Thursday 31 December 2020

विद्यापीठाच्या उद्यानांना पुरस्कार हा कोल्हापूरच्या फुप्फुसांची देखभाल करणाऱ्या श्रमिकांचा सन्मान: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांची भावना

 


कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत उद्यान विभागाचे अधिकारी, कर्मचारी गार्डन क्लब स्पर्धेत प्राप्त केलेल्या प्रमाणपत्रे व ट्रॉफीसह. (डावीकडून) अभिजीत जाधव, गणपती मस्ती, डॉ. व्ही.एन. शिंदे, संभाजी कांबळे, संजय सोनुले, सुरेश वागवेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, डॉ. जी.एस. कुलकर्णी.

गार्डन क्लबच्या पुरस्कार वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. एस. आर. यादव यांच्या हस्ते आणि अध्यक्षा कल्पना सावंत, शशिकांत कदम, पल्लवी कुलकर्णी, राज अथणे आदींच्या उपस्थितीत सर्वसाधारण विजेतेपदाचे पारितोषिक स्वीकारताना शिवाजी विद्यापीठाच्या उद्यान विभागाचे उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, उद्यान अधीक्षक अभिजीत जाधव व अन्य सहकारी.

कोल्हापूर, दि. ३१ डिसेंबर: कोल्हापूरचा गार्डन क्लब व राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ५०व्या पुष्प प्रदर्शन व स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या फुलांना व उद्यानांना सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त होणे म्हणजे कोल्हापूर शहराच्या फुप्फुसाची देखभाल करणाऱ्या श्रमिकांचाच सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे व्यक्त केली.

येथील गार्डन क्लब आणि राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सुवर्णमहोत्सवी पुष्प प्रदर्शन व स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचा उद्यान विभाग ४० गटांत सहभागी झाला. त्यापैकी ३० गटांत यश मिळविले. १२ गटांत प्रथम क्रमांक, १२ गटांत द्वितिय क्रमांक आणि ६ गटांत तृतीय क्रमांक पटकावून स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. या निमित्त उद्यान विभागाच्या सहकाऱ्यांसाठी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत चहापानाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी कुलगुरू बोलत होते.    

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचा परिसर आणि येथील उद्याने नेत्रसुखद तर आहेतच, पण कोल्हापूर शहराचे फुप्फुस म्हणून या परिसराकडे पाहिले जाते. या परिसराची देखभाल करणारे उद्यान विभागातील सहकारी हे पुरस्कारापलिकडे अभिनंदनास आणि कौतुकास पात्र आहेत. वर्षभर सर्व परिस्थितीत उद्यानांची देखभाल ते अत्यंत आत्मियतेने करतात. विद्यापीठाच्या विविध कार्यक्रमांची शोभा या विभागाने सदैव तयार ठेवलेल्या कुंड्यांतील रोपेच वाढवितात. आता विभागाने पुढच्या पाच वर्षांसाठीचा आराखडा तयार करावा आणि विद्यापीठाचे उद्यान राज्यात सर्वोत्कृष्ट बनविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, पूर्वी पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे इच्छा असूनही उद्यानाच्या देखभालीमध्ये अडचणी येत असत. मात्र, आता पाण्याच्या अनुषंगाने विद्यापीठ परिसर स्वयंपूर्ण झाल्यामुळे उद्यान विभागाला पाण्याची योग्य तऱ्हेने उपलब्धता होत आहे. ही महत्त्वाची बाब आहे. उद्यान विभागाने असेच कार्य करीत राहावे.

यावेळी उपकुलसचिव डॉ. जी.एस. कुलकर्णी, डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील यांच्यासह अभियांत्रिकी विभागाचे मेस्त्री गणपती मस्ती, उद्यान विभागाचे अधीक्षक अभिजीत जाधव, हेडमाळी संभाजी कांबळे, हेडमाळी संजय सोनुले, माळी सुरेश वागवेकर उपस्थित होते.

गार्डन क्लब स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाने प्राप्त केलेली पारितोषिके पुढीलप्रमाणे-

क्लास-१: गुलाब (एकच फूल)

पांढरा- प्रथम क्रमांक

फिका गुलाब- प्रथम व तृतीय

नारिंगी- द्वितिय व तृतीय

गडद पिवळा- प्रथम व द्वितिय

मिश्र रंग व इतर- प्रथम

क्लास-७ (फुले)

डेलिया- प्रथम

मिनी डेलिया- प्रथम

झिनिया- द्वितिय

अॅस्टर- तृतीय

कर्दळ- तृतीय

शेवंती- द्वितिय व तृतीय

झेंडू- प्रथम व द्वितिय

सालव्हिया- प्रथम व द्वितिय

निशीगंध- प्रथम व द्वितिय

जास्वंद- द्वितिय

इतर फुले- द्वितिय

दुरंगी- द्वितिय

क्लास-९ (कुंड्यांतील रोपे)

कोलीयस- प्रथम

बेगोनिया- तृतीय

इतर झाडे (फुलांशिवाय)- द्वितिय

इतर झाडे (फुलांसह)- द्वितिय

औषधी व सुगंधी वनस्पती- द्वितिय व तृतीय

Saturday 19 December 2020

केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभागाच्या ‘बिल्डर’ योजनेअंतर्गत

शिवाजी विद्यापीठास पाच कोटींचा संशोधन प्रकल्प मंजूर

राज्यातील एकमेव विद्यापीठ; जैविक नॅनोकणांबाबत होणार संशोधन

 

डीबीटी-बिल्डर प्रकल्पाविषयी माहिती देताना प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील (व्हिडिओ)



Dr. P.S. Patil


Dr. K. D. Sonawane



Dr. M.S. Nimbalkar

Dr. Kiran Pawar


कोल्हापूर, दि. १९ डिसेंबर: केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या बिल्डर (बूस्ट टू युनिव्हर्सिटी इंटरडिसिप्लिनरी लाइफ सायन्स डिपार्टमेंट्स फॉर एज्युकेशन अँड रिसर्च प्रोग्राम) या योजनेअंतर्गत येथील शिवाजी विद्यापीठाला संशोधनासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या योजनेअंतर्गत निधी प्राप्त करणारे शिवाजी विद्यापीठ हे राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे.

विद्यापीठाचे प्र-कुलगुरू व या प्रकल्पाचे समन्वयक डॉ. पी.एस. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभागाने आंतरविद्याशाखीय संयुक्त संशोधन प्रकल्पांना चालना देण्याच्या हेतूने डीबीटी-बिल्डर (BUILDER- बूस्ट टू युनिव्हर्सिटी इंटरडिसिप्लिनरी लाइफ सायन्स डिपार्टमेंट्स फॉर एज्युकेशन अँड रिसर्च प्रोग्राम)  ही योजना जाहीर केली. यामागे जैवविज्ञानातील विविध शाखांनी एकत्रित येऊन संयुक्त प्रकल्प करावेत आणि त्यातून भरीव संशोधन आकाराला यावे, असा हेतू आहे.

शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र, नॅनोसायन्स व तंत्रज्ञान आणि बायोइन्फॉर्मेटिक्स या तीन विद्याशाखांनी सूक्ष्म सजीवांपासून उपयुक्त नॅनो कणांच्या निर्मितीचा प्रकल्प सादर केला. हा पंचवार्षिक प्रकल्प मंजूर होऊन त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधीही प्राप्त होणार आहे. यातील भरीव निधी हा उपयुक्त, आधुनिक सामग्री व उपकरणे घेण्यासाठी वापरता येणार आहे.

कसा असेल प्रकल्प?

या प्रकल्पांतर्गत नॅनोसायन्स व तंत्रज्ञान विभागाचे डॉ. किरण पवार, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे डॉ. के.डी. सोनवणे आणि वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ. एम.एस. निंबाळकर हे तीन संशोधक काम करणार आहेत. डॉ. पवार हे विविध धातूंचे विविध आकाराचे नॅनोपार्टीकल्स तयार करणे व त्यांचे भौतिक गुणधर्म तपासणे याविषयी संशोधन करतील. डॉ. निंबाळकर हे संशोधन व विकासाच्या जबाबदारीबरोबरच विविध जीवाणू, विषाणू, वनस्पती आणि कवक यांच्यामधील नॅनोतंत्रज्ञानाला उपयुक्ततेबाबत संशोधन करतील. तसेच पश्चिम घाटातील विविध वनस्पतींचा नॅनोपार्टीकल तयार करणेसाठी आणि त्यांच्या औषधी व शेतीपूरक वापराबाबतही संशोधन करतील. डॉ. सोनवणे हे बायोइन्फॉर्मेटिक्स तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नॅनोकण व नॅनो मटेरिअल यांचे सिंथेसिस करतील आणि नॅनोपार्टीकल्सचा सजीव पेशींमध्ये होणाऱ्या परिणामांविषयी चाचण्या करतील.

संशोधनाचे महत्त्व व उपयोजन

या संशोधनामुळे विविध सजीवांचा उपयुक्त नॅनोकण निर्मिती करण्यासाठीच्या उपयोजनाबाबत भरीव माहिती मिळेल. नॅनोकण बनविणाऱ्या जीवाणूंचा शोध, नॅनोकण व नॅनो-मटेरिअलचा कर्करोग, न्यूरोसायन्स, अल्झायमर (स्मृतीभ्रंश), टारगेटेड ड्रग डिलीव्हरी व रिलीज, कृषी क्षेत्रासाठी उपयुक्त नॅनोमटेरिअल, नॅनो पेस्टीसाईड आदी अनुषंगानेही संशोधन केंद्रित असेल. याबरोबरच नॅनो तंत्रज्ञानाला पूरक स्वरुपाचे अध्ययन, अध्यापन आणि त्यासंदर्भातील संशोधनासाठी लागणारे प्रशिक्षण, कार्यशाळा, वेबिनार, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन यांचाही या प्रकल्पात अंतर्भाव आहे.

आंतरविद्याशाखीय संशोधनाला बळ: कुलगुरू डॉ. शिर्के

डीबीटी-बिल्डर हा प्रकल्प शिवाजी विद्यापीठाला मंजूर झाल्याने येथील जैवविज्ञानातील आंतरविद्याशाखीय संशोधनाला मोठे बळ लाभले आहे. त्याचप्रमाणे या अंतर्गत मंजूर झालेला संशोधन प्रकल्पही अत्यंत अभिनव स्वरुपाचा आहे. त्यातून अनेकविध प्रकारचे जैविक नॅनोकण व नॅनो मटेरिअल सामोरे येतील, ज्यांचा भविष्यातील संशोधन, विकास व उपयोजन यांवर मोठा दूरगामी स्वरुपाचा प्रभाव असेल, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी या संदर्भात बोलताना व्यक्त केली.

Friday 18 December 2020

शिवाजी विद्यापीठाचा ‘वाम्निकॉम’समवेत

सहकारविषयक संशोधनाबाबत सामंजस्य करार

 

शिवाजी विद्यापीठ आणि 'वाम्निकॉम' यांच्या दरम्यान झालेल्या सामंजस्य कराराच्या प्रतींचे हस्तांतरण करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि डॉ. के.के. त्रिपाठी. सोबत (डावीकडून) डॉ. एम.एस. देशमुख, डॉ. प्रकाश पवार, डॉ. संतोष सुतार, डॉ. वैशाली भोसले, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवेडकर, डॉ. यशवंत पाटील, डॉ. नामदेव पाटील.

शिवाजी विद्यापीठात झालेल्या सामंजस्य करार कार्यक्रमाचा शॉर्ट व्हिडिओ 


कोल्हापूर, दि. १८ डिसेंबर: सहकारविषयक संशोधनात राष्ट्रीय स्तरावर अग्रगण्य असलेल्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेसमवेत (VAMNICOM) सामंजस्य करारामुळे शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील सहकारी चळवळीच्या अनुषंगाने संशोधन कार्याला मोठे पाठबळ लाभणार आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठात आज सायंकाळी वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेसमवेत विद्यापीठाचा सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वाम्निकॉमचे संचालक डॉ. के.के. त्रिपाठी, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, आयक्यूएसी समन्वयक डॉ.एम. एस. देशमुख, वाम्निकॉमच्या सेंटर ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे डॉ. यशवंत पाटील उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, वाम्निकॉमसमवेत झालेल्या या सामंजस्य कराराचा विद्यापीठ परिक्षेत्रातील सहकारी चळवळीचा विविधांगी संशोधनात्मक वेध घेणे शक्य होणार आहे. शिक्षक-विद्यार्थी एक्स्चेंजसारख्या बाबी या करारात समाविष्ट आहेतच, पण त्यापुढे जाऊन प्रशिक्षण कार्यक्रम, संयुक्त संशोधन प्रकल्पांची निर्मिती, समाजकेंद्री संशोधन प्रकल्प तसेच सहकारविषयक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम हाती घेणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे या दोन्ही संस्थांच्या सहकार्यातून सहकारविषयक एखादे संयुक्त अध्यासन स्थापित करता आले, तर त्याचे दूरगामी लाभ या विभागाला होत राहतील.

यावेळी डॉ. त्रिपाठी म्हणाले, वाम्निकॉमचे संशोधन कार्यक्षेत्र हे सहकार, ग्रामीण विकास आणि कृषी असे मर्यादित आहे. मात्र, शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रात नेमक्या या बाबींची समृद्धी उत्तम आहे. या विभागातील सहकार तर केवळ भारतातच नव्हे, तर आशियातील सर्वाधिक यशस्वी मॉडेल आहे. सध्या बरेच ठिकाणी सहकार आणि कॉर्पोरेट या दोन क्षेत्रांमध्ये संघर्षाचे वातावरण आहे. या परिस्थितीत आता आपण या संदर्भातील संशोधनाच्या क्षेत्रांची नव्याने निश्चिती करणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय कार्यक्रम निर्धारित करायला हवेत. प्रायोजित संयुक्त प्रकल्पही हाती घ्यायला हवेत. त्या दृष्टीने हा सामंजस्य करार दोन्ही संस्थांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

यावेळी सामंजस्य करारावर शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी, तर वाम्निकॉमच्या वतीने डॉ. त्रिपाठी यांनी स्वाक्षरी केल्या. यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. प्रकाश पवार यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. वैशाली भोसले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. कविता वड्राळे, डॉ. संतोष सुतार, गजानन साळुंखे, चेतन गळगे, सुधीर देसाई, उमेश गडेकर, डॉ. विशाल ओव्हाळ, डॉ. नीलम जाधव, परशुराम वडार, डॉ. सागर वाळवेकर, मृणालिनी जगताप, गणेश भड, ऊर्मिला दशवंत आदी उपस्थित होते.

Thursday 17 December 2020

क्यूएस ब्रिक्स युनिव्हर्सिटी रँकिंग

शिवाजी विद्यापीठ संशोधनात देशात दुसरे; ‘ब्रिक्स’ राष्ट्रांत एकविसावे

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत संवाद साधताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. शेजारी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.

पत्रकार परिषदेत बोलताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

पत्रकार परिषदेत बोलताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के (व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. १७ डिसेंबर: क्वाक्वेरेली सायमंड्स (क्यूएस) द्वारा नुकत्याच क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज जाहीर करण्यात आल्या. त्यात क्यूएस ब्रिक्स युनिव्हर्सिटी रॅंकिं-२०२०मध्ये येथील शिवाजी विद्यापीठाने भारतातील संस्थांच्या क्रमवारीत 'प्रति पेपर सायटेशन' निकषामध्ये द्वितिय स्थान पटकावले आहे. 'प्रति संशोधक पेपर' या निकषातही विद्यापीठ देशात सतरावे आले आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, पदार्थविज्ञान अधिविभाग प्रमुख डॉ. के.वाय. राजपुरे, सूक्ष्मजीवशास्त्राचे प्रा. डॉ. के.डी. सोनवणे उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रति पेपर सायटेशन निकषात आयसीटी, मुंबई प्रथम स्थानी आहे. त्या खालोखाल शिवाजी विद्यापीठाचा क्रमांक लागतो. क्यूएस ब्रिक्स रँकिंगमध्ये 'प्रती पेपर सायटेशन' या निकषानुसार ब्रिक्स देशांतील शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत शिवाजी विद्यापीठ २१ व्या क्रमांकावर आहे; तर 'प्रति संशोधक पेपर'च्या निकषानुसार हा क्रमांक ४३ वा आहे.

ब्रिक्स राष्ट्रांमध्ये ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच उदयोन्मुख राष्ट्रांचा समावेश आहे. क्वाक्वेरेली सायमंड्स (क्यूएस) द्वारा सन २००४पासून क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज जाहीर केली जातात. गतवर्षीपासून क्यूएसने ब्रिक्स देशांसाठी मानांकने जाहीर करण्यास सुरवात केली आहे. त्यामध्येही शिवाजी विद्यापीठाला स्थान लाभले होते. यंदाही शिवाजी विद्यापीठाचा संशोधनविषयक निर्देशांक उत्कृष्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयआयटीसारख्या संशोधनाला समर्पित संस्थांच्या मांदियाळीत शिवाजी विद्यापीठाने प्राप्त केलेले स्थान गौरवास्पद आहे.

क्यूएस यांचेकडून विविध ५१ निकषनिहाय क्रमवारी जाहीर केली जाते. जगभरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षणासाठी जगातील अग्रगण्य संस्था निवडण्यासाठी ही क्रमवारी उपयुक्त ठरते. ही क्रमवारी जाहीर करताना शैक्षणिक प्रतिष्ठा, नियोक्त्याची प्रतिष्ठा, प्रतिपेपर संशोधन उद्धरण (सायटेशन), एच-इंडेक्स या चार स्रोतांचा विचार केला जातो. यापैकी पहिले दोन प्रत्येक विषयातील संस्थांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचे मूल्यांकन करण्यासाठी वापरले जातात. उर्वरित दोन निर्देशक संबंधित विषयातील प्रतिपेपर आणि एच-इंडेक्सच्या संशोधन उद्धरणांच्या आधारे संशोधन प्रभावाचे मूल्यांकन करतात. हे जगातील सर्वात व्यापक संशोधन उद्धरण डेटाबेस, एल्सव्हयरच्या स्कोपस डेटाबेसमधून प्राप्त केले जाते.

क्यूएस युनिव्हर्सिटी रँकिंग प्रत्येक देश व देशांच्या गटासाठी देखील प्रकाशित केले जाते. या देशांच्या गटामध्ये आशिया, लॅटिन अमेरिका, अरब देश, युरोप आणि मध्य आशिया आणि ब्रिक्स राष्ट्रे यांचा समावेश आहे.


नाविन्यपूर्ण सेंद्रिय खताच्या संशोधनास

राष्ट्रीय ‘अन्वेषण’ संशोधन स्पर्धेत पारितोषिक

 

राष्ट्रीय 'अन्वेषण' संशोधन स्पर्धेत पारितोषिक प्राप्त करणाऱ्या संशोधक सुप्रिया कुसाळे यांचे ग्रंथभेट देऊन अभिनंदन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) प्रकाश कुसाळे, डॉ. यास्मिन आत्तार, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. शशीभूषण महाडिक, डॉ. पंकज पवार.


संशोधक सुप्रिया कुसाळे यांचे संशोधनाविषयी पत्रकार परिषदेत सादरीकरण (शॉर्ट व्हिडिओ)

शिवाजी विद्यापीठाच्या संशोधक सुप्रिया कुसाळे यांचे कुलगुरूंकडून अभिनंदन

 कोल्हापूर, दि. १७ डिसेंबर: असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज, नवी दिल्ली (एआययू) यांच्यातर्फे आयोजित राष्ट्रीय संशोधन स्पर्धा 'अन्वेषण'मध्ये शिवाजी विद्यापीठातर्फे सहभागी झालेल्या संशोधक विद्यार्थिनी कु. सुप्रिया प्रकाश कुसाळे (वळीवडे) यांनी संशोधित केलेल्या सेंद्रिय खतास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. आज कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या उपस्थितीत शिवाजी विद्यापीठात तिला गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठात आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तिच्या संशोधनाविषयी सादरीकरण करण्याची संधीही तिला देण्यात आली.

Supriya Kusale

संपूर्ण भारतातून आलेल्या विविध व नाविन्यपूर्ण प्रवेशिकांमधून राजाराम महाविद्यालयात संशोधन करीत असलेल्या सुप्रिया कुसाळे यांच्या 'इकोफ्रेंडली अँड कॉस्ट एफेक्टिव्ह प्रॉडक्शन ऑफ फायटेज प्रोड्युसिंग बायोईनॉक्लन्ट अँड इस्ट इफिकसी इन फील्ड' या संशोधनास वाखाणण्यात आले. त्यांनी पर्यावरणपूर्वक, किफायती फायटेज तयार करण्याची क्षमता असलेले जैविक खत तयार केले आहे. गेली तीन वर्षे सुरु असलेल्या या संशोधनांतर्गत या खतामुळे ऊस, मका, मिरची, आले, हळद, ज्वारी, व भात या पिकांची गुणवत्ता वाढण्यासोबतच मातीची सुपीकता देखील वाढल्याचे दिसून आले.

गेल्या जानेवारीत मुंबई येथे झालेल्या आंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धा 'आविष्कार'मध्ये  सुप्रिया शिवाजी विद्यापीठाकडून सहभागी झाल्या. त्यांच्या संशोधनास तेथे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. फेब्रुवारीत मुंबई येथेच झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतही या संशोधनास प्रथम क्रमांक मिळाला. भोपाळ येथे मार्चमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सुप्रिया कुसाळे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार होत्या. परंतु कोविड-१९ च्या परिस्थितीमुळे सदर स्पर्धा डिसेंबरमध्ये ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली. बुधवार, दि. १६ डिसेंबर रोजी स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.

या संशोधनासाठी तिला शिवाजी विद्यापीठातील डॉ. पंकज पवार, डॉ. शशीभूषण महाडिक, राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अण्णासाहेब खेमनर, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख व मार्गदर्शक डॉ. यास्मिन आत्ता, प्रा. शोभना भोसले व प्रा. शहनाज फारुकी यांचे मार्गदर्शन लाभले. आई सौ. शोभा,  वडील श्री. प्रकाश कुसाळे व भाऊ प्रतीक व प्रा. गणपती सूर्यवंशी यांची साथ मिळाली.