कोल्हापूर, दि. १५
डिसेंबर: विविध रोगांना
कारणीभूत असणाऱ्या जीवाणूंमध्ये निर्माण होत असलेली प्रतिजैविक प्रतिकारक्षमता ही
आज जागतिक स्तरावर भेडसावणारी एक प्रमुख आरोग्यविषयक समस्या आहे. या अनुषंगाने
शिवाजी विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्र अधिविभागाच्या संशोधकांनी अत्यंत मूलभूत
स्वरुपाचे संशोधन केले असून जीवाणूंमधील ही प्रतिजैविक प्रतिकारक्षमता निष्प्रभ
करणे शक्य असल्याचे सिद्ध केले आहे. या संदर्भातील शोधनिबंध आंतरराष्ट्रीय
विज्ञानपत्रिकांतून प्रसिद्ध झाले आहेत.
Dr. K.D. Sonawane |
शिवाजी विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्र अधिविभागातील संशोधक प्रा. डॉ. के.डी.
सोनवणे आणि त्यांच्या चमूने अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स (ए.एम.आर.) या संदर्भात हे
संशोधन केले आहे. त्याविषयी माहिती देताना डॉ. सोनावणे म्हणाले, साधा ताप किंवा
सर्दी झाली तरी ती कशामुळे झाली, याचा विचार न करता अँटिबायोटिक (प्रतिजैविक) औषधे
घेतली जातात. ही सवय घातक आहे. मुळात आपल्याला झालेला संसर्ग या जीवाणूमुळे आहे,
विषाणूमुळे आहे की अन्य बुरशीजन्य स्वरुपाचा आहे, हे वैद्यकीय तपासणीतून निष्पन्न
होत असते. त्यानंतर औषधाचा प्रकार व मात्रा डॉक्टर ठरवित असतात. ती औषधे अगर
प्रतिजैविके त्याच प्रमाणात घ्यावयाची असतात. पण, तसे न करता लोक स्वतःच स्वतःचे
उपचार करू लागतात आणि त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम संभवतात. केवळ जीवाणूजन्य
आजारांवर प्रतिजैविके उपयुक्त असतात, मात्र सर्वच आजारांवर त्याचा प्रयोग केला
जातो, हेही घातक आहे. या औषधांचा अतिप्रमाणात अगर अयोग्य वापर केला असता विविध
रोगांना कारक असणाऱ्या सूक्ष्मजीवांमध्ये प्रतिजैविक प्रतिकारक्षमता
(अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स) निर्माण होते. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य
संघटनेने सन २०१४मध्ये प्रकाशित एका अहवालात, सध्या वापरात असलेली प्रतिजैविके काही
वर्षांनंतर लाभदायक अगर परिणामकारक ठरू शकणार नाहीत, असा इशारा दिला आहे. या
जागतिक स्तरावर निर्माण होऊ घातलेल्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन या विषयावरील
संशोधन सूक्ष्मजीवशास्त्र विभागाद्वारे हाती घेण्यात आले.
काय आहे संशोधन?
डॉ. सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवाणूंमध्ये ही प्रतिजैविक
प्रतिकारक्षमता कशी निर्माण होते, या दिशेने संशोधन केंद्रित करण्यात आले. या
अंतर्गत जीवाणूंत प्रतिरोध निर्माण करणारे एक नवीन वितंचक (एन्झाईम) आढळून आले.
त्या एन्झाईमचा सर्वंकष अभ्यास या संशोधनांतर्गत करण्यात आला. इतकेच नव्हे, तर
त्या एन्झाईमचा प्रतिरोध करू शकणाऱ्या सेंद्रिय रेणूचाही (इन्हिबिटर)
सूक्ष्मजीवशास्त्रीय व बायोइन्फॉर्मेटिक्स पद्धतींचा वापर करून शोध लावण्यात यश
प्राप्त झाले आहे. त्यामुळे भविष्यात एखाद्या रोगाच्या जीवाणूत प्रतिजैविक
प्रतिकारक्षमता आढळल्यास त्यावर मात करण्यासाठी सदर संशोधन अत्यंत प्रभावी ठरणार
आहे. सदरबाबतचे प्रोटीन सिंथेसिस व मॉलेक्युलर जेनेटिक स्तरावर देखील संशोधन
करण्यात आले आहे.
सदर संशोधन जर्नल ऑफ सेल्युलर बायोकेमिस्ट्री, ब्राझिलियन जर्नल ऑफ मायक्रोबायोलॉजी,
प्लॉस वन, जर्नल ऑफ प्लँट बायोकेमिस्ट्री अँड बायोटेक्नॉलॉजी, जर्नल ऑफ प्रोटीन्स
अँड प्रोटीओमिक्स आणि जर्नल ऑफ इथनोफार्मोकोलॉजी इत्यादी संशोधन पत्रिकांतून
प्रकाशित झाले आहे. डॉ. सोनवणे यांच्यासमवेत डॉ. ऋषिकेश परुळेकर, डॉ. अस्मिता
कांबळे, डॉ. एस.आर. वाघमारे, डॉ.एन.एच. नदाफ आणि सागर बराले या
संशोधकांचे यात योगदान आहे.
संशोधनाची उपयुक्तता
शिवाजी विद्यापीठात झालेले हे संशोधन जीवाणूंत निर्माण होत असलेल्या
प्रतिजैविक प्रतिकारक्षमता समजून घेणे व निष्प्रभ करण्याच्या दृष्टीने जागतिक
स्तरावर अत्यंत उपयुक्त आहे. मानव, प्राणी व वनस्पती यांच्यावरील विविध रोगांवरील
उपचारांसाठी प्रभावी ठरणारे आहे, असेही डॉ. सोनवणे यांनी सांगितले.
भविष्यवेधी संशोधन: कुलगुरू डॉ. शिर्के
डॉ. के.डी. सोनवणे आणि त्यांच्या संशोधक चमूने जागतिक स्तरावर जगाला भेडसावू
शकणाऱ्या एका महत्त्वपूर्ण आरोग्य समस्येचा वेध घेतला आहे. जीवाणूंमध्ये निर्माण
होणारी प्रतिजैविक प्रतिकारक्षमता ही भविष्यात मानवी आरोग्यासमोरील मोठी
आव्हानात्मक समस्या आहे. त्यावरील उपायांसंदर्भातील हे संशोधन भविष्यवेधी
स्वरुपाचे आहे. या पुढील काळातही या संशोधकांकडून असेच संशोधन होत राहावे, यासाठी
विद्यापीठाचे सर्वोतोपरी सहकार्य त्यांना लाभत राहील, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ.
डी.टी. शिर्के यांनी व्यक्त केली.
Dear Alok sir,
ReplyDeletePlease provide me the link connecting top universities list.