Friday, 16 April 2021

विशेष लेख: गुणवत्तेची गरुड भरारी

 

 


(शिवाजी विद्यापीठाला नॅकबंगळुरू यांचेकडून ‘A++’ मानांकन प्राप्त झाले. देशातील मोजक्या शैक्षणिक संस्थांच्या यादीत विद्यापीठाने स्थान मिळविले. या आनंदाच्या बातमीने शिवाजी विद्यापीठाच्या अनेक माजी विद्यार्थी, शिक्षकांनी आपल्या भावना विविध व्यासपीठांवरून व्यक्त केल्या. विद्यापीठाला काही पत्रेही प्राप्त झाली. त्यामधील एक लेखस्वरुप प्रतिक्रिया पुणे येथील भारतीय विद्यापीठाचे प्राध्यापक व शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी डॉ. विवेक रणखांबे यांनी व्यक्त केली आहे. ती शिवसंदेशच्या वाचकांसाठी विशेषत्वाने प्रकाशित करीत आहोत.)

 

(वाचकांना नम्र विनंती: सन १९८८ ते २००४ या काळात (एफ.वाय. बी.ए. ते पीएच.डी.) मी शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी होतो. कृतज्ञतेपोटी भूतकाळ जसा समोर आला, तसा लिहित गेलो आहे. हा लेख त्या कालखंडाला जागवणारा आहे, परंतु त्या पूर्वीच्या आणि नंतरच्या काळाशी निगडित असलेले वाचक माझ्या अनुभवाची मर्यादा आणि संदर्भाच्या काही उणीवा असतील, तर त्या समजून घेतील, ही अपेक्षा.- लेखक)   


Dr. Vivek Rankhambe
मराठी भाषेला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणाऱ्या वि. स. खांडेकरांनी, कुसुमाग्रजांच्या विशाखा’ या ‘ज्ञानपीठ’ विजेत्या काव्यसंग्रहाची प्रस्तावना म्हणून जे वाक्य लिहिलं आहे, त्याचे स्मरण व्हावे, असा हा क्षण... खांडेकर लिहितात, “रत्नहाराचं तेजस्वी सौन्दर्य कुणाला समजावून सांगावं लागत नाही, डोळ्यांना ते आपोआपच जाणवतं. रातराणीच्या सुगंधाची कुणी चर्चा करीत बसत नाही, वाऱ्याच्या झुळकेबरोबर आला की मन कसं प्रसन्न होतं, लहान मुलाच्या नाजुक पाप्याची अवीट गोडी समजण्यासाठी काही पुस्तकी पांडित्याची आवश्यकता नाही.” अगदी त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठाला नॅक मानांकनाची A++’ ही श्रेणी मिळाल्यामुळे आम्हाला झालेला आनंद आम्हीही शब्दांत व्यक्त करू शकत नाही.

पंचगंगेच्या तीरावर वसलेली ताराराणीची शाहू नगरी; कोल्हापुर! दक्षिणकाशी म्हणून प्रसिद्धी पावलेल्या कोल्हापुरात प्रवेश करताच समोर उभा ठाकतो, तो ‘रणरागिणी-ताराराणीचा’ भव्य अश्वारुढ पुतळा. तर पश्चिमेकडे कोल्हापूरकरांच्या विस्तीर्ण अंत:करणाची साक्ष देणारा रंकाळा तलाव, शालिनतेची, सर्वधर्मसमभावाची, स्वाभिमानाची शाल पांघरलेली शिवाजी पेठ, आई भवानीचा जागर मांडणारा भवानी मंडप, करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर, कायम गजबजलेलं कपिलतीर्थ, पंचगंगेच्या तीरावर विसावलेला उत्तरेश्वर, आंतरराष्ट्रीय मल्लांनाही खुणावणारं खासबाग मैदान, व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर, चंद्रकांत-सूर्यकांत मांढरे या नावांशी नातं सांगणारं कलाविश्व, शालिनी आणि जयप्रभा स्टुडिओ, कलावंतांची काशी असलेलं केशवराव भोसले नाट्यगृह, आधुनिकतेला सामावून घेतानाही आपल्या पारंपरिक कौशल्याला जपणारं उद्यमनगर,  रस्त्याने आपल्याच रुबाबात चालत कट्ट्यावर निघालेल्या लांबच लांब शिंगाच्या म्हैशी, चोवीस तास धारोष्ण दुधाचा अभिषेक करणारी आणि मायेची ऊब देणारी कोल्हापूरची संस्कृती, देशाच्या कानाकोपऱ्यातील मल्लांना आईच्या मायेनं सांभाळणाऱ्या तालमी, कलामहर्षी बाबुराव पेंटर, आबालाल रेहमान यांच्या पाऊलखुणा जपणारी ही भूमी, लहरी हैदर, पिराजीरा, पठ्ठे बापुराव आणि अगदी परवा निवर्तलेल्या शाहीर कुन्तिनाथ करके यांच्या डफाची थाप जिथे अजूनही ऐकू येते, त्या कोल्हापूरच्या इतिहासात, शिवाजी विद्यापीठाच्या निमित्ताने ‘शिक्षण क्षेत्रातही एक ऐतिहासिक दिवस उजाडला. प्रात:स्मरणीय शिवशककर्त्या छत्रपती शिवरायांचे नाव धारण केलेल्या शिवाजी विद्यापीठाला, राष्ट्रीय स्तरावर भूषणावह ठरावे, असे A++  मानांकन मिळाले. अशा वेळी परिवर्तनाचे, विचारवंतांच्या आणि स्वाभिमानी देशभक्तांच्या वारसदारांचे विद्यापीठ म्हणून एका नव्या परिप्रेक्ष्यातून शिवाजी विद्यापीठ समजून घ्यावे लागेल. कोल्हापूरच्याच मातीत जन्मलेले कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि जगातील दोन टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत सन्मानाने स्थान मिळविणारे प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील आणि कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर यांच्या नेतृत्वाखालीविद्यापीठात कार्यरत शिक्षक आणि प्रशासकीय संघ शक्तीचा एक तेजस्वी आविष्कार म्हणून विद्यापीठाला मिळालेल्या या मानांकनाकडे पाहावे लागेल. 'आणखी एक खानावळम्हणून निर्भर्त्सना झालेल्या या विद्यापीठानेटीका करणाऱ्या या वृत्तीलाकाळाच्या ओघात आपल्या आत्मतेजाची ताकत दाखवून एका अर्थाने शाश्वत उत्तरच दिले आहे.

यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई यांसारख्या सक्षम आणि लोकाभिमुख कार्य करणाऱ्या नेत्यांच्या द्रष्टेपणातून १९६२ साली स्थापन झालेल्या या विद्यापीठाची मुहूर्तमेढ डॉ. आप्पासाहेब पवार या तितक्याच द्रष्ट्या कुलगुरूंनी रोवली. डॉ. आप्पासाहेब पवार यांनी त्या काळात जे पायाभूत काम केले, त्यामुळेच त्यांच्या नावाचे ‘गारुड’ आजही या विद्यापीठाशी निगडित असलेल्या प्रत्येकाच्या मनावर स्वार आहे. देशाचे तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत पार पडलेला विद्यापीठाच्या उद्घाटनाचा भव्य समारंभ, यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडलेला पहिला पदवी प्रदान समारंभ, अशा कितीतरी आठवणी सांगणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या पिढ्या त्या कालखंडाबद्दल भरभरून बोलत राहतात. 

ज्ञानमेवामृतमहे शिवाजी विद्यापीठाचं बोधवाक्य. या लेखाच्या निमित्ताने प्रा. राम पवार सर यांनी डॉ. द. ना. धनागरे सर यांच्याशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत त्या बोधवाक्यासंबंधीची एक आठवण सांगितली. बहुधा तो विद्यापीठाचा पायाभरणी किंवा पहिला पदवीदान समारंभ असावा. त्या समारंभात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री नामदार श्री. यशवंतराव चव्हाण साहेब यांनी आपल्या भाषणात त्यानी सांगितलली ही कथा. देव आणि दैत्यानी समुद्र मंथन करून अमृताचा कलश बाहेर काढला. त्यानंतर तोच अमृताचा कलश मिळविण्यासाठी देव आणि दानवांचं युद्धही झाल्याची कथा आहे. सरते शेवटी, घनघोर अशा या युद्धात अमृताचा तो कलश कुठे तरी सांडून गेला. तो कुणाच्याच हाती लागला नाही. तेच ‘अमृत’ आज कलियुगात ज्ञान’  रूपात उपलब्ध आहे. त्याच्या प्राप्तिसाठी विद्यार्थ्याच्या भावी पिढ्यानी कष्ट घ्यावेत; अभ्यास करावा, ही खूणगाठ विद्यार्थ्यानी मनी बांधावी, म्हणून या विद्यापीठाचे बोधवाक्य हे ज्ञानमेवामृतम असे निश्चित करण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या डॉ. आप्पासाहेब पवार कमवा आणि शिका’ योजनेतून पुढे आलेल्याशिक्षणासाठी कोल्हापूरला यायलाही ज्यांच्याजवळ पैसे नव्हतेकधी अक्षरशः पायी तर कधी गावातल्या स्वातंत्र्यसैनिकासोबत; सवलतीचा पास दाखवत प्रवास करून शिक्षण घेतलेल्या पिढ्यांच्या डोळ्यांत आज विद्यापीठाच्या या यशाने आनंदाश्रू उभे केले, यात कोणतीही अतिशयोक्ती नाही. विद्यापीठाच्या या यशाने आम्हा सर्व माजी विद्यार्थ्यांचे वयाचेप्रतिष्ठेचेविद्वत्तेचे सारे आविर्भाव गळून पडले आणि या पिढ्यांचे डोळे आनंदाने वाहून गेले.

वसंतदादा पाटील, बाळासाहेब देसाई, यशवंतराव मोहिते यांच्या सहकार्याच्या आणि इच्छाशक्तीच्या सावलीत उभे राहिलेले हे विद्यापीठ. शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक आणि चित्रा नाईक यांनी मौनी विद्यापीठाच्या, तर श्री. व्ही. टी. पाटील यांनी महिलांच्या उत्थापनासाठी ताराराणी विद्यापीठाच्या माध्यमातून याच भूमीत काही प्रयोग केले. पश्चिमेकडून वहात येणाऱ्या पंचगंगेच्या प्रवाहांनी समृद्ध केलेली कोल्हापूरची भूमीकृष्णा आणि कोयनेच्या तीरावर पसरलेला सातारा-सांगली आणि चंद्रभागेच्या उभयतीरावर विसावलेली देवभूमी पंढरपूर-सोलापूर, हे या विद्यापीठाचे अनेक वर्षे कार्यक्षेत्र होते. जरी अलीकडे सोलापूरला स्वतंत्र विद्यापीठ झालेपरन्तु शिवाजी विद्यापीठाच्या या देदीप्यमान यशामुळे या इतिहासाशी नाते सांगणाऱ्या लाखो अंतःकरणे शब्दातीत आनंदाने भरून जावीतअसा हा धन्यतेचा क्षण!

राजारामपुरीतून आपण पूर्वेकडे जातो, तेव्हा तिथे आपल्या ‘मुलांना विद्यापीठाची दिशा दाखविणाऱ्या बाईचा’ (खरे तर आईचा) पुतळा लागतो आणि पूर्वेकडे दिसते ते पंढरीच्या पांडुरंगासारखे आपल्या कुशीत येणाऱ्या मुलाबाळांचे मायबाप होत, उंच सागरमाळावर विसावलेलं शिवाजी विद्यापीठआपल्या नजरेत सामावणाऱ्या उभ्या पश्चिम महाराष्ट्राचं पालकत्व स्वीकारणारं, अर्धशतकाहूनही अधिक काळ घडलेल्या इथल्या परिवर्तन प्रवासाचे कृतीशील साक्षीदार शिवाजी विद्यापीठ. या मातीतल्या ग्रामीण गुणवत्तेचे; मार्गदर्शक-पालक विद्यापीठ म्हणजे ‘शिवाजी विद्यापीठ’. इथला एक एक विद्यार्थी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, विचारवंत केवळ तत्त्वज्ञानाचा बोलका सुधारक न राहता आयुष्याच्या वाटेवर एक कर्ता-सुधारक झाला. जीवनाच्या वाटेवर मातृसंस्थेने बिंबविलेल्या तत्त्व-मूल्यांपासून तसूभरही ढळला नाही, यातच या विद्यापीठाच्या यशाचे खरे गमक आहे. 

विद्यापीठाला A++ मानाकन मिळाल्याची बातमी समजली, तशी डोळ्यासमोर उभी राहिली ती विद्यापीठाची देखणी इमारत. तिच्यासमोरील छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा, सभोवतालची देखणी बाग. प्रत्येकाच्या मोबाईलच्या स्टेटसमध्ये ती दिसू लागली. दिसू लागल्या त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या विविध विभागांच्या इमारती, होस्टेल्स. हवेशीर जागा मिळावी म्हणून प्रवेशासाठी आम्ही जिच्या दारात पहाटेपासून उभे असायचो; ती ‘विमान बिल्डिंग’, भव्य स्पोर्टस काम्प्लेक्स, ज्या मातीत अनेक ‘शिवछत्रपति पुरस्कार विजेते’ घडले; ते भव्य क्रीडांगण, बॅ. खर्डेकर ग्रंथालय, विद्यापीठाची प्रेस, दवाखाना, कंझ्युमर स्टोअर्सजुने-नवे गेस्ट हाऊस, कुलगुरूं-प्रकुलगुरू-कुलसचिव निवास... असे सारे सारे विश्व डोळ्यांसमोर तरळून गेले.

विस्तीर्ण अशा या विद्यापीठाच्या परिसरात झाडाच्या सावलीत अशिक्षित भटक्या विमुक्त जाती-जमातींच्या जात पंचायतीच्या सभा आम्ही खुप अंतरावरून पाहिल्या आहेत. या सभात होणारे वाद-विवाद, निवाडे संबंधित जमातीतील लोकांशिवाय कुणालाच कळायचे नाहीत. आम्हा विद्यार्थ्याना या सभांचे मोठे कुतुहल असायचे. विद्यापीठ स्थापनेच्या आधीपासून या पंचायती इथल्या झाडांखाली भरायच्या. कालौघात त्या आता इथे भरणे बंद झाले आहे. 

कर्मवीर भाऊराव यांच्या खांद्यावर बसण्याचे भाग्य लाभलेले गुणवंत असे बॅ. पी. जी. पाटीलनामवंत वक्तेप्रशासक म्हणून गौरव लाभलेले डॉ. के. भोगिशियनशिवाजी पेठेतील न्यू कॉलेजचे पहिले प्राचार्य डॉ. रा. कृ. कणबरकरडॉ. के.बी. पवारडॉ. ए. टी. वरुटेजागतिक कीर्तीचे समाजशास्त्रज्ञ डॉ. द. ना. धनागरेदेशातील विविध विद्यापीठांचे कुलगुरूपद भूषविणारे डॉ. माणिकराव साळुंखेडॉ. एम्. जी. ताकवले, डॉ. एन. जे. पवार  डॉ. डी. बी. शिंदे यांनी आपापल्या कुलगुरूपदाच्या कारकिर्दीत विद्यापीठाच्या प्रगतीचा वारू निश्चितच पुढे नेला. कुलसचिव म्हणून काम केलेल्या डॉ. उषा इथापेडॉ. बी. पी. साबळे यांनी प्रशासनाची उत्तम घडी घालून दिली. गुणवत्तेच्या या दीर्घ परंपरेचा विजय म्हणूनही विद्यापीठाच्या या यशाकडे पाहावे लागेल.

काळाच्या त्या त्या टप्प्यावर विद्यापीठालाविविध विभागांना प्रगल्भ नेतृत्व लाभले. रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, पदार्थविज्ञान शास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र, भूगोल, राज्यशास्त्र, हिंदी, इतिहास, मराठी, इंग्रजी, वृत्तपत्रविद्या, शिक्षणशास्त्र, बहि:शाल शिक्षण, तंत्रज्ञान, अभियांत्रिकीवनस्पतीशास्त्र, अलीकडच्या काळात भूषण ठरलेला ‘दूरशिक्षण विभाग’, नाट्य  ललितकला विभाग आदी सर्वच विभागांनी विद्यापीठाच्या गौरवशाली इतिहासात मोलाची भर घातली.

समाजाच्या भल्यासाठी काम केलेल्यालोकशाहीचा आणि कर्तव्यनिष्ठेचा झेंडा घेतलेल्या प्राध्यापक आणि सेवक संघटनानी देखील वैचारिक संघर्षाच्या क्षणी, विद्यापीठाच्या इतिहासात, परिपक्वतेचे दर्शन घडविले. त्यामुळेच विद्यार्थीहित केंद्रस्थानी मानून काम करणारे विद्यापीठ म्हणून शिवाजी विद्यापीठाचा लौकिक झाला. यातून एक सामाजिक मन तयार होत गेले. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्याला इथे संधीचे अवकाश मिळू लागले. गुणवत्तेच्या आधारे इथे संधी मिळते, याचा विद्यार्थ्यांच्या मनी विश्वास जागा झाला. खेडोपाड्यात शिकणाऱ्या गुणवंत मुलांनी शाहूंच्या या भूमीत शिक्षण घेणे, हे घराला-गावाला आणि पंचक्रोशीला भूषण वाटू लागले. विद्यापीठाच्या स्थापनेनंतर जवळपास चाळीस वर्षे, महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या एस.टी.च्या ड्रायव्हर्स आणि कंडक्टर्सनी; गावागावातून कोल्हापूरला शिकायला आलेल्या याच विद्यार्थ्यांचे डबे कोल्हापूरला वाहून आणले. ‘त्या डब्यांतील थंडगार झालेला घास प्रसंगी पाण्यासोबत गिळून’ या विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या पिढ्या मोठ्या झालेल्या आहेत. कर्मवीरांच्या ‘कमवा आणि शिका’ योजनेला विद्यापीठ स्तरावर प्रभावशाली पद्धतीने राबविणारे शिवाजी विद्यापीठ देशातील पहिले आहे. श्रमाशी आणि कष्टाशी असलेले या पिढ्यांचे नाते त्यांना नेहमीच भूषणावह वाटत आले आहे. विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच्या या आठवणी आजही त्यांच्या डोळ्यांच्या कडा सहजपणे ओलावून टाकतात.   

 अशाच मातीतल्या कसदार माणसांपैकी कितीतरी गुणवंतांनी पुढे शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र आणि देशातील इतर विद्यापीठांचेही नेतृत्व केले. डॉ. पतंगराव कदम यांच्यावर कर्मवीरांचा मोठा प्रभाव. प्रि-डिग्रीला शिवाजी कॉलेजचे विद्यार्थी असताना आणि आपल्या गाव पांढरीतले विद्यापीठ म्हणून त्यांना शिवाजी विद्यापीठाविषयी आपुलकी होती, आंतरिक जिव्हाळा होता. विद्यापीठ अनुदान आयोग आणि एआयसीटीईसारख्या राष्ट्रीय संस्थांचे सदस्यपद भूषविलेले कुलपती डॉ. शिवाजीराव कदम हे देखील याच शिवाजी विद्यापीठात शिकले. चार आणे वाचवण्यासाठी प्रसंगी मैलोनमैल चालत शिक्षण पूर्ण केलेल्या या माणसांनी पुढे भारती विद्यापीठाच्या माध्यमातून, आयुष्यभर माणसांच्याच चालत्या बोलत्या गुढ्या उभ्या केल्या, हजारो संसार उभे केले.  या संदर्भात भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह प्राचार्य डॉ. के. डी. जाधव सर यांची आठवण मोठी बोलकी आहे. अगदी सुरवातीच्या काळात विद्यापीठाचा निकाल वर्तमानपत्रातून यायचा. शेवटच्या गाडीने ते कोल्हापूरला पोहोचायचे. सगळी रात्र स्टँडवरच झोपून काढायचे. सकाळी आलेल्या वर्तमानपत्रात ‘विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आलेली बातमी’ तिथेचस्टँडवरच मिळायची. विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आलेल्या याच विद्यार्थ्यांची गावातून बैलगाडीतून मिरवणूक निघायचीसत्कार व्हायचे. त्या साऱ्या पिढ्यांसाठी हे मानांकन महत्त्वाचे आहे.

डॉ. अरुण अडसूळ नावाचा एक गुणवंत विद्यार्थी बार्शीला मामासाहेब जगदाळे कॉलेजमध्ये शिकला. शिवाजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या काळात त्यांनी शिवाजी विद्यापीठातून एम.एस्सी. केलं; आणि पुढे पुणे विद्यापीठाचे कुलगुरूपद आणि ‘एमपीएससी’चं सदस्यपदही भूषविले. पाटण तालुक्यातल्या साईंकडे-तळमावल्यासारख्या ग्रामीण भागातून पुढे येत प्राचार्य डॉ. के. आर. यादव शिवाजी विद्यापीठाचे प्रथम प्र-कुलगुरू झालेविद्यापीठाच्या सामर्थ्याची प्रतीकं असलेली गुणवंतांची अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. कितीतरी ज्ञात-अज्ञात अशा कितीतरी विद्यार्थ्याच्या यशाचा हा एक प्रातिनिधिक परिचय म्हणावा लागेल.  

माता लक्ष्मीबाईंच्या आणि कर्मवीरांच्या ‘रयत शिक्षण संस्थे’चा स्वावलंबनाचाबापूजींच्या ‘विवेकानंद शिक्षण संस्थेचा सुसंस्काराचा, समाज-परिवर्तनाचा आणि दोन्ही हातांनी समाजाला भरभरून परत करण्याचा संस्कार लाभलेल्या या संस्थांचा आदर्श समोर ठेवत, जिल्हा आणि तालुका स्तरावर, स्थानिक पातळीवर गुणवत्तेचा हाच पोत शिवाजी विद्यापीठ क्षेत्रात इतर संस्था आणि संस्थापकांनीही पोसला. तत्वं-मूल्यं आणि संस्कारांना उरीशिरी धरणाऱ्या शिक्षकांच्या पिढ्यांनी विद्यार्थ्यांच्या पिढ्यांचं वैचारिक भरणपोषण केलं. यामुळेच इथली मुलं शिकू शकली. स्वावलंबी शिक्षणातुन आपले शिक्षण पूर्ण करणारे विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव डॉ. अशोक करांडे भविष्यात इंग्रजीचे नामवंत प्राध्यापक, प्राचार्य झाले. वाई तालुक्यातील अनपटवाडीसारख्या छोट्या खेड्यात कंदिलाच्या उजेडात शिकलेला रयतच्या लोणंद कॉलेजचा विद्यार्थी डॉ. केशव राजपुरे आज जगातील दोन टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान मिळवित विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान शास्त्र विभागाचा प्रमुख झाला. अगदी अलीकडच्या काळातील ही प्रातिनिधिक उदाहरणे आहे. विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या अनेकांची ही कथा आहे. त्यामुळेच आज जगातील दोन टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान मिळविणारे तब्बल ८ प्राध्यापक या विद्यापीठात कार्यरत आहेत, हे यश अभूतपूर्व आहे.

विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभाला येणारे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाहुणे, भव्य सभामंडप, विणेच्या तारा छेडत डॉ. भारती वैशम्पायन यांच्या प्रसन्न आवाजात सादर होणारे पसायदान, आचारसंहितेचे तंतोतंत पालन करीत गांभीर्यपूर्वक  पार पडणारा समारंभ, प्रमुख पाहुण्यांच्या भाषणात काही नवे शब्द शिकायला मिळतात का? ते प्रेक्षकात बसून पाहणारे माजी कुलगुरु बॅ. पी. जी. पाटील सरनवपदवीधर स्नातकांनी फुललेला विद्यापीठाचा परिसर, ठिकठिकाणाहून आलेले पालक, मान्यवर, विद्यार्थ्यांना दिली जाणारी शपथ अशा सर्वार्थाने सजलेल्या पदवीप्रदान समारंभाचे नेटके आयोजन... अशा कितीतरी आठवणी आज या प्रसंगी आल्याखेरीज राहत नाही.

विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत कार्यरत असणाऱ्या, परिवर्तन चळवळीत मोलाची भर घालणाऱ्या कितीतरी शैक्षणिक, सामाजिक संस्था आणि प्रबोधानाचे काम करणाऱ्या संघटना यांनी या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे घडवलं. यामुळेच तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा. डॉ. एन. डी. पाटील, आचार्य शांताराम गरुड, नागनाथआण्णा नायकवडी, कॉ. गोविंदराव पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोळकर, प्रा. संभाजीराव जाधव, डॉ. बाबुराव गुरव, प्रा. राम पवार, विद्यापीठ सेवक संघाचे श्री. व्ही.आर. पाटील, श्री. बाबा सावंत अशा कितीतरी कर्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदानाच्या आठवणीचा आणि जागराचा हा क्षणत्या आठवणींशिवाय हे यश साजरे करता येणार नाही.

प्राचार्य सौ. सुमतीबाई पाटील यांच्यासारख्या प्राचार्यांच्या पिढयांचा विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर शाश्वत प्रभाव होता. वि.स. खांडेकर यांच्यासारख्या भाषाप्रभूच्या आशिर्वादाने पुलकित झालेल्या विद्यार्थ्यांच्या पिढ्यांना, तत्कालीन इंग्रजी विभागप्रमुख डॉ. एस. के. देसाई, डॉ. चंद्रशेखर जहागीरदार, डॉ. एस. व्ही. शास्त्री, वाईचे प्रा. यशवंत कळमकर, साताऱ्याचे प्राचार्य डॉ. एम्. ए. शेख आदी मान्यवर विद्वानांच्या  सहवासाचे भाग्य लाभले. ‘ज्याला काही येतेत्याला कोणीही शिकवेलपण ज्याला शिकविण्यासाठी सुद्धा उचलून घेण्याची गरज आहे, अशा होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असणाऱ्या क्षमता वाढवित कुटुंबातील सदस्याप्रमाणे घडविणारा डॉ. पी.ए. अत्तार यांच्यासारखा शिक्षकाचेही आज स्मरण होतेविद्यापीठाच्या विविध विभागांचे विभागप्रमुख हे जसे त्यांच्या त्यांच्या विषयांत पारंगत होते, तसेच त्यांना तत्त्वज्ञानाचीही चांगली जाण होती, म्हणूनच राज्यशास्त्र शिकविणारे डॉ. के. के. कावळेकर, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. अरुण भोसले, अर्थशास्त्राचे डॉ. जे. एफ. पाटील, बहि:शालचे डॉ. भालबा विभुते यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सर्वच विषयांच्या विद्यार्थ्यांत कुतूहल असायचे. डॉ. गो. मा. पवार, डॉ. ल. रा. नसिराबादकर, डॉ. विश्वनाथ शिंदे, हिंदीचे डॉ. मोरे आदींच्या भाषाविषयक, लोकसाहित्यविषयक ज्ञानाप्रति विद्यार्थ्यांच्या मनात आजही अपार आदर भावना आहे.

तसे बघितले तर विद्यापीठाच्या अंतर्गत चारही जिल्ह्यातल्या कितीतरी महाविद्यालयातुन विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडवणारे सर्वच विद्याशाखांचे कितीतरी प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षकेतर सेवक यांच्या योगदानाप्रति कृतज्ञता व्यक्त केल्या खेरीज हा लेख पूर्ण होवू शकत नाही. परंतु लेखनसीमेचा विचार करता इच्छा असूनही हे शक्य नाही.

संशोधनामध्ये विज्ञान विभागांनी मोठीच कामगिरी केली आहे. स्कोपस आणि मान्यताप्राप्त  आंतरराष्ट्रीय इंडेक्स जर्नल्समधील शोधनिबंध, संशोधनाची सद्य जगतातील आंतरराष्ट्रीय परिमाणे याबाबतीत विद्यापीठाच्या विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्र-विज्ञान विभागांनी मोलाची भर घातली आणि यामुळेच हे यश मिळू शकले, असे म्हणावे लागेल. संशोधन-प्रकल्पांतून प्राध्यापकांनी, विद्यापीठ अनुदान आयोग तसेच अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मिळविलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अनुदानातून विद्यापीठाच्या संशोधकीय प्रगतीला विशेष हातभार लावला. विद्यार्थ्यांच्या, संशोधक आणि मार्गदर्शकांच्या पिढ्या-पिढ्या एकमेकांना उभ्या करत गेल्या आणि मग गोपाळकाल्याची दहिहंडी हाती यावी, तशी नॅकच्या मुल्यांकनाची A++ ही ग्रेड (3.52 CGPA मिळवत) हाती आली. 

अभ्यासक्रमाचा दर्जा, पारंपरिक आणि अभिमत तसेच स्वायत्त महाविद्यालयांच्या निमित्ताने आज व्यक्त होत असणारी महाविद्यालयांची गुणवत्ता वाढ, संशोधन परंपरा; संशोधनशुचित्व आणि काळाच्या ओघात निर्माण झालेल्या मापदंडांचे पालन, यासाठी शिवाजी विद्यापीठाची देशपातळीवर प्रमुख ओळख आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने तर देशपातळीवर स्वत:चा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. इथल्या पीएच.डीच्या विद्यार्थ्यांचे थेसिस तपासताना, परीक्षेचे कामकाज करताना, बाहेरील विद्यापीठांतील प्राध्यापक शिवाजी विद्यापीठातील कार्यपद्धतीचा आवर्जुन उल्लेख करतात, त्यांच्या त्यांच्या विद्यापीठात अनुकरणाचा आग्रह धरतात.

विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष जड़ण घडणीशी ज्यांचा प्रत्यक्ष सम्बन्ध येतो ते विभाग म्हणजे ‘विद्यार्थी कल्याण विभाग’, ‘एन. एस. एस.’ आणि ‘कमवा-शिका’ योजने अंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे ‘आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवन’. १९९१ साली प्रा. आर. एस. माने संचालक-समन्वयक असताना मला दिल्लीच्या प्रजासत्ताकदिनाच्या संचलनात विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करता आले, देश पातळीवर अनेक वक्तृत्वस्पर्धात भाग घेता आला. त्यानंतरच्या सर्वच संचालक-समन्वयक यांच्या, ‘दिले गेलेले काम भक्तिभावाने करण्याच्या स्वभावामुळेच’ त्यांच्या नावांची मोहोर विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर आजही कायम आहे.  

या सर्व यशाचा विचार करताना विद्यापीठातील प्रशासकीय सेवक वर्गाचा आणि त्यांनी दीर्घ काळ आपल्या कामातून उभ्या केलेल्या विद्यापीठाच्या प्रतिमेचा विशेष उल्लेख करावा लागेल. आपल्या विद्यापीठाविषयी त्यांना वाटणारा कमालीचा अभिमान, हे त्यांचे वैशिष्ट्य. दिलेले काम सकारात्मक मानसिकतेने करणारा आणि विद्यापीठातील आजी-माजी प्राध्यापकांच्या क्षमतेबद्दल भरभरून बोलणारा, प्रश्न सोडविण्याची मानसिकता असलेला, विद्यार्थ्याना आपलेपणानं वागविणारा प्रशासकीय सेवकवर्ग म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या कार्यालयीन सेवक वर्गाचा उल्लेख करावा लागेल.

विद्यापीठाची अभ्यास मंडळे, अधिसभा, विद्वत-सभाव्यवस्थापन परिषद अशा सर्व स्तरांवर होणारी बौद्धिक आणि सकारात्मक चर्चा, विद्यापीठ आणि विद्यार्थी कल्याणाच्या वाटेवर आपापसातील मतभेदांच्या भिंती पाडून टाकणाऱ्या संघटना, विद्यापीठाने घालून दिलेल्या आचारसंहितेचा आदर करणारे संस्थापक, प्राचार्य आणि सभोवतालचा सारा समाज, या साऱ्या-साऱ्या घटकांच्या तप:श्चर्येचे फलित म्हणून विद्यापीठाच्या या भव्य-दिव्य यशाकडे पहावे लागेल. जगात शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या आणि काही शतकांच्या प्रवासाचा अनुभव गाठीशी असणाऱ्या विद्यापीठांच्या गुणवत्तेशी नाते सांगणारे यश; आज शिवाजी विद्यापीठाला मिळालेले आहे. मोठे यश मिळवून आईच्या कुशीत शिरताना, आपल्या डोक्यावरून फिरणारा तिच्या हाताचा स्पर्श अनुभवताना होणारा आनंद, आज विद्यापीठाशी नाते असलेला प्रत्येकजण अनुभवतो आहे. ना. धो. महानोरांच्या शब्दांतच सांगायचे तर:

या मातीने लळा लावला असा असा की,

सुखदु:खाला परस्परांच्या हसलो रडलो,

याने तर हा जीवच अवघा जखडला,

मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो II

 यासाठीच ‘मी कोण आहे, हे विचारण्यापेक्षा, मी कुठून आलो? हे विचारणे अधिक महत्त्वाचे. मातीत ज्यांचे जन्म मळलेत्यांनीच आज गुणवत्तेचे आकाश पेलले आहे. आज जगाच्या पाठीवर जीवनाच्या सर्व क्षेत्रांत; सर्वदूर पसरलेल्या, संकटांवर स्वार होणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याची जी यशोगाथा आहे, तीच यशोगाथा त्यांना उरिशिरी धरणाऱ्या शिवाजी विद्यापीठाचीही आहे. यातच या यशाचे, आनंदाचे आणि सर्वांच्या अंतःकरणात भरून पावलेल्या ‘समाधानाचे-सार’ सामावले आहे.

