Friday 30 August 2019

शिवाजी विद्यापीठाकडून पंचगंगा घाट परिसराची स्वच्छता; वीस टन कचऱ्याचा उठाव


शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे कोल्हापूरच्या पंचगंगा घाट परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी सहभागी स्वयंसेवकांसमवेत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. डी.के. गायकवाड आदी.

पंचगंगा घाटाच्या स्वच्छता मोहिमेत सक्रिय योगदान देताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

पंचगंगा घाट स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.

शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे राबविण्यात आलेल्या पंचगंगा घाट परिसर स्वच्छता मोहिमेत सहभागी स्वयंसेवक.

शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे राबविण्यात आलेल्या पंचगंगा घाट परिसर स्वच्छता मोहिमेत सहभागी स्वयंसेवक.

शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे राबविण्यात आलेल्या पंचगंगा घाट परिसर स्वच्छता मोहिमेत सहभागी स्वयंसेवक.

शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे राबविण्यात आलेल्या पंचगंगा घाट परिसर स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झालेले स्वयंसेवक.

कोल्हापूर, दि. ३० ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ७५० स्वयंसेवकांनी आज येथील पंचगंगा घाट परिसरात स्वच्छता मोहीम राबविताना दिवसभरात सुमारे २० टन कचरा साफ केला. महापुराच्या पाण्याने काठावर आणून टाकलेल्या कचऱ्याचा उठाव झाल्याने काही तासांतच घाटाचा परिसर चकाचक झाला.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी नऊ वाजता पंचगंगा घाट परिसराच्या स्वच्छता मोहिमेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
कुलगुरू डॉ. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी स्वतः हातात खोरे घेऊन एनएसएस स्वयंसेवकांच्या साथीने स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. या मोहिमेमध्ये सातारा जिल्ह्यातून आलेल्या स्वयंसेवकांसह स्थानिक अशा सुमारे ७५० स्वयंसेवकांनी ४० कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेत सहभाग घेतला. प्लास्टीक साहित्य, झाडेझुडपे, काचेच्या बाटल्या, तसबिरी, तुटक्या-फुटक्या मूर्ती, नदीला अर्पण केलेले नारळ, गाळ-चिखल आदी प्रकारच्या मलब्याची स्वच्छता करण्यात आली. पंचगंगा घाट परिसराबरोबरच राजाराम बंधारा, पंचगंगा स्मशानभूमी या परिसरातही स्वच्छता करण्यात आली. त्या ठिकाणाहूनही अनुक्रमे पाच आणि दोन टन अशा एकूण सात टन कचऱ्याचा उठाव करण्यात आला. शहरातून घाटाकडे येणाऱ्या गंगावेश ते शिवाजी पूल रस्त्यासह पाणंद रस्ता, तोरस्कर चौक या ठिकाणीही स्वच्छता करण्यात आली. या परिसरातूनही सुमारे दोन टन प्लास्टीक कचऱ्याचा उठाव करण्यात आला.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांत रंकाळा तलाव परिसरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेअंतर्गतही सुमारे वीस टन कचरा उचलण्यात आला आहे. या सर्व मोहिमेदरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेसह जिल्हा प्रशासनाकडूनही मोठे सहकार्य लाभल्याचे डॉ. डी.के. गायकवाड यांनी सांगितले.

पाच दिवसांत शहर परिसरासह ११ गावांत मोहीम
शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत दि. २६ ऑगस्टपासून कोल्हापूर शहरासह शिरोळ तालुक्यातील पूरबाधित ११ गावांत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये नृसिंहवाडी, अर्जुनवाड, औरवाड, राजापूर, खिद्रापूर, आलास, कवठेगुलंद, कनवाड, घालवाड, गणेशवाडी, अब्दुललाट या गावांचा समावेश राहिला. या मोहिमेत कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील ८०० विद्यार्थी आणि ४०० विद्यार्थिनी अशा सुमारे १२०० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. त्याचप्रमाणे सांगली व सातारा जिल्ह्यांतील विविध पूरग्रस्त ठिकाणी सुद्धा नजीकच्या महाविद्यालयातील एनएसएसच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबविली. स्वच्छतेबरोबरच सर्वेक्षण आणि समुपदेशनाचे कार्यही या स्वयंसेवकांनी केले, अशी माहिती डॉ. डी.के. गायकवाड यांनी दिली.

Thursday 29 August 2019

प्रत्येक घटकाने ‘फिट इंडिया’ चळवळीत सहभागी व्हावे

- कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचे आवाहन

शिवाजी विद्यापीठात 'फिट इंडिया' चळवळीच्या प्रारंभानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. पी.टी. गायकवाड, डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. डी.के. गायकवाड, डॉ. प्रल्हाद माने आदी.



शिवाजी विद्यापीठात 'फिट इंडिया' चळवळीच्या प्रारंभानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी झालेले कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. पी.टी. गायकवाड, डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. डी.के. गायकवाड, डॉ. प्रल्हाद माने आदी. रॅलीत मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी, एनएसएस स्वयंसेवक सहभागी झाले.

शिवाजी विद्यापीठात 'फिट इंडिया' चळवळीच्या प्रारंभानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी झालेले कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. पी.टी. गायकवाड, डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. डी.के. गायकवाड, डॉ. प्रल्हाद माने आदी. रॅलीत मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी, एनएसएस स्वयंसेवक सहभागी झाले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे 'फिट इंडिया' मोहिमेचा प्रारंभ केला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण शिवाजी विद्यापीठात करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. पी.टी. गायकवाड, डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. डी.के. गायकवाड आदी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे 'फिट इंडिया' मोहिमेचा प्रारंभ केला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण शिवाजी विद्यापीठात करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. पी.टी. गायकवाड, डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. डी.के. गायकवाड आदींसह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हापूर, दि. २९ ऑगस्ट: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या आवाहनानुसार शिवाजी विद्यापीठाशी संबंधित प्रत्येक घटकाने फिट इंडिया चळवळीत सहभागी होऊन स्वतःच्या आरोग्य रक्षणाबरोबरच देशाच्या आरोग्याचेही संवर्धन करावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले.
राष्ट्रीय खेल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये फिट इंडिया मूव्हमेंट योजनेचा प्रारंभ केला. या कार्यक्रमाचे तसेच पंतप्रधान श्री. मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात आज सकाळी करण्यात आले. त्यानंतर विद्यापीठ कॅम्पसमध्ये काढण्यात आलेल्या रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. शिंदे बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान श्री. मोदी यांनी आज फिट इंडिया चळवळीचे जनआंदोलनात रुपांतर होण्याची गरज असल्याचे सांगितले. खेळामुळे शरीराची तंदुरुस्ती राहते, हे खरेच असले तरी, फिटनेसचा विस्तार आता खेळांच्याही पुढे जाऊन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. बॉडी फिट तो माईंड हिट’, मैं फिट तो इंडिया फिट किंवा देअर आर नो एलिव्हेटर्स टू सक्सेस, यू हॅव टू टेक स्टेअर्स अशा पंतप्रधानांच्या वनलायनर्सना विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा जोरदार प्रतिसाद लाभला. त्यांच्या भाषणापूर्वी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना सुद्धा विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. विशेषतः महाराष्ट्रातील लाठीकाठी, तलवार आणि दांडपट्टा फिरविण्याच्या प्रदर्शनाच्या वेळी तर विद्यार्थ्यांच्या उत्साहाला बहर आला.
त्यानंतर विद्यापीठ परिसरातून सुमारे पाच किलोमीटरची रॅली काढण्यात आली. यामध्ये कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यासह एक हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सहभागी झाले.

Tuesday 27 August 2019

‘एनएसएस’कडून पूरग्रस्त गावांत १ सप्टेंबरपर्यंत स्वच्छता मोहीम

शिवाजी विद्यापीठाच्या एनएसएसच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांत आजपासून स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरवात झाली. या मोहिमेसाठी सातारा जिल्ह्यातून दाखल झालेल्या स्वयंसेवकांसमवेत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शिवाजी विद्यापीठाच्या एनएसएसचे समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड आदी.


शिवाजी विद्यापीठाच्या एनएसएसच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांत आजपासून स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरवात झाली. या मोहिमेसाठी सातारा जिल्ह्यातून दाखल झालेल्या स्वयंसेवकांसमवेत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शिवाजी विद्यापीठाच्या एनएसएसचे समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड आदी.

सातारा जिल्ह्यातील १३ महाविद्यालयांचे ६५० स्वयंसेवक सहभागी

कोल्हापूर, दि. २७ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी कोल्हापूर शहरातील पूरस्थिती ओसरलेल्या क्षणापासून शहरात महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यानंतर आता परिसरातील पूरग्रस्त गावांमध्ये स्वच्छता मोहिमेसह समुपदेशन, सर्वेक्षण आदी कामांमध्ये सहभाग घेण्यात येणार आहे. १ सप्टेंबरपर्यंत ही मोहीम चालणार असून यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे सातारा जिल्ह्यातील एनएसएसचे सुमारे ६५० स्वयंसेवक आणि २५ कार्यक्रम अधिकारी सहभागी होत आहेत. त्या सर्वांनी पूरग्रस्त गावांमध्ये सेवाभावी पद्धतीने काम करावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.
आज सकाळी प्र-कुलगुरू डॉ. शिर्के आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या हस्ते पूरग्रस्त गावांकडे निघालेल्या एनएसएस स्वयंसेवकांना कीट वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
शिवाजी विद्यापीठाने कोल्हापूर जिल्ह्यातील औरवाड, अर्जुनवाड, कवठेगुलंद, गणेशवाडी, बुबनाळ, शेडबाळ, अब्दुललाट, टाकवडे, नृसिंहवाडी, खिद्रापूर आणि कुरुंदवाड ही पूरग्रस्त गावे स्वच्छता, सर्वेक्षण आणि समुपदेशनासाठी दत्तक घेतली आहेत. तेथे ग्रामस्वच्छता, शाळांसह शासकीय इमारतींची स्वच्छता, मदत वाटप आणि अन्य अनुषंगिक कामे करण्यात येणार आहेत. आजपासून १ सप्टेंबरपर्यंत ही कामे करण्यात येणार आहेत. सर्वेक्षणासह पूरबाधित ग्रामस्थांचे समुपदेशन करून आपत्तीच्या धक्क्यातून त्यांना सावरण्याचे कामही करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनासह रोटरी व इनरव्हील क्लब, कोल्हापूर यांनीही सहकार्याचा हात पुढे केला आहे. वुई-केअर या संस्थेने एनएसएस स्वयंसेवकांना गमबूट, मास्क, हातमोजे, औषधांचे कीट आदी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. जिल्हा प्रशासनाने स्वयंसेवकांची ने-आण करण्यासाठी सहा एसटी बसेसचीही सोय केली आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रभारी समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांनी यावेळी दिली.
या मोहिमेत सातारा जिल्ह्यातील १३ महाविद्यालयांतील प्रत्येकी ५० एनएसएस स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. ही महाविद्यालये अशी- एस.बी.एम. महाविद्यालय, रहिमतपूर, वाय.सी. महाविद्यालय, कराड, डी.जी. महाविद्यालय, सातारा, म.ह. शिंदे महाविद्यालय, मेढा, मुधोजी महाविद्यालय, फलटण, एन.एस.बी. महाविद्यालय, फलटण, एस.पी. महाविद्यालय, लोणंद, एस.आर.एम. महाविद्यालय, खटाव, कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय, पाचवड, कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय, सातारा, एस.जे. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, वाघोली, कला वाणिज्य महाविद्यालय, वाठार स्टेशन, पी.एस. कदम कला वाणिज्य महाविद्यालय, देऊर.

तीनही जिल्ह्यांत मोहिमा: कुलगुरू डॉ. शिंदे
शिवाजी विद्यापीठाने कोल्हापूर, सांगली व सातारा या तीनही जिल्ह्यांतील महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व समन्वयकांच्या बैठका घेऊन पूरग्रस्त भागांत स्वच्छता मोहिमा व शिबिरे घेण्याचे ठरविले. त्यानुसार कोल्हापूरसह सांगली व सातारा जिल्ह्यांतही विविध महाविद्यालयांचे चमू आपल्या शेजारच्या पूरग्रस्त विभागात, गावांत अशा प्रकारच्या मोहिमा राबवित आहेत. एनएसएसच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊन दिलासा देण्याचे काम विद्यापीठ प्रशासन करीत आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी या संदर्भात व्यक्त केली आहे.

Monday 19 August 2019

फॉर्चुनकोट, कझनकॅटसॉल कंपन्यांसमवेत

शिवाजी विद्यापीठाचा सामंजस्य करार

शिवाजी विद्यापीठाने आज कझनकॅटसॉल प्रा.लि. कंपनीसमवेत सामंजस्य करार केला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डॉ.टी. शिर्के यांच्यासमवेत कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि कंपनीचे पंकज देशपांडे व मकरंद पंडित. सोबत (डावीकडून) डॉ. के.एम. गरडकर, डॉ. एस.एस. कोळेकर, डॉ. एस.डी. डेळेकर, डॉ. आर.के. कामत, डॉ. पी.एस. पाटील, प्रभारी परीक्षा संचालक गजानन पळसे, डॉ. ए.एम. गुरव, डॉ. डी.एस. भांगे.


शिवाजी विद्यापीठात सोमवारी फॉर्चुनकोट कंपनीसमवेत सामंजस्य करार करण्यात आला. या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर व कंपनीचे डॉ. संदेश काणेकर. सोबत (डावीकडून) डॉ. के.एम. गरडकर, डॉ. एस.एस. कोळेकर, डॉ. एस.डी. डेळेकर, डॉ. आर.के. कामत, डॉ. पी.एस. पाटील, डॉ. डी.एस. भांगे, प्रभारी परीक्षा संचालक गजानन पळसे, डॉ. ए.एम. गुरव आदी.

