Saturday, 1 July 2023

शिवाजी विद्यापीठात या शैक्षणिक वर्षापासून क्रीडाविषयक पदवी अभ्यासक्रम

 क्रीडा कारकीर्द घडविण्यास इच्छुक विद्यार्थ्यांसाठी खास बी.ए. (स्पोर्ट्स): कुलगुरू डॉ. शिर्के

शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागातील अंतर्गत क्रीडा सुविधा

शिवाजी विद्यापीठ मैदानावर आयोजित स्पर्धेवेळी क्रीडा संचलन (संग्रहित छायाचित्र)

शिवाजी विद्यापीठातील अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅक




कोल्हापूर, दि. १ जुलै: शिवाजी विद्यापीठात चालू शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून बी.ए. (स्पोर्ट्स) हा क्रीडाविषयक नवीन त्रैवार्षिक पदवीस्तरीय अभ्यासक्रम चालू करण्यात येत आहे, अशी माहिती विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी आज येथे दिली.

डॉ. बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागामार्फत स्पोर्ट्स (क्रीडा) या विषयातील पदवीस्तरीय अभ्यासक्रम चालू करण्याचा प्रस्ताव विद्यापीठाच्या अधिकार मंडळांसमोर सादर करण्यात आला होता. त्या प्रस्तावाला मान्यता प्राप्त झाली असून सन २०२३-२४पासून अधिविभागातच हा अभ्यासक्रम या वर्षापासून सुरू करण्यात येत आहे. क्रीडा क्षेत्रामध्येच व्यावसायिक कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बारावीनंतर लगेचच हा अभ्यासक्रम उपलब्ध होत आहे. पदवीच्या शिक्षणानंतर बी.पी.एड., एम.पी.एड. अभ्यासक्रम यापूर्वी उपलब्ध असले तरी राज्यात पदवी स्तरावर प्रथमच अशा स्वरुपाचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालेला आहे, हे या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य आहे. अभ्यासक्रमात शारीरिक शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाबरोबरच संगणक, सामाजिक मूल्यशिक्षण, संज्ञापन कौशल्य, शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडा पत्रकारिता, क्रीडा मानसशास्त्र, व्यक्तीमत्त्व विकास, सामाजिक शिक्षण, आहार व पोषण, योगा व ध्यानधारणा, पर्यावरणशास्त्र, आधुनिक क्रीडा प्रशिक्षण, क्रीडा व्यवस्थापन या विषयांसह क्रीडाविषयक व्यापक प्रात्यक्षिक ज्ञानाचा समावेश आहे.

विद्यापीठामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडासुविधा उपलब्ध असून अध्यापनासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक व शिक्षकही आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना त्यांची व्यावसायिक क्रीडा कारकीर्द घडविण्याची संधी प्राप्त होणार आहे. या अभ्यासक्रमास प्रविष्ट विद्यार्थ्यांना क्रीडा कारकीर्द घडविण्याबरोबरच शारीरिक शिक्षणामधील पुढील अभ्यास व संशोधन करण्याच्या संधी तर आहेतच; त्याशिवाय, क्रीडा प्रशिक्षण, योगा, शारीरिक तंदुरुस्ती, फिजिओथेरपी, आहार इत्यादी क्षेत्रांमध्येही नोकरी व व्यवसायाच्या संधी आहे. सदर अभ्यासक्रमाविषयी अधिक जाणून घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी क्रीडा अधिविभागाशी ०२३१- २६०९२६६/६७ या दूरध्वनी क्रमांकावर (सार्वजनिक सुटीचे दिवस वगळून) संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. बनसोडे यांनी केले आहे.

 

क्रीडा क्षेत्रात कारकीर्द घडविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त संधी

शिवाजी विद्यापीठ सुरू करीत असलेला बी.ए. (स्पोर्ट्स) हा अभ्यासक्रम म्हणजे क्रीडा क्षेत्रात कारकीर्द घडविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त संधी आहे, असे मत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडापटू घडविण्याचा निर्धार केला आहे. चालू वर्षी विद्यापीठाचे सहा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत. यापुढील काळात ही संख्या वाढत जाऊन या भूमीतून ऑलिंपिकपटू घडविण्याचाही मानस विद्यापीठ बाळगून आहे. त्या दृष्टीने पदवी स्तरावरील क्रीडा अभ्यासक्रम हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. आवडीचा खेळ खेळत राहण्याबरोबरच पदवी सुद्धा देणाऱ्या या अभ्यासक्रमाचा इच्छुक क्रीडापटूंनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment