कोल्हापूर, दि. १७ डिसेंबर: कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ
मेडिकल सायन्सेस (डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी) समवेत करण्यात आलेल्या सामंजस्य कराराचा लाभ शिवाजी विद्यापीठातील
विद्यार्थ्यांसह संशोधकांना मोठ्या प्रमाणात होईल, अशी अपेक्षा शिवाजी
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज कराड येथे व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठ आणि कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी यांच्या दरम्यान आज सकाळी कराड येथे सामंजस्य करार
करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृष्णा इन्स्टिट्यूटचे कुलपती डॉ. सुरेश
भोसले, शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, डॉ. अतुल भोसले उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, या सामंजस्य करारामुळे दोन्ही संस्थांमधील संशोधक
शिक्षक व विद्यार्थी यांच्यादरम्यान संशोधकीय सहकार्य निर्माण होऊ शकणार आहे.
विशेषतः शिवाजी विद्यापीठातील एम.एस्सी. इन मेडिकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटच्या
विद्यार्थ्यांना संशोधनासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधांची उपलब्धता होऊ शकेल.
यामध्ये न्यूरोसायन्स, कर्करोग संशोधन इत्यादीविषयक संशोधन करता येईल. त्याचप्रमाणे
कृष्णा इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना बायोइन्फॉर्मेटिक्स, मेडिकल इन्फॉर्मेशन
मॅनेजमेंट, फार्मास्युटिकल मायक्रोबायॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, पश्चिम घाटातील जैवविविधता
तसेच सामाजिक शास्त्रांमधीलही वैद्यकीय क्षेत्राला पूरक अशा क्षेत्रांबाबत अभ्यास
करणे शक्य होईल. त्याखेरीज फॅकल्टी-स्टुडंट्स एक्स्चेंज, विविध संयुक्त शैक्षणिक व
संशोधकीय उपक्रम, संयुक्त प्रकाशने, डाटा एक्स्चेंज, ग्रंथालयीन सहकार्य अशा अनेक
दिशांनी ही सहकार्यवृद्धी होणे अभिप्रेत आहे.
कृष्णा इन्स्टिट्यूटचे कुलपती डॉ. भोसले म्हणाले, शिवाजी विद्यापीठासमवेत होत
असलेला हा सामंजस्य करार दूरगामी महत्त्वाचा असून त्याचा दोन्ही संस्थांना संशोधनात्मक
दृष्टीने मोठा लाभ होणार आहे. भविष्यात या माध्यमातून दोन्ही संस्थांच्या दरम्यान
सहकार्याची आणखी नवनवीन क्षेत्रे उघडली जातील आणि हे सहकार्य अखंडित राहील, अशी
अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि कृष्णा इन्स्टिट्यूटचे
कुलसचिव डॉ. एम.व्ही. घोरपडे यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. यावेळी
कृष्णा इन्स्टिट्यूटचे अतिरिक्त संचालक (संशोधन) डॉ. डी.के. अग्रवाल, अलाईड सायन्सेस
विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.सी. काळे, डी.ए. माने, समन्वयक डॉ. के.डी. सोनवणे
उपस्थित होते. सुरवातीला डॉ. एस.व्ही. काकडे यांनी स्वागत केले. डॉ. डी.के.
अग्रवाल यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment