Saturday, 10 October 2026

जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे २३ संशोधक

प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, माजी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांचा समावेश

प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव


कोल्हापूर, दि. १० ऑक्टोबर: जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची या वर्षाची यादी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जाहीर केली असून त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह २३ संशोधक, प्राध्यापकांना मानांकन प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे या यादीत माजी संशोधक विद्यार्थ्यांनाही स्थान लाभले आहे.

स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या जागतिक स्तरावरील दोन टक्के आघाडीच्या संशोधकांच्या यादीमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी आपले स्थान सातत्यपूर्ण पद्धतीने कायम राखले आहे. यंदाही त्यांना पुनर्मानांकन लाभले आहे. या यादीमध्ये विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव (जैवरसायनशास्त्र), माजी प्र-कुलगुरू प्रा. प्रमोद पाटील (पदार्थविज्ञान), प्रा. केशव राजपुरे (पदार्थविज्ञान), डॉ. सागर डेळेकर (रसायनशास्त्र), प्रा. ए.व्ही. राव (पदार्थविज्ञान), प्रा. संजय गोविंदवार (पदार्थविज्ञान), प्रा. चंद्रकांत भोसले (पदार्थविज्ञान), डॉ. आण्णासाहेब मोहोळकर (पदार्थविज्ञान), प्रा. हेमराज यादव (रसायनशास्त्र), डॉ. सचिन ओतारी (नॅनोतंत्रज्ञान), प्रा. कल्याणराव गरडकर (रसायनशास्त्र), प्रा. तुकाराम डोंगळे (इलेक्ट्रॉनिक मटेरियल्स), डॉ. सुशीलकुमार जाधव (पदार्थविज्ञान), प्रा. विश्वास बापट (जैवतंत्रज्ञान), डॉ. नीलेश तरवाळ (पदार्थविज्ञान), प्रा. अनिल घुले (रसायनशास्त्र), डॉ. कृष्णा पवार (पदार्थविज्ञान), डॉ. तेजस्विनी भट (पदार्थविज्ञान) आणि डॉ. मानसिंग टाकळे (पदार्थविज्ञान) यांचा समावेश आहे. याशिवाय, या यादीत डॉ. सचिन भालेकर (गणित), डॉ. संजय लठ्ठे (पदार्थविज्ञान), डॉ. विठोबा पाटील (पदार्थविज्ञान) आणि डॉ. शरदराव व्हनाळकर (पदार्थविज्ञान) या माजी विद्यार्थी, शिक्षकांचाही समावेश आहे.

करिअर परफॉर्मन्स अर्थात सार्वकालिक कामगिरीच्या यादीत प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. सुशीलकुमार जाधव, डॉ. केशव राजपुरे, निवृत्त शिक्षक डॉ. ए. व्यंकटेश्वरा राव, डॉ. सी.डी. लोखंडे, डॉ. चंद्रकांत भोसले, डॉ. संजय गोविंदवार, डॉ. विश्वास बापट यांचा समावेश आहे.

‘स्कोपस’ डेटाबेसवर आधारित ‘एल्सव्हिअर’ने तयार केलेल्या या यादीसाठी सन १९६० ते २०२६ या कालावधीमध्ये संशोधकीय योगदान देणाऱ्या संशोधकांचा सार्वकालिक कामगिरी आणि वार्षिक कामगिरी अशा दोन निकषांवर विचार करण्यात आला आहे. २२ विज्ञान विषय आणि १७६ उपविषयांमधील संशोधनाची दखल त्याअंतर्गत घेतली गेली आहे. शोधनिबंधांची संख्या आणि दर्जा, संशोधन पत्रिकेचा दर्जा, शोधनिबंधाला प्राप्त झालेली सायटेशन्स, एकच लेखक असणारे शोधनिबंध, स्वतःची सायटेशन्स वगळून असणारे शोधनिबंध अशा अनेक काटेकोर निकषांवर आधारित ही यादी जाहीर केली जाते.

महत्त्वाची बाब म्हणजे २०२६च्या जागतिक आघाडीच्या २% संशोधकांच्या डेटाबेसमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान अधिविभागाच्या सर्वाधिक संशोधकांनी स्थान मिळविले आहे. ही विद्यापीठाच्या दृष्टीने अत्यंत भूषणावह बाब आहे.

 

संशोधनातील सातत्यपूर्ण कामगिरीचे फलित: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

शिवाजी विद्यापीठातील संशोधक सलगपणे दरवर्षी जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांच्या यादीमध्ये स्थान प्राप्त करीत आहेत. त्याला त्यांची सातत्यपूर्ण संशोधकीय कामगिरी कारणीभूत आहे. ही बाब विद्यापीठासाठी अत्यंत बहुमानास्पद असून नवसंशोधकांना प्रेरणा देणारी आहे. या सर्व संशोधकांचे मी मनापासून अभिनंदन करतो. यापुढील काळातही त्यांच्याकडून आणि त्यांच्या विद्यार्थ्यांकडून अशीच उज्जवल कामगिरी नोंदविली जावी, यासाठी त्यांना शुभेच्छाही देतो, अशा शब्दांत कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी या संशोधकांचे कौतुक केले आहे.

Friday, 9 October 2026

जातिभेद आणि स्त्री-पुरुष विषमता हे राष्ट्रीय एकात्मतेसमोरील प्रमुख अडथळे: ज्ञानेश्वर बंडगर महाराज

शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना ज्ञानेश्वर बंडगर महाराज.

शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना ज्ञानेश्वर बंडगर महाराज. मंचावर (डावीकडून) डॉ. मुरलीधर भानारकर, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि डॉ. चेतना सोनकांबळे.


कोल्हापूर, दि. ९ ऑक्टोबर: सामाजिक समतेतूनच राष्ट्रीय एकात्मतेचा पाया भक्कम होतो. समाजातील जातिभेद आणि स्त्री-पुरुष विषमता दूर केल्याशिवाय खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकता, एकात्मता निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे या विषमतेचे उच्चाटन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्ञानेश्वर बंडगर महाराज यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित कै. कासुबाई यलबाजी ममता तुकाराम मंगल स्मृती व्याख्यानमालेत ‘सामाजिक समता व राष्ट्रीय एकता’ या विषयावर ते बोलत होते. विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

बंडगर महाराज म्हणाले, महाराष्ट्रातील भक्ती आणि वारकरी परंपरेने सामाजिक समतेचा विचार सातत्याने मांडला आहे. राष्ट्रातील नागरिकांमध्ये परस्परांप्रती बंधुभाव, समानतेची भावना आणि एकत्व निर्माण झाल्याशिवाय राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये सामाजिक समता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा मूलभूत आशय आहे.

देशाच्या प्राचीन इतिहासात भगवान बुद्ध, भगवान महावीर आणि सिद्ध परंपरेने सामाजिक समतेच्या प्रस्थापनेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. महात्मा फुले यांनी मांडलेला एकत्वाचा विचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातिव्यवस्थेच्या निर्मूलनासाठी केलेले वैचारिक कार्य हे समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे. जातिव्यवस्था ही केवळ सामाजिक विषमतेपुरती मर्यादित नसून तिचा आर्थिक विषमतेशीही घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे जातिव्यवस्थेचे समूळ उच्चाटन करणे आवश्यक आहे. त्यासाठी धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रांत परिवर्तन घडवून आणणे गरजेचे आहे. सामाजिक समतेचा विचार प्रत्यक्ष व्यवहारात रुजल्यास राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव म्हणाल्या, सामाजिक समावेशन केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठ समाजातील विविध घटकांना जोडून घेण्याबरोबरच त्यांना मुख्य प्रवाहात ओळख प्रदान करण्यासाठी प्रयत्नशील आहे. येथील व्याख्यानांमुळे वैचारिक प्रबोधनासोबतच मानसिक समाधानही लाभते.

अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. मुरलीधर भानारकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अविनाश भाले यांनी आभार मानले. यावेळी डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. किरण पवार, डॉ. विद्यानंद खंडागळे, डॉ. किशोर खिलारे, उदय पोवार, डॉ. युवराज कदम, डॉ. रामचंद्र पवार, राजेश मेश्राम, दिनेश उथळे, डॉ. अनमोल कोठडिया, यश आंबोळे, विश्वजीत गुरव, शरद पाटील, माऊली पांढरे आणि दत्ता घुटूकडे यांच्यासह विद्यापीठातील विविध अधिविभागांचे प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

“आयडियाज् टुडे, इनोव्हेशन्स टुमारो, इम्पॅक्ट फॉरेव्हर”

शिवाजी विद्यापीठात ‘नॅनोस्पार्क’मध्ये ७५ संशोधक विद्यार्थ्यांचा सहभाग

 

प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. बाबुल कुमार, डॉ. जे नित्यानंदन आणि डॉ. प्रकाश वडगावकर यांच्यासमवेत 'नॅनोस्पार्क २०२६' या संशोधन उपक्रमात सहभागी झालेले संशोधक विद्यार्थी.

कोल्हापूर, दि. ९ ऑक्टोबर: विद्यार्थ्यांमधील संशोधनगुणांना प्रेरणा देण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी अधिविभागातर्फे “आयडियाज टुडे, इनोव्हेशन्स टुमारो, इम्पॅक्ट फॉरेव्हर” या घोषवाक्यासह 'नॅनोस्पार्क २०२६' या विशेष संशोधनपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. 'आविष्कार' संशोधन स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर “इग्नायटिंग यंग माइंड्स फॉर आविष्कार” या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात ७५ संशोधक विद्यार्थ्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण वैज्ञानिक प्रकल्पांचे सादरीकरण केले. त्यामध्ये ५ वैज्ञानिक मॉडेल्स आणि २६ वैज्ञानिक पोस्टर्स यांचा समावेश होता.

या वैज्ञानिक सादरीकरणासाठी एकूण ६ विद्याशाखांमधील विषय देण्यात आले. यामध्ये मानव्यविद्या व ललितकला, वाणिज्य व विधी, केवल विज्ञान, कृषी, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखा या क्षेत्रांचा समावेश होता. यात पदवीस्तरीय, पदव्युत्तर आणि पीएच.डी. स्तरीय संशोधक विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

विद्यार्थ्यांच्या संशोधन सादरीकरणाचे राष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञांकडून मूल्यांकन व परीक्षण करण्यात आले. त्यासाठी पुण्याच्या सीएसआयआर- राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा येथील प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. बाबुल प्रसाद, डॉ. जे. नित्यानंदन आणि डॉ. प्रकाश वाडगावकर उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाच्या जैवरसायनशास्त्र अधिविभागातील प्राध्यापक व विद्यापीठाचे 'आविष्कार' समन्वयक डॉ. पंकज पवार यांनीही परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.

प्रकल्प सादरीकरणानंतर उपस्थित शास्त्रज्ञांनी विद्यार्थ्यांसमवेत सुमारे दोन तास थेट संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधनातील आधुनिक आव्हाने, पेटंट्स आणि भविष्यातील संधींबद्दल मार्गदर्शन केले व शंकानिरसन केले.

शेवटच्या सत्रात उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्यांना पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये पदवीस्तरीय विभागातील ४ व पदव्युत्तर विभागातील ४ अशा एकूण ८ सादरीकरणांना पुरस्कार मिळाले. यामध्ये सहारा पटेल (B.Sc.-III), तन्मयी पाटील (B.Sc.-II), अंकित कुमार, तन्वी वडनाल, अंजली मायने (तिघेही B.Sc.-II), पूर्वा खरात, कावेरी पुजारी (B.Sc.-I), समृद्धी गावडे (M.Sc.-I), प्रज्वल पाटील (M.Sc.-I), लंगम्बा थानओजम (M.Sc.-I), प्रणव कांबळे (M.Sc.-II) यांचा समावेश आहे.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्कूलचे संचालक प्रा. किरणकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.