कोल्हापूर, दि. १९ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागाने आज फॉर्चुनकोट आणि कझनकॅटसॉल या कंपन्यांसमवेत प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या उपस्थितीत दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले.
फॉर्चुनकोट ही कंपनी एन्टीमायक्रोबियल पेंट निर्मिती क्षेत्रात तर कझनकॅटसॉल ही साखर कारखान्यांतील बॉयलरमधील इंधनाची क्षमतावर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत असणारी कंपनी आहे.
फॉर्चुनकोट कंपनीसमवेत झालेल्या सामंजस्य कराराअन्वये शिवाजी विद्यापीठात नॅनोमूलद्रव्ये आधारित मायक्रोबियल पेंट्सची निर्मिती करण्यात येणार असून त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगामार्फत अर्थसाह्य प्राप्त झाले आहे. एन्टीमायक्रोबियल पेंट्स हे नवीन तं६ज्ञान असून त्यांचा मुख्य उद्देश पेंट्सच्या इतर गुणधर्मासोबत सूक्ष्म जीवजंतूंचा प्रसार रोखून त्यांना नष्ट करणे असतो. या नॅनो मूलद्रव्याधारित जंतूनाशकांची सूक्ष्मजीव प्रतिबंध किंवा नष्ट करण्याची प्रक्रिया ही सूक्ष्म जीवजंतू सदर मूलद्रव्याच्या संपर्कामुळे अगर अतिसूक्ष्म आकारामुळे सुलभरित्या सूक्ष्मजीवाच्या शरीरात घुसल्यामुळे होतो. त्यामुळे सदर जंतूनाशकास न जुमानणाऱ्या सुपरबग्जच्या निर्मितीसही अटकाव होतो. साहजिकच अनेक संसर्गजन्य किंवा साथीच्या आजारांना प्रतिबंध होतो. त्यासंदर्भातील संशोधन विद्यापीठात करण्यात येत आहे, अशी माहिती संशोधक डॉ. एस.डी. डेळेकर यांनी यावेळी दिली.
त्याचप्रमाणे संशोधक डॉ. डी.एस. भांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कझनकॅटसॉल कंपनीसमवेत झालेल्या सामंजस्य करारान्वये विद्यापीठात साखर कारखान्यांच्या बॉयलरच्या धुराड्यांमध्ये तयार होणाऱ्या काजळीचे प्रमाण कमी करण्याबरोबरच इंधनाची ज्वलनक्षमता वाढविण्यासाठी संशोधन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इंधनामध्ये मिसळण्यासाठी अशा प्रकारचे उत्प्रेरक तयार करण्यात येणार आहेत की जेणे करून बॉयलरमधील ज्वलनावेळी नायट्रोजन व सल्फरचे जे विविध प्रकारचे वायू प्रदूषक तयार होतात, त्यांचे प्रमाण कमी होईल. हे तंत्रज्ञान विकसित करून संबंधित कंपनीमार्फत कारखान्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल. यामुळे साखर कारखान्यांतून होणाऱ्या प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि इंधनाची ज्वलनक्षमताही वाढेल.
सदरचे दोन्ही संशोधन प्रकल्प आणि सामंजस्य करार हे अत्यंत समाजोपयोगी असल्याचे सांगून प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट इंटरॅक्शनचे हे दोन्ही सामंजस्य करार उत्तम उदाहरण असून विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या समाजोपयोगी संशोधनाचे प्रतीक आहेत. उद्योगांची गरज भागविण्याबरोबरच सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने दोन्ही करारांचे आदर्श करार म्हणून अभिनंदन करावेसे वाटते. या दोन्ही करारांमधून अगदी बौद्धिक संपदा हक्क (पेटंट) मिळविण्याइतक्या महत्त्वाच्या संशोधनाची निर्मिती होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनीही हे करार म्हणजे संशोधनाची उत्तम संधी असून समाजाच्या दृष्टीने विद्यापीठीय संशोधन किती महत्वाचे ठरू शकते, याचे उदाहरण असल्याचे सांगितले.
यावेळी अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील, डॉ. ए.एम. गुरव, इनोव्हेशन व इनक्युबेशन केंद्राचे संचालक डॉ. आर.के. कामत आदींनीही या सामंजस्य कराराचे स्वागत करणारी मनोगते व्यक्त केली.
सामंजस्य करारावर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आणि फॉर्चुनकोट कंपनीच्या वतीने डॉ. संदेश काणेकर यांनी तर कझनकॅटसॉल कंपनीच्या वतीने पंकज देशपांडे यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी या कंपनीचे मकरंद देशपांडेही उपस्थित होते.

Saturday 17 August 2019

पूरबाधित महाविद्यालयांचे नुकसान पाहून गहिवरले कुलगुरू!

सांगली सेथील श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाच्या संगणक प्रयोगशाळेमधील नुकसानीची पाहणी करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आदी


सांगलीच्या श्रीमती मथुबाई गरवारे महाविद्यालयातील फर्निचर साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

सांगलीच्या श्रीमती मथुबाई गरवारे महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या दालनाची झालेली दुरवस्था पाहताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.

कुरुंदवाड येथील एस.के. पाटील महाविद्यालयातील कार्यालयाची झालेली दुरवस्था.

कुरुंदवाड येथील एस.के. पाटील महाविद्यालयातील कार्यालयाची झालेली दुरवस्था पाहताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.


सांगली, कुरुंदवाडच्या चार महाविद्यालयांची केली पाहणी
कोल्हापूर, दि. १७ ऑगस्ट: महाविद्यालयांच्या भिंतींवर महापुराच्या दहा-बारा फुट उंचीच्या तांबड्या-करड्या ओलेत्या खुणा... फरशांवर जमिनीवर मातकट चिखलाचा थर... वर्गखोल्यांतील भिजून मोडलेले बेंच... कार्यालयीन साहित्याचे झालेले प्रचंड नुकसान... प्रयोगशाळांतील साहित्याची झालेली प्रचंड नासधूस... ग्रंथालयांतील कपाटांमध्ये अक्षरशः कुजलेली दुर्मिळ पुस्तकं... परिसरात सर्वत्र भरून राहिलेला कुजट, कुबट वास... अशी काळजाला पिळवटून टाकणारी दृश्यं पाहून काल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना गहिवरुन आले.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी काल महापुराने ग्रस्त झालेल्या सांगली आणि कुरुंदवाड येथील महाविद्यालयांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. काल दिवसभरात कुलगुरूंनी सांगली येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, मथुबाई गरवारे महाविद्यालय आणि कुरुंदवाड येथील स.का. पाटील महाविद्यालय या चार महाविद्यालयांना भेटी दिल्या.
सांगलीतील बसस्थानक परिसरातील मथुबाई गरवारे महाविद्यालयाचे पुराच्या पाण्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. तळमजल्यावरील प्राचार्यांच्या दालनासह कार्यालय, वर्गखोल्या, उपाहारागृह, प्रयोगशाळा, ग्रंथालय आदी ठिकाणी पूर्णतः पाणी भरले होते. त्यामुळे लाकडी टेबल-खुर्च्या आदी सामानासह काचसामान, संगणक आदी पायाभूत सुविधांची मोठी नासधूस झाली आहे. वर्गातले बेंच आणि लाकडी सामान तर पाण्याने कुजून खराब झाले आहे. गरवारे महाविद्यालयाचे मधले प्रांगण या खराब झालेल्या साहित्याने भरून गेले आहे आणि अद्यापही ते बाहेर काढण्याचे काम सुरूच आहे. इथल्या तळमजल्यावरील ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथसंपदेची झालेली दुरवस्था पाहून कुलगुरू डॉ. शिंदे यांना खूप गहिवरुन आले. प्राचार्य डॉ. आर.जी. कुलकर्णी यांचे सांत्वन करीत असताना ते अचानकपणे निःशब्द, स्तब्ध झाले. त्यानंतर केवळ त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना थोपटून दिलासा देत राहिले.
अशीच अवस्था कुरुंदवाडच्या एस.के. पाटील महाविद्यालयाच्या भेटी प्रसंगीही झाली. महाविद्यालयाचा संपूर्ण तळमजला आठवडाभर पाण्याखाली होता. इथेही कार्यालय, वर्गखोल्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाणी ओसरल्यानंतर कालच सकाळी महाविद्यालयाचा तळमजला उघडून कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम सुरू केली. तथापि, पाणी चढत असल्याचे लक्षात आल्यानंतर महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी शक्य तितके कार्यालयीन दप्तर, कागदपत्रे, ग्रंथ आदी साहित्य उंचावर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे भेटीप्रसंगी लक्षात येत होते. तरीही झालेले नुकसान दाखविताना कर्मचाऱ्यांना हुंदका आवरत नव्हता. विशेष म्हणजे तळमजला पाण्यात गेल्याचे दुःख असतानाही वरच्या दोन मजल्यांवर सुमारे हजारभर पूरग्रस्तांसाठी निवारा कॅम्प महाविद्यालयाने या काळात चालविला, याबद्दल कुलगुरू डॉ. शिंदे यांनी प्राचार्य डॉ. टी.के. जाधव यांचे विशेष अभिनंदन केले. अद्यापही अनेक बाधित नागरिक येथील कॅम्पमध्ये आहेत.
तत्पूर्वी, कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगलीवाडी येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाला भेट दिली. आयर्विन पुलापासून अगदी नजीक असलेल्या या महाविद्यालयाच्या तळमजल्यावर पुराचे पाणी घुसले होते. तरीही प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसरातल्या सुमारे तीन हजार पूरग्रस्तांची वरच्या मजल्यांवर सोय केली. पुराचे पाणी ओसरेपर्यंत परिसरातल्या नागरिकांसाठी एक महत्त्वाचे आश्रयस्थान म्हणून या महाविद्यालयाने केलेल्या कामगिरीचे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी कौतुक केले.
शहरातल्या कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाच्या तळमजल्यावरील संगणक कक्ष, रसायनशास्त्र प्रयोगशाळा आणि त्याशेजारच्या वर्गखोल्यांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले. प्राचार्य डॉ. व्ही.बी. कोडग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखून शक्य तितके संगणक वरच्या मजल्यांवर हलविल्याने नुकसानीची तीव्रता कमी झाली. मात्र, अद्यापही या साऱ्या खोल्यांमध्ये ओलसरपणा आणि कुबट वास भरून राहिला आहे. या महाविद्यालयाच्या वरच्या मजल्यांवरही हजारहून अधिक पूरग्रस्त नागरिकांसाठी निवारा कॅम्प चालविण्यात आला.

सांगलीच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात एनएसएस व एससीसी कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या बैठकीस संबोधित करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. व्यासपीठावर डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. डी.जी. कणसे, अॅड. धैर्यशील पाटील, डॉ. सी.टी. कारंडे, विशाल गायकवाड, संजय परमणे आदी.

विद्यापीठात कायमस्वरुपी आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारणार: कुलगुरू डॉ. शिंदे
शिवाजी विद्यापीठात कायमस्वरुपी आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्याचा आपला मनोदय असून साहित्य, सहाय्य आणि प्रशिक्षण अशा तिहेरी स्वरुपाची भूमिका या केंद्राच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ बजावेल, अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी यावेळी दिली.
कोल्हापूर, सांगली परिसरात आलेल्या अभूतपूर्व महापुरामुळे विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या सुमारे दहा महाविद्यालयांचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्या महाविद्यालयांना मी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करीत आहे. या महाविद्यालयांना विद्यापीठ स्तरावरुन नेमकी कशा स्वरुपाची मदत करता येईल, याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी या संदर्भातील विषय व्यवस्थापन परिषदेसमोर मांडण्यात येईल, असेही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले.

सांगली शहर-जिल्ह्यातही स्वच्छता मोहीम
महापुराने मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झालेल्या सांगली शहरासह जिल्ह्यातही राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) यांच्या माध्यमातून नियोजनबद्धरित्या स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगली जिल्ह्यातील समन्वयकांना केले. डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात कुलगुरूंच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एनएसएस, एनसीसी समन्वयकांची बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
स्वच्छता मोहीम राबविताना स्वयंसेवकांना मास्क, हातमोजे, गमबूट आदी आवश्यक साहित्य उपलब्ध करवून देण्यात यावे. तसेच, त्यांच्या आरोग्याची पूर्ण खबरदारी घेऊनच स्वच्छता मोहीम राबवावी, असे आवाहनही त्यांनी केले. ज्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका, डिग्री प्रमाणपत्रे आदींचे पुरामुळे नुकसान झाले असेल, त्यांनी योग्य पुरावे प्रदर्शित केल्यास त्यांना सदर कागदपत्रे विद्यापीठाकडून मोफत उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचेही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, व्यवस्थापन परिषद सदस्य अॅड. धैर्यशील पाटील, डॉ. डी.जी. कणसे, डॉ. सी.टी. कारंडे, अधिसभा सदस्य संजय परमणे, विशाल गायकवाड, विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, डॉ. संजय ठिगळे, प्राचार्य डॉ. आर.एस. पाटील, डॉ. बी.व्ही. ताम्हणकर यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, एनएसएस व एनसीसी समन्वयक उपस्थित होते.

Friday 16 August 2019

शिवाजी विद्यापीठाकडून शहरात स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

लक्ष्मीपुरी येथे स्वच्छता मोहिमेस प्रारंभ प्रसंगी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासमवेत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक.


लक्ष्मीपुरी येथील गल्ल्यांमध्ये स्वच्छता मोहिम राबविताना शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक

लक्ष्मीपुरी येथील गल्ल्यांमध्ये स्वच्छता मोहिम राबविताना शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक

लक्ष्मीपुरी येथील गल्ल्यांमध्ये स्वच्छता मोहिम राबविताना शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक

लक्ष्मीपुरी येथे स्वच्छता मोहिमेअंतर्गत सफाई करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील

लक्ष्मीपुरी येथील गल्ल्यांमध्ये स्वच्छता मोहिम राबविताना शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक

कुंभार गल्ली येथे स्वच्छा मोहिमेअंतर्गत सफाई करताना कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी आणि कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे

कुंभार गल्ली येथे स्वच्छता करताना शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक

कोल्हापूर, दि. १५ ऑगस्ट: शहर परिसरात महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आजपासून शहरात स्वच्छता अभियानास प्रारंभ करण्यात आला. आज दिवसभरात पुराचे पाणी घुसून नुकसान झालेल्या सुमारे तेरा महाविद्यालयांच्या चमूने ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली.
आज सकाळी स्वातंत्र्यदिनाचे ध्वजवंदन झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठासह शहरातील विविध महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या सुमारे एक हजार स्वयंसेवकांनी शहरात स्वच्छता मोहीम राबविली. लक्ष्मीपुरी येथे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील यांच्यासह अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. ए.एम. गुरव, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. अमोल मिणचेकर, एनएसएस शहर समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेस औपचारिक प्रारंभ करण्यात आला. सुरवातीला स्वयंसेवकांना हातमोजे, मास्क, गमबूट तसेच अन्य स्वच्छता साहित्याचे वाटप करण्यात आले. रोटरी क्लबच्या वतीनेही स्वयंसेवकांना टोप्या व स्वच्छता साहित्य देण्यात आले. त्यानंतर मोहिमेस सुरवात करण्यात आली.
लक्ष्मीपुरी येथे रिलायन्स मॉलच्या परिसरातील विविध गल्ल्यांमध्ये पुराच्या पाण्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. घरे, दुकानांसह रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखलाचे थर साचले आहेत. राष्ट्रीय सेवा योजना तसेच विद्यापीठाच्या एमएसडब्ल्यूच्या स्वयंसेवकांनी हा सारा मलबा घरांतून, गल्ल्यांतून बाहेर काढून मुख्य रस्त्यापर्यंत आणण्यात आला. तुंबलेली गटारे मोकळी करण्याबरोबरच अन्य स्वच्छतेची कामे करण्यात आली.
राजाराम कॉलेज, कमला कॉलेज व न्यू कॉलेजच्या एनएसएस स्वयंसेवकांच्या व छात्रसैनिकांच्या वतीने तसेच किर्लोस्कर ऑईल इंजिनच्या कर्मचाऱ्यांतर्फे कुंभार गल्ली (शाहूपुरी) परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या ठिकाणी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी, प्राचार्य डॉ. व्ही.एम. चव्हाण यांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. या वेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीही भेट देऊन सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेची पाहणी केली व मोहिमेत सहभागी स्वयंसेवकांचे अभिनंदन केले.
या स्वच्छता मोहिमेमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींसह सेवाभावी नागरिक, संस्था तसेच महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणाही पूर्ण तयारीनिशी उतरल्याचे दिसत आहे.
आज सकाळच्या सत्रात स्वच्छता मोहीम राबविण्यात आलेली ठिकाणे अशी: हुतात्मा बाग परिसर (गोपाळकृष्ण गोखले कॉलेज), दसरा चौक परिसर (श्री शहाजी छत्रपती कॉलेज), न्यू पॅलेस परिसर (महावीर कॉलेज), सिद्धार्थनगर परिसर (नाईट कॉलेज व डी.आर.के. वाणिज्य कॉलेज), दुधाळी व पंचगंगा घाट परिसर (यशवंतराव चव्हाण कॉलेज), शुक्रवार पेठ परिसर (डी.डी. शिंदे कॉलेज), रमणमळा परिसर (विवेकानंद कॉलेज), बावडा परिसर (डॉ. डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज), कदमवाडी परिसर (राजर्षी शाहू कॉलेज).
यापुढील काळातही सदर परिसरांत संबंधित महाविद्यालयांतर्फे स्वच्छता मोहिम सुरूच राहील. तसेच, त्यानंतर जिल्ह्यातील विविध पूरग्रस्त गावांमध्ये जाऊनही स्वच्छता मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले.

सिद्धार्थनगरातील काव्यांजलीला शैक्षणिक साहित्य
एका दूरचित्रवाणी वाहिनीशी बोलताना सिद्धार्थनगर येथील काव्यांजली संजय कांबळे या बालिकेला आपले दप्तर, पुस्तकं पुराच्या पाण्यानं भिजून खराब झाल्याचे सांगताना रडू कोसळले. खरे तर काव्यांजलीचे घरच या पुराने पडले आहे. पण, तिची तगमग मात्र पुस्तकांसाठी होती. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रवीण कोडोलीकर यांनी तिला शैक्षणिक साहित्य देण्याचा निश्चय केला. तिच्यासारख्या सिद्धार्थनगरातील अन्य बालकांनाही त्यांनी शैक्षणिक साहित्य देण्याचे ठरविले. आज शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्रभारी परीक्षा संचालक गजानन पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, एनएसएस समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रसूल कोरबू यांच्या उपस्थितीत सिद्धार्थनगरातील समाज मंदिरात हे साहित्य वाटप करण्यात आले. त्यानंतर कुलगुरुंसह विद्यापीठाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी सिद्धार्थनगर परिसरात फिरून पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली व आपत्तीग्रस्त नागरिकांचे सांत्वन केले.
सिद्धार्थनगर परिसराला आपत्तीच्या क्षणी विद्यापीठातील आपल्या सर्व वरिष्ठ सहकाऱ्यांसमवेत भेट देऊन नागरिकांना दिलासा देणारे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हे पहिलेच कुलगुरू आहेत, अशी भावना यावेळी सिद्धार्थनगरवासियांनी व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिन



कोल्हापूर, दि. १५ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठात आज स्वातंत्र्यदिनानिमित्त कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील यांच्यासह अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील, डॉ. पी.डी. राऊत, डॉ. ए.एम. गुरव, डॉ. भारती पाटील, इनोव्हेशन व इनक्युबेशन केंद्राचे संचालक डॉ. आर.के. कामत, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत तसेच विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday 14 August 2019

विद्यापीठाकडून शहरवासियांना दहा लाख लीटरहून अधिक पाणीपुरवठा - कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची माहिती



शिवाजी विद्यापीठाच्या जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणी भरून घेण्यासाठी महानगरपालिकेच्या टँकरसह अन्य वाहनांची रांग

शिवाजी विद्यापीठाच्या जलशुद्धीकरण केंद्रावर पिण्याचे पाणी घेऊन जाण्यासाठी जमलेले नागरिक.

शिवाजी विद्यापीठाच्या जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणी भरून घेणारे महानगरपालिकेचे टँकर


कोल्हापूर, दि. १४ ऑगस्ट: कोल्हापूर शहरातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे सावट ओळखून गेल्या चार दिवसांत शिवाजी विद्यापीठाच्या जलशुद्धीकरण केंद्रामधून सुमारे दहा लाख लीटरहून अधिक पाणी शहरवासीयांना उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे दिली.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि महापुरामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी महानगरपालिकेची जल शुद्धीकरण यंत्रणा पाण्याखाली जाऊन नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे सभोवती पुराचे पाणीच पाणी असूनही नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. शहरातील ही परिस्थिती लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाने गेल्या चार दिवसांपासून महानगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने आपल्या जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी पालिकेच्या टँकरसह त्यांनी भाड्याने घेतलेल्या टँकरमधून शहराला पाणीपुरवठा करण्यास सुरवात केली आहे. यामुळे शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या चार दिवसांत दिवसाला सरासरी दोन ते अडीच लाख लीटर या प्रमाणे आतापर्यंत सुमारे दहा लाख लीटरच्या घरात पाणीपुरवठा करण्यात विद्यापीठ व पालिका प्रशासनाला यश लाभले आहे.
या संदर्भात कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने गेल्या चार वर्षांत जलयुक्त विद्यापीठ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने सातत्याने प्रयत्न केले आहेत. तीन मोठे जलाशय, आठ विहीरी सहा शेततळी आदींच्या माध्यमातून सुमारे चाळीसा कोटी लीटरची साठवण क्षमता निर्माण करण्यात यशस्वी झालेले शिवाजी विद्यापीठ गेल्या दोन वर्षांत पाण्याच्या संदर्भात पूर्णतः स्वयंपूर्ण झाले आहे. पूर्वी पाण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेवर अवलंबून असणारे विद्यापीठ गेल्या दोन वर्षांपासून पालिकेकडून पाणी घेत नाही. यामुळे विद्यापीठाच्या खर्चातही मोठी बचत झाली आहे. त्यापुढे जाऊन विद्यापीठाने आपल्या कॅम्पसवर आर.ओ. जल शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित केला. यामुळे कॅम्पसवर कुलगुरूंपासून ते उपाहारगृहात आलेल्या अभ्यागतापर्यंत प्रत्येकाला समान दर्जाचे शुद्ध पाणी प्यावयास मिळते. या पार्श्वभूमीवर, यंदा विद्यापीठाने महापूर स्थितीत पाणीटंचाईग्रस्त असलेल्या कोल्हापूर शहराला आपल्या क्षमतेनुसार दिवसाला सरासरी दोन ते अडीच लाख लीटर इतके शुद्ध पाणी पुरविण्यात यश मिळविले आहे. महापालिकेच्या टँकरसह सर्वसामान्य नागरिकांची सुमारे चारशे ते पाचशे वाहने कॅम्पसवरुन दैनंदिन पिण्याचे पाणी घेऊन जात आहेत. या आपत्तीच्या परिस्थितीत शहरवासियांना पाणी पुरवून दिलासा देऊ शकलो, याचे मोठे समाधान आहे.
शिवाजी विद्यापीठाने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासही मोठा हातभार लावल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, जिल्ह्याच्या अनेक भागांत पूर आल्याने आणि तेथील पिकेच्या पिके पाण्याखाली गेल्याने मुक्या जनावरांचा चारा-वैरणीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन गेल्या चार दिवसांत सुमारे चाळीस ट्रॉली इतका चारा विद्यापीठाच्या कॅम्पसवरुन आपत्तीग्रस्त भागातील जनावरांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे आपत्तीग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय सुविधा पुरविण्याच्या दृष्टीनेही विद्यापीठ आपल्या शिव सहायता- आपत्ती निवारण कक्षाच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचेही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले.