Thursday, 22 September 2016

कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांना जयंतीनिमित्त विद्यापीठात अभिवादन








कोल्हापूर, दि. २२ सप्टेंबर - कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात आज त्यांना अभिवादन करण्यात आले.
विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र इमारतीसमोरील कर्मवीर पाटील यांच्या पुतळ्यास विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या पोर्चमध्ये त्यांच्या प्रतिमेस प्रभारी कुलगुरु डॉ.डी.आर.मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
 यावेळी सोलापूर विभागाचे शिक्षण सहसंचालक डॉ.सतीश देशपांडे, प्रभारी कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे, वित्त लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ.आर.व्ही. गुरव, उपकुलसचिव डॉ.जी.एस.कुलकर्णी, डॉ.पद्मजा पाटील, डॉ.ए.एम. गुरव, डॉ.पी.एन.भोसले, डॉ.जगन कराडे, डॉ.आर.एन.ठाकूर, व्ही.वाय.धुपदाळे यांच्यासह अधिकारी, प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Tuesday, 20 September 2016

नव्वदोत्तरी समकालीन साहित्य हे अस्वस्थ कालखंडाचे द्योतक: ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे



कोल्हापूर, दि. २० सप्टेंबर: नव्वदोत्तरी समकालीन साहित्य हे अस्वस्थ, व्याकुळ कालखंडाचे द्योतक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे यांनी आज येथे व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठात आजपासून भाषाविषयक २१ दिवसीय विशेष हिंवाळी वर्गास प्रारंभ झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील युजीसीचे मनुष्यबळ विकास केंद्र आणि शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व भाषा विषयांच्या शिक्षकांसाठी विशेष वर्ग आयोजित करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात झाले.
नव्वदोत्तरी समकालीन साहित्याच्या संदर्भात चिंतनपर मांडणी करताना अतुल पेठे म्हणाले, समकालीन असणे हे अनेक बाबींवर अवलंबून असते. प्रत्येक समकालीन निर्मिती ही सार्वकालिक असेलच असे नाही, तथापि, जे साहित्य सार्वकालिक कसोट्यांच्या निकषांवर आपले अस्तित्व सिद्ध करते, ते प्रत्येक काळामध्ये समकालीनच असते. ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महात्मा फुले यांच्यासह अगदी शेक्सपिअरची ट्रॅजेडी सुद्धा या निकषांवर समकालीन ठरते. समकालीनत्व हे अशा प्रकारे सिद्ध करावे लागते. आधुनिकता हा समकालीनतेचा महत्त्वाचा अविभाज्य गुणविशेष आहे. तुम्ही आधुनिक नसाल, तर तुम्ही निश्चितच समकालीन नाही. समकालीन असणे म्हणजे तुमचे स्वतःशी, समाजाशी, विश्वाशी जोडले जाणे असते. जो माणूस अशा जोडले जाणारे साहित्य निर्माण करतो, जो धर्म, प्रांत, भाषा, देश अशा साऱ्या भेदांच्या सीमा ओलांडून जाणारी निर्मिती करतो आणि त्या त्या ठिकाणी आपल्या साऱ्या संवेदना, सहवेदनांसह प्रकटतो, प्रतिबिंबित होतो, तो खरा समकालीन ठरतो.
नव्वदोत्तरी संकल्पनेच्या अनुषंगाने बोलताना श्री. पेठे म्हणाले, १९९०च्या दशकापूर्वी समाजात एकरेषीय एकजिनसीपणा होता. तो नव्वदोत्तरी काळामध्ये लोपला आणि नैकरेषीय व विखंडित समाजरचना अस्तित्वात आली. अन्य कोणत्याही भेदांपेक्षा डिजीटल आणि नॉन- डिजीटल अशी जगाची नव्या संदर्भाने विभागणी झाली. या प्रक्रियेमध्ये माणसाच्या मनाचे, त्याच्या ओळखीचे विखंडीकरण झाले, तुकडे पडले. त्याचा शोध घेण्याची प्रक्रिया हे खऱ्या जिवंतपणाचे, समकालीनत्वाचे लक्षण आहे. नव्वदोत्तरी कालखंडात पहिले दशकभर हा तसा चाचपडण्याचा काळ होता. तथापि, त्यानंतर मात्र या अस्वस्थतेवर, व्याकुळतेवर मात कशी करावी, याची एक निश्चित दिशा गवसल्याने आता पुढच्या वाटचालीबाबत एक आश्वस्तता माझ्या मनात आहे. या दिशेचा शोध प्रत्येकाने आपापल्या पातळीवर घेण्याची नितांत आवश्यकता आहे.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी साठोत्तरी आणि नव्वदोत्तरी समकालीन साहित्यातील विविध प्रवाहांचा वेध घेतला. ते म्हणाले, नव्वदोत्तरी कालखंडाच्या नव्या परिप्रेक्ष्यात श्रमिक, शोषित, दलित, वंचित, महिला यांच्या प्रश्नांनी नवे स्वरुप धारण केले आहे. युवा पिढीला त्यांच्यासमोरील प्रश्नांचा वेध घेऊन दिशा दाखविणाऱ्यांची गरज आहे. नवमध्यमवर्गासमोरचे प्रश्न आणखीच वेगळे आहेत. समाजाच्या एकूणच अस्तित्वासंदर्भातील अनेक समस्यांनी भोवताल ग्रस्त आहे. या सर्वांना सामावून घेणारे, त्यांना दिशा दाखविणारे सकस साहित्य निर्माण होणे आवश्यक आहे.

यावेळी पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. एस.ए. सोनावणे यांनीही मार्गदर्शन केले. मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. राजन गवस यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला. समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी आभार मानले.

Monday, 19 September 2016

विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पहिले ऊर्दू महाविद्यालय सांगलीत




अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी
ऊर्दू महाविद्यालय उपयुक्त:  कुलगुरू डॉ. शिंदे

कोल्हापूर, दि. १९ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत पहिले ऊर्दू महाविद्यालय माझ्या कारकीर्दीत सुरू होत असल्याचा अतिशय आनंद होत असून या महाविद्यालयाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी, विशेषतः विद्यार्थिनी उच्चशिक्षणाच्या प्रवाहात येतील, अशी भावना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे व्यक्त केली.
सांगली येथील मुस्लीम एज्युकेशन कमिटीच्या नवीन कला (ऊर्दू) महाविद्यालयास शिवाजी विद्यापीठाचे प्राथमिक संलग्नीकरण आज प्रदान करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. केवळ शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्राबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील हे पहिले ऊर्दू महाविद्यालय ठरले आहे.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, ऊर्दू भाषेमधून शालेय शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थी-विद्यार्थिनींना एक तर मराठी किंवा इंग्रजी माध्यमातून पुढील उच्चशिक्षण घ्यावे लागत असे. तथापि, या महाविद्यालयामुळे त्यांना आता ऊर्दूतूनच पुढील शिक्षण घेता येणे शक्य होणार आहे, ही मोठी उपलब्धी आहे. या महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विद्यापीठाची सदैव सहकार्याची भूमिका राहील, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष तथा सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे महापौर हारुण शिकलगार यांना संलग्नीकरणाचे पत्र प्रदान करण्यात आले. या वेळी विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक प्राचार्य डॉ. डी.आर. मोरे, सहाय्यक कुलसचिव डॉ. वैभव ढेरे यांच्यासह संस्थेचे ऑनररी सेक्रेटरी हारुण इसहाक परांडे, संचालक इस्माईल बागवान व सांगलीचे माजी नरगाध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक महंमदअली बागवान उपस्थित होते.

     

Friday, 16 September 2016

कोल्हापूर गणेश विसर्जन मिरवणूक:

ध्वनीप्रदुषणात तुलनेत घट;

पण मार्गदर्शक पातळीपेक्षा अधिकच!


विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाकडून पाहणी
कोल्हापूर, दि. १६ सप्टेंबर: अनंत चतुर्दशीनिमित्त काल रात्री शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ध्वनीप्रदुषणाची पातळी गतवर्षीपेक्षा कमी झाली असली, तरी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक पातळीपेक्षा अधिकच असल्याचे दिसून आले, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. पी.डी. राऊत यांनी आज येथे दिली. राजारामपुरीतील ध्वनीप्रदुषणाची पातळी मात्र गतवर्षीपेक्षा वाढल्याचे आढळले असल्याचेही त्यांनी सांगितले.  
यंदा उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीस प्रशासनासह विविध माध्यमांतून डॉल्बीबंदीचा पुरस्कार करण्यात आला. कोल्हापुरातील अनेक गणेश मंडळांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला. याचा परिणाम यंदाच्या ध्वनीप्रदूषणाची पातळी खालावण्यात झाला असला तरी, अद्यापही ही पातळी आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मतही डॉ. राऊत यांनी व्यक्त केले. 
डॉ. राऊत म्हणाले, विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाचे विद्यार्थी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून दर वर्षी गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीमध्ये कोल्हापूर शहरात होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाची पातळी तपासतात. याच उपक्रमांतर्गत यंदाही गणेशोत्सवा दरम्यान विद्यार्थ्यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचीनुसार ध्वनीप्रदुषणाचे मोजमाप केले. या मार्गदर्शक सूचीनुसार अभ्यास करताना कोल्हापुरातील रहिवासी क्षेत्र, शांतता क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र आणि व्यापारी क्षेत्र अशा सर्व ठिकाणी मोजमाप करण्यात आले. ही मोजमापे ध्वनीमापक उपकरणाद्वारे (Sound Level Meter) डेसिबल या एककात मोजमाप करण्यात आले. व्यावसायिक क्षेत्रात ध्वनीप्रदूषणाची पातळी मार्गदर्शक सूचीनुसार रात्री ५५ डेसिबल असावी लागते. ती महाद्वार रोडवर यंदा  ९९.५ डेसिबल इतकी आढळली, जी गेल्या वर्षी १०३.५ डेसिबल इतकी होती. गुजरीमधील ध्वनीप्रदुषणाची पातळीही गतवर्षीच्या १०३.९ डेसिबलच्या तुलनेत यंदा ९७.७ डेसिबल इतकी कमी झाल्याचे आढळले. औद्योगिक क्षेत्रामध्ये वाय.पी. पोवार नगरातील ध्वनीप्रदूषण पातळी ६७.० वरुन ६१.३ डेसिबल इतकी लक्षणीय कमी झाल्याचे आढळले आहे. 
सी.पी.आर. न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय या शांतता क्षेत्रांमध्ये ध्वनीप्रदुषणाची पातळी कमी झाली असली तरी मार्गदर्शक सूचीपेक्षा अधिक आढळून आली. 
शहरातील ध्वनीप्रदुषणाची पातळी मोजण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पी.डी. राऊत यांच्या नेतृत्वाखाली डॉ. श्रीमती ए.एस. जाधव, डॉ. एस.बी. मांगलेकर, श्रीमती पल्लवी भोसले, अक्षय पाटील व आकाश कोळेकर यांनी परिश्रम घेतले. 
यंदाच्या ध्वनीप्रदुषणाची पातळी क्षेत्रनिहाय व परिसरनिहाय डेसिबलमध्ये पुढीलप्रमाणे (कंसात गतवर्षीची पातळी): 
शांतता क्षेत्र (रात्रीची मार्गदर्शक पातळी- ४०): सीपीआर ६७.६ (७१.८), न्यायालय ६३.२ (७१.९), जिल्हाधिकारी कार्यालय ६४.१ (६४.७). 
रहिवासी क्षेत्र (रात्रीची मार्गदर्शक पातळी- ४५): राजारामपुरी ६२.४ (६१.२), उत्तरेश्वर पेठ ६३.५ (७३.४), शिवाजी पेठ ६३.८, मंगळवार पेठ ७९.९, नागाळा पार्क ५८.५, ताराबाई पार्क ६१.८. 
व्यावसायिक क्षेत्र (रात्रीची मार्गदर्शक पातळी- ५५): महाद्वार रोड ९९.५ (१०३.५), गुजरी ९७.७ (१०३.९), मिरजकर तिकटी ९६.१, बिनखांबी गणेश मंदिर ९६.५, पापाची तिकटी ९८.६, लक्ष्मीपुरी ६७.८, शाहूपुरी ६७.७. 

औद्योगिक क्षेत्र (रात्रीची मार्गदर्शक पातळी- ७०): उद्यमनगर ६७.५ (६७.५), वाय.पी. पोवार नगर ६१.३ (६७.०).
 

 
विद्यापीठाच्या मूर्तीदान उपक्रमासही वाढता प्रतिसाद 
शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र अधिविभागामार्फत सन २००८पासून कोटीतीर्थ परिसरात दरवर्षी घरगुती गणेश विसर्जनादरम्यान मूर्तीदान तसेच पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रम राबविला जातो. यंदाही कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी भाविकांनी सुमारे २६३८ मूर्ती दान केल्या. दरवर्षी या उपक्रमास सातत्याने वाढता प्रतिसाद लाभतो आहे. सन २००८मध्ये अवघ्या २३० मूर्तींपासून सुरू झालेल्या या उपक्रमात सन २००९ ते २०१५ या कालावधीत अनुक्रमे २५१, ३२०, ४९२, ६५०, ९१०, १७३६ व २४०० असा वाढता प्रतिसाद लाभला. लोकांमध्ये पर्यावरणाप्रती होत असणारी ही जागृती अत्यंत उत्साहवर्धक असल्याची भावना डॉ. राऊत यांनी व्यक्त केली.