Showing posts with label Environment Department. Show all posts
Showing posts with label Environment Department. Show all posts

Friday, 16 September 2016

कोल्हापूर गणेश विसर्जन मिरवणूक:

ध्वनीप्रदुषणात तुलनेत घट;

पण मार्गदर्शक पातळीपेक्षा अधिकच!


विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाकडून पाहणी
कोल्हापूर, दि. १६ सप्टेंबर: अनंत चतुर्दशीनिमित्त काल रात्री शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ध्वनीप्रदुषणाची पातळी गतवर्षीपेक्षा कमी झाली असली, तरी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक पातळीपेक्षा अधिकच असल्याचे दिसून आले, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. पी.डी. राऊत यांनी आज येथे दिली. राजारामपुरीतील ध्वनीप्रदुषणाची पातळी मात्र गतवर्षीपेक्षा वाढल्याचे आढळले असल्याचेही त्यांनी सांगितले.  
यंदा उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीस प्रशासनासह विविध माध्यमांतून डॉल्बीबंदीचा पुरस्कार करण्यात आला. कोल्हापुरातील अनेक गणेश मंडळांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला. याचा परिणाम यंदाच्या ध्वनीप्रदूषणाची पातळी खालावण्यात झाला असला तरी, अद्यापही ही पातळी आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मतही डॉ. राऊत यांनी व्यक्त केले. 
डॉ. राऊत म्हणाले, विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाचे विद्यार्थी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून दर वर्षी गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीमध्ये कोल्हापूर शहरात होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाची पातळी तपासतात. याच उपक्रमांतर्गत यंदाही गणेशोत्सवा दरम्यान विद्यार्थ्यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचीनुसार ध्वनीप्रदुषणाचे मोजमाप केले. या मार्गदर्शक सूचीनुसार अभ्यास करताना कोल्हापुरातील रहिवासी क्षेत्र, शांतता क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र आणि व्यापारी क्षेत्र अशा सर्व ठिकाणी मोजमाप करण्यात आले. ही मोजमापे ध्वनीमापक उपकरणाद्वारे (Sound Level Meter) डेसिबल या एककात मोजमाप करण्यात आले. व्यावसायिक क्षेत्रात ध्वनीप्रदूषणाची पातळी मार्गदर्शक सूचीनुसार रात्री ५५ डेसिबल असावी लागते. ती महाद्वार रोडवर यंदा  ९९.५ डेसिबल इतकी आढळली, जी गेल्या वर्षी १०३.५ डेसिबल इतकी होती. गुजरीमधील ध्वनीप्रदुषणाची पातळीही गतवर्षीच्या १०३.९ डेसिबलच्या तुलनेत यंदा ९७.७ डेसिबल इतकी कमी झाल्याचे आढळले. औद्योगिक क्षेत्रामध्ये वाय.पी. पोवार नगरातील ध्वनीप्रदूषण पातळी ६७.० वरुन ६१.३ डेसिबल इतकी लक्षणीय कमी झाल्याचे आढळले आहे. 
सी.पी.आर. न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय या शांतता क्षेत्रांमध्ये ध्वनीप्रदुषणाची पातळी कमी झाली असली तरी मार्गदर्शक सूचीपेक्षा अधिक आढळून आली. 
शहरातील ध्वनीप्रदुषणाची पातळी मोजण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पी.डी. राऊत यांच्या नेतृत्वाखाली डॉ. श्रीमती ए.एस. जाधव, डॉ. एस.बी. मांगलेकर, श्रीमती पल्लवी भोसले, अक्षय पाटील व आकाश कोळेकर यांनी परिश्रम घेतले. 
यंदाच्या ध्वनीप्रदुषणाची पातळी क्षेत्रनिहाय व परिसरनिहाय डेसिबलमध्ये पुढीलप्रमाणे (कंसात गतवर्षीची पातळी): 
शांतता क्षेत्र (रात्रीची मार्गदर्शक पातळी- ४०): सीपीआर ६७.६ (७१.८), न्यायालय ६३.२ (७१.९), जिल्हाधिकारी कार्यालय ६४.१ (६४.७). 
रहिवासी क्षेत्र (रात्रीची मार्गदर्शक पातळी- ४५): राजारामपुरी ६२.४ (६१.२), उत्तरेश्वर पेठ ६३.५ (७३.४), शिवाजी पेठ ६३.८, मंगळवार पेठ ७९.९, नागाळा पार्क ५८.५, ताराबाई पार्क ६१.८. 
व्यावसायिक क्षेत्र (रात्रीची मार्गदर्शक पातळी- ५५): महाद्वार रोड ९९.५ (१०३.५), गुजरी ९७.७ (१०३.९), मिरजकर तिकटी ९६.१, बिनखांबी गणेश मंदिर ९६.५, पापाची तिकटी ९८.६, लक्ष्मीपुरी ६७.८, शाहूपुरी ६७.७. 

औद्योगिक क्षेत्र (रात्रीची मार्गदर्शक पातळी- ७०): उद्यमनगर ६७.५ (६७.५), वाय.पी. पोवार नगर ६१.३ (६७.०).
 

 
विद्यापीठाच्या मूर्तीदान उपक्रमासही वाढता प्रतिसाद 
शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र अधिविभागामार्फत सन २००८पासून कोटीतीर्थ परिसरात दरवर्षी घरगुती गणेश विसर्जनादरम्यान मूर्तीदान तसेच पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रम राबविला जातो. यंदाही कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी भाविकांनी सुमारे २६३८ मूर्ती दान केल्या. दरवर्षी या उपक्रमास सातत्याने वाढता प्रतिसाद लाभतो आहे. सन २००८मध्ये अवघ्या २३० मूर्तींपासून सुरू झालेल्या या उपक्रमात सन २००९ ते २०१५ या कालावधीत अनुक्रमे २५१, ३२०, ४९२, ६५०, ९१०, १७३६ व २४०० असा वाढता प्रतिसाद लाभला. लोकांमध्ये पर्यावरणाप्रती होत असणारी ही जागृती अत्यंत उत्साहवर्धक असल्याची भावना डॉ. राऊत यांनी व्यक्त केली.

Wednesday, 30 April 2014

शिवाजी विद्यापीठात व्यापक वृक्षगणना सुरू



   
पर्यावरण शास्त्र विभागाचा उपक्रम
 कोल्हापूर, दि. २९ एप्रिल: परिसरातला कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजनचा पुरवठा करणारा शिवाजी विद्यापीठाचा परिसर जणू कोल्हापूर शहराचे फुप्फुसच आहे. पण, या फुप्फुसाची कार्बन शोषून घेण्याची नेमकी क्षमता किती आहे, याचा आता शास्त्रशुद्ध अभ्यास केला जात आहे. विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाने विद्यापीठाच्या ८५२ एकर क्षेत्रावरील वृक्षगणना करण्याचा आणि या वृक्षांच्या प्रजातींनुसार त्यांच्या आणि पर्यायाने संपूर्ण परिसराच्या कार्बन ग्रहण क्षमता मापनाचा शास्त्रीय उपक्रम हाती घेतला आहे.
गेल्या काही वर्षांत विद्यापीठांतील विविध विभाग आणि संबंधित घटकांनी विद्यापीठ परिसरात वृक्षलागवड केली आहे. यामध्ये विद्यापीठाचा उद्यान विभाग, पर्यावरण शास्त्र विभाग, वनस्पतीशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांचा समावेश आहे. या सर्व विभागांच्या प्रयत्नांमुळे विद्यापीठ परिसर हरित होऊन पर्यावरण पूरक होण्यास मदत झाली आहे. पर्यावरण शास्त्र विभागाच्या वृक्षगणनेच्या उपक्रमातून सर्व जुन्या-नव्या वृक्षसंपदेची गणना होऊन त्यांच्या निसर्ग संतुलनातील महत्त्वपूर्ण कार्याची नोंद होणार आहे.
या उपक्रमासंदर्भात माहिती देताना पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. पी.डी. राऊत म्हणाले की, जागतिक तापमानवाढीस कारणीभूत असणाऱ्या हरितगृह वायूंपैकी (Green House Gases) एक असलेल्या कार्बन डायऑक्साईडचे वातावरणातील वाढलेले प्रमाण कमी करण्यासाठी सध्या जगभर संशोधन सुरू आहे. त्या संशोधनाचाच एक भाग म्हणून जंगले, वने, गवताळ कुरणे यांची कार्बन शोषून घेण्याची क्षमता तपासणे आणि अशा कार्बन कुंडांचे (Carbon Sink) संवर्धन करणे आदी गोष्टी केल्या जात आहेत. निसर्गातील अशा विविध घटकांच्या कार्बन शोषून घेण्याच्या क्षमतेला कार्बन ग्रहण क्षमता (Carbon Sequestration Potential) असे म्हणतात. जागतिक तापमानवाढीच्या समस्येवर मात करण्यासाठी या संकल्पनेकडे मोठ्या आशेने पाहिले जात आहे.
जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून गेल्या २२ एप्रिलपासून पर्यावरण शास्त्र विभागाने सदर वृक्षगणनेला प्रारंभ केला आहे. याअंतर्गत परिसरातील सर्व वृक्षांची गणना, प्रजातींची नोंद, त्यांच्या खोडाचा परीघ, उंची या बाबींचे मापन करण्यात येत असून त्यावरुन त्यांचे जैव-वस्तुमान (बायोमास) काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर झाडाचा फुलोरा, फळे, पक्ष्यांची घरटी, मधमाशांचे पोळे, कीटकांची नोंद आदी परिसंस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबींची देखील मोजदाद करण्यात येणार आहे. या अभ्यासातून विद्यापीठ परिसरातील वृक्षसंपदेचे व अनुषंगिक परिसंस्थेच्या सद्यस्थितीचे आकलन होण्यास मदत होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या वृक्षगणनेतून विद्यापीठ परिसराच्या कार्बन ग्रहण क्षमतेचे मापन होऊन हा परिसर किती प्रमाणात हरितगृह वायूंचे शोषण करू शकतो, हे पुढे येईल आणि विद्यापीठ परिसर कोल्हापूर शहराचे फुप्फुस म्हणून सक्षमपणे काम करीत असल्याचे सिद्ध होईल, असा विश्वास प्रा. राऊत यांनी व्यक्त केला.
या उपक्रमात विभागातील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक विद्यार्थी आणि पदव्युत्तर विभागातील सुमारे शंभर विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या उपक्रमासाठी कुलगुरू डॉ. एन.जे. पवार, प्र-कुलगुरू डॉ. ए.एस. भोईटे, कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. डी.के. गायकवाड, उद्यान विभागाचे उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे व कर्मचारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत असल्याचे प्रा. राऊत यांनी सांगितले.