगड हे ठिकाण महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यांच्या सीमेवर आहे. त्यामुळे पूर्वेकडील चंदगडी बोलीवर कानडी आणि बेळगावी मराठीचा प्रभाव दिसतो तर पश्चिमेकडील बोलीवर गोमंतकीय कोकणीचा प्रभाव दिसतो. चंदगडी माणूस हा निर्मळ, स्वाभिमानी आणि सडेतोड स्वभावाचा असल्यामुळे स्वाभाविकच त्याची भाषा ही राकट आहे. या भाषेत लिंगभेद आढळत नाही. प्रत्येक विधी, सण, उत्सव यांचे लोकगीतांतून मोठे साजरीकरण होते. आता नव्या पिढीमध्ये हे सारे अस्तंगत होताना दिसते. जर ही बोलीभाषा टिकवावयाची तर तिला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत.

डॉ. एकनाथ आळवेकर कोल्हापुरी बोली या विषयावर बोलताना म्हणाले, कोल्हापुरी बोली ही कृषी आणि ग्रामीण संस्कृतीमधून उदयाला आलेली आहे. करवीर, पन्हाळा, कागल, भुदरगड, शाहूवाडी, शिरोळ आणि गगनबावडा व कर्नाटकचा सीमाभाग या ठिकाणी प्रामुख्याने ती बोलली जाते. इथला भूमीपुत्र रांगडा आहे. त्याच्या स्वभावाचे प्रतिबिंब त्याच्या बोलीमध्ये आढळते. एकाचवेळी रांगडा लवंगी मिरचीसारखा तिखट शिवराळपणा आणि गुळासारखा गोडवा हे त्याच्या भाषेचे वैशिष्ट्य आहे. शंकर पाटील, महादेव मोरे, डॉ. आनंद यादव, डॉ. राजन गवस, डॉ. चंद्रकुमार नलगे, कृष्णात खोत आणि किरण गुरव इत्यादी लेखकांच्या साहित्यामधून कोल्हापुरी बोली निरनिराळ्या ढंगाने वाचकांना सामोरी येते. उच्चारणातील आक्रमकता, स्त्रियांच्या बोलण्यातील क्रियापदांचा वापर आणि कृषीसंस्कृतीचा स्वाभाविक प्रभाव ही या बोलीची ठळक वैशिष्ट्ये आहेत. त्याचप्रमाणे शहरी भागामध्ये इंग्रजी शब्दांचे सुलभीकरण करून त्यांचा सहजगत्या नित्य बोलण्यात केला जाणारा वापर हेही कोल्हापुरी बोलीचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणून सांगता येते.

सर्वच वक्त्यांनी आपल्या भाषणांतून कोल्हापुरी आणि चंदगडी बोलींमधील शब्द, वाक्प्रचार आणि म्हणींची अनेक उदाहरणे देऊन ही माहिती रंजकरित्या सादर केली.

यावेळी मराठी भाषा विभागाचे उपसमन्वयक डॉ. संजय पवार यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील बोली भाषांचे जतन व संवर्धन करण्यासाठी बोलीभाषा केंद्र उभारण्याचा शासनाचा मानस आहे. त्याचप्रमाणे विविध बोलीभाषांचे शब्दकोष निर्माण करण्याच्या दृष्टीनेही शासन गांभीर्यपूर्वक प्रयत्न करीत आहे. नवतंत्रज्ञानाचा, समाजमाध्यमांचा वापर करून नव्या पिढीने आपल्या बोली भाषेला लोकमान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, बोलीभाषा ही आपली खरी मातृभाषा आहे, हे लक्षात घेऊन आपण तिचा सन्मान करण्यास शिकले पाहिजे. भाषा हे लोकांमध्ये जवळीक साधण्यासाठीचे महत्त्वाचे साधन आहे. भाषा प्रवाही राहण्यासाठी अन्य भाषांतील शब्दांचा मुक्तप्रवेश आपण स्वीकारला पाहिजे. बोलीभाषांचे शब्दकोष निर्माण होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

चंदगडी लोककलाकारांचे श्रवणीय सादरीकरण

कार्यक्रमात डॉ. गोपाळ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली नागनवाडी (ता. चंदगड) येथील तुळसाबाई बांदिवडेकर आणि सहकारी लोककलाकारांनी चंदगडी लोकगीतांचे सादरीकरण केले. विशेषतः चंदगड भागातील विवाहादरम्यान जे विविध विधी केले जातात, त्यावेळी म्हटल्या जाणाऱ्या विविध लोकगीतांचे सादरीकरण करण्यात आले. या कलाकारांत सरिता विष्णू गावडे, सुनिता गोविंद भादवणकर, गुंडाबाई बाळू गावडे, शांता महादेव बांदिवडेकर, अनिता अनंत गावडे, सुनिता गावडे आणि शांता दत्तू गावडे यांचा समावेश होता.

कार्यक्रमास मराठी भाषा विभागाचे भाषा अधिकारी अजित पोवार, वरिष्ठ अनुवादक मुकुंद गोरे, अधीक्षक नारायण जायभाये, नितीन यशवंतराव, डॉ. अनिल गवळी, डॉ. अरुण शिंदे, डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांच्यासह शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी केले. प्रांजल क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Tuesday, 20 January 2026

विद्यापीठाची ‘पेटंट गॅलरी’ ठरली लक्षवेधक

शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने आयोजित औद्योगिक प्रदर्शन व पोस्टर स्पर्धेचे उद्घाटन करताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. सोबत डॉ. सागर डेळेकर, डॉ. सुभाष माने, डॉ. गजानन राशिनकर यांच्यासह सहभागी उद्योजक व व्यावसायिक.

शिवाजी विद्यापीठाच्या पेटंट गॅलरीला भेट प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. सोबत डॉ. सागर डेळेकर, डॉ. गजानन राशिनकर, डॉ. सुभाष माने आदी.


शिवाजी विद्यापीठात आयोजित औद्योगिक प्रदर्शनात सहभागी उद्योजकांच्या उत्पादनांची पाहणी करताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. सोबत डॉ. सागर डेळेकर आणि डॉ. सुभाष माने.

(शिवाजी विद्यापीठ औद्योगिक प्रदर्शन उद्घाटनाचा व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. २० जानेवारी: शिवाजी विद्यापीठात आजपासून सुरू झालेल्या दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय शिक्षण-उद्योग-शासन परिषदेमध्ये विशेष औद्योगिक प्रदर्शन आणि पोस्टर प्रदर्शन व स्पर्धेचे उद्घाटन दुपारी करण्यात आले. यामध्ये शिवाजी विद्यापीठाने गेल्या पाच वर्षांत प्राप्त केलेल्या बौद्धिक संपदा हक्क अर्थात पेटंटची गॅलरी सर्वाधिक लक्षवेधक ठरली.

विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात या प्रदर्शन-स्पर्धेचे दुपारी फीत कापून उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर डॉ. जाधव यांनी फिरून सर्व प्रदर्शनाची पाहणी केली. त्याचप्रमाणे सहभागी उद्योजक-व्यावसायिकांनी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेण्याविषयी तसेच आवश्यक तेथे मार्गदर्शन व सहकार्य करण्याविषयी सूचित केले.

या आंतरराष्ट्रीय परिषदेत गतवर्षीप्रमाणे यंदाही अनेक स्थानिक उद्योजक, व्यावसायिक सहभागी झाले आहेत. यामध्ये अभिनव स्टार्टअपपासून ते प्रयोगशील उत्पादक, व्यावसायिक यांचा सहभाग राहिला. असे एकूण २० स्टॉल आहेत. सेंद्रिय, पर्यावरणपूरक पदार्थ, वस्तू आणि उत्पादने येथे प्रदर्शन, नोंदणी व विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये डॉ. गजानन राशिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठाच्या बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर) कक्षाच्या वतीने गेल्या पाच वर्षांत विद्यापीठाने प्राप्त केलेल्या विविध पेटंट प्रमाणपत्रांची गॅलरीही मांडण्यात आली आहे. ही प्रमाणपत्रे पाहण्यासाठी जिज्ञासू संशोधक विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली. ही गॅलरी अभिनव आणि दर्जेदार संशोधनासाठी प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास डॉ. राशिनकर यांनी व्यक्त केला. याखेरीज वीज बचत उपकरणे, औद्योगिक उपकरणे, सौर उपकरणे, आधुनिक लॉकर्स, कॉफी विथ सी.ए., स्टार्च थ्री-डी प्रिंटींग, सेंद्रिय खाद्यपदार्थ इत्यादींचेही स्टॉल आहेत.

पोस्टर प्रदर्शनात इंजिनिअरिंग व फॅब टेक, आय.टी. व इमर्जिंग टेक्नॉलॉजी, सोशिओ-मॅनेजमेंट व फिट-टेक, सस्टेनेबिलिटी व हेल्थ या चार गटांमध्ये सुमारे शंभर पोस्टर संशोधक विद्यार्थ्यांनी प्रदर्शित केले.

दरम्यान, परिषदेत आज दिवसभरात देशविदेशांतील तज्ज्ञांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर मांडणी केली. यामध्ये मलेशियाच्या टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे डॉ. मोहम्मद याझीद बिन याह्या, डॉ. अहमद इलियास बिन रुश्दान, ऑस्ट्रेलियाच्या साऊथवेल्स विद्यापीठाचे डॉ. महेश सूर्यवंशी, चितळे जिनस एबीएस इंडियाचे गिरीश चितळे, डी.वाय. पाटील वैद्यकीय विद्यापीठाचे डॉ. देवव्रत हर्षे, सिरीचे सहसंस्थापक सचिन कुंभोज, ग्लोबल फायनान्सचे संस्थापक संचालक योगेश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

 

 



स्थानिक पातळीवर स्टार्टअप संस्कृतीचा विकास महत्त्वाचा: अश्विनी दाणीगोंड

शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलताना अश्विनी दाणीगोंड.

शिवाजी विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलताना अश्विनी दाणीगोंड. मंचावर (डावीकडून) डॉ. सागर डेळेकर, प्रा. कंडलम् रामानुजाचार्य, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. चंद्रिका कौशिक व डॉ. सुभाष माने.

(आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाचा व्हिडिओ)



कोल्हापूर, दि. २० जानेवारी: जागतिक स्तरावर झेप घेण्यासाठी स्थानिक पातळीवर स्टार्टअप संस्कृतीचा विकास होणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे, असे प्रतिपादन प्रख्यात उद्योजक अश्विनी दाणीगोंड यांनी केले.

शिवाजी विद्यापीठात आजपासून दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय शिक्षण-उद्योग-शासन परिषदेस प्रारंभ झाला. परिषदेच्या उद्घाटन समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव अध्यक्षस्थानी होत्या, तर अमेरिकेतील रोवान विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. कंडलम् रामानुजाचार्य आणि नवी दिल्ली येथील डी.आर.डी.ओ.च्या महासंचालक डॉ. चंद्रिका कौशिक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

श्रीमती दाणीगोंड म्हणाल्या, उद्योजकता विकासाच्या प्रक्रियेमध्ये आजघडीला नवोन्मेषाला पर्याय नाही. त्यासाठी केवळ मूल्यांकनावर नव्हे, तर मूल्यनिर्मितीवर भर देण्याची आवश्यकता आहे. शिक्षण, उद्योग आणि शासन हा विद्या, बुद्धी आणि शक्ती यांची त्रिवेणी संगम असून त्या माध्यमातूनच देशात उद्योग-व्यवसायांचे सक्षमीकरण करणे शक्य आहे. विकसित भारत@२०४७ ही संकल्पना आपल्याला प्रत्यक्षात आणावयाची असल्यास त्या प्रक्रियेमध्ये शैक्षणिक क्षेत्रात योगदान अत्युच्च असण्याची आवश्यकता आहे. उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन गुणवत्तासंपन्न विद्यार्थी देशाला सोपविण्याची जबाबदारी उच्चशिक्षण संस्थांवर आहे. स्थानिक गुणवत्ता जास्तीत जास्त पारखून आणि निवडून देशाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सामील केले पाहिजे. आजच्या मंथनातून जे सृजन घडेल, त्यातून उद्याच्या भारताचे भवितव्य साकार होईल. राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये शिक्षण, आरोग्य, कृषी या मूलभूत क्षेत्रांसह सर्वच क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे उपयोजन करण्यासाठी सुसज्ज असे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात निर्माण करण्याची जबाबदारी अशा परिषदांमधून पार पाडली गेली पाहिजे. त्यामध्ये सातत्य राहण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी प्रा. रामानुजाचार्य म्हणाले, शैक्षणिक क्षेत्राला उद्योगांच्या गरजांनुसार आपल्या संशोधनाच्या दिशा ठरवाव्या लागतात. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील नवनव्या प्रवाहांवर शैक्षणिक क्षेत्राचे बारीक लक्ष असणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने शिक्षण-उद्योग सहकार्य परिषदा कळीची भूमिका बजावतात.

यावेळी डॉ. चंद्रिका कौशिक यांनीही मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी वाहून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. श्रीमती दाणीगोंड यांच्या हस्ते परिषदेच्या ई-स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. परिषदेचे समन्वयक डॉ. सागर डेळेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सहसमन्वयक डॉ. सुभाष माने यांनी आभार मानले. उद्घाटन समारंभाला विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव यांच्यासह ज्येष्ठ संशोधक डॉ. प्रकाश वडगांवकर, मलेशियाचे डॉ. मोहम्मद याझीद, ऑस्ट्रेलियाचे डॉ. महेश सूर्यवंशी, डॉ. कैलास सोनवणे, डॉ. संजय चव्हाण, डॉ. कल्याणराव गरडकर यांच्यासह शिक्षण, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, 19 January 2026

गांधी, नेहरू, आंबेडकरांकडून सर्वसमावेशक भारताची संकल्पना साकार: अरूण खोरे


फोटोओळ (उपरोक्त दोहोंसाठी): शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ विचारवंत अरूण खोरे. मंचावर (डावीकडून) डॉ. प्रकाश पवार आणि डॉ. रणधीर शिंदे.

(कार्यक्रमाची लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. १९ जानेवारी: देशाच्या उत्थानासाठी कार्य करण्याचे मार्ग वेगळे असले तरी गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांचे भारताच्या व्यापक उभारणीचे उद्दिष्ट मात्र एकच होते. ते साध्य करण्यासाठी त्यांनी संघर्षातून समन्वयात्मक संवादाचा मार्ग स्वीकारला. त्यातून सर्वसमावेशक भारताची संकल्पना साकारली, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत अरूण खोरे यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचे गांधी अभ्यास केंद्र आणि नेहरू अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी- डॉ. बाबासाहेब आंबेडकर- पंडित जवाहरलाल नेहरू: एक संवादया विषयावर श्री. खोरे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे होते.

अरूण खोरे यांनी आपल्या व्याख्यानात गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांच्या परस्पर संबंधांचा अत्यंत विस्ताराने वेध घेतला. ते म्हणाले, गांधी आणि नेहरू, आंबेडकर यांच्यामध्ये एका पिढीचे अंतर होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये काही बाबतीत मतभेद होत असत. तरीही गांधी, नेहरूंमध्ये एक वेगळे अद्वैत होते. नेहरूंसाठी गांधी नेहमीच पित्यासमान राहिले. गांधीजींची ग्रामस्वराज्याची संकल्पना आणि नेहरूंचा आधुनिकतावादी दृष्टीकोन यामध्ये अंतर असले तरी गांधींच्या रचनात्मक कार्याला नेहरूंचे सदैव सहकार्य राहिले. गांधीजी आणि डॉ. आंबेडकर यांच्यामध्ये मात्र हिंदू धर्मातील वर्णाश्रम पद्धती, जातीभेद यांवरुन मोठे मतभेद होते. गांधी आहे त्या घरात राहून सुधारणा करण्याच्या मताचे होते. तर, अथक प्रयत्नांनंतरही ते घर दुरुस्त होत नसेल तर त्याची संपूर्ण फेरबांधणी करावी, असे आंबेडकरांचे मत होते. जातीय निवाड्यावरुन आमरण उपोषणापर्यंत हे संबंध ताणले गेले तरी, या दोघांच्या संवादात खंड पडला नाही. घटना समितीमध्ये आंबेडकरांचा प्रवेश ही गांधी-आंबेडकरांच्या सुसंवादाची नवी सुरवात होती. या देशातील अखिल महिलांच्या कल्याणाचा विचार करणारे हिंदू कोड बिल जसेच्या तसे लागू करण्याच्या मताचे आंबेडकर होते कारण पुढे त्या बिलाचे काय होईल, ही चिंता त्यांना होती. पण, काँग्रेसजनांच्या मानसिकतेची पूर्ण जाणीव असलेल्या नेहरूंनी ते टप्प्याटप्प्याने लागू करण्याचे विचार मांडला. बाबासाहेबांनी या तळमळीतून मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र, नेहरूंनी आपले शब्द खरे करताना हिंदू कोड बिल तुकड्या-तुकड्यांत लागू करून महिलांना न्याय दिला.

श्री. खोरे म्हणाले, गांधी-नेहरू-आंबेडकरांनी अखिल भारतीय समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचे स्वप्न पाहिले. त्या उद्दिष्टपूर्तीचे त्यांचे मार्ग वेगळे असले तरी देशातील बहुजन, वंचित, दलित घटकांच्या उन्नतीची तळमळ मात्र सारखीच होती. भारतीयत्व निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांचा समन्वयात्मक संवाद हा उच्च दर्जाचा होता. त्याची फळे आजही आपण चाखत आहोत. या त्रयीने देशाच्या निर्मितीच्या कालखंडात घेतलेल्या भूमिकांचा समग्र आणि साकल्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या विचारकार्याचे विस्मरण देशाला परवडणारे नाही.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. शिंदे म्हणाले, तत्कालीन परिस्थितीमध्ये गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांच्यासमोरील अग्रक्रमाचे मुद्दे वेगवेगळे होते. पण राष्ट्रनिर्मितीचे ध्येय मात्र समान होते. शोषणाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोनही वेगळा होता. आज या महामानवांच्या विचारांना संकुचित आणि बंदिस्त करण्याचे प्रयत्न विविध स्तरांवर सुरू आहेत. ते उल्लंघून त्याच्याकडे पुन्हा नव्याने पाहणे आवश्यक आहे.

कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ. प्रकाश पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मतीन शेख यांनी सूत्रसंचालन केले. सोनाली जाधव यांनी आभार मानले. यावेळी सौ. शोभा खोरे, डॉ. सुनीलकुमार लवटे, व्यंकाप्पा भोसले, दशरथ पारेकर, जयसिंग पाटील, डॉ. रत्नाकर पंडित, डॉ. ओमप्रकाश कलमे, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. सुमेधा साळुंखे, डॉ. आलोक जत्राटकर उपस्थित होते.

Saturday, 17 January 2026

सकारात्मक अभिव्यक्तीतून माणूसपण घडते: डॉ. आलोक जत्राटकर

शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रात आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. आलोक जत्राटकर. शेजारी डॉ. कृष्णा पाटील.


कोल्हापूर, दि. १७ जानेवारी: सकारात्मक अभिव्यक्तीमधून माणूसपण घडत जाते आणि मानवतेच्या कक्षा रुंदावतात, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातील अंतर्गत शिक्षकांमध्ये गुणवत्ता व कौशल्यवृद्धीसाठी बातमीलेखन याविषयी डॉ. जत्राटकर यांचे काल (दि. १६) विशेष व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. कृष्णा पाटील होते.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षकांच्या सर्वांगीण विकासाला, कौशल्याधारित ज्ञानाला विशेष महत्व असल्याने कौशल्य विकास उपक्रमांतर्गत सदर व्याख्यान आयोजित करण्यात आले. डॉ.जत्राटकर म्हणाले, अभिव्यक्ती ही मानव असण्याची पूर्वअट आहे. त्यासाठी भोवतालामधून प्रेरणा घेऊन आपल्या वाचन, लेखन आदी अभिव्यक्तीच्या दिशा शोधाव्या लागतात. अनुभव आणि सातत्य यामधून ही कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. बातमी लेखन ही एक शैलीदार कला असून हे कौशल्य प्रत्येकाला सरावातून विकसित करता येते. यावेळी त्यांनी संज्ञापन, बातमीलेखन, वार्तामूल्ये, लेखनाचे प्रकार, बहुमाध्यमी बातमीचे स्वरुप इत्यादींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ.नितीन रणदिवे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ.सचिन भोसले यांनी परिचय करून दिला. संदीप थिटे यांनी सूत्रसंचालन केले, तर, डॉ. नगीना माळी यांनी आभार मानले. कार्यक्रमास उपकुलसचिव विनय शिंदे, समन्वयक डॉ.चांगदेव बंडगर यांच्यासह सर्व समन्वयक, सहायक प्राध्यापक आणि कोर्स कॉर्डिनेटर उपस्थित होते.

Friday, 16 January 2026

नवभारताचे उदात्त स्वप्न हा एन. डी. सरांचा ध्यास : प्रसाद कुलकर्णी

शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना प्रसाद कुलकर्णी. मंचावर (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, संगीता पाटील, डॉ. विलास शिंदे आणि डॉ. नंदकुमार मोरे.

शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना प्रसाद कुलकर्णी. 


कोल्हापूर, दि. १६ जानेवारी: प्रबोधन परंपरेतील कृतिशील विचारांचा नेता म्हणून एन. डी. सरांचे योगदान महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचे आहे. सामान्य माणसांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी चळवळी उभारल्या. निद्रिस्ताला जागे करणे हीच त्यांची प्रबोधनाची व्याख्या होती. सत्याचा आग्रह धरून त्यांनी हस्तक्षेपाचे राजकारण केले. त्यासाठी प्रबोधन विचारांची मूल्यव्यवस्था स्वीकारून ती  रुजविण्यासाठी अथक प्रयत्न केले. नवभारताचे उदात्त स्वप्न हा त्यांचा ध्यास होता, असे प्रतिपादन प्रसाद कुलकर्णी यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील डॉ. एन. डी. पाटील लोकचळवळ अध्यासन आयोजित स्मृतिदिनानिमित्त ‘प्रा. एन. डी. पाटील: विचारविश्व आणि प्रबोधन’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे होते.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले, सामाजिक बांधिलकी ही फक्त त्यांच्या बोलण्यात नव्हती. तिचा कृतिशील पाठपुरावा त्यांनी सातत्याने केला. रस्त्यावरची लढाई खेळणारे ते लढवय्या होते. तत्त्वनिष्ठ नैतिकता हा त्यांच्या जीवनाचा मूलाधार होता. गेल्या साठ वर्षांतील चळवळींचा इतिहास जर लिहायचा झाला, तर त्यात एन. डी. सरांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

डॉ. शिंदे अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, तत्त्वांशी तडजोड न करता संवाद साधत समाजहिताची उभारणी करणे हा एन. डी. सरांचा सर्वात मोठा गुण होता. विधायक कामासाठी ते नेहमी पुढाकार घेत राहिले. महाराष्ट्राच्या प्रबोधन चळवळीला त्यांच्या कार्याचे सदैव स्मरण राहील.

यावेळी एन. डी. पाटील यांच्या स्नुषा संगीता पाटील यांनी प्रा. एन. डी. पाटील यांच्या आठवणी सांगितल्या. मराठी विभागप्रमुख प्रा. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. यावेळी प्रा. नंदकुमार मोरे, डॉ. बळवंत मगदूम, डॉ. पी. टी. सावंत, डॉ. दीपक भादले, मतीन शेख, सोनाली जाधव, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.                                     

Tuesday, 13 January 2026

आंतरराष्ट्रीय ‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स-२०२६’मध्ये शिवाजी विद्यापीठाचे १६८ संशोधक

प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांचा समावेश; माजी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील अग्रस्थानी

डॉ. ज्योती जाधव

डॉ. प्रमोद पाटील

डॉ. एस.पी. गोविंदवार

डॉ. केशव राजपुरे

डॉ. आण्णासाहेब मोहोळकर

डॉ. चंद्रकांत भोसले

डॉ. कल्याणराव गरडकर

डॉ. संजय कोळेकर

डॉ. तुकाराम डोंगळे

डॉ. अनिल घुले


कोल्हापूर, दि. १३ जानेवारी: जागतिक पातळीवरील संशोधन कार्याचे मूल्यमापन करणाऱ्या ए.डी. सायंटिफिक इंडेक्स-२०२६ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या एकूण १६८ संशोधकांचा समावेश झाला आहे. यामध्ये प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह माजी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांचा समावेश असून डॉ. पाटील विद्यापीठातील संशोधकांत अग्रस्थानी आहेत.

ए.डी. सायंटिफिक इंडेक्स हा जगभरातील संशोधक व विद्यापीठांचे स्थानांकन करणारा आंतरराष्ट्रीय निर्देशांक असून, संशोधकांच्या एच-निर्देशांक (h-Index), आय-टेन निर्देशांक (i10-Index) आणि शोधनिबंधांवरील उद्धरणे (Citations) या निकषांवर आधारित ही क्रमवारी निश्चित केली जाते. या निर्देशांकांमुळे संशोधनाचा दर्जा, सातत्य आणि जागतिक प्रभाव अधोरेखित होतो.

या निर्देशांकात शिवाजी विद्यापीठातील विविध शास्त्र शाखांतील संशोधकांचा समावेश असून, विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्रे आणि मानवविद्या या क्षेत्रांतील संशोधन त्यात अंतर्भूत आहे.

विद्यापीठातील आघाडीचे दहा संशोधक (h-Index आधारित) अनुक्रमे असे: डॉ. प्रमोद पाटील (भौतिकशास्त्र), डॉ. एस. पी. गोविंदवार (जैवरसायनशास्त्र), डॉ. केशव राजपुरे (सौरघट), डॉ. अण्णासाहेब मोहोळकर (ऊर्जा अभियांत्रिकी), डॉ. चंद्रकांत भोसले (भौतिकशास्त्र), डॉ. ज्योती जाधव (जैववैद्यकीय अभियांत्रिकी), डॉ. के. एम. गरडकर (रसायनशास्त्र), डॉ. संजय कोळेकर (रसायनशास्त्र), डॉ. तुकाराम डी. डोंगळे (विद्युत व इलेक्ट्रॉनिक्स), डॉ. अनिल घुले (रसायनशास्त्र).

याखेरीज सदर यादीत पुढे डॉ. नीलेश तरवाळ, डॉ. राजेंद्र सोनकवडे, डॉ. गोविंद कोळेकर, डॉ. सागर डेळेकर, डॉ. कैलास सोनवणे, डॉ. सुशीलकुमार जाधव, डॉ. विजया पुरी, डॉ. जॉन डिसूझा, डॉ. डी.एम. पोरे, डॉ. एस.आर. सावंत, डॉ. गजानन राशीनकर, डॉ. मानसिंग टाकळे, डॉ. राजश्री साळुंखे, डॉ. प्रमोद वासंबेकर यांच्यासह १६८ संशोधकांचा समावेश आहे. या यशामुळे शिवाजी विद्यापीठाची जागतिक संशोधन ओळख अधिक भक्कम झाली असून, विद्यार्थ्यांसाठी, संशोधकांसाठी तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संशोधन निधी मिळविण्यासाठीही ही बाब उपयुक्त ठरणार आहे.

संशोधकांच्या यशाची वाढती कमान अभिमानास्पद

शिवाजी विद्यापीठाचे संशोधक सातत्याने ए.डी. सायंटिफिक क्रमवारीत झळकत आहेत. शिवाय या यादीमधील त्यांची संख्या वर्षागणिक वाढते आहे. विद्यापीठातील संशोधकांच्या यशाची ही वाढती कमान अभिमानास्पद आणि नवसंशोधक विद्यार्थ्यांसाठी प्रेरक आहे. हे सातत्य कायम ठेवण्याबरोबरच अधिकाधिक दर्जेदार संशोधन करण्याकडेही हे संशोधक आपली वाटचाल राखतील, असा विश्वास विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी या सर्वांचे अभिनंदन करीत असताना व्यक्त केला. महत्त्वाचे म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे २७६ संशोधक या क्रमवारीत आहेत. त्यामध्ये डॉ. गोसावी यांचा समावेश आहे.

या क्रमवारीच्या अनुषंगाने अधिक माहितीसाठी जिज्ञासूंनी पुढील लिंकना भेट द्यावी. –

https://www.adscientificindex.com/university/Shivaji+University/

https://www.adscientificindex.com/h-index-rankings/?university=Shivaji+University