Monday, 29 June 2026

मोत्यांच्या शेतीसाठीच्या अभिनव टाकीच्या डिझाईनला पेटंट

शिवाजी विद्यापीठाचे शेतकऱ्यांसाठी वरदायी संशोधन


शिवाजी विद्यापीठाचे पेटंटप्राप्त टाकीचे डिझाईन

डॉ. नितीन कांबळे


साक्षी ढेकणे

दिलीप कांबळे

विशाल सुतार


 

कोल्हापूर, दि. २९ जून: शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाने विकसित केलेल्या गोड्या पाण्यातील मोती शेतीसाठीच्या टाकीच्या डिझाईनला नुकतेच भारत सरकारचे पेटंट प्राप्त झाले आहे. प्रयोगशाळेपासून शेतीपर्यंत या प्रकारचे संशोधन करणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्रज्ञांना हे यश मिळाले आहे.

विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागातील डॉ. नितीन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणाऱ्या साक्षी श्रीकांत ढेकणे, विशाल संभाजी सुतार आणि दिलीप आनंदराव कांबळे यांच्या संशोधनकार्याचे हे फलित आहे.

भारतामध्ये गोड्या पाण्यातील मोती शेतीला मोठी संधी उपलब्ध असून, त्यासाठी आवश्यक असलेले नियंत्रित आणि नैसर्गिक वातावरण निर्माण करणे हे मोठे आव्हान मानले जाते. शिवाजी विद्यापीठाने दोन वर्षांपूर्वी प्राणीशास्त्र अधिविभागात गोड्या पाण्यातील मोत्यांच्या शेतीचा प्रकल्प हाती घेऊन तो प्रमाणाबाहेर यशस्वी करून दाखविला आहे. आता या प्रकल्पाअंतर्गत विविध बाबींचा सूक्ष्म अभ्यास करून हा प्रयोग अधिकाधिक यशस्वी करण्याच्या दृष्टीने संशोधनाची दिशा केंद्रित केली आहे. याचाच भाग म्हणून या संशोधकांनी मोत्यांच्या शेतीसाठी आवश्यक अशा वैज्ञानिक निकषांनुसार दोन परस्पर जोडलेल्या टाक्यांची अभिनव रचना विकसित केली आहे.

टाकीची रचना व महत्त्व

या टाकीच्या डिझाईनमध्ये दोन वेगवेगळ्या आकारांच्या परस्पर जोडलेल्या टाक्यांचा समावेश आहे. पहिल्या टाकीतील सबमर्सिबल पंपाद्वारे पाणी दुसऱ्या टाकीत सतत प्रवाहित केले जाते. दुसऱ्या टाकीत विशेष पाईपलाइन आणि स्प्रिंकलर प्रणाली बसविण्यात आली असून त्यामुळे पाण्यात नैसर्गिक नदीप्रवाहासारख्या लहरी निर्माण होतात. छतावरील स्प्रिंकलर्समधून नियंत्रित वेगाने होणारा पाण्याचा शिडकावा कृत्रिम पावसासारखे वातावरण तयार करतो. या अखंड जलपरिभ्रमणामुळे पाण्यातील विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण, तापमान, पीएच आणि एकूण पाण्याची गुणवत्ता दीर्घकाळ संतुलित राहते. परिणामी मोती उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या शिंपल्यांना नैसर्गिक अधिवासासारखे पोषक वातावरण उपलब्ध होते. या अभिनव टाकीच्या माध्यमातून एकदाच भरलेले पाणी १५ ते १८ महिन्यांपर्यंत गुणवत्तेत कोणताही लक्षणीय बदल न होता वापरणे शक्य झाल्याचे या संशोधनातून सिद्ध झाले आहे. ही रचना केवळ मोती शेतीसाठीच नव्हे, तर संशोधन, शिक्षण, जैवविविधता संवर्धन आणि कृषीपूरक उद्योगांसाठीही उपयुक्त ठरणार आहे.

प्राणीशास्त्र अधिविभागात विकसित झालेल्या या तंत्रज्ञानामुळे भविष्यात शेतकरी, संशोधक तसेच लघु व मोठ्या उद्योजकांना मोती उत्पादनाचा पर्यायी व्यवसाय विकसित करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. यासाठी अधिविभागाची संशोधक विद्यार्थिनी साक्षी ढेकणे हिने भुवनेश्वर (ओडिशा) येथील आयसीएआर-सीआयएफए (सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर फ्रेशवॉटर एक्वाकल्चर) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षणही घेतले आहे.

कृषीपूरक उद्योग म्हणून विकासाची क्षमता

या संदर्भात डॉ. नितीन कांबळे यांनी सांगितले की, या पेटंटमुळे शिवाजी विद्यापीठाच्या संशोधनाधारित तंत्रज्ञान विकसित करण्याच्या क्षमतेची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. हे संशोधन भविष्यात तंत्रज्ञान हस्तांतरण (Technology Transfer) आणि व्यावसायिकीकरणासाठीही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पारंपरिक शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गोड्या पाण्यातील मोती शेतीकडे शेतकरी वळू शकतात. कमी देखभाल खर्च, कमी वीज वापर आणि नियंत्रित जलव्यवस्थापनामुळे हे तंत्रज्ञान ग्रामीण भागात रोजगार व उत्पन्नवाढीसाठी उपयुक्त ठरण्याची क्षमता आहे.

लॅब टू लँड संकल्पनेला मूर्त रुप देणारे संशोधन: कुलगुरू डॉ. कामत

या संदर्भात संशोधकांचे अभिनंदन करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत म्हणाले की, शिवाजी विद्यापीठात समाजोपयोगी आणि उद्योगाभिमुख संशोधनाला सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. या पेटंटमुळे संशोधनाचे रूपांतर प्रत्यक्ष तंत्रज्ञानात करण्याच्या आमच्या प्रयत्नांना बळ मिळाले असून, शेतकरी व उद्योजकांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. संशोधन, नवोपक्रम आणि समाजोपयोगी तंत्रज्ञान विकासाच्या दिशेने शिवाजी विद्यापीठाने टाकलेले हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल असून, 'प्रयोगशाळेतील संशोधन ते शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत' या संकल्पनेला मूर्त रूप देणारे हे पेटंट आहे.

 

गोड्या पाण्यातील मोती शेतीसाठीच्या टाकीची वैशिष्ट्ये-

* दोन परस्पर जोडलेल्या वैज्ञानिक पद्धतीने डिझाइन केलेल्या टाक्या

* सतत पाणी परिभ्रमण, कृत्रिम लहरी आणि पावसासारखा शिडकावा

* पाण्यातील विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण वाढविणारी रचना

* तापमान, पीएच व पाण्याची गुणवत्ता दीर्घकाळ स्थिर ठेवण्याची क्षमता

* नैसर्गिक नदीसदृश परिसंस्था निर्माण करणारे डिझाईन

* कमी वीज वापर आणि कमी देखभाल खर्च

* सर्व ऋतूंमध्ये वापरण्यास सुलभ रचना

* संशोधन, शिक्षण व व्यावसायिक मोती शेतीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान.

 

या संशोधनाचे फायदे-

* मोती उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या शिंपल्यांचे आरोग्य सुधारते.

* मृत्यूदरात लक्षणीय घट होते.

* उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होते.

* पाण्याची गुणवत्ता दीर्घकाळ टिकून राहते.

* अमोनियाचे प्रमाण नियंत्रित राहते.

* नैसर्गिक परिसंस्थेचे संवर्धन होते.

* रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.

* शेतकरी, संशोधक आणि उद्योजकांसाठी किफायतशीर तंत्रज्ञान.

* कृषीपूरक व्यवसाय म्हणून मोती शेतीला चालना मिळणार.

 

स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये अभियांत्रिकी प्रवेश मार्गदर्शन सत्राला उदंड प्रतिसाद


कोल्हापूर, दि. २९ जून: शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व चर्चासत्राला विद्यार्थी आणि पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

एमएच-सीईटी २०२६ मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियसंदर्भातील अचूक, अद्ययावत व सविस्तर माहिती मिळावी, या उद्देशाने २७ जून रोजी या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.

यावेळी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्रभारी संचालक डॉ. अजित कोळेकर यांनी सांगितले की, योग्य माहिती आणि योग्य निर्णय यांच्या आधारे विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार, गुणवत्तेनुसार आणि करिअरच्या उद्दिष्टांनुसार महाविद्यालय व शाखेची निवड करावी. अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये देश-विदेशात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे जाणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये पदवी स्तरावर कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, फूड टेक्नॉलॉजी, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखांमध्ये शिक्षण दिले जाते. तसेच पदव्युत्तर स्तरावर कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, फूड टेक्नॉलॉजी, एनर्जी टेक्नॉलॉजी आणि एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी या शाखांमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध असून अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये पीएच.डी. अभ्यासक्रमाची सुविधाही उपलब्ध आहे.

प्रशिक्षण व प्लेसमेंट सेल अधिकारी तथा केंद्रीय प्रवेश प्रक्रिया तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. गणेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना सुमारे दीड तास सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी केंद्रीय नोंदणी प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, गुणवत्ता यादी (Merit List), पर्याय फॉर्म (Option Form) भरण्याची योग्य पद्धत, CAP च्या विविध फेऱ्या, महाविद्यालय व शाखा निवडीचे निकष, प्रवेश निश्चिती प्रक्रिया, शुल्क, शिष्यवृत्ती योजना तसेच विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेदरम्यान घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर माहिती दिली.

यासोबतच भविष्यातील रोजगाराच्या संधी, उच्च शिक्षणाच्या संधी, विविध शिष्यवृत्ती योजना, विद्यापीठाच्या विविध विद्यार्थी कल्याणकारी योजना, सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेली फी सवलत व मोफत वसतिगृह योजना, तसेच प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण स्वरूप याविषयीही विद्यार्थी व पालकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

मार्गदर्शन सत्रानंतर प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थी व पालकांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील विविध शंकांचे निरसन करण्यात आले. अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत सखोल मार्गदर्शन मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन प्रथम वर्ष प्रवेश समन्वयक डॉ. महेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणीमध्ये डॉ. विश्वास पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला. डॉ. वैशाली सावंत, डॉ. अमर डूम, डॉ. चेतन आवटी आणि डॉ. श्रीपाल गायकवाड यांनी परिश्रम घेतले. डॉ. हर्षवर्धन पंडित यांनी आभार मानले.

Friday, 26 June 2026

शिवाजी विद्यापीठात राजर्षी शाहू जयंती उत्साहात

 

शिवाजी विद्यापीठात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, शाहू संशोधन केंद्राच्या प्रभारी संचालक डॉ. मंजुश्री पवार यांच्यासह उपस्थित अधिकारी, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी.

शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्रात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, केंद्राच्या प्रभारी संचालक डॉ. मंजुश्री पवार यांच्यासह उपस्थित अधिकारी, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी.


(शिवाजी विद्यापीठात शाहू जयंती कार्यक्रमाची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. २६ जून: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.

शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्र येथेही शाहू महाराजांच्या भव्य तैलचित्रास कुलगुरू डॉ. कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांच्या हस्ते पुष्पहार वाहून अभिवादन करण्यात आले.

तत्पूर्वी, कुलगुरू डॉ. कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी कसबा बावडा येथील लक्ष्मीविलास पॅलेस या शाहू जन्मस्थळी भेट देऊन शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले. त्यानंतर दसरा चौक येथील शाहू महाराजांच्या पुतळ्यासही अभिवादन केले.

विद्यापीठातील अभिवादन कार्यक्रमास शाहू संशोधन केंद्राच्या प्रभारी संचालक डॉ. मंजुश्री पवार यांच्यासह इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. कबीर खराडे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. सागर डेळेकर, दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. कृष्णा पाटील, अधिसभा सदस्य अॅड. अभिषेक मिठारी, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. कैलास सोनवणे, डॉ. निखिल गायकवाड, डॉ. मुरलीधर भानारकर, डॉ. नीलांबरी जगताप, डॉ. देविकाराणी पाटील, डॉ. नीलेश बनसोडे, कास्ट्राईबचे आनंद खामकर, डॉ. उत्तम सकट, डॉ. अविनाश भाले, डॉ. दत्तात्रय मचाले, यश आंबोळे यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.