ही विजयश्री परिश्रमपूर्वक खेचून आणणारे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील, डॉ. व्ही.डी. नांदवडेकर आणि सर्व संबंधित घटकांचे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन!!!

 

- प्राध्यापक (डॉ.) विवेक रणखांबे

भारती विद्यापीठ, पुणे 

Mob: ९८५०५५८४०४, 

Email: vivekrankhambe@gmail.com

(लेखक हे कला शाखेचे विद्यार्थी असून शिवाजी कॉलेजसातारा, न्यू कॉलेजकोल्हापूर, शिवाजी विद्यापीठ इंग्रजी विभाग तसेच  वेणुताई चव्हाण कॉलेज, कराडचे ते माजी विद्यार्थी आहेत.)


62 comments:

  1. डॉ विवेक रणखांबे आपण अतिशय सुयोग्य शब्दात विद्यापीठाविषयी कौतुक सुमने वाहिली आहेत. विद्यापीठाविषयी तोच माणूस इतक भरभरून लिहू शकतो ज्याचे आपल्या या मातृसंस्थेविषयी अतूट स्नेहबंध आहेत. आपल्या काळातील सगळे घटक डोळ्यासमोर आले. मन भूतकाळात गेलं. लेख वाचल्यावर कळतं की आपण कुठून कुठपर्यंत आलो आहे. भाषा देखील फारच सुरेख. सर्वांगसुंदर लेखन आणि सुयोग्य कौतुक. खरं तर या मानांकनाने विद्यापीठाशी निगडित प्रत्येक घटकाला अवर्णनीय आनंद झाला आहे ..

    खूप खूप अभिनंदन 👍🙏🚩💐

    केशव राजपुरे

    ReplyDelete
  2. डॉ. विवेक रणखांबे सर अतिशय समर्पक शब्दात आपण शिवाजी विद्यापीठाच्या मानांकनामुळे सगळ्यांना झालेला आनंद या लेखामधून व्यक्त केला आहे. सुयोग्य मांडणी आणि आतापर्यंतच्या विद्यापीठाच्या जडणघडणीत ज्यांनी मोलाचे योगदान दिले त्या सर्वांबद्दल आपण खूप छान लिहिलं आहे. लेखाची मांडणी, भाषा आणि दाखले खूप भावले.
    खूप खूप अभिनंदन
    डॉ. मनिषा आनंद पाटील

    ReplyDelete
  3. Gr8 sir. Really proud to be a student of this university.

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर लेखन केले आहे विवेक तुझे मनापासून अभिनंदन व शुभेच्छा

    ReplyDelete
  5. Beautifully written. Wonderful experiences mentioned about SUK are indeed great. I also felt humbled and joyful, being a former student of SUK. Congratulations Sir and best wishes.

    ReplyDelete
  6. विवेक संप्पन्न लिखाणासाठी डॉ विवेक आपले मनपूर्वक अभिनंदन व भावी लिखाणासाठी खूप शुभेच्छा

    ReplyDelete
  7. It is an elaborative yet a very compassionate write up, giving a very good insight into the history, caliber and efficiency of the University and the stalwarts who stand as solid pillars behind it. Three cheers to Professor Dr Vivek Rankhambe 👍👍

    ReplyDelete
  8. आपली लेखणी बहरली आहे.

    ReplyDelete
  9. एक कृतज्ञता

    ReplyDelete
  10. लेख अतिशय अभ्यासपूर्ण व प्रत्येकाने शिवाजी विद्यापीठासाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून देणारा किंबहुना या विद्यापीठाच्या उभारणीपासून ते आत्तापर्यंत झालेल्या दैदीप्यमान प्रगतीचा व प्रत्येकाने दिलेल्या योगदानासह यश इथे घडलेली माणसं, समाज विद्यापीठाची गुणवत्ता, इथं होऊन गेलेली गुणी माणसं त्यांची बौद्धिक संपत्ती ,विद्यापीठाचे प्रशासन यात मोलाची भर टाकणारे तत्वनिष्ठ प्राध्यापक व प्रशासकीय अधिकारी आणि मुख्यतः अगदी सुरुवातीलाच कोल्हापूरचं सौंदर्य ऐतिहासिक स्थान आणि तिथे कार्यरत असलेले शिवाजी विद्यापीठ, सर्वांनाच अभिमान वाटावा, सर्वांच्याच जाणिवा जाग्या करणाऱ्या आपण दिलेल्या लेखाबद्दल वर्णन करणं अगदी अशक्य सन्माननीय कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के सर कुलगुरू पदावर असताना मिळालेला हा सन्मान बहुमोल असा आहे कारण याच विद्यापीठात गेली अनेक वर्ष प्राध्यापक व प्रशासक म्हणून त्यांचे मोठे योगदान विद्यापीठास लाभलेले आहे अर्थात प्रत्येकाचेच श्रम व त्यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख,हा लेख केवळ माहितीपूर्ण नसून त्यात भावनेचा ओलावा दिसून येतो नकळत हृदयाला स्पर्श करून जातो फार सुंदर लिखाण मनःपूर्वक अभिनंदन सर!

    ReplyDelete
  11. गुणवत्तेची गरुड भरारी हा डॉ. विवेक रणखांबे यांनी लिहिलेला लेख वाचण्यात आला या लेखांमध्ये विद्यापीठाच्या जडणघडणीमध्ये ज्या कुलगुरूंनी परिश्रम घेतले त्या सर्वांचा उल्लेख डॉ.रणखांबे यांनी केलेला आहे अत्यंत विचारी आणि वाचनीय व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर विवेक रणखांबे होय. त्यांनी आपल्या मातृसंस्थेबद्दल असलेला आदर या लेखातून व्यक्त केला आहे. हा लेख अतिशय अभ्यासपूर्ण असून ज्यांनी ज्यांनी यामध्ये योगदान दिले आहे त्या सर्वांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करावी असाच आहे. या सुंदर व वाचनीय लिखाणाबद्दल डॉ. विवेक रणखांबे यांचे
    हार्दिक अभिनंदन.

    ReplyDelete
  12. आदरणीय रणखांबे सर!
    आपण आपले लेखनातून शिवाजी विद्यापीठाकरिता प्रत्येकानी जे जे योगदान दिले त्यातून आज जे उंच शिखर पादाक्रांत केले. त्याचे संपूर्ण पण आगदी कमी शब्दातून एकदम छान आणि हुबेहुब वर्णन केले आहे, यातून विद्यापीठाच्या निर्मिती पासून आजपर्यंत जे घडले त्याचे दर्शन घडले. आपली लेखणी आणि शब्द संचय यातून विद्यापीठाबाबत ज्यानी ज्यानी योगदान आणि कठोर परिश्रम केले त्याचीच पोहोच पावती म्हणजे आजची विद्यापीठास मिळालेला मान आहे,हे आपले लेखन वाचून समजून येते व तेच मनास भावते.
    आपले मनःपूर्वक अभिनंदन!
    राजाराम बाळासाहेब साळुंखे, वकील
    सांगली

    ReplyDelete
  13. शिवाजी विद्यापीठाचे हे review article च म्हणावे लागेल. अतिशय अभ्यासपूर्ण लेख आहे. विद्यापीठ कसे घडले आहे याची माहिती आजच्या तरुण पिढीला व विद्यापीठात काम करणाऱ्या नवोदिताना या लेखातून निश्चितच होईल आणि त्यांना प्रेरणा मिळेल. अफाट प्रेमशिवाय व कृतज्ञतेशिवाय असे लिखाण होत नाही. डॉ रणखांबे सर आपण सतत लिहित रहा व सर्वाना प्रेरित करा....

    ReplyDelete
  14. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाणे A++ हे नामांकन मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.ज्या विध्यापिठाच्या गुणवत्तेबाबत ठराविक वर्गाकडून नेहमी प्रश्नचिन्ह उभे केले जायचे त्यांच्याकडे दुर्लक्ष करित सातत्याने गुणवत्तेचे प्रयोग करून मिळालेले हे यश आहे.शिवाजी विध्यापिठ हे बहुजनांच्या,गरीब व गरजू विध्यार्थ्याच्या शिक्षणाचे माहेर घर आहे. तिथल्या 'कमवा व शिका' योजनेच्या विध्यार्थी भवनच्या लाभाचे 'तत्कालीन फाटके' भाग्यवंत आज जगाच्या काना कोपऱ्यात कर्तृत्वाचा पताका फडकवत आहेत.नामांकित प्राध्यापक,बॅ.खर्डेकर ग्रंथालय व 'प्लेन ग्रंथालय' ही बुद्धीच्या मशागतीची दोन केंद्रे,रम्य परिसर,दिमाखदार मुख्य इमारत व कोल्हापूरच्या मातीतला माणुसकीचा ओलावा यातून खेड्यातून आलेल्या लाजऱ्या बुजऱ्या अनेकांना घडवले.
    डॉ राजपुरे,डॉ रनखांबे हे आम्ही सहाध्यायी. डॉ राजपुरे आज विध्यापिठाच्या पदार्थविज्ञान विभागाचे प्रमुख आहेत.डॉ रनखांबे हे उपजत प्रतिभावन्त, त्यांच्या यशाची पताका कधी खाली आलीच नाही.असे अनेक मानकरी ही विध्यापिठाचीच देणगी आहे.
    विद्यापीठाचे यश हे अनेक वर्षांच्या सातत्याने गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण केलेल्या प्रयत्नाचे फलित आहे.यशाचे मानकरी असणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन🙏

    ReplyDelete
  15. नमस्ते विवेक सर,अतिशय अनमोल लेख,खूपच अभिमानास्पदआहे आम्हा विद्यार्थ्यांसाठी,जे आम्हाला या विद्यापीठात शिकतो म्हणून हिणवतात त्यांना एक चपराक या निमित्ताने.शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी म्हणून विद्यापीठाचे मानांकन आमच्यासाठी गौरवास्पद आहे,खूप खूप धन्यवाद

    ReplyDelete
  16. Khup Sundar Lekh Lihila Aahe Dr. Rankhambe Sir.

    ReplyDelete
  17. अप्रतिम लेख, सर.
    - श्रीपाद

    ReplyDelete
  18. डॉ. रणखांबे सर, आपण या लेखाद्वारे विद्यापीठ स्थापनेपासून घेतलेला आढावा हा आम्हा कर्मचाऱ्यांना येथील माजी कर्मचाऱ्यांकडून यापूर्वी कळलेलाच होता. तथापि आपण या इतिहासाला उजाळा दिला. शिवानी विद्यापीठ सेवक संघाचे सध्याचे अध्यक्ष आदरणीय श्री. प्रभाकर आत्माराम तहत बाबा सावंत आजही वयाच्या ८० व्य वर्षी कार्यरत आहेत व आम्हा कर्मचाऱ्यांचे प्रेरणास्थान आहेत. आणि अशाच महनीय व्यक्तींकडून आम्ही कर्मचारी शिवाजी विद्यापीठामध्ये कार्यरत आहोत. आपण लिहिलेल्या या लेखाद्वारे आम्हा कर्मचाऱ्यांना कार्याचे उर्मीच मिळते आहे. या लेखाबद्दल आपले आम्ही येथील कर्मचारी ऋणी आहोत. धन्यवाद!
    श्री अतुल एतावडेकर, सहायक अधीक्षक, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग,
    महासंघ प्रतिनिधी, शिवाजी विद्यापीठ सेवक संघ,
    समन्वयक, पश्चिम महाराष्ट्र, महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ.

    ReplyDelete
  19. अप्रतिम लेख, सर.

    ReplyDelete
  20. अतिशय अभ्यासपूर्ण लेख...

    ReplyDelete
  21. अभ्यासपूर्ण....अनुभवसंपन्न....भूतकाळातील आठवणींना उजाळा देत वर्तमानाच्या यशाशी केलेलं देखणं हस्तांदोलन म्हणजे हा लेख आहे.
    विवेक सातत्यानं लिहीत रहा .

    ReplyDelete
  22. खूप छान वक्तृत्व तर प्रभावशाली आहेच लेख ही अप्रतिम

    ReplyDelete
  23. डॉक्टरसाहेब लेख आवडला अतिशय उत्कृष्ट लेख आहे आपले विचार असेच प्रकट होत राहोत हिच सदिच्छा देशपांडे परीवार कडेगांव

    ReplyDelete
  24. Very nice and informative article. It has historical and artistic touch. Feel proud to be Alumni of Shivaji university Kolhapur.

    ReplyDelete
  25. Excellent article highling the contributtion of all to the development of the alma mater. Nice presentation in a lucid language. Congratulations Dr Vivek for recalling the past. It's an useful document to narrate the history of the Shivaji University.

    ReplyDelete
  26. Excellent article Dr Rankhambe Sir ! Nice presentation. Feel proud to be Alumni of Shivaji University, Kolhapur.

    ReplyDelete
  27. Excellent article Dr Rankhambe Sir ! Nice presentation. Feel proud to be Alumni of Shivaji University, Kolhapur.

    ReplyDelete
  28. विद्यापीठाची भौगोलिक स्थान, कर्तबगार नेतृत्व, स्थापना कार्यकाळ ते आजचं मिळालेलं यश हा प्रवास डॉ विवेक रणखभे यांनी अतिशय सुंदर शब्दात वर्णिला आहे। धन्यवाद डॉ विवेक.माजी विद्यार्थी म्हणून अतिशय आनंद झाला. यशाचा अलेख उंच राहावा ही सदिच्छा

    ReplyDelete
  29. डॉ बाळकृष्ण मागाडे,वाई
    आपल्या मातृविद्यापीठाप्रती ऋणानुबंध किती घट्ट असू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉ विवेक रणखांबे यांनी शिवाजी विद्यापीठाचा भूतकाळापासून ते वर्तमानापर्यंत झालेल्या उज्वल प्रवासाचे सुंदर शब्दांकन.या यशापाठीमागे वस्तूपासून वास्तुपर्यंत आणि अनेक व्यक्तींच्या पराकाष्टेची मालिकाच होती त्यास सलाम.पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

    ReplyDelete
  30. 👏👏👏👏👏👏

    संदर्भसंपन्न आणि अभ्यासपूर्ण!

    डॉ. विवेक मनःपूर्वक अभिनंदन!
    👍👍👍

    ReplyDelete
  31. डॉ.विवेकानंद रणखांबे यांनी लिहिलेला गुणवत्तेची गरुड भरारी हा लेख वाचला.गौरवशाली शिवाजी विद्यापीठाबद्दल अतिशय गौरवपूर्णं शब्दात प्रकट केलेले आपले विचार फारच सुरेख आणि सुयोग्य आहेत.शिवाजी विद्यापीठाच्या सुरवातीपासून आतापर्यंतच्या प्रगतीचा आपण घेतलेला आढावा मनाला खुप भावला.अतिशय उत्कृष्ट लिखाण आणि प्रभावशाली मांडणी..असेच सातत्याने लिहीत रहा.मनापासुन खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद..!
    श्री.राजेश कराडकर.

    ReplyDelete
  32. शिवाजी विद्यापीठाने मिळवलेल्या उत्तुंग यशाचे अत्यंत समर्पक शब्दांकन डॉ विवेक.या विद्यापीठाचा माजी विद्यार्थी असल्याचा सार्थ अभिमान वाटतो.
    संजय दीक्षित,फलटण

    ReplyDelete
  33. शिवाजी विद्यापीठाने मिळवलेल्या ऊत्तुंग यशाबद्दल सर्व मान्यवरांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. ही आमच्यासारख्या माजी विद्यार्थ्यांसाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. डॉक्टर विवेक रणखांबे यांनी खूपच सुंदर आणि अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे.शिवाजी विद्यापिठाचा गौरवशाली ईतिहास अतिशय उत्तम प्रकारे आणि सर्मपक शब्दात मांडला आहे. त्याबद्दल त्यांचेही खूप खूप कौतुक आणि अभीनंदन.
    सूर्यकांत निकम , पुणे

    ReplyDelete
  34. Excellent write up Dr.Rankhambe.Congratulations!! So aptly and meticulously put in. Proud to be an alumni of this university.

    ReplyDelete
  35. Dr रणखांबे सर , खूपच सुंदर लेख लिहिला आहे . विद्यापीठाविषयीचा अभिमान आणि प्रेम उत्कट भावाने व्यक्त केले आहे.

    फारच छान...!👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼👍👍

    ReplyDelete
  36. अभ्यासपू्र्ण व सुंदर लेख. शिवाजी विद्यापीठाच्या प्रतेक विद्यार्थ्याच्या मनातील भावनांचे प्रतिनिधित्व करणारा लेख.धन्यवाद सर

    ReplyDelete
  37. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, सन्माननीय कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि विद्यापीठाची संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन व कौतुक!!!👏👏👏

    माझे मित्र डॉ. विजय रणखांबे सर यांच्या लेखणीतून शब्दबद्ध झालेला शिवाजी विद्यापीठाच्या यशाचा आलेख या दीर्घ लेखाच्या माध्यमातून उत्कृष्टपणे आणि उत्कटतेने मांडण्यात आला आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी निर्माण केलेल्या ज्ञान परंपरा, विद्यापीठाने महाराष्ट्र भूमीला आणि भारतभूमीला दिलेले अतुलनीय योगदान, ग्रामीण भागातून अनेक हिर्‍यांची पारख करून राष्ट्रीय भूमिका बजावण्यासाठी व विद्यापीठाचे हित जपण्यासाठी संस्कार रुपी दिलेला ज्ञान डोस या सर्वांचा परिपाक म्हणजे विद्यापीठाला मिळालेली NAAC A++ मानांकन. डॉ. रणखांबे यांनी या लेखाच्या माध्यमातून मांडलेला हा लेखाजोखा वाचकांच्या काळजाला भिडणारा व विद्यापीठाने निर्माण केलेल्या विद्यार्थ्यांसोबत चा ऋणानुबंध दर्शवणारा आहे. इंग्रजीचा प्राध्यापक असतानाही इतके अचूक, अत्युच्च साहित्यिक, मराठी प्रमाणभाषेतून प्रकट झालेले ह्या भावना उत्कट आनंदाची साक्ष देणाऱ्या आहेत.
    डॉ. रणखांबे सर यांचे मनापासून अभिनंदन 👏👏

    प्रा.बळीराम गायकवाड
    कुलसचिव मुंबई विद्यापीठ

    ReplyDelete
  38. डॉ. रणखांबे सर,

    आपण विद्यापीठ स्थापनेपासूनचा चांगला आढावा घेतला आहे. लेखाच्या निमित्ताने अनेक गोष्टींचा नव्याने परिचय झाला. शिवाजी विद्यापीठाची स्थापना ही एक शैक्षणिक चळवळच होती. ही चळवळ शैक्षणिक करणे,हे आव्हान साठच्या दशकात होतं. शिवाजी विद्यापीठाच्या आतापर्यंतच्या नेतृत्वाने हे पेलून दाखविले आहे. याचीच पावती म्हणजे हे नँक मधील धवल यश आहे. विद्यापीठाचा माजी विद्यार्थी म्हणून याचा सार्थ अभिमान वाटतो.
    शैक्षणिक गुणवत्ता वाढवत नेणे ही एक दीर्घकालीन प्रक्रिया असते. शिवाजी विद्यापीठाने हा प्रवास साध्य केला आहे. आता ही गुणवत्ता सातत्याने वाढवत नेणे,हे मोठं काम आहे. आजची विद्यापीठ प्रगती पाहता हे मोठं काम निश्चित होणार, यात शंकाच नाही. आपणही माजी विद्यार्थ्यांनी यात योगदान दिले पाहिजे. खरं म्हणजे शिवाजी विद्यापीठ शैक्षणिक उपक्रम आणि यातील फलनिष्पत्ती यावर अनेक विद्यार्थ्यांना पीएच.डी साठी नवे विषय मिळू शकतात. यातून आणखीन नवी माहिती समाजासमोर येईल.
    आपले उत्तम लेखनासाठी अभिनंदन.

    डॉ. संजय रत्नपारखी,
    दूर व मुक्त अध्ययन संस्था,
    मुंबई विद्यापीठ

    ReplyDelete
  39. विद्यापीठाच्या एकूण जडणघडणीचा लेखाजोखा अत्यंत ओघवत्या भाषेत मांडला आहे.प्रत्येक घटकाचे योगदान अधोरेखित केले आहे.विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचा व याच विद्यापीठाशी संलग्नित आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गारगोटी येथे कार्यरत असल्याचा आनंद व अभिमान वाटतो आहे.
    डॉ.रावसाहेब शेळके,सहयोगी प्राध्यापक ,गारगोटी

    ReplyDelete
  40. अप्रतिम लेख, डॉ. रणखांबे...अभिनंदन
    लेख वाचत असताना, शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या सर्व लहान मोठ्या घटनांचा आणि त्याबरोबरच सर्व लहान मोठ्या घटकांचा उल्लेख अगदी काटेकोरपणे केलेला आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्या कार्यकतृत्वाचा, योगदानाचा आणि त्याचा विद्यापीठाच्या एकुण जडणघडणीत असणारा सहभाग यांचा अप्रतिम आढावा या लेखात घेण्यात आला आहे. डॉ.अप्पासाहेब पवार, डॉ.भोगिशियन, बॅरिस्टर पी.जी. पाटील, डॉ.धनागरे यांसारख्या कुलगुरूनी शिवाजी विद्यापीठ नावारुपाला आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्यांच्या मेहनतीला विद्यापीठातील सर्व विभागातील शिक्षकांनी तेवढ्याच मोलाची साथ दिली आणि कोल्हापूर सारख्या ग्रामीण भागातील विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी हातभार लावला. प्राध्यापकांबरोबरच या विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या असंख्य होतकरू विद्यार्थ्यांनी आपल्या प्रचंड अभ्यासाच्या जोरावर विद्यापीठाला अत्युच्च शैक्षणिक व संशोधनात्मक शिखरावर पोहोचण्यास मदत केली. शिवाजी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी आपले काम चोखपणे बजावले. त्याबरोबरच विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाची विजयी पताका देशविदेशात कायमस्वरूपी फडकत राहील याची काळजी घेतली. या सर्वांचा परिपाक म्हणजे शिवाजी विद्यापीठाला बेंगलोर येथील NAAC या संस्थेकडून मिळालेला A++ हा दर्जा होय असे म्हणता येईल.
    म्हणूनच डॉ. रणखांबे यांचा प्रस्तुत लेख हा शिवाजी विद्यापीठाशी संबंधित सर्व घटकांच्या प्रातिनिधीक भावनांचा शब्दप्रपंच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
    शिवाजी विद्यापीठ या आपल्या मातृसंस्थेवर निस्सीम प्रेम व्यक्त करणारा हा लेख विद्यापीठाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल अशी आशा वाटते.

    डॉ. शिवाजी सरगर
    प्राध्यापक व माजी विभागप्रमुख
    इंग्रजी विभाग
    मुंबई विद्यापीठ, मुंबई

    ReplyDelete
  41. Excellent and precisely written. The article gives glimpse about the grand history and the quality of the Shivaji University. I am very proud to be an ex student of Shivaji University.

    ReplyDelete
  42. लेख वाचताना डोळ्यात अश्रू उभे केले सर .धन्यवाद

    ReplyDelete
  43. Precisely and aptly portrayed the development of Shivaji University,lifeline of thousands of lives. Hearty Congratulations Dr Rankhambe!!!

    ReplyDelete
  44. A great write-up Sir. Proud to be the part of this University as a faculty and student of Ph. D.

    ReplyDelete
  45. अत्यंत अभ्यासपूर्ण लेख विवेक

    आपल्या दुसऱ्या आईबद्दल (आपल्या विद्यापीठाला मी तरी
    आपली दुसरी आईच मानतो) एवढ्या सुंदर शब्दात वर्णन... आप्रतिम

    ReplyDelete
  46. Feel proud about the achievement of my Shivaji University.. Wonderful article by Prof Vivek Rankhambe. The beauty of the article is highlighting the contribution of all who were part of this University as the A++ is an outcome of decades of hardwork.. Congratulations to Shivaji University on the achievement & Prof Rankhambe on this precise writeup..

    ReplyDelete
  47. Feel proud about the achievement of my Shivaji University.. Wonderful article by Prof Vivek Rankhambe. The beauty of the article is highlighting the contribution of all who were part of this University as the A++ is an outcome of decades of hardwork.. Congratulations to Shivaji University on the achievement & Prof Rankhambe on this precise writeup..
    Col Bhushan Awasare, 1989-93

    ReplyDelete
  48. अप्रतिम वर्णन केले आहे.भाऊजी मनापासून तुमचे कौतुक

    ReplyDelete
  49. अप्रतिम लेख. सर्व घटकांच्या योगदानाची नोंद घेणारा आणी एक मोठा कालखंड डोळ्यासमोर उभा करणारा सुंदर लेख.
    Prof. Tripti Karekatti
    Head, Department of English, Shivaji University, Kolhapur .

    ReplyDelete
  50. प्रा.विवेकानंद दादा..नमस्कार.. प्रथम विद्यापीठ मानांकन प्रक्रियेतील यशाच्या वाटेकऱ्यांचे शतशः धन्यवाद.व अभिनंदन अन शिवाजी विद्यापीठाचा ओघवता इतिहास दाखवणारे डॉ रणखांबे या विद्यार्थ्यांचे.मी 1995 ते 2000 चे शिक्षण ASC कॉलेज किर्लोस्करवाडीचा विद्यार्थी.प्रथम शिक्षणाचा ग्रामीण रंग भरला रयत शिक्षण संस्थेने.कर्मवीर आण्णा हेच आमचे आद्य पालक.रयत नसती तर माझ्यासारखे शिकलेच नसते. शिवाजी विद्यापीठ हें नेहमीच घरचे अन हक्काचे,तेथील आवार बघून जाऊच वाटत नाही.इंग्रजी विचित्रपणा येऊ नये म्हणून शिवाजी असे एकेरी नाव ठेवले. वसंतदादांच्या कारकिर्दीत सांगलीत होणारे हें विद्यापीठ कोल्हापूरला गेले व आकाशवाणी रेडिओ स्टेशन सांगलीत आले.माझ्या मते ही सरकारी अनुदानित विद्यापीठे तेथील प्रशासनाच्या इच्छाशक्तीवरच इतके उत्तुंग यश मिळवू शकतात.विवेक दादा इंग्रजीचे शिक्षक असून मराठीत खूप लाघवी भाषेत अभ्यासू लेखन करतात. त्यांनी विविध विषयावर सतत लिहावे व या पुण्यनगरीत भाषाप्रभू व्हावे व आपला स्वतंत्र वाचकवर्ग बनवावा, ही इच्छा आहे.मी हा लेख तीनदा वाचला..लेखांचा संग्रह असुद्या.. खूप खूप धन्यवाद आणि बहोत बहोत बधाई... आपला........ उमेश धोंडीराम पंढरे... कोथरूड पुणे

    ReplyDelete
  51. प्रिय विवेक
    शिवाजी विद्यापीठा बाबतीत लेख वाचला. प्रत्येकानेच असे कृतज्ञ राहणे हेच खूप  महत्त्वाचे..म्हणतात ना तांब्याभर पाण्याची पण आठवण ठेवावी आणि इथे तर आयुष्य घडले आहे .पण सर्वांनाच ते जमत अस नाही .असो
    तो लेख वाचताना मात्र सर्वांच्याच भावना नक्कीच जागृत झाल्या यात शंका नसावी.
    विद्यापीठाची इमारत शिक्षक  शिक्षकेतर कर्मचारीवर्ग सर्वांनाच
    कृतकृत्य वाटल असेल. पंचगंगा दुथडी भरून वहावी असा आनंद शब्दाशब्दातून व्यक्त झाला आहे.
    खरतर  तूझ मन ही निर्मळ आहे त्या मूळे तू इतरांविषयी इतक भरभरुन लिहू शकतोस..
    खूप आशिर्वाद खूप शुभेच्छा.......

    ReplyDelete
  52. Professor (Dr.) Vivekanand Rankhambe,
    I really appreciate your elegant gesture of gratitude towards our alma mater, Shivaji University, on the remarkable achievement of securing A ++. It's a commendable review of all the important factors that shaped the grand success. I must say that it's a notable documentation of galloping growth of the university from the very inception to the date of glorious achievement. Your article has made everyone proud. I thank you for the invaluable documentation and congratulate whole heartedly.
    Dr. Neeta Dhumal

    ReplyDelete
  53. अतीशय छान लेख. शिवाजी विद्यापीठाची पायाभरणी पासुन ते शिखरापर्यंतचा एक आलेखच तोपण चढता विदवत्ता पुर्ण अलंकारानी नटलेला आकाशासम अनेक तारांनी असलेले हे विश्वविद्यापीठ .खरोखरच महाराष्र्ट या विद्यापीठाचा ृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृऋणी राहील

    ReplyDelete
  54. अप्रतिम लिखाण विवेकानंद, तुझे लिखाण पूर्वीपासून च माहिती आहे ,आता ते आणखीनच सुंदर झालेय,अर्थात तुझ्यासारखे छान छान शब्दात नाही जमत आम्हाला लिहायला आणि बोलाय ला सुद्धा 😊 पण तू जे काही लिहितोस आणि लिहिले आहेस ते अतिशय मनापासून लिहिले आहेस, तुझ्या शब्दातून आपले विद्यापीठ किती महान कार्य करतेय आणि करत होते याची जाणीव होतेय. आणि शाहू महाराजांच्या कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ हे त्यांचाच वारसा पुढे नेणारे म्हणजे जात पात धर्म न बघता अगदी तळागाळातील विध्यार्थ्यांना आपलेसे करून त्यांना यशाचा मार्ग दाखवणारे विद्यापीठ होय आणि आता तर ते सिद्ध झाले, हे तुझ्या लेखनातून सर्वाना ज्ञात होतेय . अभिनंदन विवेकानंद तुझे हि आणि तुला घडविणाऱ्या विद्यापीठ चे हि 💐💐💐💐💐💐💐💐💐

    संयोगीता सासने रत्नागिरी

    ReplyDelete
  55. अप्रतिम लिखाण विवेकानंद, तुझे लिखाण पूर्वीपासून च माहिती आहे ,आता ते आणखीनच सुंदर झालेय,अर्थात तुझ्यासारखे छान छान शब्दात नाही जमत आम्हाला लिहायला आणि बोलाय ला सुद्धा 😊 पण तू जे काही लिहितोस आणि लिहिले आहेस ते अतिशय मनापासून लिहिले आहेस, तुझ्या शब्दातून आपले विद्यापीठ किती महान कार्य करतेय आणि करत होते याची जाणीव होतेय. आणि शाहू महाराजांच्या कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ हे त्यांचाच वारसा पुढे नेणारे म्हणजे जात पात धर्म न बघता अगदी तळागाळातील विध्यार्थ्यांना आपलेसे करून त्यांना यशाचा मार्ग दाखवणारे विद्यापीठ होय आणि आता तर ते सिद्ध झाले, हे तुझ्या लेखनातून सर्वाना ज्ञात होतेय . अभिनंदन विवेकानंद तुझे हि आणि तुला घडविणाऱ्या विद्यापीठ चे हि 💐💐💐💐💐💐💐💐💐

    संयोगीता सासने रत्नागिरी

    ReplyDelete
  56. Dr Ranakhambe Sir, very beautiful article written. I have experienced your writing and oratory since I was at Shivaji University, and I have seen the excellent narration of many of the programs you have done, liked the above article, congratulations, very nice

    Very nice ...!

    ReplyDelete
  57. Excellent and informative article. Nice presentation .I am very proud to be an ex student of Shivaji University. Hearty congratulations sir Mr Dorkar A .V.

    ReplyDelete
  58. I am very proud to be an ex student of Shivaji University kolhapur.And special Thanks to Dr.Vivek Rankhambe sir.About Excellent and informative article .
    Sanjay p kurkute
    Bharati vidyapeeth pune

    ReplyDelete
  59. खूप छान लेख .

    ReplyDelete